संघस्वयंसेवकांचा सहभाग (लेखांक 7)

विवेक मराठी    09-Oct-2022   
Total Views |
सन 1938-1939मध्ये निजामविरोधी नि:शस्त्र प्रतिकार लढ्यात मध्य प्रांत आणि वर्‍हाडमधील रा.स्व. संघस्वयंसेवकांच्या सहभागाचा संक्षिप्त परामर्श गेल्या लेखात घेण्यात आला. या लेखात उर्वरित प्रदेशांतील, म्हणजे हैदराबाद संस्थानातील आणि महाराष्ट्र प्रांतातील काही प्रमुख संघस्वयंसेवकांच्या सहभागाचा विचार करू. प्रस्तुत लेखात घेण्यात आलेला परामर्श परिपूर्ण नाही, हे नमूद केले पाहिजे.
 
vivek
 
दत्तात्रय लक्ष्मीकांत जुक्कलकर
 
 
हैदराबाद संस्थानात रा.स्व. संघाचे काम कधी सुरू झाले, याचा नेमका तपशील प्रस्तुत लेखकाला अद्याप मिळालेला नाही. विविध संस्थानांत आपल्या संघटनेचे काम ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावाने न करता अन्य नावाने सुरू करण्याचे संघनिर्माते डॉ. हेडगेवारांचे धोरण होते. याचाच भाग म्हणून कोल्हापूरला ’राजाराम स्वयंसेवक संघ’ आणि ग्वाल्हेरला ’राणोजी स्वयंसेवक संघ’ या नावाने संघाचे काम सुरू करण्यात आले. त्याप्रमाणे ’हिंदू स्वयंसेवक संघ’ या नावाने हैदराबाद संस्थानात संघाचे काम सुरू झाले असावे. मुंबईहून आलेल्या यलाप्पा यांनी रा.स्व. संघाची (बहुधा वेगळ्या नावाने) पहिली शाखा करीमनगर जिल्ह्यातील कोरुटला या आपल्या मूळ गावी 1936 साली सुरू केल्याचे सांगितले जाते. रा.स्व. संघाच्या अभिलेखागारातील उपलब्ध कागदपत्रांत संघकामाची पहिली नोंद सापडते ती दि. 3 डिसेंबर 1939 या दिनांकाची! म्हणजे हा लढा संपल्यानंतरची ही नोंद आहे.
 
 
vivek
 
2735, गौळीगुडा हैदराबादहून ’पूज्य डॉ. हेडगेवार’ यांना पाठविलेले हे पत्र नि:शस्त्र प्रतिकार लढ्याचे एक अग्रणी दत्तात्रय लक्ष्मीकांत जुक्कलकर यांनी लिहिलेले असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पत्राच्या सुरुवातीलाच ’यापूर्वी पाठविलेले पत्र पोहोचले असेलच’ असा उल्लेख आहे. दि. 3 डिसेंबर 1939ला डॉक्टरांना पाठवलेल्या या पत्रात ते लिहितात, ‘येथील संघाचे काम व्यवस्थित चालले आहे. ता. 1 रोजी श्री. के.बी. लिमये (महाराष्ट्र प्रांत संघचालक काशिनाथ भास्कर लिमये - लेखक) यांनी संघाच्या स्वयंसेवकांना भेट दिली. संघाच्या कार्यकर्त्या मंडळींशी विचारविनिमय झाला व सर्व स्वयंसेवकांकरिता त्यांनी बौद्धिक वर्गही घेतला. त्यांच्या आगमनाने स्वयंसेवकांना चांगलेच उत्तेजन मिळाले. पुण्याहून आलेले स्वयंसेवक श्री. कुलकर्णी यांनी आठ दिवसांचा शिक्षक तयार करण्याचा वर्ग घेतला, तो कालच संपला. तसेच यापुढे त्यांनी येथेच स्थायिक होण्याचे ठरविले आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यांच्या राहण्याने आम्हास पुष्कळच मदत होणार आहे. वेळोवेळी पत्र पाठवून माहिती कळवीत आहे.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Correspondence - C- A\Hyderabad 0001). थोडक्यात, दत्तोपंत जुक्कलकर हे हैदराबादमधील संघाचे प्रमुख स्वयंसेवक होते हे निश्चित. ते कधी संघस्वयंसेवक झाले आणि संघाचे काम नि:शस्त्र प्रतिकार लढ्याच्या अगोदर सुरू झाले की नंतर हे मात्र स्पष्ट नाही. तथापि, दत्तोपंतांची लढ्यातील भूमिका महत्त्वाची असल्याने ती त्रोटकपणे देणे आवश्यक आहे.
 
