राजकीय क्षेत्रातील उगवता तारा ललिता जाधव

विवेक मराठी    19-Jan-2022   
Total Views |

bjp
यमगरवाडीची विद्यार्थिनी ते भारतीय युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी सदस्य असा प्रवास करणार्‍या ललिता जाधव .....
 
“महाविद्यालयीन वयातच मला जाणवलं की मला जे बदल करायचेत ते मी दोनच माध्यमांतून करू शकते - एक म्हणजे मॅनेजमेंटमध्ये जाऊन आणि दुसरं म्हणजे राजकारणात जाऊन. मॅनेजमेंटमध्ये जाण्यासाठी मी स्पर्धा परीक्षा देत असते. अभाविपमुळे राजकीय क्षेत्राच्या क्षमतेचाही मला प्रत्यक्ष अनुभव आला. मला या दोन्ही मार्गांनी जाऊन समाजात बदल करायचा आहे.” छोट्या चणीची ललिता जाधव तिच्या तुफानी एनर्जीत ठामपणे आपली मते मांडते, तेव्हा तिच्या ध्येयाचा कॅनव्हास किती मोठा आहे ते स्पष्ट होत जाते. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सा. विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारतीय युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी सदस्य ललिता जाधवची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.
ललिता जाधव मूळची लातूरची. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून आलेल्या ललिताचा शालेय शिक्षणाचा मार्ग यमगरवाडीच्या एकलव्य आश्रमशाळेमुळे साध्य झाला. अर्थात त्यामागे तिची शिक्षणाविषयीची ओढ आणि तिच्या आईचा पाठिंबा या गोष्टीही तितक्याच कारणीभूत ठरल्या. यमगरवाडीच्या जडणघडणीत तिच्या सामाजिक जाणिवा समृद्ध होत गेल्या. तिने जिद्दीने महाविद्यालयीन उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यातही अनंत अडचणींचा सामना करावा लागला. आधी तर रस्ताच चुकला. इंजीनिअरिंगचे स्वप्न पाहणार्‍या ललिताने एमसीव्हीसीला प्रवेश घेतला. चुकीचा पर्याय निवडल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा डिप्लोमा आणि डिग्री असा प्रवास नव्याने करावा लागला. डिप्लोमापर्यंत स्कॉलरशिप मिळत होतीच. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर लोणेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता. महाविद्यालय शासकीय आणि ऑटोनॉमस होते, पण 25000 रुपये शुल्क भरायचे होते. त्या वेळी मात्र ललिता हताश झाली. पण आई नेहमीसारखीच पाठीशी ठाम राहिली. ललिताच्या हुशारीची जाणीव असलेल्या ताईने दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. कुटुंबातील अन्य सदस्यही पाठीशी उभे राहिले. ललिताने या सगळ्यांचा विश्वास सार्थकी लावला आणि इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.


 
याच दरम्यान नकळत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी ललिताकडे आली. परिषदेच्या छात्रसंसदेला गेलेल्या ललिताला राजकारणाच्या माध्यमातून आपण समाजातील प्रश्न मांडू शकतो, याची जाणीव झाली. त्यानंतर झालेल्या परिषदेच्या अधिवेशनांमध्ये ललिताने आपल्या महाविद्यालयातील समस्या मांडल्या. शेवटच्या वर्षात आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने तिने हॉस्टेलमधील विविध समस्यांविरुद्ध शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. 5000 विद्यार्थिनी तिच्या या आंदोलनात सहभागी झाल्या. त्या आंदोलनाचा योग्य तो परिणामही दिसून आला. आपण ठामपणे बोललो तर आपल्यामागे अनेक जण ठामपणे उभे राहतात, हा अनुभव तिला आला. अशाच अनुभवांतून राजकीय क्षेत्राची ताकद तिच्या लक्षात येऊ लागली. समाजात बदल करायचा तर या क्षेत्रातच काहीतरी करून दाखवायला हवे, हे तिला कळून चुकले होते. सामाजिक प्रश्नांविषयीची तिला असलेली जाणीव आणि प्रश्न तडीस नेण्याची वृत्ती यामुळेच भारतीय युवा मोर्चात तिला जबाबदारी मिळाली.
 
‘संघर्ष करा आणि ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका’, तसेच ‘देशाचा विचार सर्वप्रथम करा’ या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे बीज ललिताच्या मनात खोलवर रुजले आहे. अशा विचारांच्या मार्गाने चालणार्‍या तरुणांची आजच्या राजकारणात खरी गरज आहे. त्यामुळे भविष्यात ललिता जाधव नावाचा तारा या राजकीय नभात तेजाने तळपू दे, अशा सदिच्छा या मुलाखतीच्या निमित्ताने मनात उमटल्या.

सपना कदम

गरवारे मधून पत्रकारितेचे पद्व्युत्तर शिक्षण. सध्या सा.विवेक येथे उपसंपादक म्हणून काम पाहतात. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.