महिषासुरमर्दिनी आणि कामाक्षी

विवेक मराठी    03-Oct-2022
Total Views |
@स्वप्ना कुलकर्णी  

devi
 
कांचीपुरम येथील कामाक्षी मंदिर देवीचे एक शक्तिपीठ आहे. येथे मातेची नाभी पडल्याने, पृथ्वीचा नाभी बिंदू असा या जागेचा काही ठिकाणी उल्लेख केला जातो. येथील गर्भगृहात देवी पद्मासनात बसलेली आहे. ती चतुर्भुज असून एका हातात ऊस, एका हातात फुलांचा गुच्छ, एका हातात पाश आणि उरलेल्या हातात अंकुश घेऊन बसली आहे. ती नेहमीच नटलेली, उत्तमोत्तम साड्या नेसलेली, फुले आणि साजशृंगार केलेली आहे.
 
 
कामाक्षी संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्यातील काही थोडक्यात दिल्या आहेत.
 
 
देवी कामाक्षी ही इक्षवसु घराण्याची कुलदेवी. मार्कंडेय पुराणानुसार प्रभू रामचंद्राचे पिता राजा दशरथाने येथे पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता, म्हणूनच अपत्यहीन जोडपी या मंदिरात येतात आणि आशीर्वाद घेतात. देवीने कामाक्षी रूपात शिवाच्या प्राप्तीसाठी शिवआराधना केली होती. सुईच्या अग्रावर उभे राहून तिने ही कठोर तपस्या केली. शिव प्रसन्न झाले आणि फाल्गुन महिन्यात त्या दोघांचे लग्न लागले. (तंजावर वस्तुसंग्रहालयात या पोझमधील देवीची मूर्ती ठेवली आहे, असे एके ठिकाणी वाचनात आले.)
देवर्षी दुर्वास शाप मिळाल्यावर इथे आले आणि कामाक्षीची यथायोग्य पूजा आणि भक्ती करून शापमुक्त झाले. येथेच त्यांनी चिंतामणी सौभाग्य कल्प अर्थातच दुर्वास संहिता लिहिली. या संहितेत लिहिल्याप्रमाणेच येथील देवीची पूजा-अर्चना केली जाते. त्यांनीच या मंदिरात देवीसमोर श्रीचक्र स्थापन केले.
 
 
असे म्हणतात की देवीचे रूप एकेकाळी रौद्र होते, गर्भगृह तप्त असायचे. आदिशंकराचार्य यांनी तिला स्तोत्र म्हणून शांत केले. येथेच त्यांनी सौंदर्य लहरी लिहिल्या.
 
 
देवी जरी अनंत काळापासून येथे असली, तरी सांप्रत मंदिर पल्लव साम्राज्यकाळात, सोळाव्या शतकात बांधण्यात आले आहे. दाक्षिणात्य मंदिरांची खास ख्याती म्हणजे उंच गोपुर आणि त्यावरील कोरीवकाम. या गोपुरावर आपण अष्टहस्त देवी महिषासुराचा वध करताना बघू शकतो. तिच्या हातात असलेली शस्त्रे विळा, अंकुश, तलवार आणि भाला तर इतर हातात शंख, चक्र, पद्म. तिचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, नासिका सरळ आहे, तिने मुकुट घातला असून त्यातून सुटलेल्या केसांच्या बटा वार्‍यावर लहरत आहेत. तिच्या हातात बांगड्या, गोठ तर दंडावर बाजूबंद आहेत. कमरेला मेखला आणि पायांत पैंजण आहेत. तिचे नेसूचे वस्त्र घट्ट असून त्यावर जरीकाम आहे. दोन हातांनी भाला तोललेला असून तो महिषासुराच्या छातीत रोवला आहे. तिने एक पाय महिषासुराच्या स्कंधावर, तो उठू नये म्हणून दाबून धरलेला आहे. तिच्या चेहर्‍यावर महिषासुरवधाचे समाधान दिसत आहे.