 
सन 1930च्या सुमारास दत्तोपंतांनी हिंदुहिताचा पाठपुरावा करण्यासाठी ’कर्मयोगी सेवा दल’ काढले होते. त्याच्याअंतर्गत प्रभात वाचनालय, शार्दूल प्रकाशन, नमस्कार व प्रार्थना मंडळ, दंगा आपद्ग्रस्त साहाय्य निधी असे उपक्रम चालविले जात. लढा सुरू झाल्यावर दलाचे संचालक या नात्याने दत्तोपंतांनी त्याचे काम स्थगित केले. लढा सुरू झाला, तेव्हा वीर यशवंतराव जोशी आणि दत्तोपंत ’हिंदू नागरिक स्वातंत्र्य संघ’ या हैदराबादमध्ये काम करणार्‍या संघटनेचे मंत्री होते. दि. 21 ऑक्टोबर 1938ला वामनराव नाईक यांच्या दुसर्‍या पुण्यतिथीनिमित्त हिंदू नागरिक स्वातंत्र्य संघाच्या वतीने यशवंतराव, दत्तोपंत आणि त्यांच्या तीन सहकार्‍यांनी हजारों लोकांच्या साक्षीने अधिकार्‍यांनी बंदी केली असताही मिरवणूक काढून अंतर्गत निर्बंधभंगास धडाडीने प्रारंभ केला. या आघाडीच्या पाच वीरांवर खटला होऊन दि. 26ला जोशी यांना पावणेदोन वर्षांचा सश्रम कारावास व रु. 200 दंड अशी शिक्षा झाली. दत्तोपंत व इतर तीन जणांना सहा महिने सश्रम कारावास व रु. 50 दंड अशी शिक्षा झाली. (केसरी, 1 नोव्हेंबर 1938.) दि. 17 जून 1939ला दत्तोपंत आपली शिक्षेची मुदत संपवून सुटले. (केसरी, 1 ऑगस्ट 1939.)
 
 
डॉक्टरांच्या निधनानंतर ’हैदराबाद संस्थान हिंदू प्रजामंडळ’च्या शीर्षपत्रावर दि. 26 जून 1940ला रा.स्व. संघाच्या सेक्रेटरींना दत्तोपंतांनी लिहिलेले दुखवट्याचे पत्र आणि त्याबरोबर हिंदू स्वयंसेवक संघ, प्रार्थना मंडळ आणि बाल संघ यांच्या वतीने संमत झालेला दुखवट्याचा ठराव संघाच्या अभिलेखागारात आहे. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar Miscellaneus1\Hyderabad 0001, 0002).
 

