स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान

10 Oct 2022 15:16:49
- केशव करंदीकर
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 राज्यात सुरू झाले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
 
cmo
देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे. गाव आणि शहरे स्वच्छ राखण्यात तसेच स्वच्छता मोहिमांतही महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. सक्रिय इच्छाशक्तीद्वारेच स्वच्छता चळवळीतील कामे साध्य होत आहेत आणि यापुढेही होणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 राज्यात सुरू झाले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे हीदेखील लोकचळवळ बनणे गरजेचे ठरणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) 2.0 अंतर्गत राज्यातील नागरी भागाचा कायापालट करण्यात येणार असून या टप्प्यात आता राज्यातील सर्व नागरी भागांचा समावेश असणार आहे. याद्वारे शहरांचे पूर्णपणे नगरोत्थान होईल.
 
 
स्वच्छ महाराष्ट्र अभियान
 
 
शाश्वत घन कचरा व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया, लोकसहभाग ही या मोहिमेची प्रमुख ध्येय आहेत. तर स्वच्छता मानके, स्पर्धात्मकतेवर भर, क्षमता बांधणी, भागीदारी सहभाग, लोकसहभाग, डिजिटल सक्षमीकरण, नवीन उपक्रम व नवसंकल्पनांना प्रोत्साहन, शहरी-ग्रामीण अभिसरण ही या मोहिमेची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यासाठी केंद्र व राज्य स्तरावर आढावा व उच्चाधिकार समिती असणार आहे. विभाग व जिल्हा स्तरावरही समिती असणार आहे.
 
 
स्वच्छतेचे अष्टमार्ग
 
1) घरगुती कुटुंब स्तरावर कचर्‍याचे विलगीकरण, 2) 100 टक्के घरोघरी घन कचरा संकलन, 3) 100 टक्के कचर्‍याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व लँडफिलिंग, 4) जुन्या साठलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया आणि त्या ठिकाणाचे हरित क्षेत्रामध्ये रूपांतर, 5) निर्धारित वेळापत्रकानुसार मैला व्यवस्थापन तसेच वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता 100 टक्के सुरक्षित संकलन, वहन आणि प्रक्रिया करणे, 6) वैयक्तिक घरगुती शौचालये, 7) आकांक्षी सार्वजनिक शौचालये, 8) शहरव्यापी सर्वसमावेशक स्वच्छता आणि सफाई मित्र सुरक्षित शहर बनविणे हे स्वच्छतेचे अष्टमार्ग असणार आहेत.
 
 
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 राबविण्यास मान्यता.
 
 
या मोहिमेअंंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शहरे कचरामुक्त करणे अभिप्रेत असून त्यानुसार घरोघरी 100 टक्के विलगीकृत कचरा संकलित करणे, सर्व प्रकारच्या कचर्‍यावर 100 टक्के वैज्ञानिक प्रक्रिया करणे, जुन्या साठलेल्या कचर्‍यावर 100 टक्के उपाययोजना व त्या जागेचे हरित झोनमध्ये रूपांतर करण्यात येऊन सर्व शहरांकरिता कचरामुक्तीची 3 स्टार मानांकन प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
या मोहिमेअंतर्गत घरोघरी वैयक्तिक शौचालयाची उभारणी, आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात येऊन वापरलेल्या पाण्यावर 100 टक्के शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येऊन सर्व शहरांनी ओडीएफ ++ व एक लाख लोकसंख्येखालील शहरांमध्ये किमान 50 टक्के शहरांनी वॉटर + प्रमाणीकरण प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
 
या मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्य शासनाने 12,409 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून या मोहिमेअंतर्गत सन 2026पर्यंत वैयक्तिक शौचालये 1,88,334, सामुदायिक शौचालये 16,905 सीट्स, आकांक्षी शौचालये 3,228 सीट्स, सार्वजनिक शौचालये 4,292 सीट्स व 6,830 मुतार्‍या बांधण्यात येणार आहेत. वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन या घटकात 10,056 कि.मी. भूमिगत गटाराची बांधणी, नाला अडवणे व वळवणे, यामध्ये नाले 1823 कि.मी. व 1656 द.ल.प्र.दि. इतक्या क्षमतेचे मलजलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.
 
 
 
तसेच घन कचरा व्यवस्थापनाअंतर्गत 100 टक्के प्रक्रिया करणे, सर्व जुन्या साठलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया, बांधकाम आणि पाडकाम कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
 
 
दि. 02 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत 90 दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणार्‍या प्रभागांना व प्रथम 3 शहरांना अनुक्रमे 15 कोटी रु., 10 कोटी रु. व 5 कोटी रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
 
 
 
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत सहकार्य करणार्‍या संस्थांशी सहकार्य करारही करण्यात आले आहेत.
 
 
स्वच्छतेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर
 
 
 
महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयानेच गावांचा आणि शहरांचा विकास होतो, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. स्वच्छतेत राज्य नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्र राज्य 2017मध्ये हागणदारीमुक्त झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) अंतर्गत यापुढील काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील. स्वच्छता मोहिमेत छोटी शहरेही चमकदार कामगिरी करत असल्याचे आपण पाहत आहोत. बर्‍याच शहरांत घन कचरा व्यवस्थापन अतिशय व्यवस्थितपणे केले जाते. गावागावांत स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करणारे हे स्वच्छतादूतच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत, हे खरेच आहे.
 
 
कचरामुक्तीद्वारे शहरांचा पूर्णपणे कायापालट करण्यावर भर
 
 
घरगुती कचरा, शेतातील घन कचरा, इलेक्ट्रॉनिक घन कचरा, जीववैद्यकीय कचरा, विघटनशील घन कचरा, औद्योगिक कचरा, धोकादायक कचरा या सर्व प्रकारच्या कचर्‍याच्या व्यवस्थापनाचे आव्हान आपल्यापुढे आहे. शहरे ही विकासाची केंद्र असून शहरात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे शहरीकरण हा शाप नसून शहरीकरणाचे आता सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे, हेच खरे. यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये शहर स्वच्छता कृती आराखडा, शहर घन कचरा कृती आराखडा याद्वारे शहरे कचरामुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.
 
 
 
कचरा आता भांडवल
 
 
सर्व प्रकारचा कचरा ही आता समस्या नसून हाच कचरा आता भांडवल ठरत आहे. घन तसेच सर्वच प्रकारच्या कचर्‍याच्या सुनियोजित व्यवस्थापनाद्वारे खतनिर्मिती आणि अन्य बाबीही उत्पादित होऊ शकतात, हे आपण पाहत आहोत. कचरा व्यवस्थापनात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागेल. याद्वारे महापालिकांना उत्पन्नही मिळू शकेल. नागपूर महापालिकेने या संदर्भात केलेले सर्वोत्कृष्ट काम सर्वश्रुत आहे.
 
 
मोहिमेत नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन
 
 
उल्हासनगर महापालिकेने राबविलेला गटार स्वच्छतेसाठीचा रोबो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणार्‍या कामगारांना दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारची नावीन्यपूर्ण कामे आणि उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राबविण्यावर भर देण्यात येत आहे. याबरोबरच या मोहिमेत घन कचरा व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणे व क्षमताबांधणीचे उपक्रमही घेण्यात येणार आहेत.
  
 स्टार्टअप्सना संधी
 
 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्येही लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे ठरणार आहे. यामध्ये खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. कारण पीपीपी मॉडेलद्वारेही रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, हे आपण अनुभवतो आहोत. या मोहिमेत आपल्याला उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि वापरण्यावर भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत दोन वर्षांत शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांद्वारे कचरामुक्त शहरांकडे वाटचाल सुरू करण्यात आली आहे.
 
 
- केशव करंदीकर
। 7767078662
वरिष्ठ उपसंपादक - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. मंत्रालय
Powered By Sangraha 9.0