भारतकेंद्री विचारांचा द्रष्टा वारसदार

विवेक मराठी    14-Oct-2022   
Total Views |
पाश्चात्त्य व हिंदू विचारधारेतील प्रमुख फरक म्हणजे पाश्चात्त्य विचारधारा काम व अर्थ या दोन विषयांपुरती मर्यादित आहे, तर हिंदू विचारधारा धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चौकटीत आपले तत्त्वज्ञान मांडते. काम म्हणजे इच्छा व अर्थ हे त्या इच्छापूर्तीचे साधन. मनुष्यजीवनाचे अंतिम उद्दिष्ट कोणते असले पाहिजे? या मूलभूत मुद्द्याशी ही चर्चा निगडित आहे. एकदा केवळ अर्थ व काम प्राप्त करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानले की केवळ ऐहिक इच्छांची पूर्ती करणे एवढाच जीवनाचा अर्थ बनतो.
 
 
Dattopant Thengadi
 
 
ठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा नव्वद वर्षांचा कालखंड हा भारतीय प्रबोधनाचा कालखंड मानला जातो. अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्ययुद्धात भारतीयांचा पराभव झाला. या युद्धाचे राजकीय नेतृत्व भारतीय संस्थानिक करीत होते. या युद्धातील पराभवाने भारतातील संस्थानिकांचे युग संपले व आधुनिक प्रजासत्ताक राजकारणाचे युग सुरू झाले. हा बदल घडवून आणण्यात विचारसरणींची भूमिका महत्त्वाची राहणार होती. विद्यापीठीय शिक्षणातून नवशिक्षित मध्यमवर्ग या बदलाचे केंद्र बनणार होता. युरोपमधील विविध समाज आधुनिक राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून प्रबळ बनले होते. त्यांच्यापुढे टिकून राहायचे असेल, तर भारतालाही आधुनिक राष्ट्रवादाच्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे, यावर सर्वसाधारण एकमत होते. परंतु त्या राष्ट्रवादाचे स्वरूप कोणते असले पाहिजे यावर विभिन्न मतप्रवाह होते. या विचारमंथनाचा परिणाम म्हणून प्रबोधनाच्या कालखंडात परिवर्तनाचे तीन प्रमुख प्रवाह निर्माण झाले होते. पहिला प्रवाह कर्मठ परंपरानिष्ठांचा होता. हिंदू धर्माच्या परंपरा कालातीत सत्यावर उभ्या असल्याने त्यात कोणताही बदल होता कामा नये, हे या प्रवाहाचे सांगणे होते. दुसरा प्रवाह हा युरोपकेंद्री विचार करणार्‍या विचारवंतांचा होता. भारतीय समाजरचनेची युरोपीय धर्तीवर पुनर्रचना केल्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही, असा या गटाचा दावा होता. प्रामुख्याने समाजवादी व साम्यवादी विचारांच्या विचारवंतांचा यांत समावेश होता. तिसरा प्रवाह हा युरोपीय सुधारणावाद व भारतीय परंपरा यांच्या समन्वयातून नवभारत घडवू पाहणारा होता. या प्रवाहाला स्वामी विवेकानंदांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत अनेक पदर आहेत. दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांचे आकलन होण्यासाठी प्रथम या विचारप्रवाहाची ओळख करून घेण्याची गरज आहे.
 
 
 
