भरली वांगी

विवेक मराठी    25-Oct-2022
Total Views |
 त्याला भरली वांगी आवडतात हा शोधही तिला अचानकच लागला. एरवी फारसं काही न दर्शवणार्‍या त्याच्या चेहर्‍यावर पानातली भरली वांगी बघून मनापासून हसू उमटलं.
@प्राजक्ता काणेगावकर 
 
vivek
 
वास्तविक सुमीच्या उत्तराने घर हादरण्यासारखं काहीच झालेलं नव्हतं. अशी उत्तरं ऐकायची घराला सवय होती. घरातले जवळपास सगळेच एकमेकांशी तिच्या उत्तरासारखंच बोलत. कळीचा मुद्दा तोच होता. उत्तर सुमीकडून आलं होतं. सुमी लग्न करून या घरात आली, तेव्हा घरातले सगळेच सतत काही ना काही उद्योगात असत. उद्योग नव्हता फक्त सुमीला. आता इथे उद्योग म्हणजे कुणी शिकत होतं, कुणी नोकरी करत होतं, कुणी घरबसल्या छोटं छोटं काम करून काही ना काही कमावत होतं. एकटी सुमीच असं काही करत नव्हती. सुमीने पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि ते स्वयंपाकघर तिला बिलगलं. तिनेही तिथल्या चार-दोन भांड्यांवरून मायेने हात फिरवला. भिंतीवर बोटाने तिचं नाव लिहिलं आणि मग ते सगळं तिचंच झालं. तिथल्या छोट्याशा बुडकुल्यापासून पातेल्यांपर्यंत सगळ्यांची सुमी लाडकी झाली.
 
 
 
सुमीचा नवरा दिलीप हा शांत माणूस. भांडणतंटे तर लांबचीच गोष्ट, पण तो कधी स्वत:होऊन फारसा कुणाशी बोलतही नसे. त्याचं मन मोकळं करायची हक्काची जागा म्हणजे सुमी. तिला तो त्याच्या ऑफिसातल्या काहीबाही गमती सांगे. तिला त्यातलं फार काही कळे असंही नाही. पण ती उचित ठिकाणी हसे किंवा वाईट वाटलं असं दाखवी. दिलीप तेवढ्यावरही खूश असे. मान मोडून काम करावं, पगार घ्यावा आणि दोन घास खाऊन स्वस्थ पडावं याहून त्याच्या फार काही अपेक्षाही नव्हत्या. जेवताना मात्र चवीने जेवे. त्याच्यासाठी काही केलं असेल तरी बोलून दाखवत नसे. त्याच्या खाण्याच्या वेगावरून सुमीला कळे. पुन्हा मागून घेतलं की पदार्थ खरंच छान झालाय इतपत ओळखायला ती शिकली.
 
 
 
त्याला भरली वांगी आवडतात हा शोधही तिला अचानकच लागला. एरवी फारसं काही न दर्शवणार्‍या त्याच्या चेहर्‍यावर पानातली भरली वांगी बघून मनापासून हसू उमटलं. फार मनापासून जेवला तो त्या दिवशी. सुमीला रात्री मिठीत घेऊन त्याने तिचा हात त्याच्या गालावर ठेवला. हात सोडवून घेण्याची घाई तिने केली नाही. त्याला खूप काही सांगायचंय इतकंच तिला कळलं. त्याच्याकडून ते येईपर्यंत ती थांबली. पण तो बोलला नाही. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि तिच्या हातावर चेहरा ठेवून तो झोपून गेला. सुमीच्या डोळ्यात पाणी आलं. किती लहान मुलासारखा दिसत होता तो. आवडीचा खाऊ मिळाल्यावर लहान मुलाचा होतो तसा निर्व्याज चेहरा दिसत होता त्याचा. तिने त्याला जवळ घेतलं, तसा तो तिला आणखीच बिलगला. त्याला मायेने थोपटताना तिचाही डोळा लागला.
 
 
 
सकाळी उठून कधी एकदा स्वयंपाकघराला ही गंमत सांगतो असं तिला झालं. इतक्या माणसांनी भरल्या घरात तिचं तिचं असं गुपित तिला मिळालं. थोडं तिचं, थोडं दिलीपचं आणि थोडं तिच्या स्वयंपाकघराचं. आसपासच्या नजरांपासून ते सांभाळून ठेवायचंय, हेही तिला उमगलं. तिची आणि त्याची भाषाच बदलली. त्या भाषेत शब्द नसले, तरी बिघडत नव्हतं. कळायला फार अवघड नव्हती ती. सुमी दिलीपइतकी अबोल नसली, तरी फारशी बोलकीही नव्हती. आणि म्हणूनच कुणालाही न कळणारी बिनशब्दांची ही भाषा तिला आणि दिलीपला फारच मानवली.
 
 
 
पुढे मुलं झाली, तसं घर लहान पडतं म्हणून दिलीपचा धाकटा भाऊ विनय आणि त्याची बायको शुभा पलीकडच्या गल्लीत राहायला गेले. सुमीसाठी फार काही बदललं नाही पण त्यामुळे. तिच्या मनातलं घर अजूनही एकसंधच होतं. घरात काही केलं की ती आवर्जून त्यांच्यासाठी वेगळा डबा बांधून ठेवत असे. कधीकधी दिलीप कामावरून आला की त्याला तो डबा देऊन ती विनयच्या घरी पिटाळत असे. जर मोकळा वेळ असेल तर स्वत:च पटकन जाऊन देऊन येई.
एके दिवशी ती असाच डबा घेऊन गेली असता शुभाने तिला थांबवून घेतलं.
 
 
“वहिनी, एक सांगायचं होतं..”
“सांग की.”
“मी नोकरी करावी म्हणतेय. मुलं शाळेत जायला लागलीत. घरात बसून वेळ खायला उठतो. आणि आता थोडं आमचा आम्हाला खर्चही पाहायला हवा.”
सुमी हरखली.
“कर गं नोकरी तू. अगदीच कर. काही लागलं सवरलं तर मी आहे की. हक्काने सांग. नोकरी सुरू झाली की तुमचा जम बसेपर्यंत डबा देईन मी काही दिवस.”
शुभाने प्रेमाने सुमीला मिठी मारली. सुमी भिरभिरत घरी आली. रात्री दिलीपला सांगताना तिला नोकरी लागल्यासारखीच ती खूश होती.
दिलीप गंभीर झाला. त्याने तिच्याकडे बघितलं. तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने एकदम काळजीने तिच्याभोवती हात लपेटले. त्याच्या कुशीत सुमी निर्धास्त झोपून गेली. सकाळी ती उठायच्या आधी तो उठलेला होता. त्याला असं जागं बघून तिला काही कळेचना.
“अहो, काय झालं? आज अचानक लवकर उठलात?”
त्याने तिला हाताला धरून खाली बसवलं.
“सुमी, मी काय सांगतो ते नीट ऐक. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा निर्णय घेते, तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारीही त्या व्यक्तीने घ्यायची असते. आपण मदत करावी, पण आपण त्याच्या निर्णयाची जबाबदारी घेऊ नये. कळलं?”
सुमीला काही कळलं नाही. पण तिने मान डोलावली.
शुभाची नोकरी सुरू झाली, तशी सुमी आणखीच स्वयंपाकघरात गुंतली. पुतण्यांना शाळेतून आणणं, त्यांचं खाणंपिणं बघणं, वेळेवर डबे करून देणं हे सगळं हळूहळू तिच्याकडेच आलं. स्वत:च्या मुलांबरोबर एरवीही ती ते करतच होती. तिच्या दृष्टीने फारसं काही बदललं नव्हतं.
 
 
मार्गशीर्षातल्या एका आठवड्यात शुभा संध्याकाळी घरी आली.
“वहिनी, तुम्ही मला भरली वांगी करून द्याल का? मला येतात करता, पण तुमच्यासारखी जमत नाहीत. परवा ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकेक पदार्थ करून आणायचा आहे. मला भरली वांगी करून न्यायची आहेत.”
“देईन की. किती जण आहेत?”
“दहा तरी लोक आहेत.” शुभाच चेहरा अपराधी झाला.
“देईन. परवा ऑफिसला जाताना घरी येऊन डबा घेऊन जा. तयार ठेवते.”
संध्याकाळी दिलीप घरी आला, तशी सुमीने त्याला स्कूटर काढायला लावली. बाजारात जाऊन तिने पारखून निरखून वांगी घेतली. घरातल्या सामानाची पाहणी करून त्याप्रमाणे केलेल्या यादीनुसार सगळं घेऊन दोघे घरी आले, तेव्हा बराच उशीर झाला होता. सकाळी लवकर उठून तिने दहा माणसांची भाजी करून डबा तयार ठेवला.
रात्री बर्‍याच उशिराने शुभा डबा घेऊन परतली.
“वहिनी, काय सुंदर भाजी झाली होती! चाटून पुसून संपवली सगळ्यांनी. फारच मस्त. विचारलं मला, नक्की तूच केलीस का, कशी केलीस ते सांग म्हणून..” ती हसत म्हणाली.
‘’मग काय सांगितलंस?” दिलीपने अचानक विचारले.
शुभा गडबडली.
“सांगितली रेसिपी. त्यात काय? आता वहिनी कशी करतात ते माहीत आहे ना.”
दिलीप काही बोलला नाही यावर. त्याने सुमीकडे पाहिलं. ती त्याच्याकडे बावचळून बघत होती.
काही दिवसांनी पुन्हा एकदा भरल्या वांग्यांची फर्माइश आली. या वेळी शुभाकडे ऑफिसचे लोक जेवायला येणार होते आणि त्यांनी खास हीच भाजी हवी म्हणून आग्रह धरला होता. सुमी घरातलं सगळं आवरून सकाळीच शुभाकडे गेली. सगळा स्वयंपाक करून, सगळे जेवल्यावर मग ती घरी आली.
“कोण कोण होते जेवायला?” घरी आल्यावर दिलीपने विचारलं.
“काय माहीत?”
“म्हणजे?”
“म्हणजे मी बाहेरच्या खोलीत गेलेच नाही. आपलं काय काम तिकडे?”
‘’तू वाढायला पण गेली नाहीस?”
“नाही. शुभाच गेली. ती म्हणाली, तुम्ही ओळखत नाही कुणाला. मीच वाढते.”
दिलीपचा चेहरा फुलला.
“सुमी, इथून पुढे तू तिला नाही म्हणून सांग.” हे एकच वाक्य बोलून तो चप्पल सरकवून बाहेर निघून गेला.
सुमीला काही कळेचना. मदत करावी असं म्हणाला होता तो. मदतच तर करत होती ती. इतक्या वर्षांमध्ये हे असं पहिल्यांदाच घडत होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“काही चुकलं का हो माझं?” तिने त्याला रात्री विचारलं.
त्याने तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवला.
“सुमी, तुला कळलं नाही का काही? नको इतकं धावून धावून करू कुणासाठी.”
“अहो, ती आपलीच ना? मग काय बिघडलं?”
तो यावर काही बोलला नाही. इतक्या वर्षांत प्रथमच तो तिच्याकडे पाठ फिरवून झोपून गेला.
सुमीने हे सगळं दुसर्‍या दिवशी तिच्या स्वयंपाकघराला सांगितलं. त्याने मायेने ते ऐकून घेतलं. काही दिवस अबोल शांतता उरली घरात.
त्याच्या पुढच्याच महिन्यात शुभा घरी आली. विनयचा वाढदिवस होता. त्याचे काही मित्र आणि त्यांच्या बायका यांना शुभाने जेवायला घरी बोलावलं होतं.
“मदतीला याला का हो वहिनी?” तिने आर्जवाने विचारले.
“येईन की.”
“तुम्ही सगळेही असालच ना?”
“हो, हो, आम्ही सगळे येऊ.” सुमीने परस्पर सांगून टाकलं. दिलीपला हे आवडणार नाहीये याची तिला मनातून टोचणी लागून राहिली. आणि झालंही तसंच. तो फारसा काही बोलला नाही, पण त्याच्या चेहर्‍यावर तीव्र नापसंती उमटली होती. तिच्या आग्रहामुळे तो तिच्याबरोबर शुभाकडे गेला. पार्टी रंगात आली, तशी विनयच्या मित्राची बायको एकदम म्हणाली, “शुभा, तुझ्या हातची भरली वांगी खायची आहेत कधीची. इतकं ऐकलंय मी. कधी खायला घालतेस?”
दिलीपने रोखून शुभाकडे बघितलं. शुभाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. हसून ती म्हणाली, “अगं कधीही सांग. करेन की तुझ्यासाठी. त्यात काय?”
स्वयंपाकघराच्या उंबर्‍यात उभ्या असलेल्या सुमीने हे सगळं पाहिलं. ती आत वळली आणि तिने आतला पसारा आवरायला घेतला.
अपेक्षेप्रमाणे काही दिवसांनी संध्याकाळी शुभा घरी आली. दिलीप नुकताच ऑफिसमधून आला होता. सुमी त्याच्यासाठी चहा करत होती. शुभा आलीय बघून तिने चहाचं आधण वाढवलं.
“वहिनी, या रविवारी तुमची मदत हवी होती.”
“का गं?”
“त्या दिवशी विनयचे मित्र आले होते पार्टीला सगळे. तुम्ही आत होतात. त्यामुळे तुम्ही ऐकलं नाही कदाचित. पण त्या सगळ्यांना भरली वांगी खायची आहेत.” ती एका दमात म्हणाली.
“ते सगळे असं म्हणाले की माझ्या हातची भरली वांगी खायची आहेत म्हणून?” सुमीने निष्पाप आवाजात विचारलं.
“नाही हो. त्यांना कुठे माहीत आहे तुम्ही करता भरली वांगी म्हणून?” शुभा पटकन म्हणाली.
सुमी वळली. तिने कपात चहा ओतला. तिचा निर्णय झाला.
चहाचा कप शुभाच्या पुढ्यात ठेवत ती शांतपणे म्हणाली, “नाही जमणार मला करायला. मला वेळ नाहीये या रविवारी.”
शुभालाच काय, पण सगळ्या घरालाच सुमीचं उत्तर ऐकून धक्का बसला. सुमीने शुभाच्या पलीकडे बसलेल्या दिलीपकडे बघितलं. तो शांतपणे चहा घेत होता. त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं अस्पष्ट हसू आणि नजरेतलं कौतुक फक्त सुमीला उमजलं.