vivek
 
अधिवक्ता दत्तात्रय ग. देशपांडे उर्फ बाबूराव जाफराबादकर
 
 
मूळ जाफराबाद (जि. जालना) येथील दत्तात्रय ग. देशपांडे उपाख्य बाबूराव जाफराबादकर हे 1933 साली औरंगाबादेस आले आणि त्यातील व्यायामशाळा, गणेश मंडळ, विद्यार्थी चळवळ अशा सार्वजनिक कामांत सहभागी झाले. दोन वर्षांनी ते शिक्षणासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यपीठात रुजू झाले. हिंदू विद्यार्थ्यांना शेरवाणी घालण्याची सक्ती, त्यांना प्रार्थनेसाठी कुठल्याही सोयीचा अभाव, वंदे मातरम गीतावर बंदी इत्यादी अन्यायाच्या प्रतिकारात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. पुढे ते हिंदुसभेमध्ये आणि रा.स्व. संघात सक्रिय असून त्यांनी 1939 साली संघाची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी लिहिलेली ’हैदराबाद वर्‍हाड मुक्तिसंग्राम’ (नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, 1987) आणि ’संस्थान हैदराबादचे स्वातंत्र्य आणि लोकस्थिती’ (साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद, 1998) ही पुस्तके माहितीपूर्ण आहेत.
 
 
वंदे मातरम गीतावरील बंदी झुगारून देणार्‍या उस्मानिया विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले. त्यांना नागपूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयांत कुलगुरू टी.जे. केदार यांनी प्रवेश दिला. त्यात पुढे हिंदुमहासभेचे आणि जनसंघाचे नेते म्हणून नावारूपाला आलेले प्रा. विष्णू घनश्याम देशपांडे आणि संघाचे कार्यकर्ते बिंदुमाधव पुराणिक यांचे विशेष साहाय्य झाले. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी देशपांडे द्वयाने डॉ. हेडगेवार, अधिवक्ता ह.वा. कुलकर्णी (1935-36 या काळात संघाचे सरकार्यवाह), डॉ. ल.वा. परांजपे, विश्वनाथराव केळकर या संघ-हिंदुसभेच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, असे द.ग. देशपांडे यांनी नमूद केले आहे. कुलकर्णी हे देशपांडे यांचे मामाच होते. कुलकर्णी यांच्याकडे ’बनारसहून प्राध्यापकी सोडून संघकार्यास जीवन वाहून घेण्यासाठी आलेल्या श्री. माधवराव गोळवलकरांचा मुक्काम होता. आम्ही कुलकर्णी मामांकडे जात येत असताच श्री. गोळवलकरांचा व आमचा परिचय झाला, वाढला व लोभ जडला. विद्यार्थ्यांना दिलासा व धैर्य देणारी त्यांची अनेक भाषणे टिळक विद्यालयाच्या इमारतीत होत असत. श्री. गोळवलकरांनी धंतोली-धरमपेठ-शहरात विद्यार्थ्यांना राहण्यास जागा मिळवून देण्यात अपार कष्ट घेतले’ असे देशपांडे लिहितात. (हैदराबाद वर्‍हाड मुक्तिसंग्राम, पृ. 76,77.)
 
 
डॉ. हेडगेवारांनी हैदराबाद संस्थानातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा परिचय करून घेतला आणि संघस्थापनेचे उद्दिष्ट, विचार, कार्यपद्धती आदीबद्दल त्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी वारंवार भेटी दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांमधील बहुतांश विद्यार्थ्यांना डॉक्टरांचे विचार मनोमन पटले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या निवासस्थानाच्या आवारात संघ शाखा सुरू केली. भाऊसाहेब पुळूजकर (बिदर) यांच्यासारख्या काही स्वयंसेवकांनी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर आपल्या गावी परतून तेथे संघ शाखा सुरू केली. (मराठवाड्यातील संघाचा उष:काल, संपा. अप्पा पुळूजकर, रा.स्व. संघ जनकल्याण समिती, संभाजीनगर, 2007, पृ. 19, 24.)
 
