निस्सीम देशभक्त गाइदन्ल्यू

25 Jan 2022 19:00:16
 @शोभा जोशी
निस्सीम देशभक्त, प्रखर हिंदू धर्माभिमानी, पराक्रमी, निष्ठावान, संस्कृतिरक्षक गाइदन्ल्यूंना होत्या! वनवासी कल्याण आश्रमानेसुद्धा, त्यांचं देशासाठीचं योगदान लक्षात घेऊन त्यांचं चरित्र संपूर्ण देशभर प्रसारित केलं. २०१४ ते २०१५ हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं. या वर्षीपासून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस 'नारी शक्ती दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे.

Rani Gaidinliu

एकदा एका इंग्रजाने स्वामी विवेकानंदांना विचारलं, "तुमच्या देशातील स्त्रिया पुरुषांशी हस्तांदोलन का करत नाहीत?"
स्वामीजी म्हणाले, "तुमच्या देशातील सामान्य माणूस तुमच्या राणीशी हस्तांदोलन करतो?"
"नाही." त्याने उत्तर दिलं.
स्वामीजी म्हणाले, "आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी असते."
ईशान्य भारतातील निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या सात राज्यांपैकी मणिपूर राज्यात उहूसैन व मकरू या नद्यांमध्ये काला नागा पर्वतांची रांग आहे. या रांगांमध्ये रोंगमै नागा नावाची जनजाती राहाते. तेथील लंकोवा गावामध्ये २६ जानेवारी १९१५ रोजी गाइदन्ल्यूंचा जन्म झाला. गाइदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखवणारी.

'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीप्रमाणे त्या लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या, दृढ इच्छाशक्ती असलेल्या, प्रतिभासंपन्न, चिंतनशील, तीक्ष्ण बुद्धीच्या होत्या. लहानपणापासूनच इंग्रजांचे अत्याचार, आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिस्त्यांचं आक्रमण त्या पाहत होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं, रूढी, परंपरा टिकवून ठेवणं, अंधश्रद्धा दूर करणं, तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं.

त्यांचा चुलत भाऊ हैपोऊ जादोनांग याने ' हेरका' हे धार्मिक आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन हळूहळू स्वातंत्र्यआंदोलनाकडे झुकलं. इंग्रजांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी १९३१मध्ये जादोनांगला कैद करून, त्याच्यावर खटला चालवून २९ ऑगस्ट १९३१ रोजी त्याला फाशी दिलं. त्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाची सूत्रं अवघ्या १६व्या वर्षी गाइदन्ल्यूकडे आली. लहान वयातच त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली. 'हम आजाद लोग है। गोरे हमपर राज नही कर सकते।' अशी घोषणाच त्यांनी दिली.

 
स्थानिक लोकांना आंदोलनात ओढण्यासाठी त्यांनी इंग्रजांना टॅक्स देऊ नका असं सांगितलं. इंग्रजांच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांनी टॅक्स देणं बंद केलं. इंग्रजांनी लोकांवर कारवाई सुरू केली. गाइदन्ल्यू भूमिगत राहून इंग्रजांवर हल्ले करत राहिल्या. त्यांच्या या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज जेरीस आले. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. पण त्या हाती लागल्या नाहीत. त्यांना पकडून देणार्याीला इंग्रजांनी २०० रुपयांचं, नंतर ५०० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं, तसंच त्यांची माहिती देणार्यांचा कर १० वर्षं माफ केला जाईल अशीही लालूच दाखवली. पण त्याचाही उपयोग झाला नाही. त्यांच्या या लढ्याचा प्रभाव आसाम, मणिपूर, नागालॅँड या राज्यांवरही होता.
 
१६ फेब्रुवारी १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर झालेली लढाई 'हैग्रम की लडाई' म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या साथीदारांसह त्यांनी पोलोमी इथे आउट पोस्ट बनवायला सुरुवात केली. त्याच वेळी इंग्रजांनी मोठं सैन्य पाठवून त्यांच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यात त्या पकडल्या गेल्या. त्यांना कोहिमाला पाठवलं गेलं. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. त्यांनी १४ वर्षं तुरुंगवास भोगला. या १४ वर्षांत त्यांना अनेकदा निरनिराळ्या तुरुंगांत हलविण्यात आलं.

१९३७मध्ये स्व. पं. नेहरूंना त्यांचा पराक्रम कळला. त्यांनी शिलॉँगच्या तुरुंगात त्यांची भेट घेतली. 'आपण तर नागांच्या राणी आहात' असं म्हणून त्यांनी त्यांचा गौरव केला. गाइदन्ल्यूंची तुरुंगातून सुटका करावी ही नेहरूंची मागणी इंग्रजांनी धुडकावून लावली. त्यांना सोडलं तर त्या पुन्हा उठाव करतील, ही इंग्रजांना भीती होती.

 
स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतरही त्या समाजहिताकरिता संघर्ष करीत राहिल्या. १९७२मध्ये त्यांना 'ताम्रपट स्वतंत्रता सेनानी' पुरस्कार देण्यात आला. १९८२मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
 
वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्याशी त्यांचा १९७८मध्ये संपर्क झाला. गाइदन्ल्यूंच्या इच्छेनुसार, बाळासाहेबांनी निरनिराळ्या गावांतील कल्याण आश्रमाच्या शाळांमध्ये आणि छात्रावासात हिंदू नागा मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
 
१९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई इथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, "आपण आपल्या देशाचं, धर्माचं, भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे."

अशा या निस्सीम देशभक्त, प्रखर हिंदू धर्माभिमानी, पराक्रमी, निष्ठावान, संस्कृतिरक्षक गाइदन्ल्यूंना १७ फेब्रुवारी १९९३ रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकीट काढलं. कल्याण आश्रमानेसुद्धा, त्यांचं देशासाठीचं योगदान लक्षात घेऊन त्यांचं चरित्र संपूर्ण देशभर प्रसारित केलं. २०१४ ते २०१५ हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं. या वर्षीपासून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस 'नारी शक्ती दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे.
 
शोभा जोशी
 
जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम पुणे महानगराची कार्यकर्ती.
 
9422319962
Powered By Sangraha 9.0