हिंदू संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. आत्मा व परमात्मा या मूलभूत संकल्पनेवर हिंदू संस्कृती उभी आहे. विश्व हे आत्मस्वरूपाचे बाह्य प्रकटन आहे व व्यक्तीचा आत्मा व त्याचेच असलेले बाह्य प्रकटन यांच्यात परस्पर सुसंवाद निर्माण करणे हे व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आत्मा ही संकल्पना मानत नाही. याचे कारण ती प्रयोगसिद्ध नाही व तर्कातीत आहे. हिंदू तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आत्मा हे अनुभूतिजन्य सत्य आहे, तर पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्या मते जे प्रयोग किंवा तर्काने समजू शकत नाही, त्याची दुसर्‍याला पटेल अशी वस्तुनिष्ठ मांडणी करता येत नाही. त्यामुळे तो त्यांच्यामते तो व्यक्तिगत भ्रमही असू शकतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ soul या संकल्पनेपर्यंत जातात. पण soul ही संकल्पना आत्म्याच्या संकल्पनेपर्यंत जात नाही. ती फार तर consciousnessच्या किंवा जाणिवेच्या संकल्पनेपर्यंतच राहते. त्यामुळे पाश्चात्त्य विश्लेषणात आत्मा या संकल्पनेचा समावेश नसतो, तर हिंदू संकल्पनेत ती केंद्रवर्ती संकल्पना आहे. युरोपीय सुधारणावाद व हिंदू तत्त्वज्ञानातून निघालेले कोणतेही शास्त्र यांच्या समन्वयाच्या विश्लेषणात हा कूटप्रश्न कायम राहतो. भारतीय प्रबोधन पर्वाच्या तिसर्‍या प्रवाहातील विचारवंतांनी हा कूटप्रश्न वेगवेगळ्या पद्धतींनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही त्यातून सर्वंकष तत्त्वज्ञान तयार झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दत्तोपंतांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे.
 
  
Dattopant Thengadi
 
दत्तोपंतांचे विचार समजून घेण्याआधी ज्या वैचारिक परिघात दत्तोपंतांचे व्यक्तिमत्त्व घडले, त्या संघाच्या, श्रीगुरुजींच्या व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या वैचारिक भूमिकांचा परिचय करून घेतला पाहिजे. संघाची स्थापना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर झाली. डॉक्टर हेडगेवारांचा स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग होता. परंतु त्यात आपला सहभाग देत असतानाच भारताच्या पारतंत्र्याचे कारण व भारताच्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असले पाहिजे यावर त्यांचे विचारमंथन सुरू होते. भारताला आधी मुस्लीम व नंतर ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी पत्करावी लागली, याचे कारण या देशातील हिंदू हा जो मूळ समाज, त्याच्या मनात एकात्मभाव नव्हता व तो निर्माण केल्याशिवाय भारत स्वतंत्र होणार नाही व स्वातंत्र्य मिळालेच तरी ते टिकविता येणार नाही, या भूमिकेतून डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत, हिंदुत्वाच्या भावनेने आपल्यामध्ये बंधुत्वभाव निर्माण झाला पाहिजे व हिंदू समाज म्हणून जगाला काही देण्यासाठी आमची विशिष्ट भूमिका आहे, या एकत्वाच्या, बंधुत्वाच्या व विशिष्टत्वाच्या विचारांवर डॉक्टरांनी संघाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी एक अनोखी कार्यपद्धतही निर्माण केली. एकत्व व बंधुत्व हा या कार्यपद्धतीचा गाभा आहे.
 
 
 
संघाच्या कार्यपद्धतीतून जी अफाट कार्यशक्ती निर्माण होईल, तिचे स्वरूप कसे असेल? याची स्पष्टता श्रीगुरुजी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांत आहे. संघाची कार्यपद्धती ही लष्करी धर्तीची असल्याने ती बाह्यत: फॅसिस्ट किंवा नाझी चळवळीसारखी वाटत असे. संघावर तसे आरोपही झाले. परंतु या शक्तीला पाशवी प्रवृत्तीचे अधिष्ठान नसून सात्त्विक, मानवतावादी प्रवृत्तीचे अधिष्ठान आहे, ही गोष्ट श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांनी पुन:पुन्हा अधोरेखित केली. हिंदू समाजाला विद्यमान सत्तासंघर्षात टिकून राहायचे असेल, तर या संघर्षाचे मूळ स्वरूप समजून घेतले पाहिजे व त्याचा निर्भयपणे प्रतिकार केला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक तेवढे सामर्थ्य संपादनही केले पाहिजे, हे स्पष्टपणे नमूद करीत असतानाच एकदा अशा शक्तींचा बिमोड केल्यानंतर या सामर्थ्याचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे, असे श्रीगुरुजी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी नि:संदिग्ध प्रतिपादन केले आहे. यासाठीच सामर्थ्य संपादनाबरोबरच आध्यात्मिक जागृतीची आवश्यकताही त्यांनी वारंवार सांगितली आहे. ऐहिक सामर्थ्य व अध्यात्म हे परस्परविरोधी घटक नसून परस्परपूरक घटक आहेत, अशी या दोघांची मांडणी आहे. त्यांनी हिंदू समाजाला समजणार्‍या हिंदू तत्त्वज्ञानाच्या परिभाषेच्या चौकटीत ही आपली मांडणी केली आहे.
 
 
 
 
परंतु स्वातंत्र्यानंतर भारतात जी वैचारिक चौकट तयार झाली, ती युरोपकेंद्री विचारांची. स्वातंत्र्यपूर्व काळातील परंपरावादी विचारांचा प्रवाह काळाच्या ओघात टिकला नाही व ते स्वाभाविकही होते. परंतु गांधीहत्येचा आरोप सर्वच भारतकेंद्री विचारधारेवर ठेवून त्यांच्यावर मध्ययुगीन, हिंसावादी, प्रतिगामी असा शिक्का मारून त्यांना सार्वजनिक जीवनातून बहिष्कृत करण्यात आले. एवढेच काय, लाला लजपतराय, लो. टिळक, सरदार पटेल, कन्हैयालाल मुन्शी यासारख्या काँग्रेसमधल्याही भारतकेंद्री विचारधारेला राजकीय, सामाजिक, विद्यापीठीय, साहित्यिक, प्रसारमाध्यमे आदींच्या वैचारिक चर्चेतून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे श्रीगुरुजी, दीनदयाळ उपाध्याय जी परिभाषा वापरत होते, ती परिभाषा भारताच्या मुख्य विचारधारेला अपरिचित होती. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या विचारांसंबंधी गैरसमज निर्माण होणे सोपे होते. म. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. त्यांची ही ओळख पुसून टाकली गेली. भारताच्या सर्व कथित, अकथित विपन्नावस्थेचा दोष हिंदू तत्त्वज्ञानाच्या व परंपरांच्या माथी मारून युरोपीय विचारांच्या धर्तीवर नवा भारत निर्माण करण्याचा संकल्प केला गेला. या पार्श्वभूमीवर संघ, श्रीगुरुजी व दीनदयाळजी यांची भूमिका पाश्चात्त्य विचारवंतांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर व त्या परिभाषेत मांडण्याचे काम दत्तोपंत ठेंगडी यांनी केले.
 
