पॉवरलिफ्टिंगमधील सुवर्णकन्या - संपदा नागवेकर

विवेक मराठी    19-Jan-2022
Total Views |
@प्रज्ञा जांभेकर
वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीला आदर्श मानून तिच्याप्रमाणे यश संपादन करावे, हा ध्यास उराशी बाळगून कठोर मेहनत करणारी आणि यश गाठणारी संपदा नागवेकर हिची राष्ट्रीय युवा दिनानिमित्त खास मुलाखत घेतली. हाताला झालेल्या दुखापतीमुळे संपदाला वेटलिफ्टिंगऐवजी पॉवरलिफ्टिंग निवडावं लागलं, पण ती खचली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 63 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावलं.

sports
 
लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीचा पेहराव परिधान केलेल्या संपदा नागवेकरने इस्तंबूल इथे गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं, तेव्हा तिला ओळखणार्‍या कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. तिने तिची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिमाखात जिंकली आणि सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. स्कॅट, बेंच आणि डेडलिफ्ट या प्रकारात तिने 385 किलोग्रॅम वजन उचलत चमकदार कामगिरी केली होती.
 
 
2000 साली कर्णम मल्लेश्वरीने ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमधलं पदक मिळवून दिलं, तेव्हा संपदा फक्त तीन वर्षांची होती आणि आज 20 वर्षांनंतर संपदा पॉवरलिफ्टिंगमध्ये यश मिळवताना दिसत आहे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. मोठं होताना तिने मल्लेश्वरीचाच आदर्श कळत-नकळत ठेवला होता.
 
 
युवा दिनानिमित्त पॉवरलिफ्टर संपदा नागवेकरची मुलाखत घ्यायला मी मुंबईत वडाळा इथे साप्ताहिक विवेकच्या कार्यालयात गेले, तेव्हा रांगडा खेळ समजल्या जाणार्‍या पॉवरलिफ्टिंग खेळातली खेळाडू म्हणजे कोणीतरी पहिलवानी खाक्यातली मुलगी भेटेल असा माझा कयास होता, पण प्रत्यक्षात समोर उंच आणि हसतमुख संपदा आली आणि मूडही प्रसन्न झाला. तिच्याशी गप्पा मारताना तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं.
 
 
संपदा आधी टग ऑफ वॉर आणि कबड्डी हे सांघिक खेळ खेळायची, मात्र तिने वैयक्तिक खेळाकडे वळायचा निर्णय विचारपूर्वक घेतला. हाताला झालेल्या दुखापतीमुळे संपदाला वेटलिफ्टिंगऐवजी पॉवरलिफ्टिंग निवडावं लागलं, तरी ती हताश झाली नाही. आईवडिलांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे तिने नेटाने सराव सुरू ठेवला.
 

sports 
 
2017 साली पॉवरलिफ्टिंगमधली कारकिर्द सुरू करणार्‍या संपदाने अनेकदा जिल्हा, राज्य, विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावलं. तिने राज्यशास्त्रातून बीए केलं आहे. सध्या तिने शारीरिक शिक्षणातल्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
 
 
सध्या ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी तयारी करत आहे. ही स्पर्धा कोविडमुळे कधी होणार याबद्दल अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. इस्तंबूलमधलं हवामान खूप वेगळं होतं. त्यामुळे संपदाला तिथे खेळताना काही अडचणी आल्या. त्यामुळे ती आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करू नाही शकली, याबद्दल तिने खंत व्यक्त केली. त्या दृष्टीने तिने आता तयारी करायचं ठरवलं आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची तिची जिद्द अफलातून आहे.


sports
आजची युवा पिढी व्यसनाधीन होत आहे, सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. संपदा या सगळ्यापासून दूर राहून आपलं लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तिची मुलाखत त्याचमुळे युवा पिढीसाठी प्रेरणादायक ठरेलच, तसंच क्षेत्र कोणतंही असो, ध्येय गाठण्यासाठी शॉर्ट कट उपयोगाचा नाही आणि मेहनतीला पर्याय नाही, याची जाणीवही करून देईल यात शंका नाही. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला अनेक शुभेच्छा.
 
 
प्रज्ञा जांभेकर
9967063331