 
 
सातारा-कराडकडील संघस्वयंसेवक
 
 
सातारा जिल्हा संघचालक आणि हिंदुसभेचे नेते शिवराम विष्णू उपाख्य भाऊराव मोडक हे नि:शस्त्र प्रतिकार लढ्याशी सुरुवातीपासून जोडले गेले होते. भाऊराव मार्च-एप्रिल 1938मध्ये निजामशासित मराठवाड्यातील परिस्थितीची गुप्त पाहणी करण्याकरता गेलेल्या हिंदुसभेच्या तीन सदस्यीय तुकडीचे सदस्य होते. नि:शस्त्र प्रतिकार आंदोलनासाठी फेब्रुवारी 1939मध्ये सातारा आणि दक्षिण महाराष्ट्र संस्थानांसाठी स्थापन झालेल्या युद्धमंडळाचे मोडक आणि संघाचे सातारा जिल्हा कार्यवाह आणि हिंदुसभेचे कार्यकर्ते अनंत सदाशिव भिडे उपाख्य भिडे गुरुजी अनुक्रमे अध्यक्ष आणि कार्यवाह होते. महाराष्ट्र प्रांत संघचालक काशिनाथ भास्कर लिमये मंडळाचे एक सदस्य होते. (केसरी, 17 फेब्रुवारी 1939.) सातार्‍याहून वासुदेव गाडगीळ (पुढे नाट्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध झाले), विनायक ढवळे, भास्कर गजानन उपाख्य नाना काजरेकर, अधिवक्ता का.ना. उपाख्य नाना कापरे, रंगा पवार आदी संघस्वयंसेवकांनी सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला. वसंत कुलकर्णी, कराडचे पूर्णप्रज्ञ घळसासी यानींही सत्याग्रह केला. (स्वर्गीय भाऊसाहेब मोडक जन्मशताब्दी वर्ष 1999, चरित्रात्मक स्मरणिका, पृ. 9.)
 

vivek
 
बाबूराव मोरे यांना डॉक्टरांचे पितृछत्र
 
 
यशवंत जयराम उपाख्य बाबूराव मोरे हे मूळचे चंद्रपूरचे संघप्रशिक्षित स्वयंसेवक. मॅट्रिक झाल्यावर डॉ. हेडगेवारांच्या सांगण्यावरून 1936 साली अहमदनगरच्या आयुर्वेद कॉलेजात शिक्षणासाठी आले. त्यांनी नगरच्या संघकार्यावर इतका जबरदस्त ठसा उमटविला की नगरच्या काही स्वयंसेवकांच्या घरात डॉ.हेडगेवार आणि बाबूराव मोरे या दोघांची छायाचित्रे एकाच चौकटीत ठेवली जात. अहमदनगर ही जुन्या निजामशाहीची राजधानी असल्यामुळे ठिकठिकाणी मशिदी असायच्या. संघाच्या संचलनावर मशिदीतून दगडफेक झाली की बाबूराव आणि त्यांचे स्वयंसेवक सहकारी मशिदीचा दरवाजा उघडून, आत घुसून, दिसेल त्याला ठोकत असत. त्यामुळे संघसंचलनावरील दगडफेक बंद झाली.
 
 
असे हे बाबूराव मोरे नि:शस्त्र प्रतिकार लढ्यात हिंदू नागरिक स्वातंत्र्य संघाच्या आठव्या तुकडीचे नायक होते. एकूण चार प्रतिकारक असलेल्या या तुकडीला दि. 14 डिसेंबर 1938ला अटक होऊन बाबूरावांना एक वर्ष सश्रम कारावास आणि रु. 50 अर्थदंड अथवा तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा झाली. (केसरी, 20 डिसेंबर 1938.)
 
 
बाबूरावांची घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. डॉ. हेडगेवारांनी बाबूरावांसारख्या असंख्य संघस्वयंसेवकांना लढ्यात भाग घेण्याची प्रेरणा दिली. पण तेवढ्यावर न थांबता अशा स्वयंसेवकांच्या क्षेमकुशलाची चिंता डॉक्टरांनी वाहिली आणि त्यांची व्यवस्था लावली. अशा स्वयंसेवकांची व्यक्तिगत व्यवस्था लावत असताना डॉक्टरांनी संघरितीचे अवधान कसे ठेवले, हे पाहण्यासारखे आहे. किंबहुना डॉक्टरांनी स्वत:च्या व्यवहाराने संघाची रीत घालून दिली, असे म्हणणे सयुक्तिक होईल.
 
 
निजामाच्या कारावासातून सुटून आल्यानंतर आईची प्रकृती बिघडल्यामळे मोरे नागपूरला आले. डॉक्टरांनी त्यांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेतली. दि. 20 ऑक्टोबर 1939ला नगरच्या रावसाहेब बागडे यांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टर म्हणतात, ‘(नगरचे श्री. बाबूराव मोरे) यांच्यापासून त्यांची खाजगी परिस्थिती समजावून घेतली व यापुढे तुमची सर्व व्यवस्था श्री. रावसाहेब बागडे करणार असल्यामुळे तुम्ही निश्चिंत असावे व नगरला आपला अभ्यास व संघकार्य जोराने चालू ठेवावे’ असे त्यांना सांगितले. रावसाहेब बागडे यांना डॉक्टर पुढे लिहितात, ‘आता ते (बाबूराव मोरे) नगरला आलेले आहेत. आपण त्यांची व्यवस्था करणार असल्यामुळे मलाही आनंद झालेला आहे व आता त्यांची काळजी करण्याचे मला कारण उरलेले नाही. आपणांला एकच खाजगी व प्रेमाची सूचना द्यावयाची आहे व ती म्हणजे आपण त्यांची व्यवस्था संघाच्या पैशांतून न करिता खाजगी तर्‍हेने करावी. प्रसंग विशेषी आपणांला काही आवश्यकता वाटल्यास त्याप्रमाणे आम्हाला कळवावे. म्हणजे आम्हीही आपल्या हाकेला ओ देऊच.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1939\October 1939 20-10-39 b.)
 
 
लक्ष्मणराव इनामदार आणि प्रह्लादजी अभ्यंकर
 
 
दि. 23 एप्रिल 1939ला हिंदू महासभेचे नेते ल.ब. भोपटकर यांच्या नेतृत्वाखाली 200 प्रतिकारकांच्या तुकडीने पुणे सोडल्यावर आंदोलनाला अधिकच उधाण आले. त्याच्या आदल्या दिवशी डॉ.हेडगेवार संघाच्या अधिकारी शिक्षण वर्गासाठी पुण्यात आले होते. त्या दिवशी भोपटकरांना निरोप देण्यासाठी शनिवारवाड्यावर झालेल्या विशाल सत्कार सभेत डॉ. हेडगेवार व्यासपीठावर होते. (केसरी, 24 एप्रिल 1939.) भोपटकरांच्या तुकडीला निरोप देण्यासाठी डॉक्टर दुसर्‍या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर गेले होते.
 
 
भोपटकरांच्या या तुकडीत मूळचा खटाव (जि. सातारा) येथील एक संघस्वयंसेवक सामील झाला. लक्ष्मण माधव इनामदार (मूळ आडनाव खटावकर) असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव. या संघस्वयंसेवकाला डॉ. हेडगेवारांचा परीसस्पर्श लाभला होता. पुढे 1952पासून गुजरातमध्ये प्रचारक म्हणून गेलेले, तिथे 1972पर्यंत प्रांत प्रचारक राहिलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गुजरातमधील असंख्य संघस्वयंसेवकांचे मार्गदर्शक म्हणून आज विख्यात असलेले लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकीलसाहेब हा या स्वयंसेवकाचा भविष्यकाळ अद्याप काळाच्या उदरात होता.
 
 
सन 1936च्या सुमारास लक्ष्मणराव महाविद्यालयीन शिक्षणासाठी सातार्‍याहून पुण्याला आले. इंटर आर्ट्स उत्तीर्ण केल्यावर त्यांनी एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. एलएलबीची पहिली परीक्षा पासही झाले, परंतु त्याच वेळेला भागानगर नि:शस्त्र प्रतिकार सुरू झाला. दि. 21 एप्रिल 1939ला लक्ष्मणराव एलएलबीचा अभ्यास अर्धवट सोडून दि. 23 एप्रिल 1939ला अण्णासाहेब भोपटकरांच्या नेतृत्वात पुण्याहून निघणार्‍या तुकडीत सामील झाले.
 
 
दि. 23 एप्रिलला भोपटकर आपला जथा घेऊन खास सत्याग्रह गाडीने हैदराबादकडे जाण्यास पुण्याहून निघाले. हा जथा दोन गटांत वेगवेगळ्या दिवशी मनमाडहून औरंगाबादला पोहोचला. सर्वांना रेल्वे स्थानकावर अटक होऊन कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. औरंगाबाद तुरुंगात प्रतिकारकांवर करण्यात आलेले अत्याचार - विशेषत: दि. 5 ते 12 जून 1939चा घटनाक्रम मागील एका लेखात दिलेला आहे.
 
 
 
या घटनाक्रमात लाठीधारी पोलिसांच्या आणि गावातील मुस्लीम गुंडांच्या अमानुष अत्याचाराला लक्ष्मणरावही धीरोदात्तपणे सामोरे गेले. सर्वप्रथम मो.स. साठे नावाच्या सत्याग्रहीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर लक्ष्मणरावांचा क्रम होता. साठे यांनी त्या प्रसंगाची आठवण लिहून ठेवली आहे, ‘माझ्यानंतर लगेच लक्ष्मण (वकीलसाहेब)ची पाळी आली. या अवस्थेत तो स्थिर राहिला. या सार्‍या अवस्थेची त्याने मानसिकदृष्ट्या आधीच तयारी केली होती. पोलिसांकडून मार खाण्यात त्याला इतके खटकले नाही, जितके भाडोत्री गुंडांकडून. ती वेदना, ते खटकणे आणि दु:ख त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. सुमारे सात महिन्यांनंतर वकीलसाहेब तुरुंगातून सुटले.’ (राजाभाई नेने, नरेंद्र मोदी, सेतुबंध, प्रभात प्रकाशन, पृ. 21-23.)
 
 
 
’औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नेऊरगाव येथील प्रह्लादराव अभ्यंकर या धडाडीच्या, त्यागी जीवन जगणार्‍या तरुणाने सत्याग्रह केला. त्यांना अकरा महिने कारावासाची शिक्षा झाली. औरंगाबादेतील हर्सूल, परभणी व हैदराबाद या तुरुंगांत ते शिक्षा भोगीत होते. सुटल्यानंतर त्यांनी सार्वजनिक विशेषत: हिंदुत्वाच्या कार्यास वाहून घेतले’ असा उल्लेख देशपांडे करतात. (पृ. 90.) हा धडाडीचा तरुण म्हणजे पुढे महाराष्ट्र प्रांत संघचालक झालेले प्रह्लाद सीताराम अभ्यंकर! त्यांना लढ्यात अकरा महिने सश्रम कारावास आणि एक महिना साधा कारावास झाला होता. (केसरी, 19 मे 1939.)
 
 
vivek
 
भिडे गुरुजींचे शौर्य
 
 
 