 
Dattopant Thengadi
 
 
पाश्चात्त्य व हिंदू विचारधारेतील प्रमुख फरक म्हणजे पाश्चात्त्य विचारधारा काम व अर्थ या दोन विषयांपुरती मर्यादित आहे, तर हिंदू विचारधारा धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चौकटीत आपले तत्त्वज्ञान मांडते. काम म्हणजे इच्छा व अर्थ हे त्या इच्छापूर्तीचे साधन. मनुष्यजीवनाचे अंतिम उद्दिष्ट कोणते असले पाहिजे? या मूलभूत मुद्द्याशी ही चर्चा निगडित आहे. एकदा केवळ अर्थ व काम प्राप्त करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानले की केवळ ऐहिक इच्छांची पूर्ती करणे एवढाच जीवनाचा अर्थ बनतो. हाच जीवनाचा सीमित अर्थ गृहीत धरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची उभारणी केली जाते. याचा अर्थ असा नाही की पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या शाखा जीवनातील नैतिक बाबींची चर्चा करीत नाहीत. ती करतात, परंतु तिचा पाया निखळ उपयुक्ततावादाचा असतो. एकदा असा पाया घेतला की व्यक्तीचे हित व समाजाचे हित या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या स्पर्धक बनतात. त्यातून व्यक्ती व समाज यांच्यात संघर्ष तयार होतो. तो संघर्ष मिटविण्यासाठी राजसत्तेला मध्यस्थ म्हणून काम करावे लागते. राजसत्ता कायद्याचा वापर करून व्यक्ती व समाज यांच्यातील परस्परसंबंध निश्चित करते. हे कायदे हुकूमशाही पद्धतीने केले जातात की लोकशाही पद्धतीने, एवढाच फरक राहतो. समाजाचा गतीने विकास व्हायला हवा असेल, तर सक्षम व्यक्तींना त्यांचे कर्तृत्व दाखविण्याकरिता पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे असे उजवी आर्थिक विचारसरणी सांगते, तर अशा स्वातंत्र्यामुळे समाजातील विषमता वाढत जाते असे डावी विचारसरणी सांगते व त्यामुळे सक्षम व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर बंधने आणून समाजात आर्थिक समता प्रस्थापित केली पाहिजे असे डावी विचारसरणी सांगते. आचारधर्माबाबत मात्र या दोन्ही विचारसरणी वेगळ्या भूमिका घेतात. धार्मिक मूल्यांवर आधारित नैतिकता कायद्याच्या आधारे समाजावर लादली पाहिजे, किमान त्याला पोषक असलेले कायदे असले पाहिजेत असे उजवी विचारसरणी मानते, तर व्यक्तिगत नीतिमत्ता हा राजसत्तेचा विषय नाही व त्यात राजसत्तेने न पडता ती व्यक्तीच्या इच्छेवर सोडून द्यावी, असे डावी विचारसरणी सांगते. म्हणजेच आर्थिक व नैतिक क्षेत्रात शासनाच्या हस्तक्षेपासंबंधात या दोन्ही विचारसरणी परस्परविरोधी भूमिका घेतात.
 
 
 
हिंदू विचारधारा मनुष्यातील अर्थ व काम या प्रेरणांचे महत्त्व तर अधोरेखित करीत असतानाच, माणसाच्या प्रेरणा केवळ ऐहिक आकांक्षांपुरत्याच मर्यादित नसून त्यापलीकडे मानवता, विरक्ती, परमार्थभाव, दिव्यत्वाची ओढ आदी स्वरूपातही प्रकट होत असतात, या व्यावहारिक अनुभवांचाही विचार करतात. या प्रेरणा आपल्या इंद्रियांना जाणवणार्‍या अनुभवापलीकडच्या अतींद्रिय अनुभवाचा साक्षात्कार घडवीत असतात व व्यक्तीचा व समाजधारणेचा विचार करत असताना अर्थ व काम या प्रेरणांबरोबर याही प्रेरणांचा विचार केला पाहिजे, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. स्वत:च्या इंद्रियजन्य सुखापलीकडे विचार करायला लावणारी भावना म्हणजे मोक्षभावना होय. स्वा. सावरकर हे ‘जयोस्तुते’मध्ये ‘मोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे’ म्हणतात ते याच अर्थाने. परंतु हे केवळ शुष्क तात्त्विक चर्चेचे मुद्दे नाहीत, तर त्याचा परिणाम व्यावहारिक जीवनावरही पडतो. उदाहरणार्थ, आपल्या उदरभरणासाठी किंवा आपला जीवनचरितार्थ चालविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला काम करावेच लागते. जर मार्क्सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण करीत असलेले काम म्हणजे आपले केलेले शोषण असून आपण त्यातून भांडवलशाही व्यवस्था बळकट करीत असतो असे मानले, तर आपण करीत असलेल्या कामाचा आपल्याला तिरस्कार वाटू लागेल. परंतु आपल्या कामात आपल्याला दिव्यत्वाचा आनंद घेता येतो असा विचार केला, तर आपल्या कामाशी आपण एकरूप होऊ व त्यात अधिकाधिक सौंदर्याचा अनुभव घेऊ. समाजातील सर्व लोक पहिल्या भावनेतूनच काम करीत राहिले, तर समाजव्यवस्था कोसळून पडेल, जे कम्युनिस्ट चीनमध्ये व रशियात झाले. जर समाजात दिव्यत्वाच्या भावनेने लोक काम करीत असतील, तर त्यांच्या कामाचा दर्जा नेहमीच उत्तम राहील. जपानसारख्या देशांचे उदाहरण आपल्यापुढे आहे. अशा समाजात विपुल संपत्ती निर्माण होत असते. मालकापासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्वच जण अशा देवत्वाच्या भावनेतून काम करीत असतील, तर शोषणाचा प्रश्नही उद्भवत नाही. शोषणमुक्त समाज निर्माण करण्याकरिता पाश्चात्त्य विचारधारा राजसत्तेची भूमिका केंद्रस्थानी मानते. हिंदू विचारधारा राजसत्तेची भूमिका निश्चितपणे महत्त्वपूर्ण मानते, पण तिला केंद्रस्थानी मानत नाही. समाज दैवी गुणांनी संपन्न कसा होईल यावर ती आपले लक्ष केंद्रित करते.
 
