व्यक्तीची मानसिकता ही त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा बायप्रोडक्ट असते असं म्हणतात आणि ती बदलण्याच्या दृष्टीने माणूस स्वतः प्रयत्न करत असतो, अथवा त्याच्याकडून नकळतपणे ते होत असते. परंतु त्यासाठी होणारे प्रयत्न हे कोणत्या माध्यमातून होत असतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. 'वाचन' हा तुमच्या मनपरिवर्तनाचा पाया मानला जात असला तरी त्याहूनही प्रभावी दृश्यमाध्यम म्हणून 'चित्रपट' महत्वाची भूमिका निभावतात.

भारतीय सिनेसृष्टीची सुरवात ही आदर्श मूल्य असणाऱ्या राजावर आधारित म्हणजेच 'राजा हरिश्चंद्र' ह्या चित्रपटाने झाली होती. पुढे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक चित्रपट आले. 'भारतीय जीवनमूल्ये' व 'संस्कृती' यास धक्का लागणार नाही व समाज प्रबोधनाचा विचार करूनच अनेक सिनेमांची निर्मिती झाली. परंतु , जसा जसा काळ पुढे सरकत गेला तशी तशी भारतीय मूल्य, संस्कृती आणि मूळ भारतीय तत्वज्ञान चित्रपटांतून हरवत गेले. पुढे भारतीय संस्कृतीला छेद देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आणि विशिष्ट अजेंडा घेऊनच चित्रपट निर्मिती होतोय की काय असा प्रश्न समाजाला पडू लागला. आणि तेव्हापासून चित्रपटाच्या विकृतीकरणाला रसिक प्रेक्षकांकडूनच विरोध होऊ लागला. मागील काही वर्षात आपण हे बघत आलो आहोत.
चित्रपटात विवादित सिन व डायलॉग घेऊन पूर्वप्रसिद्धी मिळवण्याचा नवीन ट्रेंड अलीकडे सुरू झाला. 'जितका चित्रपट विवादित तेवढा तो हिट' असे सुत्रच जणू तयार झाले. मग 100 कोटी क्लब , 200 कोटी क्लब अशी मानसिकता तयार झाली आणि हे मनोरंजनाचे माध्यम केवळ कमाई आणि विशिष्ट दृश्य समाजमनावर लादण्याचे केंद्र होऊन बसले. ज्यामुळे आज समाजात विविध फॅशन, रूढी, प्रथा, शैलींचा ठसा उमटवण्यात आल्याचे आपण पाहतो.
या प्रकारामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील ग्रामीण भागातील नवख्या कलाकारांवर अन्याय झाला. हातात अँड्रॉइड फोन्स आल्यापासून लघुपट निर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढली, मात्र त्यांना ते मांडण्यासाठी सादर करण्यासाठी व्यासपीठ मात्र अतिशय कमी. असलेच तर पुणे, मुंबई, नागपूर अश्या मेट्रो सिटीतच कार्यक्रमांचे आयोजन होते. ग्रामीण भागातील तरुणांना त्याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे एका अर्थाने केवळ शहरांकडे केंद्रित झालेली सिनेसृष्टी ग्रामीण भागातील तरुणांवर अन्यायकारक ठरत आहे. यावर समाधान म्हणून आता देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलचे महत्व अधोरेखित होते.
१५ व १६ जानेवारी रोजी जळगांव शहरात असा पहिला शॉर्टफिल्म फेस्टिवल संपन्न झाला जिथे सर्वाधिक फिल्म ग्रामीण भागातून आल्या होत्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर अन्य राज्यातूनही दोन फिल्मचा सहभाग या फेस्टिवलमध्ये नोंदवला गेला. प्रथमच आयोजित आणि भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणार्या विषयांची मर्यादा असतांनाही एकुण ६० लघुपटांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. यात सर्वात आकर्षणाची बाब ठरली संस्कृत भाषेतून सादर केलेली 'अंबाली' ही फिल्म. जळगांव जिल्ह्यातील आडगाव सारख्या डोंगराळ भागातील एका तरुणाने ही फिल्म बनवली होती. त्याचप्रमाणे वरडी सारख्या खेड्या गावातील शेतकरी तरुणाने एकमेव अँनिमेशन फिल्म 'आब्रू' निर्मित करून सहभाग नोंदवत रसिकांची मने जिंकली. एकट्या जळगाव जिल्ह्यातून २५ फिल्म्स या फेस्टिवल मध्ये सहभागी झाल्या होत्या ही एक विशेष बाब आहे. एका विशिष्ट अजेंड्यासाठी आयोजित होणारे कार्यक्रम, त्यातील पुरस्कार देताना होणारे राजकारण, सातत्याने शहरी भागास दिले जाणारे प्राधान्य, ग्रामीण महाराष्ट्राकडे होणारे दुर्लक्ष यामुळे एका वर्गावर अन्याय होत होता, ज्याला देवगिरी शॉर्टफिल्मने एक प्रकारे न्याय मिळवून दिला. जळगावात पार पडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवातून हे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे.

ग्रामीण भागातील तरुण कलाकार या बीजारोपणचे साक्षीदार ठरले आहेत. या फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म ठरली ती चाळीसगाव येथील निर्माते सुनील अहिरे यांची 'अ...' ही फिल्म. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमातील स्टोरी, पटकथा, डायलॉग, दिग्दर्शन सर्व बाबी उत्कृष्ट ठरल्या. द्वितीय पुरस्कार स्नेहल काबे यांच्या 'कविता' या फिल्मला मिळाला तर तृतीय पुरस्कार प्रियांका वाघमारे यांच्या 'होप-वे' या फिल्मला. सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म म्हणून अस्लम शेख यांच्या 'तासिका' या फिल्मचा सन्मान करण्यात आला. या फिल्म ला विविध प्रकारच्या तीन पुरस्कार मिळाले. समाजाभिमुख विचार करून, मोठ्या संघर्षरत प्रवासातून लॉक डाऊन च्या काळात या सर्व फिल्मची निर्मिती झाली आहे. महोत्सवात उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन अनेकांना गौरवण्यात आले. कारण या महोत्सवाचा उद्देशच मुळात सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना सन्मानित करणे असा आहे. आगामी काळात आपल्याला या देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलचे रूपांतर वटवृक्षात झालेले पाहायला मिळेल व अनेक कलाकार यातून घडतील यात शंकाच नाही. भारतीय मुल्यांवर आधारित चित्रपट सृष्टीचा वैभवशाली इतिहासाची अनुभूती भविष्यात पुन्हा लवकरच अनुभवायला मिळेल.. कारण बीजारोपण योग्य पद्धतीने सुरु झालयं...।
- अनुप देशपांडे, संभाजीनगर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी