आयुर्वेद व्यासपीठ काल, आज आणि उद्या

विवेक मराठी    09-Oct-2022
Total Views |
@वैद्य विक्रम पाटील  9324451708
 
‘कृण्वन्तो विश्वं स्वस्थम्।’ या ध्यासाने प्रेरित आणि ’आयुर्वेद’ या जगातील सर्वात प्राचीन अशा भारतीय वैद्यकशास्त्राला त्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याकरिता झटणारी वैद्यांची संघटना म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ. या संघटनेच्या स्थापनेला या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने, दि. 11 ते 13 नोव्हेंबर या तीन दिवसांत नागपूर येथे आयुर्वेद व्यासपीठ रौप्यमहोत्सव समापन समारोह आयोजित केला आहे. रेशीमबागमधील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंदजी सोनोवाल, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री मा. वैद्य प्रमोदजी सावंत, तसेच आयुष मंत्रालयातील विविध उच्च पदाधिकारी, आयुष मंत्रालयाशी संलग्न विविध शासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
 
 
Ayurved Vyaspeeth
 
या पार्श्वभूमीवर आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेची स्थापना, 25 वर्षांची वाटचाल आणि पुढील मार्गक्रमणाची आखणी याविषयी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. वैद्य विनय वेलणकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
 
 
आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेची सुरुवात कशी झाली? आयुर्वेद क्षेत्रात अनेक संस्था असताना या नवीन संघटनेच्या स्थापनेची काय आवश्यकता होती? थोडक्यात, या संस्थेच्या जन्मकथेबद्दल काय सांगाल?
 
 
सुमारे 25 वर्षांपूर्वी आयुर्वेद क्षेत्रात अनेक विविध संस्था कार्यरत होत्या. मी स्वत:, तसेच आयुर्वेद व्यासपीठातील माझे आत्ताचे अनेक सहकारी पूर्वी वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत होतो. या तत्कालीन संस्थांची ध्येयधोरणे, उद्दिष्ट, स्वरूप भिन्न होते. परंतु, एकंदरीत आयुर्वेदशास्त्राला फारसे प्राधान्य नव्हते. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार सामान्य नागरिकांपासून वैद्यांपर्यंत होण्याची नितांत आवश्यकता होती. आणि त्यासाठी काही सूत्रबद्ध रचनेची गरज जाणवत होती. सुदैवाने, आमच्यावर संघाचे संस्कार असल्याने सुनियोजित उपक्रमांद्वारे आयुर्वेदाच्या कार्याची उभारणी करण्याचे ठरले आणि अशा समविचारी वैद्यांनी एकत्र येऊन एका नव्या संघटनेची बांधणी करण्यास सुरुवात झाली. 25 वर्षांपूर्वी कराडजवळ ’राममळा’ येथे पहिला अभ्यासवर्ग झाला. या अभ्यासवर्गाला त्या वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील साधारण तिशीतील 52 तरुण वैद्य उपस्थित होते. यांत औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर, नाशिकचे वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य अभय कुलकर्णी, पुण्यातील वैद्य धनंजय कुलकर्णी ही वैद्यमंडळी होती. याशिवाय वैद्य भा.वि. साठ्ये, वैद्य वि.वि. उपासनी, वैद्य सरदेशमुख सर, डॉ. कुंटे अशी आयुर्वेदातील काही जेष्ठ मंडळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती. आणि येथूनच ’आयुर्वेद व्यासपीठ’ या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
 
 
 

Ayurved Vyaspeeth

संस्थापक अध्यक्ष मा. वैद्य विनय वेलणकर -9930669379
 
 
आयुर्वेद व्यासपीठ स्थापनेच्या वेळी काय उद्दिष्टे होती? या अनुषंगाने प्रत्यक्ष कार्य कसे चालते?
 
 
आयुर्वेदाचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार सर्व स्तरांतून व्हावा हे उद्दिष्ट. व्यासपीठाचे काम सुनियोजित पद्धतीने कसे करता येईल या दृष्टीने पहिल्या अभ्यासवर्गात चर्चा आणि चिंतन झाले. त्यानुसार सेवा, शिक्षण, प्रचार आणि संशोधन या चतु:सूत्रीच्या आधारे काही उपक्रमांची योजना आखली गेली. यातील काही उपक्रम हे प्रत्येक शाखेसाठी अनिवार्य उपक्रम म्हणून राबवले जातात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा अनिवार्य उपक्रम म्हणजे क्लिनिकल मीटिंग. आयुर्वेदाच्या प्रगतीला खीळ घालणारी एक बाब म्हणजे गुप्तता. अनेक वर्षांपासून आयुर्वेदाला काळिमा फासणारी ही गुप्तता म्हणजे वैद्य आपले ज्ञान, अनुभव, आपले निदान किंवा चिकित्सेतील कौशल्य इतरांना सांगत नव्हते. म्हणून क्लिनिकल मीटिंग या उपक्रमाद्वारे या धारणेला छेद दिला. यामध्ये दर महिन्याला ठरलेल्या नियमित वारी/दिवशी वैद्य एकत्र येतात. एक वैद्य आपले यशस्वी रुग्णानुभव शास्त्रीय पद्धतीने मांडतो, त्यावर प्रश्न-उत्तरे, चर्चा, अन्य वैद्यांचे त्या विषयावरील अनुभव, ग्रंथातील संदर्भ आणि ज्येष्ठ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अशा पद्धतीने मीटिंग होते. या निमित्ताने, अन्य शहरांतील/शाखांमधील वैद्यांनाही निमंत्रित केले जाते, तसेच केस मांडणार्‍या वैद्य वक्त्यांचाही अन्य शहरांमध्ये प्रवास, नवीन वैद्यांशी संपर्क होतो. आयु व्यासपीठाच्या या उपक्रमाची सुरुवात प्रथम डोंबिवली येथे झाली. तेथून पुढे अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये या मीटिंग होऊ लागल्या. विद्यार्थ्यांवर व नवीनच पास-आउट झालेल्या वैद्यांवर या उपक्रमाचा सर्वाधिक उत्तम परिणाम झाला. अशा रुग्णानुभव चर्चसत्रातून शास्त्रोक्त माहिती, व्यावहारिक कौशल्य, वनस्पती आणि अन्य औषधांचा सुयोग्य वापर, पथ्यापथ्याचे महत्त्व अशा अनेक अंगांनी मिळणारे समृद्ध ज्ञान नवोदित वैद्यांचा आयुर्वेदिक प्रॅक्टिसचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले. त्यामुळे, अगदी ग्रामीण भागांपासून ते मोठमोठ्या शहरांमध्ये ‘डॉ.’ऐवजी ’वैद्य’ अशी पाटी लावून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणार्‍या तरुण यशस्वी वैद्यांमागे ’क्लिनिकल मीटिंग’ या उपक्रमाचे मोठे योगदान आहे.
 
 
याशिवाय, धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य किंवा सामान्य जनांकरिता विविध विषयांवर व्याख्याने, वर्षभरात वैद्यांसाठी वेगवेगळ्या शाखांकडून शास्त्रीय परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. तीन वर्षांतून एकदा राज्य/राष्ट्रस्तरीय मोठ्या परिसंवादाचे आयोजन केले जाते. आयुर्वेद अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत अनेक आयुर्वेद महाविद्यालयांच्या सहयोगाने केले जाते. तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्या निमित्ताने आयुर्वेदिक प्रॅक्टिससाठी प्रेरणा देणारी उद्बोधक व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल, राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा असे अभिनव उपक्रम चालवले जातात. बालवयातच आयुर्वेदाचा परिचय व्हावा यासाठी ’शालेय अभ्यासक्रमांत आयुर्वेद’ या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सोप्या आणि रंजक भाषेत आयुर्वेदातील आरोग्य संकल्पनांची ओळख करून दिली जाते. याशिवाय पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी ’कळी उमलताना’ या उपक्रमाद्वारे शास्त्रोक्त व नैतिक लैंगिक शिक्षण दिले जाते.
 
  
 
आयुर्वेद व्यासपीठाची संघटनात्मक रचना नेमकी कशी आहे?
 
 
आयुर्वेद व्यासपीठ संघटना स्थापन झाल्यावर त्याची अधिकृत नोंदणी आणि आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली. सुरुवातीला आयु व्यासपीठाचे काम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते. तेव्हा सर्व प्रमुख शहरांमध्ये व्यासपीठाच्या शाखा सुरू केल्या. नंतर काही वर्षांतच सर्व जिल्ह्यांमध्ये व्यासपीठाच्या शाखा सुरू झाल्या. इतर संस्थांप्रमाणेच सर्व शाखांमध्ये 11 ते 13 जणांची एक कार्यकारिणी असते. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सह-कार्यवाह, कोषाध्यक्ष अशी पदे व अन्य सदस्य असतात. संघटनेचा विस्तार वाढला, तसतसा काही ठिकाणी मुख्य जिल्हा/शहर शाखेबरोबरच तालुका पातळीवरही शाखा स्थापन झाल्या आहेत. व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ अशा चार प्रांतांमध्ये ह्या शाखांची वर्गवारी करण्यात आली. या प्रत्येक प्रांताची/विभागाची एक कार्यकारिणी आहे आणि यांच्या वरील स्तरावर केंद्रीय कार्यकारिणी आहे. वैद्य रजनी गोखले या केंद्रीय कार्यकारिणीच्या विद्यमान अध्यक्ष असून त्यांच्यासह 11 सहकारी आहेत. ’चरक सदन’ हे आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यालय नाशिकच्या द्वारका सर्कलजवळ आहे.
 

Ayurved Vyaspeeth 
 
 
मागील 25 वर्षात आयुर्वेद व्यासपीठाचा विस्तार कसा झाला?
 
 
व्यासपीठाची स्थापना झाल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद येथे आयुर्वेद इंटर्नीजकरता, तसेच नवोदित वैद्यांकरता एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले. या परिसंवादाला सुमारे 450 वैद्य-विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आयुर्वेदिक प्रॅक्टिस का करावी, कशी करावी याचा आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी विविध व्याख्यानांची रचना केली होती. याबरोबरच चतु:सूत्रीपैकी ’सेवा’ या सूत्राशी निगडित आयुर्वेदाची प्रॅक्टिस ’सेवा’ स्वरूपात कशी करता येईल, त्याचा सेवा म्हणून समाजाला कसा लाभ पोहोचवता येईल या अनुषंगाने डॉ. आनंद फाटक (औरंगाबाद) यांचे व्याख्यान विशेष लक्षणीय होते. या अभिनव परिसंवादामुळे आयुर्वेद व्यासपीठाबद्दल वैद्यांमध्ये कुतूहल जागृत झाले, तसेच या संघटनेचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. याच परिसंवादातून वैद्य गिरीश टिल्लू या नुकत्याच इंटर्नशिप पूर्ण केलेल्या वैद्यांच्या रूपाने आयुर्वेद व्यासपीठाला आपला पूर्णवेळ प्रचारक मिळाला. यांनी आपली पुढची करिअर सुरू करण्याआधी एक पूर्ण वर्ष व्यासपीठ प्रचारासाठी देण्याचा संकल्प सोडला. यानंतर खर्‍या अर्थाने व्यासपीठाची महाराष्ट्रभर घोडदौड सुरू झाली. वैद्य गिरिश टिल्लू यांनी संपूर्ण राज्यात अथक प्रवास करून संघटनेचा प्रचार-प्रसार केला. अनेक वैद्यांना, विद्यार्थ्यांना या संघटनेत सामील करून घेतले. त्यांच्यानंतर वैद्य राहुल पाटील (उस्मानाबाद), वैद्य सुदीप चिटणीस (डोंबिवली), वैद्य विवेक कुलकर्णी (लातूर), वैद्य अमेय भावे (चिपळूण), वैद्य दीपक घुमे (पुणे) अशा अनेक पूर्णवेळ प्रचारकांनी आपली एक-दीड वर्षे संघटनेला देऊन काही वर्षांतच आयुर्वेद व्यासपीठाला सशक्त केले. संघातील प्रचारक ज्याप्रमाणे नि:स्वार्थी भावनेने आणि संपूर्ण समर्पित वृत्तीने कार्य करतो, त्याप्रमाणे तरुण वैद्यांनी आपल्या प्रॅक्टिसला सुरवात करण्याआधी आयुर्वेदाला आणि त्यासाठी झटणार्‍या संघटनेला आपल्या एक-दीड वर्षांचे समर्पण दिले. व्यासपीठाच्या उभारणीत प्रचारकांचे हे योगदान संस्मरणीय आणि उल्लेखनीय आहे. याशिवाय विविधांगी उपक्रम, अभिनव कार्यक्रमांमुळे व्यासपीठ ही संघटना महाराष्ट्रातील वैद्यवर्गात प्रसिद्ध झाली. आज व्यासपीठ महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड़, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, तेलंगण आणि कर्नाटक या 9 राज्यांमध्ये कार्यरत आहे. तसेच यापुढे पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, पूर्वेकडील ओरिसा, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर अशा राज्यांमध्ये व्यासपीठाच्या कार्याला लवकरच सुरुवात होत आहे.
 
 
 
प्रत्येक संघटनेला उत्तम काम करणार्‍या कार्यकर्त्यांची गरज असते. व्यासपीठ ही वैद्यांची संघटना आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या या वैद्यांना कार्यकर्ते म्हणून घडवण्यासाठी काही वेगळे प्रशिक्षण दिले जाते का?
 
 
हे खरेय की प्रत्येक वैद्याला संघटनेत काम करण्याचा अनुभव नसतो किंवा संघटनात्मक कार्याबद्दल फारशी माहिती नसते. म्हणूनच व्यासपीठाचा कार्यकर्ता हा प्रत्यक्ष कामातून घडावा, यावर आमचा विश्वास आहे. संघटनेने राबवलेल्या विविध योजनांमध्ये किंवा उपक्रमात वैद्यांना सहभागी करून घेतले जाते. लहान-मोठ्या जबाबदारीबरोबरच योग्य ते मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे कार्यक्रमातून कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यातून पुढचा कार्यक्रम तयार होत जातो. तसेच संघपरिवारातील इतर संस्थांमध्ये ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेतले जातात, त्याचप्रमाणे आम्ही व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित करतो. आमचे विभागीय अभ्यासवर्ग दर वर्षी साधारणत: एप्रिल-मे मध्ये दोन दिवस असतात, तर दर तीन वर्षांनी अखिल भारतीय केंद्र स्तरावरचा दोन दिवसीय अभ्यासवर्ग असतो. यामध्ये संघटनेसाठी काम का केले पाहिजे, कसे केले पाहिजे, कामांसाठी कसा वेळ काढला पाहिजे आणि आपला व्यवसाय सांभाळून संघटनेचे काम करण्यासाठी रोजच्या दिवसाचे नियोजन कसे केले पाहिजे, याचे मार्गदर्शन आम्ही करतो. याशिवाय वक्तृत्व, नेतृत्व, संभाषण, लेखन अशा व्यक्तिमत्त्व विकासातील आवश्यक कलाकौशल्यांसाठी तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. अगदी समारंभातील अध्यक्ष, प्रमुख अतिथी किंवा अन्य वक्ते यांचा परिचय कसा करून द्यावा इथपासून, सामान्य लोकांसमोर किंवा मोठ्या वैद्यकीय परिषदांमध्ये शास्त्रीय विषयांचे सादरीकरण कसे करावे इथपर्यंत विविध विषयांचा यात अंतर्भाव असतो. संघटनेतून कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांमधून संघटन निर्मिती हे व्यासपीठाच्या यशामागचे सूत्र आहे. आपला व्यवसाय, कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून संघटनेसाठी नि:स्वार्थी बुद्धीने अथक कार्य करणार्‍या या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता म्हणून आमच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अनावृत केलेल्या बोधचिन्हासह ‘अविरत कार्यरत’ हे घोषवाक्य आम्ही प्रसृत केले आहे.
 
 
 
Ayurved Vyaspeeth
 
आयुर्वेद व्यासपीठाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील काही उल्लेखनीय टप्पे सांगाल का?
 
 
चतु:सूत्रीतील ’सेवा, प्रचार, शिक्षण आणि संशोधन’ याच अनुषंगाने आयुर्वेद व्यासपीठाच्या सर्व कार्याची योजना किंवा रचना केली जाते. वर्षभर सर्व शाखा अनिवार्य दहा कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध अभिनव उपक्रम राबवत असतात. तर दर तीन वर्षांनी एक व्यापक कार्यक्रम या सगळ्या वैद्यांना एकत्र आणेल, त्यांचा उत्साह वाढवेल आणि संघटनेचे शक्तिप्रदर्शन होईल या हेतूने घेतला जातो. आम्ही 2001 साली नगरला असा पहिला कार्यक्रम घेतला. त्याला दोन हजार वैद्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे केवळ महिला वैद्यांचा परिसंवाद आम्ही आत्तापर्यंत एकदा नाशिकला आणि दुसर्‍यांदा कल्याणला आयोजित केला. या मेळाव्यांना तीनशे-साडेतीनशे महिला एकत्र येतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात दोन्ही कार्यक्रमामध्ये हजारांहून अधिक महिलांची अत्यंत उत्साहवर्धक उपस्थिती होती.
 
 
 
आयुर्वेद व्यासपीठ वेळोवेळी उत्तमोत्तम शास्त्रीय पुस्तकांचे प्रकाशन करत असते. व्यासपीठाने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या अमृतबिंदु, यशस्वी चिकित्सा, गुग्गुळकल्पना, आरोग्यवर्धिनी, यशस्विनी, Career after BAMS,, पुरुष वंध्यत्व, PCOD, कळी उमलताना, Ayurvedic Education : Perspectives and Implications या पुस्तकांना वैद्यवर्गाची व विद्यार्थ्यांची भरपूर प्रशंसा मिळाली. आगामी रौप्यमहोत्सवी समारंभात काही नवीन पुस्तकांचे तसेच काही पूर्वप्रकाशित पुस्तकांचे हिंदी अनुवाद प्रकाशित होतील. याव्यतिरिक्त वर्ष 2001पासून ’आयुर्वेद दैनंदिनी’चे प्रकाशन होते. दर वर्षी एका विशिष्ट वैद्यकीय विषयाला धरून या दैनंदिनी (डायरी)चे संपादन केले जाते. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शाखेला या दैनंदिनीच्या संपादनाची जबाबदारी दिली जाते. तसेच या दैनंदिनीत वैद्यसूची (Directory) समाविष्ट असते, ज्यात विभाग, जिल्हा, तालुका, शहर अशा क्रमाने वैद्यांचे नाव, संपर्कासाठी पत्ता, नंबर, ईमेल अशी उपयुक्त माहिती नमूद केलेली असते. अशी ही डायरीची नावीन्यपूर्ण संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वी कुठल्याही संस्थेने यशस्वीपणे आणि सातत्याने राबविली नव्हती. आज हजारो वैद्यांच्या टेबलवर आयुर्वेद दैनंदिनी असतेच. इतकी वर्षे आम्ही या आयुर्वेद क्षेत्रात होणार्‍या निवडणुकांमध्ये कधी सहभाग घेतला नव्हता. पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शासकीय व अन्य चांगल्या संस्थांच्या आधिकारिक पदांवर आपले चांगले वैद्य असलेच पाहिजेत या निश्चयाने आम्ही निवडणुका लढवल्या. सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये आमचे तीन सदस्य निवडून आले, तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये चार सदस्य निवडून आले. आता ही काउन्सिल सिस्टिम बरखास्त झाली असली, तरी आयुष मंत्रालयाच्या काही विभागांमध्ये, CCRASसारख्या संशोधन संस्था किंवा अन्य संलग्न संस्थामध्ये व्यासपीठाचे कार्यकर्ते चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच शासनाच्या विविध धोरणांमध्ये निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी यांत सहभागी आहेत. उदा., भारतीय चिकित्सा पद्धतीच्या राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष्यपदी व्यासपीठाचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष जयंतराव देवपुजारीजी आहेत. आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठमध्ये आयुर्वेद व्यासपीठाचे पाच वैद्य नियुक्त झाले आहेत. असे आणखीही बरेच उल्लेखनीय यश सांगण्यासारखे आहे.
 
 
 
आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार सर्वसामान्यांपर्यंत झाला पाहिजे. आयुर्वेदाचे पहिले प्रयोजन आहे ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्।’ म्हणजे निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे. आणि मग ‘आतुरस्य विकार प्रशनम्।’ म्हणजे रुग्णाची रोगापासून मुक्तता करणे. आयुर्वेदाची जीवनशैली जर नीट पाळली, तर माणूस आजारी पडण्याची वेळच कमी येईल. आणि हे जर समाजात प्रस्थापित झाले, तर वैद्यकीय व्यवस्थेवर पडणारा ताण कमी होईल. कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर सगळा भर होता. या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांमध्ये आयुर्वेद व्यासपीठाची मोठी भूमिका होती. या संदर्भात, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमंत्रित केलेल्या ऑनलाइन चर्चेमध्ये आयुर्वेद व्यासपीठातर्फे प्रेझेंटेशन मी स्वत: केले होते. या चर्चेत असे लक्षात आले की रोगप्रतिकारक्षमता वाढवायची असेल, तर आयुर्वेद सोडून जगात दुसर्‍या कुठल्याही शास्त्रांमध्ये औषध नाही. आयुर्वेद व्यासपीठाने या कोरोना काळात आहार, व्यायाम, निद्रा, रोगप्रतिकारक्षमता वाढवणे, पर्यायी औषधोपचार अशा विविध गोष्टींबाबत सामान्यजनांचे प्रबोधन केले.
 
 
आयुर्वेद जनसामान्यांत रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. आयुर्वेद व्यासपीठतर्फे सर्वसामान्यांकरिता पाली, अलिबाग, नवी मुंबई, पनवेल, नगर, तळवडे, औरंगाबाद, अमरावतीजवळील दुर्लक्षित भागात स्थायी रुग्णसेवा प्रकल्प चालवले जातात. अतिवृष्टी, साथीचे आजार, तसेच अन्य नैसर्गिक संकटांमध्ये आयुर्वेद व्यासपीठाचे कार्यकर्ते आपत्तिनिवारणाअंतर्गत प्रासंगिक सेवा देतात. अन्य उपक्रमांमध्ये सर्वसामान्यांसाठी आहार संकल्पनेवर व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. विविध सण-उत्सवांनिमित्त किंवा संस्थामार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यासपीठाचे वैद्य स्वास्थ्य/रोग विषयांवर आयुर्वेदशास्त्राच्या माध्यमातून प्रबोधन करतात.
 
ही झाली व्यासपीठाची पंचवीस वर्षांची वाटचाल. आता पुढील वाटचालीचे नेमके स्वरूप किंवा दिशा काय असू शकेल?
 
 
आमचे ध्येय आहे ‘वैद्य तितुका मेळवावा। आयुर्वेद मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा॥’ त्यामुळे प्रत्येक आयुर्वेदीय पदवीधराने आयुर्वेदाची चांगली चिकित्सा करावी. जगातले आद्य किंवा सर्वात पुरातन वैद्यकशास्त्र जर कुठले असेल, तर ते आयुर्वेद आहे. त्यामुळे तो जगामध्ये प्रस्थापित व्हावा आणि म्हणून परदेशातही पुढे हा आयुर्वेद चांगल्या पद्धतीने कसा जाईल यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. दुसरे म्हणजे आपल्या केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आयुर्वेदाला प्राधान्य देणारे वैद्यकशास्त्र निर्माण होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आतापर्यंत मॉडर्न मेडिसिन हेच देशाचे प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये भारतीय विचारसरणी, संस्कृती व परंपरा व्यक्त होते. हा भारतीय वारसा लाभलेल्या आयुर्वेदाला मेन स्ट्रीम वैद्यकशास्त्रामध्ये प्राधान्य मिळालेच पाहिजे, यासाठी आमचे प्रयास चालू आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या अशा प्रयत्नानंतर आयुष मंत्रालय निर्माण झाले आहे. आता ते राज्यस्तरावरही व्हावे असा प्रयत्न चालू आहे. आपल्या आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार केवळ भारतभरच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये होईल या दृष्टीने या संघटनेची वाटचाल असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही काही आगामी रचना करत आहोत.