 
Dattopant Thengadi
 
त्यामुळे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाप्रमाणे समाजपरिवर्तनाचा विचार करू लागलो, तर तो विचार राजसत्ताकेंद्रित व केवळ कायद्याच्या आधारे समाजधारणा करण्याचा विचार होतो. आधी चर्चा केल्याप्रमाणे कायद्याच्या आधारे समाजनियंत्रणाचा प्रयत्न हा अपुर्‍या चादरीने अंग झाकण्यासारखा होतो. अशी चादर डोक्यावर घेतली तर पाय उघडे पडतात व पाय झाकले तर डोके उघडे राहते. असे होण्याचे कारण म्हणजे आधुनिक कायद्याची रचना केवळ अर्थ व काम या दोन घटकांच्या आधारेच केली आहे. याउलट हिंदू समाजविज्ञानात कायद्याइतकेच दैवी गुणसंपदेच्या संस्कारांनाही महत्त्व आहे व अशा तत्त्वज्ञानाचा जीवनात अंगीकार केलेल्यांच्या उपदेशाला कायद्याइतकेच महत्त्वाचे स्थान असते. पाश्चात्त्य समाजरचनेत भांडवल या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व आहे, तर हिंदू तत्त्वज्ञानात निर्मितिक्षमतेला महत्त्व आहे. कायद्याच्या राज्यांत केवळ हक्कांच्याच भाषेला महत्त्व येते, तर दैवी गुणसंपन्न समाजात प्रत्येक जण आपापले कर्तव्य करीत गेला तर सर्वांच्या हक्कांचे आपोआपच रक्षण होत जाते. कायदा चुकलेल्या माणसाला शिक्षा करतो, पण तो माणसात सुधारणा करू शकत नाही. त्याचे नियंत्रण बाह्य असतो. दैवी गुणसंपन्न समाजात मानवी मनाच्या सात्त्विक भावाला आवाहन करून तो गुन्हा करणारच नाही यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे या दोन्ही समाजव्यवस्थांच्या परिवर्तनाची उद्दिष्टे व मार्ग भिन्न असतात. स्वातंत्र्योत्तर भारतात कायद्याने समाज कसा नियंत्रित करता येईल यावरच चर्चा झाल्या, तेच अभ्यासाचे विषय बनले. दैवी गुणांच्या आधारे समाजनिर्मिती असा काही समाजशास्त्राचा, राज्यशास्त्राचा विषय असू शकतो, असा विचारही कोणाच्या मनात आला नाही. त्यामुळे श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला दैवी गुणसंपन्न समाजाचा विचार आधुनिक समाजशास्त्राच्या, राज्यशास्त्राच्या परिभाषेत मांडणे अशक्यच होते. जे विचार आपल्या परिभाषेत मांडले जाऊ शकत नाहीत, ते अस्तित्वातच नाहीत किंवा असले तरी निरुपयोगी आहेत, अशी विद्यापीठीय अभ्यासाची अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य व हिंदू तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास, आधुनिक समाजशास्त्रीय व राज्यशास्त्रीय परिभाषेत मांडले जाणे आवश्यक होते. ते ऐतिहासिक कार्य दत्तोपंतांनी केले.
 