अनंत सदाशिव भिडे उपाख्य भिडे गुरुजी हे मुळात बाबाराव सावरकरांच्या तालमीत तयार झालेले हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते. पुढे रत्नागिरीच्या पटवर्धन शाळेत शिक्षक असताना स्वा. सावरकरांच्या परिचयात आले आणि हिंदुसभेचे आणि रा.स्व. संघाचे कार्य करू लागले. सन 1857चे स्वातंत्र्यसमर या विषयावर व्याख्यान दिल्यामुळे रत्नागिरीचे विद्यालय सोडावे लागले. काही दिवस सातार्‍याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले. तेथे असताना हिंदुसभेच्या आणि संघाच्या वाढीसाठी काम केले. नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा सुरू झाला, तेव्हा भिडे संघाचे सातारा जिल्हा कार्यवाह होते. शिवाय सातारा जिल्हा आणि दक्षिणी संस्थाने भागानगर नि:शस्त्र प्रतिकार मंडळाचे कार्यवाह होते. लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. संघाचे आणखी एक कार्यकर्ते अधिवक्ता का.रा. उपाख्य नाना कापरे यांच्यासह भिडे यांनी दि. 30 जानेवारी 1939पासून सातारा जिल्ह्यात लढ्याला पाठिंबा मिळवण्याकरता दौरा सुरू केला. एका आठवड्यात त्यांनी सुमारे 40 गावांचा प्रवास केला. (केसरी, 15 फेब्रुवारी 1939.) दि. 10 मार्च 1939ला भिडे यांच्या नेतृत्वाखालील बारा नि:शस्त्र प्रतिकारकांची 17वी तुकडी हैदराबादकडे निघाली. प्रत्यक्ष प्रतिकारात भाग घेण्यासाठी निघाल्यावर भिडे यांच्या जागी कापरे प्रतिकार मंडळाचे कार्यवाह झाले. कापरे यांच्या साहाय्यासाठी श्रीराम बाळकृष्ण आचार्य हे संघस्वयंसेवक नियुक्त झाले. (केसरी, 17 मार्च 1939.) दि. 18ला भिडे यांनी औरंगाबादला सत्याग्रह केला आणि त्यांना अटक झाली. (केसरी, 1 ऑगस्ट 1939.)
 
 
 
सुटका झाल्यावर भिडे स्वस्थ बसले नाहीत. दि. 17 जुलै 1939ला भिडे यांच्या नेतृत्वात हिंदुसभेच्या सहा प्रतिकारकांनी सिकंदराबाद येथील ब्रिटिश रेसिडेंटच्या बंगल्याकडे मिरवणूक काढली. दुसर्‍या दिवशी भिडे यांनी रेसिडेंटच्या दुय्यम सेक्रेटरीला आपल्या मागण्यांचे पत्रक दिले. रेसिडेंट भेटू शकणार नाही असे सांगण्यात आल्यावर ’सर्व सनदशीर मार्ग संपले, आता आमचा मार्ग आम्हांस मोकळा आहे’ असे म्हणत भिडे निघून गेले. लगेच आपल्या सहकारी प्रतिकारकांना घेऊन रेसिडेंट बंगल्यावर परतले. त्यांनी हातातील काठीला भगवा ध्वज लावून, लपेटून घेतला होता. बंगल्यासमीप चौकी पहारे गुंगवीत आत आल्यावर जवळच मोठ्या खांबावर फडकणार्‍या युनियन जॅकशी स्पर्धा करणारा भगवा ध्वज उंच उभारून ’हिंदू धर्म की जय’ ही घोषणा दिली. सिंहाच्या गुहेत जाऊन तेथे भगवा ध्वज अल्पकाळ का होईना पण तितक्याच मानसिक ईर्ष्येने भिडे यांनी फडकविला. ब्रिटिश रेसिडेन्सीला प्रतिकार होण्याचा हैदराबाद लढ्याच्या इतिहासात हा पहिलाच प्रकार होता. (केसरी, 18 व 21 जुलै 1939.)
पुढे भिडे संघात नव्हे, तर हिंदुसभेत सक्रिय राहिले. सन 1945-48 या काळात त्यांनी ’फ्री हिंदुस्थान’ हे इंग्लिश साप्ताहिक चालविले. ते सावरकर सदनाच्या भुईतळातील (हा सावरकरांचाच शब्द, हा उल्लेख सावरकरांच्या इच्छापत्रात सापडतो) तीन खोल्यांत भाड्याने राहायचे.
 
 
देशाला स्वातंत्र्य ’विना खड्ग विना ढाल’ मिळालेले नाही. असंख्य सामान्य लोकांनी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, कारावास भोगला, छळ सोसला आणि प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य सार्थकी लावण्याचे दायित्व वर्तमान पिढ्यांवर आहे.
 
 
(समाप्त)

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन