पिकांच्या रोगावरील प्रभावी संशोधन करणारे डॉ. यशवंत नेने

08 Jan 2022 16:31:04
 @डॉ. क.कृ. (नाना) क्षीरसागर 9422080865
डॉ. यशवंत नेने यांनी कृषिसंशोधन क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. डॉ. नेने यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी केलेला जगभरातील 47 देशांचा प्रवास, त्यांनी मिळविलेली सुवर्णपदकं व अन्य विशेष सन्मान, त्यांनी भूषविलेली अनेक पदं व विविध संस्थांचं सन्माननीय सदस्यत्व, मार्गदर्शन केलेल्या 12 पी.एच.डी. आणि 14 एम.एस्सी. विद्यार्थ्यांची यादी या सर्वांचा समावेश करता येऊ शकेल. तरीही डॉ. नेने यांच्या मनाला आज एक खंत सतावत असते, ती म्हणजे अजूनही आमच्या वनस्पती विकृतिशास्त्रातील अनेक वैज्ञानिकांना पाश्चात्त्यांवरच्या परावलंबित्वाचं जोखड झुगारून देता येत नाही.

krushi

भारतीय भूमिका आणि परिसरातील पौर्वात्य देशांना अन्य विज्ञान शाखांप्रमाणेच कृषिविज्ञान शाखेलाही उज्ज्वल परंपरा लाभली आहे. आधुनिक शेती-तंत्र आणि विज्ञान यांना या वारशाची जोड लाभली, तर या क्षेत्रात देशाला अग्रेसरत्व मिळेल. भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीला अनुरूप कृषिविज्ञानाचा विकास व्हायला हवा, असा दृष्टीकोन आता दिवसेंदिवस मान्य होऊ लागला आहे. आधुनिक कृषि-तंत्र-विज्ञानाचा स्वीकार या दृष्टीने केला, तर कृषिविकास शाश्वत ठरेल. भारतीय शेतकरी या दृष्टीकोनाचा मनापासून स्वीकार करतील, कारण त्यांच्या शेतीची नाळ अशा पारंपरिक शेतीशी जोडलेली राहते. आजच्या जागतिकीकरणाच्या झंझावातात आपली शेती त्यामुळेच सुरक्षित राहील. आपल्या कृषिपरंपरांचा वेध डोळसपणे घेऊन त्यातील सत्यता आणि व्यवहार्यता पडताळून पाहणे या विचाराने कार्य करणार्‍या मोजक्या कृषिवैज्ञानिकांमध्ये ज्यांच्या कामाची गणना करावी लागेल, अशा डॉ. यशवंत लक्ष्मण नेने या कृषि-वनस्पती विकृती शास्त्रज्ञाचा परिचय करून घेणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या आधुनिक वनस्पती-विकृतिशास्त्र (प्लँट पॅथालॉजी) या विषयात त्यांनी पारंगतता मिळवली ती निश्चितच गौरवास्पद आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्राचीन कृषिपरंपरेचा शोध घेण्याचा ध्यास घेतला आणि त्या क्षेत्रात उच्च शिखर गाठलं हेही वाखाणण्यासारखं आहे.
 
 
बालपण व शिक्षण
 
डॉ. नेने यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1936 रोजी मध्य प्रदेशातील ऐतिहासिक शहर ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचं घराणं मूळचं कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूर्वागडजवळच्या मावळंगे या लहानशा खेड्यातलं. मात्र 1885मध्ये त्यांचे पणजोबा उपजीविकेच्या शोधात तिथून बाहेर पडले आणि तत्कालीन होळकरांच्या इंदूर संस्थानात पोहोचले. त्यांचे वडील लक्ष्मणराव यांनी पुढे 1921मध्ये इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना लगेच शिंदे यांच्या संस्थानातील ग्वाल्हेर येथील सुप्रसिद्ध ‘सिंदिया’ प्रशालेत शिक्षण म्हणून नेमणूक मिळाली. त्यांच्या शिक्षणाचा लौकिक पाहून तेथील राजमहालात राजघराण्यातील शिक्षकपदही त्यांना मिळालं. त्यांच्यावर राजकुमार जिवाजीराव शिंदे यांना शिकविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जिवाजीराव हे माधवराव शिंदे या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे वडील. 1936मध्ये लक्ष्मणराव नेने यांना शिक्षण खात्यात बढती मिळून ते सर्व शासकीय शाळांचे साहाय्यक निरीक्षक झाले. 1944 साली ते मुख्य निरीक्षक झाले. शेवटी 1957मध्ये ते मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण खात्याचे निदेशक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या शैक्षणिक अध्यापनाचा वारसा पुढे चालत यशवंतरावांकडे आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी पंतनगर कृषी विद्यापीठात संशोधनाबरोबरच अध्यापनाचंही कार्य केलं. यशवंतरावांची आई ग्वाल्हेरच्याच बर्वे घराण्यातल्या. यशवंतरावांना पाच भावंडं होती. चार बहिणी आणि एक भाऊ. त्यांचे हे कुटुंबीय इंदोरला स्थायिक झाले. यशवंतरावांची कन्या आता पुण्याच्या सरदार रास्त्यांच्या कुटुंबाची सून आहे, तर चिरंजीव वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असून अमेरिकेतील टेक्सास राज्यामधील डलास या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. यशवंतरावांचं शालेय शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झालं. नंतर वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी त्या वेळी ग्वाल्हेरमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी शाळेतल्या त्यांच्या स्काउट, नाटक, संगीत, हॉकी, क्रिकेट, एन.सी.सी., अशा अनेकविध क्षेत्रांतील आवडीच्या कामांकडे नंतर दुर्लक्ष केलं आणि अभ्यासाला वाहून घेतलं. 1955मध्ये त्यांनी बी.एस्सी. (कृषी) ही पदवी मिळविली. त्या परीक्षेत त्यांना आग्रा विद्यापीठाचे कुलगुरू पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचं सुवर्णपदकही त्यांनी पटकावलं. पुढील उच्चपदवीसाठी त्यांनी कानपूरच्या कृषी महाविद्यालयात 1957 साली प्रवेश घेतला. तेथून त्यांनी उच्चसन्मान मिळवून एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यांचा विषय होता ‘वनस्पती विकृतिशास्त्र (प्लँट पॅथॉलॉजी)’. या पदवीचा अभ्यास करतानाच पुढच्या पीएच.डी.च्या पदवीच्या अभ्यासासाठी त्यांना 1960 साली अमेरिकेतील इलिनॉइस विद्यापीठाची Champaign-Urbana ही सन्माननीय अभ्यासवृत्ती (फेलोशिप) देण्यात आली. त्यानंतर 1974मध्ये पंतनगरच्या भारताच्या पहिल्या कृषी विद्यापीठाकडून वनस्पतिविकृतिशास्त्र विभागातील साहाय्यक प्राध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाली. या विद्यापीठाला इलिनॉइस विद्यापीठाच्या सहयोगाने जमीन मिळाली होती. ते लगेच विभागप्रमुखही झाले. मागोमाग त्यांना हैदराबादच्या इंटरनॅशनल क्रॉप्स रीसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमिएरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) या कोरडवाहू पिकांवर संशोधन करण्याच्या नामवंत आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ‘इंटरनॅशनल प्लँट पॅथॉलॉजिस्ट’ हे पद भूषविण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आलं. त्यानुसार ते या पदावर रुजू झाले. ‘इक्रिसॅट’ या संस्थेत त्यांनी 1974 ते 1989 अशी पंधरा वर्षं संशोधनाचं केलेलं योगदान अत्यंत मोलाचं होतं; परंतु त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या ‘प्राचीन कृषिविज्ञानाचा शोध’ या विषयाचा वेध घेण्यासाठी त्यांनी निवृत्तीच्या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या तारखेआधीच पाच वर्षं स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच कामात स्वत:ला आजपर्यंत झोकून दिलं आहे.
 
 
कृषिसंशोधक डॉ. नेने
 
 
संशोधकाला आपण हाती घेतलेल्या संशोधन विषयाबद्दल, संशोधन पद्धतीबद्दल आणि निष्कर्षांच्या सादरीकरणाबद्दल सखोल पूर्वाभ्यासाची गरज असते. त्याचप्रमाणे हाती घेतलेल्या कामाबद्दल व घेत असलेल्या निर्णयांबद्दल ठाम भूमिका घ्यावी लागते. डॉ. नेने 1960 साली इलिनॉइस येथे पीएच.डी.च्या संशोधनासाठी रुजू झाले. त्या वेळी त्यांना अनेक ज्येष्ठ जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या भेटींच्या व विचारांच्या आदानप्रदानाच्या संधी मिळाल्या. त्यातूनच त्यांचा संशोधकाचा पिंड तयार झाला. सुप्रसिद्ध विषाणुतज्ज्ञ डॉ. थॉर्नबेरी यांनी एक मौलिक सल्ला दिला की, चर्चासत्र, परिसंवाद अथवा लेखाद्वारे आपण मांडत असलेल्या आपल्या भूमिकेवर आपण ठाम राहिलं पाहिजे. त्या वेळी मतभेद उद्भवले आणि समोरची व्यक्ती वरिष्ठ असली, तरी आपलं मत संकोच न करता ठामपणे मांडलं पाहिजे. हा डॉ. नेन्यांसाठीचा पहिला धडा ठरला. त्याचप्रमाणे अशा अनुभवी मार्गदर्शनाचा त्यांनी पुढील जीवनप्रवासात सतत आदर राखला. डॉ. नेने यांचं संशोधन विविधांगी होतं. प्रामुख्याने भात, गहू आणि मका या तृणधान्यांवरील रोगांवर, त्याचप्रमाणे हरभरा, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, भुईमूग, जवस व वाटाणा या शेंगावर्गीय पिकांच्या रोगांवर आणि इतर पिकांवरच्या बुरशीजन्य जिवाणुजन्य व विषाणुजन्य रोग यांवर त्यांचा भर होता. जमिनीतील सूत्र-कृमी हाही त्यांच्या संशोधनाचा एक विषय होता.
 
 
krushi

भाताच्या ‘खैरा’ रोगावरील संशोधन
 
डॉ. नेने यांच्या संशोधनाला प्रारंभ झाला उत्तर प्रदेशाच्या नैनितालच्या सपाटीवरील तराईच्या भातक्षेत्रात, भाताच्या त्या वेळी गूढ वाटणार्‍या ‘खैरा’ या रोगाने. 1965च्या काळात या रोगामुळे दर वर्षी किमान 20 लाख रुपयांचं नुकसान होत असे. अनेक शेतकर्‍यांनी त्यामुळे भातशेतीच सोडली. चिकाटीच्या संशोधनातून डॉ. नेने यांनी सिद्ध केलं की खैरा रोगाचं मूळ मातीतील ‘झिंक’ या मूलद्रव्याच्या कमतरतेत सापडतं. उपाय म्हणन झिंक सल्फेटचा पूरक वापर प्रभावी ठरतो, हेही त्यांनी अनेक पथदर्शक प्रयोगांतून शेतकर्‍यांना दाखवून दिलं. शेतकर्‍यांचं त्यामुळे समाधान झालं. डॉ. नेने यांच्या या संशोधनाला ‘जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने’ (FAOने) अधिकृत मान्यता दिली. 1967मध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे संशोधन म्हणजे केवळ स्थानिक भातशेतीलाच लाभदायक आहे असं नाही, तर सर्व ठिकाणच्या भात-पीक-पोषणाचा हा महामंत्र आहे, अशी गौरवास्पद टिप्पणीही या पुरस्काराच्या वेळी केली गेली. या संशोधनाच्या आधारे नंतर, जपान, पाकिस्तान आणि फिलिपाइन्स या व इतर भातशेतीतील अग्रणी देशांमध्येही भातावरील या रोगावर संशोधन झालं आणि तेथेसुद्धा या रोगाचं अस्तित्व, रोगाचं निदान आणि त्यावरील उपाययोजना यासंबंधीचे प्रकल्प अंमलात आणले गेले. भाताप्रमाणेच इतर पिकांना ग्रासणारी झिंक द्रव्याची त्रुटी यावरही इतर संशोधकांना काम करण्याची लाभदायक प्रेरणा त्यातून मिळाली. ‘सेकंडरी अँड मायक्रोन्युट्रिअंट्स इन अ‍ॅग्रिकल्चर गाइड बुक कम डिरेक्टरी’ या एच.एल.एस. टंडन यांनी 1991 साली लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात या संशोधनाच्या गौरवास्पद प्रभावाची दखल घेण्यात आली आहे.
 