 
 
श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या तात्त्विक विचारांची व्यावहारिक मांडणी करताना दत्तोपंतांनी सूत्ररूपाने काही विचार व्यक्त केले. त्या विचारांतील प्रमुख विचार पुढीलप्रमाणे आहेत -
 
 
1) धर्मनियमांच्या अंतर्गत, म्हणजेच सुयोग्य नीतितत्त्वांचा अवलंब करून आपल्या कर्तृत्वाच्या आधारावर प्रत्येकाला संपत्ती निर्माण करण्याची अनुमती समाजात असली पाहिजे. परंतु संपत्ती निर्माणाचा अधिकार म्हणजे स्वत:च ती उपभोगण्याचा अधिकार नव्हे. संपत्ती समाजाचीच आहे, आपण तिचे पालक, विश्वस्त आहोत अशी भावना असली पाहिजे. जो सबळ तो शोषक नव्हे, तर पालक बनला पाहिजे.
 
 
 
2) अधिकाधिक उत्पादन व सर्वांना उपभोग घेता येईल असे अर्थव्यवस्थेचे स्वरूप असले पाहिजे.
 
 
3) भांडवलाइतकाच श्रमिकांचाही व्यवसायात सहभाग असला पाहिजे.
 
 
4) भांडवलधारक, श्रमिक, ग्राहक हा समाजाअंतर्गत असलेला परिवार आहे. या परिवाराच्या व्यवसायातून जी समृद्धी निर्माण होईल, तिचा लाभ समाजालाही मिळाला पाहिजे.
 
 
 
5) समाजनियमांचे पालन केल्यानंतर व्यवसाय कशा प्रकारे करावा याचे स्वातंत्र्य व्यावसायिकाला दिले गेले पाहिजे, तरच त्याच्या प्रतिभेला वाव मिळेल.
 
 
6) संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला समाजात प्रोत्साहन मिळता कामा नये.
 
 
7) कोणत्याही समाजसंघटित घटकाला आपल्या मागण्यांसाठी समाजाला वेठीला धरण्याचा अधिकार नाही.
 
 
8) समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या किमान गरजांची पूर्ती करणे समाजाचे कर्तव्य आहे.
 
 
या सूत्रांमध्ये उत्पादकता व समानता या दोन्ही मूल्यांचा विश्वस्त भावनेतून समन्वय साधण्याच्या विचार केंद्रीभूत ठेवलेला आहे.
व्यवसायातही त्यांनी ज्या प्रकारच्या उद्योगांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्याचे स्वरूपही स्पष्ट केले आहे. शक्य तर अधिकाधिक उद्योगांचे भांडवल सर्वसामान्यांकडून एकत्रित केलेले असावे, त्यांच्या धोरणामध्ये त्या उद्योगात काम करणार्‍यांचा सहभाग असावा, त्यावर वित्तसंस्थांचे नियंत्रण असावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकेंद्रीकरण करून अधिकाधिक स्वायत्त घटकांना स्वायत्तता द्यावी, जेणेकरून अधिकाधिक लोकांच्या प्रतिभेला वाव मिळेल. उद्योग क्षेत्र हे संसदेला जबाबदार असावे.
पाश्चात्त्य व हिंदू विचारधारेचा पायाच भिन्न असल्याने त्यातून विकसित होणार्‍या समाजव्यवस्थांचे स्वरूपही भिन्न असणार. ते स्वरूप स्पष्ट करताना दत्तोपंतांनी खालीलप्रमाणे मांडणी केली आहे -
 
 
• विशिष्ट घटक गृहीत धरून विशिष्ट प्रश्नापुरती मांडणी.
 
 
समग्र हिताचा विचार करून सर्वंकष व एकात्म मांडणी.
 
 
• अर्थ व काम एवढाच सीमित जीवनोद्देश.
 
 
धर्म व मोक्ष या संकल्पनांच्या मर्यादेत अर्थ व काम यांचा विचार.
 
 
• समाज म्हणजे केवळ स्वहिताला केंद्र ठेवून विचार करणार्‍या व्यक्तींचा समूह.
 
 
व्यक्ती हा समाजाचा जैविक घटक.
 
 
• स्वत:चा आनंद मिळविणे हाच जीवनाचा आत्मकेंद्रित दृष्टीकोन.
 
 
सर्वांच्या सुखातच आपला आनंद मानण्याचा दृष्टीकोन.
 
 
• लोभीपणातून निर्माण झालेला उपयुक्ततावाद, नफेखोरीतून निर्माण झालेली शोषणवृत्ती.
 
 
अपरिग्रहातून निर्माण झालेला संयमित दृष्टीकोन व अंत्योदयाच्या प्रेरणेतून निर्माण झालेली सेवावृत्ती.
 
 
• स्वत:च्या हक्कांबाबत सदैव जागरूक व इतरांना त्यांच्या कर्तव्याबद्दलची सक्ती.
 
 
जागृत स्वकर्तव्य भावना व इतरांच्या हक्काबाबत संवेदनशीलता.
 
 
• कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढीतून नफा कमावणे
 
 
मुबलक उत्पादन करून वाजवी किंमत आकारणे.
 
 
• मक्तेदारी निर्माण करणारी भांडवलशाही.
 
 
निखळ स्पर्धेतून मुक्त बाजारपेठेकडे.
 
 
• कामगारांचा समाज नियंत्रित करणारे मूठभर भांडवलदार
 
 
स्वयंरोजगारांच्या सहयोगातून चालणारी स्वयंशासित व्यवस्था.
 
 
 
• व्यक्ती, समाज व निसर्ग यांच्यात निरंतर संघर्ष व त्यातून परस्परांचे शोषण.
 
 
परस्पर समन्वयातून एकमेकांचे गुणसंवर्धन
 
 
वरील विवेचनात विचार व व्यवस्था यांच्या परस्पर संबंधांचे विश्लेषण केले आहे. व्यवस्था बदलायची असेल तर मूळ विचारांचा पाया बदलावा लागेल. तो न बदलता केवळ व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून नवे सत्ताधारी येतील, पण मूळचेच प्रश्न केवळ कायम राहणार नाहीत, तर अधिक उग्र होतील.
 
 
 
आजचा आपला समाज हा घटनात्मक रचनेनुसार चालतो. विद्यमान घटनेची मूलतत्त्वे ही युरोपीय प्रबोधन पर्वातून आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न हा निर्भय, बलशाली परंतु दैवी गुणांनी युक्त असा हिंदू समाज निर्माण करायचा आहे. ही दोन्ही उद्दिष्टे वेगळी असली, तरी परस्परविरोधी नाहीत. कायद्याचे पालन करून अर्थ व काम यांची प्राप्ती केली पाहिजे असे राज्यघटना सांगते, तर धर्माचे पालन करून अर्थ व काम यांची प्राप्ती केली पाहिजे असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. येथे धर्म म्हणजे सांप्रदायिकता नव्हे. जसे घटनेतील कायद्यांच्या तरतुदीमागे एक मूल्यात्मक चौकट उभी असते, तशीच धर्म ही मूल्यात्मक चौकटीची संकल्पना आहे. कायद्यामागील मूल्यात्मक चौकट ही निखळ इहवादावर उभी असल्याने त्यात वकिली युक्तिवाद करून तिला आपल्या स्वार्थासाठी वापरण्याची मोठी संधी असते. धर्म या संकल्पनेत वकिली युक्तिवाद चालत नाही, कारण त्यात अंतरात्म्याचा संतोष हे मूलतत्त्व असते. जगाला फसविता येऊ शकते, पण आपल्या अंतरात्म्याला नाही. धर्म या संकल्पनेची जी सामाजिक उपयुक्तता आहे, त्यावर स्वातंत्र्योत्तर काळात विचारमंथन न झाल्याने घटनात्मक मूल्ये भारतीय जनमानसात पुरेशा प्रभावी रितीने रुजलेली नाहीत. ती रुजवायची असतील, तर कायद्याच्या राज्याला धर्म या संकल्पनेचे पाठबळ लागेल.
 
 
 
प्रत्येक सामाजिक परिवर्तनामागे विचारधारा उभी असते. विचारधारा हे संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे विज्ञान व तंत्रज्ञान आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञाने जीवनातील केवळ एका विशिष्ट क्षेत्राला डोळ्यांसमोर ठेवून मांडणी करत असल्यामुळे त्या विचारातून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय विसंवाद निर्माण होतात. त्यामुळेच चांगले अर्थकारण हे लोकप्रिय राजकारणाला बाधक असते, अशा संकल्पना तयार होतात. परंतु हिंदू तत्त्वज्ञानातील एकात्मभावामुळे असे विसंवाद तयार न होता एकात्मभावावर आधारित समरस समाज तयार होतो. ही प्रक्रिया स्पष्ट करताना दत्तोपंत श्रीगुरुजींच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन म्हणतात,
 
 
 
“एकदा समाजाच्या सर्व अंगांमधून एकत्वाचा चैतन्यस्रोत वाहू लागला की त्याचे सर्व घटक हे देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समरस होऊन काम करू लागतील. या प्रक्रियेत ज्या गोष्टी काळाला अनुकूल आहेत त्या टिकून रहातील व ज्या कालविसंगत आहेत त्यांचा त्याग केला जाईल. जे जुने गेले आहे त्याबद्दल दु:ख करण्याचे कारण नाही. झाडांना नवी पालवी येत असताना जुनी पाने गळून पडतात. हा निसर्गनियमच आहे. समाजातील ज्या व्यक्ती हा आदर्श आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंगभूत भाग बनवितात, त्याच व्यक्ती एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे समाजाला मार्गदर्शक ठरतात.”
 
 
 
त्यामुळे आजच्या सर्वंकष परिवर्तनाच्या काळात सांस्कृतिक प्रश्न महत्त्वाचे की आर्थिक प्रश्न? असे प्रश्न विचारले जातात. आणीबाणीच्या कालखंडात ‘तुम्हाला भाकरी हवी की स्वातंत्र्य?‘ असा प्रश्न विचारला जात असे. या प्रश्नाचा आविर्भाव असा असतो की जणू हे दोन पर्याय आहेत व आपण यापैकी एकच निवडू शकतो. परंतु प्रत्यक्षात असे घडते की जर स्वातंत्र्य नसले तर भाकरी मिळत नाही, हेही सांगणे शक्य नसते. तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. जागृत झालेल्या सांस्कृतिक ऊर्जाच अर्थचक्राला चालना देत असतात, याचा अनुभव जगातील अनेक देशांनी घेतला आहे. आता नवा भारत घडतो आहे. त्या भारताचे भविष्यातील दृश्य स्वरूप कसे असेल हे समजून घ्यायचे असेल, तर दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारधनाचा अभ्यास अनिवार्य आहे. आज जगातील वेगवेगळ्या विचारसरणी कोंडीत पडल्याचे लक्षात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत अनुसरत असलेल्या या विचारसरणीत जगाला नवा रस्ता दाखविण्याचे सामर्थ्य आहे.
 
 

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.