 
गव्हाच्या तांबेरा (गेरवा) आणि काजळ्या रोगावरील संशोधन
 
पंतनगर येथील गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठात काम करताना डॉ. नेने यांनी भारतीय कृषिविज्ञान संशोधन संस्था (न्यू दिल्ली) आणि लुधियाना येथील कृषी विद्यापीठातील इतर कृषि-संशोधकांच्या सहयोगाने ‘कल्याण सोना’ या सुप्रसिद्ध वाणावरील तपकिरी तांबेरा रोगावर संशोधन केलं. त्यातूनच या रोगाला प्रतिबंध करणार्‍या नव्या वाणाची निर्मिती झाली. डॉ. नेने यांनी कॅरबॉक्सिन (Vitavax) यासारख्या दैहिक बुरशीनाशकांचा (Systemic Fungicide) उपयोग गव्हाच्या काजळ्या रोगावर प्रभावी ठरतो, हे सिद्ध केलं. हे संशोधन करणारे ते पहिलेच भारतीय शास्त्रज्ञ आहेत. पुढे त्यांनी यासंबंधीच्या देशभरच्या प्रयोगांची आखणी केली आणि ते यशस्वीपणे पार पाडले. या उल्लेखनीय नेत्रदीपक यशामुळेच 'zineb' या बुरशीनाशक द्रव्याच्या वापराची शिफारस अधिकृतपणे करण्यात आली. पुढे डॉ. नेने यांनी ब्यटिझॉल (INDAR or RH-124) या बुरशीनाशकाच्या तपकिरी तांबेरा रोगाच्या प्रतिबंधक परिणामांचं यशस्वी प्रात्यक्षिकही दिलं. त्यासाठी त्यांना पंतनगर येथील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अमरिक सिंग यांचा सहयोग मिळाला. हे भारतातील यशस्वी प्रयोग पाहून अमेरिकेच्या Rohm & Haas या कंपनीने 'INDAR' या नावाच्या बुरशीनाशकाची व्यापारी तत्त्वावर भारतात निर्मिती करून ते बाजारपेठेत आणलं. डॉ. नेने यांच्या या संशोधनाची दखल घेऊन प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. ए.जी. अँडरसन यांनी 1971 साली डॉ. नेने यांना रौप्यपदक बहाल केलं. मेक्सिकोच्या गव्हाच्या सुधारित वाणांचा जगभर प्रसार करणार्‍यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मेक्सिकन सरकारने ही प्रथा सरू केली होती.
 
 
डॉ. नेने यांची विषाणु-शास्त्रज्ञ म्हणून कामगिरी
 
 
डॉ. नेने यांचा मूळ विषय वनस्पती विषाणुशास्त्र. विविध विषाणूंमुळे वनस्पती रोगग्रस्त होतात, याविषयीचे ते तज्ज्ञ असले आणि पिकांच्या अन्य प्रकारच्या रोगांचा त्यांचा अभ्यास असला, तरी त्यांनी डाळींच्या व कडधान्यांच्या विषाणुजन्य रोगांवर मूलभूत संशोधन केलं आहे. त्यांचा याविषयीचा अभ्यास सर्वांगीण स्वरूपाचा आहे. या रोगांसंबंधीचं व्यापक सर्वेक्षण, त्यातील समस्या, रोगांचं तौलनिक महत्त्व आणि रोगनियंत्रणाची उपाययोजना यासंबंधी अभ्यासिलेल्या माहितीच्या संकलनाचा एक स्वतंत्र प्रबंधच त्यांनी प्रकाशित केला आहे. त्यांनी काळा उडीद, मूग, तूर, सोयाबीन अशा डाळवर्गीय कडधान्यांच्या पीतपर्णी (यलो मोझेइक) या रोगाचं अचूक निदान केलं. उत्तर प्रदेशाच्या अनेक भागांमध्ये या रोगामुळे पिकांचं 50 ते 100 टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. त्यांच्या प्रयोगातून त्यांनी उडदाच्या रोगप्रतिकारक्षम अशा UPU-1 व UPU-2 दोन नव्या वाणांची निर्मिती केली. उत्तर प्रदेशातल्या सपाटीच्या शेतीक्षेत्रातील, सोयाबीन पिकावरील पीतपर्णी (यलो मोझेइक) या रोगाच्या रोगकारक विषाणुवाहक कीटकांच्या बंदोबस्तासाठीची कार्यप्रणाली त्यांनी तयार केली. रोगांची विषाणुवाहक असलेली पांढरी माशी या कीटकावर हल्ला चढविणार्‍या (Paecilomyces farinosus) परजीवी बुरशीचा शोध त्यांनी लावला. त्याचप्रमाणे या माशीची हालचाल बंद करून तिला उगीच जखडून टाकण्यासाठी पिकांना हानिकारक नसलेल्या खनिज तेलाच्या द्रावणाचा शोधही त्यांचाच. या पद्धतीचा वापर उष्णकटिबंधीय देशांमध्ये व्यापक प्रमाणात होऊ लागला आहे. शीतकटिबंधीय भागातही हरितगृहामधील पिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे पांढर्‍या माशीचं नियंत्रण करता येतं.
 
 
हरभरा, तूर व इतर डाळींवरील संशोधन
 
 
1974मध्ये ICRISAT या कोरडवाहू शेतीसंशोधन करणार्‍या आंध्र प्रदेशातील पटनचेरू (सिंकंदराबाद) येथील संस्थेत डॉ. नेने यांची नेमणूक झाली. तेथे त्यांनी डाळवर्गीय कडधान्यांवरील रोगांसंबंधी उल्लेखनीय संशोधन केलं. 1929मध्ये प्रथमच हरभरा पिकाच्या ‘मर’ (Wilt-Complex) रोगाची नोंद झाली होती. या रोगाच्या निदानासंबंधीच्या संशोधनावर डॉ. नेने यांनी 1978मध्ये प्रथम एक सविस्तर माहितीपत्रक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं 'Diagnosis of Some Wilt like Disorders of Chicken Pea' सर्व भारतात तर त्याचा प्रसार झालाच, तसाच जगभरच्या संशोधकांनीही त्याचा उपयोग केला. त्याचं लगेच स्पॅनिश भाषेत भाषांतरही झालं. त्यामध्ये भर घालून तर 1991 साली ’ऋळशश्रव ऊळरसपेीळी ेष उहळलज्ञशप झशर ऊळीशरीशी रपव ींहशळी लेपीीेंश्र’ या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्यामध्ये रंगीत चित्रांचा समावेश असल्यामुळे ते रोगनिदानासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं. अरेबिक, बंगाली, चिनी व म्यानमार (ब्रह्मदेशी) भाषांमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालं. डॉ. नेने यांच्या समृद्ध अनुभवामुळे त्यांना बांगला देश आणि पाकिस्तानमधून मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी निमंत्रणं आली. त्याचप्रमाणे इथियोपिया, केनिया, सीरिया, जॉर्डन, तुर्कस्तान आणि अमेरिकेतील संशोधकांनाही याविषयी डॉ. नेने यांनी मार्गदर्शन केलं आहे.
 
 
डॉ. नेने यांनी प्रयोगशाळा, हरितगृह आणि पारंपरिक शेतात वापरता येण्यासारख्या तूर, हरभरा आणि तत्सम कडधान्यांच्या विविध रोगांच्या रोगनिदानपद्धती व प्रणाली प्रमाणित केल्या. त्यांचा जगभरच्या वनस्पतिरोग शास्त्रज्ञांना व संशोधकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. त्यांनी हरभरा व तूर पिकांच्या 1 ते 4 रोगांचा एकाच वेळी प्रतिकार करणार्‍या वाणांचा शोध लावला. अशा संयुक्त रोगप्रतिबंधक क्षमतेचे गुणधर्म असलेल्या वाणांच्या निर्मितीबद्दल त्यांची खूप प्रशंसा झाली. परिणामत: ‘अ‍ॅन्युअल रिव्ह्यूज इन्कॉर्पोरेशन’ या अमेरिकन ग्रंथ प्रकाशकाकडून त्यांना एका ग्रंथात 'Multiple Disease Resistance in Grain Legumes' या विषयावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिण्यासाठी निमंत्रित केलं गेलं. ‘अ‍ॅन्युअल रिव्ह्यू ऑफ फायटोपॅथॉलॉजी’ या 1998 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथांचं जगभर स्वागत झालं.
 
 
डॉ. नेने यांनी अनेक वनस्पतींच्या रोगांना कारणीभूत होणार्‍या जैविक व अजैविक घटकांचा शोध लावला. त्यांनी अमेरिकेतील इलिनॉइस भागातल्या शॉम्पेन-अरबाना या ठिकाणच्या हॅकबेरी वृक्षांच्या हरितलोप (Chlorosis) या रोगाचं निदान केलं.
 
 
तूर व हरभरा या पिकांच्या विविध रोगनिदानांवरील संशोधनासाठी आणि प्रतिकारशक्ती असलेल्या वाणांच्या निर्मितीसाठी संशोधन करणार्‍या इथियोपिया, फिजी, भारत, केनिया, मालावी, पेरू आणि अमेरिका या देशांतील संशोधकांच्या गटांचं नेतृत्व डॉ. नेने यांनी वेळोवेळी केलं. अशा नव्या सुधारित वाणांमुळे कृषिपिकांचं उत्पादन वाढलं. त्यांच्या संशोधनामुळे ICRISAT येथील आणि राष्ट्रीय पातळीवरील रोगप्रतिकारक गुणधर्म असलेल्या वाणांच्या निर्मिती प्रकल्पांना खूप चालना मिळाली. मृदावैज्ञानिकांच्या सहयोगाने त्यांनी जोंधळा आणि हरभरा यांची मिश्र लागवड केली असता फ्युजरिअममुळे होणार्‍या मर रोगाचं चांगलं नियंत्रण करता येतं, हे प्रस्थापित केलं. मर रोगप्रतिकाराचे गुणधर्म असलेल्या आणि Helicoverpaला सामोरं जाणार्‍या हरभर्‍याच्या नव्या वाणांचा शोधही डॉ. नेने यांनी लावला. तूर व हरभरा या पिकांच्या रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर व त्याबरोबरच रासायनिक आणि जैविक रोगनियंत्रणपद्धतींचा एकात्मिक उपयोग करण्याची पद्धत डॉ. नेने यांनी प्रस्थापित केली. बुरशीजन्य व विषाणुजन्य रोगांच्या संशोधनाबरोबरच त्यांनी मातीतील रोगकारक सूत्रकृमीविषयीचं संशोधनही यशस्वीपणे केलं. जमिनीची नांगरट करून ती उन्हात तापली की सूत्रकृमी आणि फ्युजरियम रोगजंतू यांची साखळी तुटते व पुढच्या पिकांची निकोप वाढ होते, हे त्यांनी प्रात्यक्षिकांतून दाखवून दिलं. सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत प्रायोगिक पद्धतीने ‘आगर’ या तबकडीतील माध्यमावर रोगकारक जंतूंची वाढ करतात. हे माध्यम खूप महागडं असतं. त्याऐवजी डॉ. नेने यांनी टॅपिओका वनस्पतींपासून बनविलेल्या साबुदाण्याचा वापर यशस्वीपणे केला. आजवर गेल्या शतकभर ‘आगर’ याच माध्यमाचा उपयोग होत आला आहे. या नव्या पर्यायी माध्यमाची दखल जगभरच्या शास्त्रज्ञांनी घेतली आहे.
 
 
प्रायोगिक संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण प्रकल्पांचे नेते
 
 
डॉ. नेने यांच्या 1980 ते 1989 या कार्यकाळात ICRISAT संस्थेमध्ये डाळी व शेंगावर्गीय (लेग्यूम्स) पिकांच्या रोगांवर मान्यताप्राप्त असं बहुआयामी व सर्वंकष संशोधन झालं. भुईमूग, हरभरा व तूर या पिकांची रोगप्रतिकारक गुणधर्मांची 34 उत्पादक सुधारित वाणं निर्माण करण्यात आली. ऑस्ट्रेलिया, बांगला देश, इथियोपिया, फिजी, घाना, इंडोनेशिया, जमेका, केनिया, मालावी, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, कोरिया, पाकिस्तान आणि अमेरिका अशा जगभरच्या अनेक देशांत त्यांचा उपयोग केला गेला. याशिवाय 1984 ते 1989 या काळात 14 देशांमध्ये काबुली जातीच्या हरभर्‍याच्या 18 सुधारित वाणांचा प्रसार झाला. या संशोधन प्रकल्पांचं नेतृत्व होतं डॉ. नेने यांच्याकडे. अर्थात त्यासाठी अन्य संशोधकांचं सहकार्य मोलाचं होतंच. 'Asian Grain Legume Network (AGLN)'’ या मूळच्या आणि आता 'Cereals and Legumes Asia Network (CLAN)' असं नामकरण झालेल्या आणि विविध उपशाखांच्या संशोधकांच्या सामन्वयिक संशोधन योजनेचं नेतृत्वही डॉ. नेने यांनी केलं. त्यामुळे भारतातील काही राज्यांच्या धान्योत्पादनात भरघोस वाढ होऊ शकली. याची दखल घेऊन बर्‍याच आंतरराष्ट्रीय कृषीविषयक संस्थांनी ICRISATच्या प्रकल्पांसाठी भरघोस आर्थिक मदत केली. आशिया खंडातील देशांतील सामन्वयिक संशोधन प्रकल्पांसाठीही डॉ. नेने यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
 
 
कुशल संशोधन व्यवस्थापक
 
 
कोणत्याही संस्थेच्या कृषी संशोधन प्रकल्पांमध्ये अनेक शाखा, उपशाखांचा परस्परसंबंध व अवलंबित्व अटळ असतं. प्रत्येक विषयातील संशोधकांच्या काही समस्या असतात. त्या सोडवून सर्वांचं परिणामकारक सहकार्य मिळवून व त्यांच्यामध्ये पूर्णत: समन्वय साधून केलेलं संशोधन यशस्वी होतं. त्यासाठी योजकता, कल्पकता व कौशल्य लागतं. उपलब्ध साधनं, उपकरणं आणि मनुष्यबळ यांचा पुरेपूर व वेळच्या वेळी उपयोग करून घेण्याच्या निर्दोष योजना कार्यान्वित कराव्या लागतात. आर्थिक व वेळेचं नुकसान टाळावं लागतं. अशा सामन्वयिक संशोधनात आपल्या स्वत:च्या संशोधनाकडेही त्याच वेळी काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं. हे सर्व करण्यासाठी अंगी उत्तम व्यवस्थापनक्षमता असावी लागते. हे सर्व गुणधर्म असलेली व्यक्तीच व्यवस्थापनात यशस्वी होते. हे सर्व निकष ज्यांच्या व्यवस्थापनाला लागू पडतील असं डॉ. नेने यांचं व्यक्तिमत्त्व आहे, हे त्यांच्या ICRISATमधील कार्यावरून प्रत्ययाला येतं.
 
 
त्या संस्थेत 1984मध्ये झालेल्या जैवतंत्रज्ञान समितीचे डॉ. नेने हे अध्यक्ष होते. त्यांचं व्यवस्थापन कौशल्य ध्यानात घेऊन 1989मध्ये ICRISAT या संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल या उच्च पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी अनेक पिकांसंबंधीचे संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प जागतिक पातळीवर यशस्वी केले. उष्णकटिबंधीय देशांतील कोरडवाहू पिकांच्या धान्योत्पादन वाढीसाठी त्यांच्या संशोधनाचा उपयोग झाला. त्यांनी ICRISAT मध्ये संशोधन प्रकल्पांसाठी उत्तम व्यवस्थापनपद्धती प्रस्थापित केली.
 
 
त्यांनी ICRISATच्या विविध विभागांचा उत्कृष्ट समन्वय साधला. त्यामुळेच अशा आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांना स्वीकारावी लागली. त्यामुळे डायरेक्टर जनरल नसण्याच्या काळात त्यांना  
 Acting Director General
या पदाचा कार्यभारही स्वीकारावा लागला. डॉ. एल.डी. स्विंडेल यांच्या निवृत्तीनंतर नवे डायरेक्टर डॉ. जे.जी. रयान रुजू होईपर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला.
 
 
 
डॉ. नेने यांची संवादक भूमिका
 
संशोधकाने केलेलं संशोधन सर्व लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. ते शास्त्रीय जगात पोहोचणं जेवढ महत्त्वाचं, तेवढंच ज्यांच्यासाठी काम केलं त्या शेतकर्‍यांपर्यंतही पोहोचणं आवश्यक असतं. या सर्व दृष्टींनी डॉ. नेने यांनी आपली संवादकाची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. त्यांनी लिहिलेल्या, संपादित केलेल्या व इतरांबरोबर लिहिलेल्या प्रकाशनांची संख्या 440 आहे. त्यांचे 52 शोधनिबंध शोधपत्रिकांमधून आणि 10 वार्तापत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय त्यांचं 'Fungicides in Plant Disease Control' हे पुस्तक भारतीय व अन्य देशांतील विद्यापीठांमध्ये खूपच लोकप्रिय झालं. मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तक म्हणून अनेक विद्यापीठांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. 1976मध्ये त्याची हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली. 1993पर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या. 'The Pigeonpea'’ या तुरीवरील शोधनिबंधांच्या संकलनपर पुस्तकांचे ते प्रमुख संपादक आहेत. त्यांना डॉ. एन.के. अनंतराव स्मृती व्याख्यानासाठी, त्याचप्रमाणे द्वितीय ग्लेन अँडरसन स्मृती व्याख्यानासाठी आणि डॉ. एन. प्रसाद स्मृती व्याख्यानासाठी सन्माननीय व्याख्याता म्हणून निमंत्रित केलं होतं.
 
 
डॉ. नेने यांना अनेक आंतरराष्ट्रीय कृषीविषयक समित्यांचं सदस्यत्व मिळालं होतं. ते 1994मध्ये ‘सोसायटी ऑफ मायकॉलॉजी अँड प्लँट पॅथॉलॉजी’ या उदयपूरच्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या वेळी या सोसायटीला त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. या संस्थेच्या 1995मधील रौप्यमहोत्सवी वर्षी त्यांनी, उदयपूर या ठिकाणी 'Advances in Research on Plant Diseases and their Management' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं. 1999मध्ये याच संस्थेच्या त्रैमासिक मुखपत्राची त्यांनी सुरुवात केली. त्याचे संपादक म्हणून ते आजही काम पाहतात.


krushi
 
एशियन अ‍ॅग्री हिस्ट्री फाउंडेशन
डॉ. नेने यांनी भारतीय प्राचीन कृषिविज्ञानाचा शोध घेण्यासाठी 1994मध्ये ‘एशियन अ‍ॅग्री-हिस्ट्री फाउंडेशन’ या संस्थेची, ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्थापना केली. नवी दिल्ली येथे 1996मध्ये या संस्थेचं औपचारिक उद्घाटन झालं. या संस्थेचं पहिलं प्रकाशन म्हणजे, संस्कृत भाषेतील वृक्षायुर्वेद या ग्रंथाचं इंग्लिश भाषेतील पुस्तक होय. कृषिविज्ञानविषयक ग्रंथांचं संशोधनात्मक विश्लेषण करणार्‍यांना एक प्रमुख संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे.

 
या पहिल्या ग्रंथानंतर या संस्थेने 1996 ते 2000 या काळात 1) कृषि-पराशर, 2) Nuskha-Dar fanni-Falahat' 3) कश्यपीय कृषिसूक्ति, 4) विश्ववल्लभ, 5) लोकोपकारा, 6) कृषि-गीता, 7) 'Glimpses of the Agricultural Heritage of India' 8) मृग-पक्षि-शास्त्र, 9)Text Book on Ancient History of Indian Agriculture', 10) Agriculture and Medieval History of Indian Agriaculture'. 11) Agricultural Heritage of India, 12) Bridging Gap between Ancient and Modern Technologies to Increase Agricultural Productivity, 13) Traditional Agricultural Practices with potential for growing plantation Crops, 14) Improving Productivity and Quality of Tea Through Traditional Agricultural Practices, 15) Agricultural Heritage of Asia, मौलिक माहितीची एकूण 15 पुस्तक प्रकाशित केली आहेत. हे कार्य यापुढेही सातत्याने चालू असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या प्रकाशनांमुळे पौर्वात्य व भारतीय प्राचीन कृषिविज्ञानाचं आजवर दुर्लक्षित असं समृद्ध भांडारच जगापुढे आलं आहे. अजूनही प्रकाशात येऊ शकेल असा या साहित्याचा प्रचंड अज्ञात साठा संशोधकांची वाट पाहत आहे. युवा पिढीसमोर हे प्रेरणादायक आव्हान डॉ. नेने यांच्या प्रयत्नांमुळेच प्रकट झालं आहे.

 
एवढं महत्कार्य करूनही डॉ. नेने यांच्या मनाला एक खंत सतावत असते, ती म्हणजे अजूनही आमच्या वनस्पती विकृतिशास्त्रातील अनेक वैज्ञानिकांना पाश्चात्त्यांवरच्या परावलंबित्वाचं जोखड झुगारून देता येत नाही. डॉ. नेने यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी केलेला जगभराच्या 47 देशांचा प्रवास, त्यांनी मिळविलेली सुवर्णपदकं व अन्य विशेष सन्मान, त्यांनी भूषविलेली अनेक पदं व विविध संस्थांचं सन्माननीय सदस्यत्व, मार्गदर्शन केलेल्या 12 पी.एच.डी. आणि 14 एम.एस्सी. विद्यार्थ्यांची यादी या सर्वांचा समावेश करता येऊ शकेल.
 
 
स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून वनस्पतींच्या निरोगी प्रकृतीची चिंता वाहणार्‍या या कृषिवैज्ञानिकाने 24 नोव्हेंबर 2016 रोजी आपल्या जीवनप्रवासाचा अमृतमहोत्सवी टप्पा पूर्ण केला, तरीही ते अजून तसेच कार्यमग्न आहेत. त्यांना निरामय शतकपूर्तीसाठी शुभेच्छा.
 
 
(‘नामवंत भारतीय कृषिशास्त्रज्ञ’ या पुस्तकातून साभार)
Powered By Sangraha 9.0