इम्रान खानांचा पाय खोलात!

विवेक मराठी    11-Nov-2022   
Total Views |
इम्रान खान गोळीबार प्रकरणाचा जेवढा आणि जसा फायदा अपेक्षित होता, तसा तो इम्रान यांना मिळायची शक्यता दिसत नाही. इम्रान खान यांनी आपल्या हल्ल्यामागे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रीमंडळातले अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सनाउल्लाह खान असल्याचे म्हटले, इथपर्यंत कदाचित समजून घेता येईल; पण त्यांनी ‘व्यवस्थे’तल्या एका उच्चाधिकारी जनरल फैजल नासीर यांचे नाव घेतले, तेव्हापासून त्यांच्या या आरोपांना एका वेगळ्या स्तरावर पाहिले जाऊ लागले. या आरोपानंतर शाहबाज शरीफ यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयामार्फत ही चौकशी व्हायला हवी असे सांगितले. त्यांनी बंदियाल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ती अर्थातच होईल आणि त्यानंतर इम्रान यांच्याविरुद्ध कायमची कारवाई होईल आणि त्यांचे पायच काय, तेच खोलात किंवा कायमच्याच अडगळीत जाऊन पडतील की काय?
 
 
pakistan

मराठीत ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी एक म्हण आहे. इम्रान खानांचा एकच नव्हे, तर दोन्ही पाय जायबंदी असल्याने खोलात आहेत, तेही दोन दोन गोळ्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे अर्थातच ही म्हण आठवली. आता हा पाय किंवा हे पाय खोलात कसे, ते पाहू. इम्रान खान यांनी आपल्या हल्ल्यामागे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रीमंडळातले अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सनाउल्लाह खान असल्याचे म्हटले, इथपर्यंत कदाचित समजून घेता येईल; पण त्यांनी ‘व्यवस्थे’तल्या एका उच्चाधिकार्‍याचे नाव घेतले, तेव्हापासून त्यांच्या या आरोपांना एका वेगळ्या स्तरावर पाहिले जाऊ लागले. त्यांच्या या आरोपावरून सर्वप्रथम व्यवस्थेतल्या दोघांकडे बोट दाखवले गेले, ते म्हणजे लष्करप्रमुख कंवर जावेद बाज्वा आणि ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’चे प्रमुख नदीम अंजुम. खुद्द इम्रान खानांनी अंजुम यांना त्या पदावर बसवलेले असल्याने कदाचित ते त्यात नसतील, असे त्यांचे मत असावे. त्यांनी या दोघांची नावे न घेता तिसरेच एक नाव काढले, ते म्हणजे मेजर जनरल फैजल नासिर. तेही ‘आयएसआय’चे संचालक आहेत. आता एवढ्या मोठ्या कटाचे सूत्र बाज्वा किंवा अंजुम यांच्या कानावर गेलेच असणार. पण मग त्यांच्या या आरोपानंतर शाहबाज शरीफ यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयामार्फत ही चौकशी व्हायला हवी, असे ठरवून सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांना पूर्ण पीठापुढे हा विषय घेऊन त्याची चौकशी करण्यात यावी, असे सांगितले. त्यांनी बंदियाल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ती अर्थातच होईल आणि त्यानंतर इम्रान यांच्याविरुद्ध कायमची कारवाई होईल आणि त्यांचे पायच काय, तेच खोलात किंवा कायमच्याच अडगळीत जाऊन पडतील की काय, अशी अवस्था आहे. इम्रान खानांनी अशी चौकशी होऊ द्यायला आपली हरकत नसल्याचे म्हटले आहे, पण ती कितपत निष्पक्ष असेल ते सांगता येत नाही, असेही म्हटलेले आहे. सरकार आणि लष्करी अधिकारी यांच्या राजीनाम्याशिवाय ही चौकशी व्यवस्थित होऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
यामध्ये ज्या राणा सनाउल्लाह खान यांचे नाव घेतले गेले आहे, ते 2019मध्ये हेरॉइनच्या साठ्याप्रकरणात पकडले गेले होते. त्यांच्याकडे काही हजार कोटी रुपयांचे हेरॉइन सापडले होते, ते आज पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. विशेष हे की त्यांच्याकडे हा छापा चुकून घातला गेला होता आणि ते निर्दोष आहेत, असे शिफारसपत्र त्यांना इम्रान यांचे उजवे हात आणि माजी मंत्री फवाद चौधरी यांनी काही काळापूर्वी दिले होते. पाकिस्तानात जर एखाद्याकडे अंमली पदार्थ सापडले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. त्याला दंडही दहा लाखांवर केला जातो. हे प्रकरण न्यायालयात असताना पाकिस्तानात इम्रान यांची सत्ता गेली आणि सनाउल्लाह थेट मंत्री बनले, तेही अंतर्गत सुरक्षेचा विषय हाताळणारे मंत्री. दुसरीकडे ज्यांनी ज्यांनी पाकिस्तानच्या लष्कराबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले, त्यांची अवस्था काय झाली त्याची साक्ष द्यायला इतिहास पुरेसा आहे. बेनझिर भुट्टो यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, नवाझ शरीफ यांचीही तीनदा सत्ता गेली. लष्करप्रमुख बाज्वा यांनी त्यांना नरेंद्र मोदींच्या पहिल्या शपथविधीला जाऊ नका, असे सांगितल्यावरही शरीफ दिल्लीत शपथविधी समारंभास उपस्थित राहिले. त्यांचा हा ‘गुन्हा’ मोठा आहे, असे मानून त्यांची गच्छंती झाली. एकदा तर त्यांनी लष्करप्रमुखांना उद्देशून “आता मी तुमचा ‘बॉस’ आहे आणि तुम्हाला माझ्या हाताखाली काम करायचे आहे हे लक्षात घ्या” असे म्हटले आणि काय झाले? तर त्यांच्या शपथविधी समारंभानंतर लगेचच वाहनांचा जो ताफा निघाला, त्यात तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी यांची मोटार आणि त्यांच्याबरोबरचा ताफा पुढे गेल्यानंतरच शरीफ यांच्या मोटारीला आणि त्यांच्या ताफ्याला पुढे जाऊ दिले गेले. अशा कितीतरी गोष्टी आहेत, जिथे पाकिस्तानात लष्करप्रमुख पंतप्रधानांना त्यांची जागा दाखवून देतात. जनरल परवेझ मुशर्रफ हे तर नवाझ शरीफ यांनीच नेमलेले लष्करप्रमुख, पण त्यांना दूर करायचा प्रयत्न केला जाताच शरीफ यांची सत्ता गेली. (12 ऑक्टोबर 1999.) इथे इम्रान हे तर आता पंतप्रधानही नाहीत.
 
 

pakistan
 
इम्रान खान लाँग मार्चच्या काळात वझिराबादमध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना तेथून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या लाहोरच्या शौकत खानूम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, वझिराबादमध्ये किंवा त्याजवळच्या परिसरात एकही बरे हॉस्पिटल नाही का? एवढी गंभीर जखम झालेली असताना आणि ज्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडलेली असताना त्यांना लाहोरला नेण्याची काय गरज होती? तथापि या प्रश्नाला उत्तर देण्यात आलेले नाही. शिवाय ज्या दिवशी हल्ला झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ते पाकिस्तानी जनतेला उद्देशून बोलू कसे शकले? त्यांना तशी परवानगी नेमकी कोणी दिली? तशी ती दिली असेल तर त्याचा अर्थ त्यांच्या जखमा किरकोळ स्वरूपाच्या होत्या असे म्हणता येईल का? की सगळेच उत्तम प्रकारचे नाट्य रचण्यात आले होते? इम्रान लगेचच इतके ठणठणीत बरे कसे झाले, हा अर्थातच सर्वसामान्यांना पडलेला दुसरा प्रश्न आहे. शौकत खानूम हॉस्पिटल त्यांनीच आपल्या आईच्या स्मृत्यर्थ उभारले आहे, पण म्हणून त्यांच्यावर झटपट उपचार झाले का?
 
  
 
इम्रान खान म्हणतात की, त्यांना हा हल्ला होणार याची कल्पना होती. तो हल्ला वझिराबादमध्ये किंवा गुजरात (पाकिस्तानात एक गुजरात आहे) आणि वझिराबाद यादरम्यान होणार याचीही त्यांना माहिती होती. असे असूनही त्यांनी वझिराबादचा कार्यक्रम रद्द केला नाही किंवा त्याला डावलून ते पुढे गेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल की, ते वझिराबादला कसे टाळणार होते? तिथे तर लाखालाखांची गर्दी होत होती, असा त्यांचा दावा होता. आणि इस्लामाबादला तर त्यांना लक्षावधी लोक - म्हणजे किमान दहा लाखांवर लोक अपेक्षित होते. तिथेच तर त्यांचे घोडे पेंड खाते आहे. त्यांच्या या जत्रेला अगदी शेवटच्या टप्प्यात 35 हजार लोक हजर होते, असे गुप्तचर अहवाल सांगतो. त्यातही अनेक जण येऊन-जाऊन होते. असो, त्यांच्या गर्दीचे गणित जरा चुकलेच हे लक्षात आल्यावर त्यांना अचानक ठार करण्याचा प्रयत्न झाला. ते ठार झाले नाहीत, पण त्यांना ठार करण्याचा जो कट बनला होता, त्यात मेजर जनरल नासिर या लष्करी अधिकार्‍याचे नाव इम्रान यांनी घेतले आणि ते ‘एफआयआर’मधून म्हणजेच प्रथमदर्शी माहिती अहवालातून काढण्यात येऊ नये, असे इम्रान खानांचे म्हणणे आहे. त्यांचे नाव त्यात घेऊ नये, असे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री परवेझ इलाही यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेरीस पोलिसांनी प्रथमदर्शी अहवाल अखेर नोंदवून घेतला, त्यात जनरल फैजल नासीर यांचे नाव घेण्यात आले आहे. हे परवेझ इलाही पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या इम्रान खानांच्या पक्षाच्या सहकारी पक्षाचे नेते आहेत. ते पाकिस्तान मुस्लीम लीग (काईद) पक्षाचे नेते आहेत. इलाही यांच्या आग्रहानंतरही इम्रान यांनी त्या अधिकार्‍याचे नाव संशयितांच्या नावांमधून कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे स्वाभाविकच तो प्रथमदर्शी अहवालच बर्‍याच काळपर्यंत दाखल होऊ शकला नाही. कंवर जावेद बाज्वा यांना आता आणखी मुदतवाढ द्यायची की नाही किंवा दुसरा कोणी त्यांच्या जागी नेमायचा किंवा नाही, हे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ठरवू नये, असा इम्रान यांचा आग्रह आहे. सार्वत्रिक निवडणुकांनंतरच काय ते ठरेल, असे त्यांचे मत आहे. या निवडणुका नजीकच्या भविष्यात शक्य नाहीत. म्हणजेच इम्रान यांनी बाज्वा यांना किमान आणखी वर्षभर मुदतवाढ दिल्यासारखीच आहे.
 
 
शौकत खानूम हॉस्पिटल त्यांनीच आपल्या आईच्या स्मृत्यर्थ उभारले आहे, पण म्हणून त्यांच्यावर झटपट उपचार झाले का?
pakistan
 
 
इम्रान यांनी लष्करालाच या हल्ल्यात गुंतवल्यानंतर मात्र सगळे पाकिस्तान हलले. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की पाकिस्तानात लष्कराने किंवा ‘आयएसआय’ने कुणाच्या हत्या केल्याच नाहीत. त्यात पत्रकार सईद सलीम शाहजाद यांच्यापासून ते बलुचिस्तानच्या अकबर बुग्ती यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत त्यांनी अनेकांचा काटा काढलेला आहे. घरातून बोलावून घेऊन शाहजादला तर मारून गटारात फेकून दिलेले होते. या व्यवस्थेने असे कितीतरी खून पचवलेले आहेत आणि त्यांच्याविरोधात कोणीही ब्र काढू शकलेला नाही. अगदी अलीकडचेच एक उदाहरण आहे, ते म्हणजे पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांचे. त्यांनी 29 जुलै 2022 रोजी एका वाहिनीवर इम्रान खान यांची मुलाखत घेतली होती. तीत इम्रान यांनी आपल्यावर ‘आयएसआय’कडून हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर अर्शद यांना सतत धमकावले जात होते. त्यांनी पाकिस्तानातून पळ काढला आणि ते केनियामध्ये नैरोबीला गेले. तिथे त्यांच्यावर केनियाच्या पोलिसाने गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार केले. हा प्रकार 23 ऑक्टोबर 2022 रोजी घडला. केनियाच्या पोलिसांनी हा प्रकार चुकून घडल्याचे जरी सांगितले असले, तरी संशयाला नक्कीच जागा आहे. इम्रान हे पहिले असे नेते आहेत, ज्यांनी लष्करातल्या एका अधिकार्‍याचे नाव घेऊन ही टीका केली आणि त्या विरोधात आपली तक्रार मागे घ्यायला नकार दिला. हे घडताच राजापेक्षाही राजनिष्ठ असलेल्या ‘पेम्रा’ म्हणजेच ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड रेग्युलेटरी अथॉरिटी’ या स्वायत्त म्हणविल्या जाणार्‍या संस्थेने एक आदेश काढून इम्रान यांच्या पत्रकार परिषदा किंवा त्यांची मेळाव्यातली भाषणे विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवू नयेत, असा आदेश काढला. आता खरी गंमत पुढे आहे. शाहबाज शरीफ यांनी ‘पेम्रा’ला सूचना केली की त्यांनी हा आदेश तातडीने मागे घ्यावा. तुम्ही म्हणाल की खरी लोकशाहीच तिथे दिसून आली आहे, पण तसे नाही. जेवढे बोलून इम्रान बदनाम होतील, तेवढे शाहबाज शरीफ यांना ते हवेच असणार यात शंका नाही.
 
 
pakistan
 
आता मुद्दा असा की ज्याने इम्रान यांच्यावर गोळी झाडली, तो नाविद त्यांना ठार करण्याच्या उद्देशानेच लाहोरहून तिथे आलेला होता. इथपर्यंत कदाचित परिस्थिती समजून घेता येईल. पण ज्याला त्यांना ठार करायचे आहे, तो त्यांच्या दोन्ही पायांवर गोळ्या कशासाठी झाडेल? तो खाली आहे आणि इम्रान वरच्या बाजूला त्यांच्या वाहनात होते. त्याच्या नजरेच्या टप्प्यात ते होते आणि खालून गोळ्या झाडल्यावर त्या त्यांच्या पायांना म्हणजेच गुडघ्याखाली लागतात, हा नेमबाजीचा नवाच प्रकार म्हणावा लागेल. याचा अर्थ त्यांना मारण्यासाठी ज्यांनी कोणी त्याला सुपारी दिली असेल, तो दुसराच कोणी असण्याची शक्यता आहे. त्याने पोलिसांमध्ये आपले निवेदन दोनदा बदलले आहे आणि त्याला अधिक संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे शाहबाज शरीफ यांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये सरकार पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या इम्रान यांच्याच पक्षाच्या सहकारी पक्षाचे असल्याने तो कदाचित आणखीही काही वेळा आपली जबानी बदलण्याची शक्यता आहे.
 
 
 
इम्रान यांच्यावरच मी हा संशय व्यक्त करतो आहे, असा याचा अर्थ नाही. त्यांचे राजकारणच सर्व अशा भंपकबाजीवर अवलंबून राहिले आहे. त्यांनी अमेरिकन प्रतिनिधीचे नाव घेऊन याआधी सांगितले होते की, डोनाल्ड लू नावाच्या एका अमेरिकन अधिकार्‍याने वॉशिंग्टनमध्ये असलेल्या पाकिस्तानी राजदूतास असे सांगितले होते की, जर पाकिस्तानने इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवले नाही, तर पाकिस्तानपुढे दारुण अवस्था निर्माण होईल. त्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आणि तो संमत झाल्याने इम्रान यांना दूर व्हावे लागले. हा झाला इतिहास, पण तो त्यांना एवढा झोंबला आहे की, अजूनही आपल्याला सत्तेवरून दूर व्हावे लागले याचा विसर ते पडू देत नाहीत. इम्रान हे ज्या एका ‘व्यवस्थे’चा (‘एस्टॅब्लिशमेंट’चा) असा उल्लेख करतात, ते म्हणजे पाकिस्तानातली सर्वात मोठी संस्था अर्थातच लष्कर आणि लष्करानेच पाकिस्तान मुस्लीम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या संयुक्त सरकारला सत्तेवर आणले, असा त्यांनी आरोप केला होता. लष्करावर अशा तर्‍हेचा आरोप पहिल्यांदाच पाकिस्तानात केला गेला. इतरांच्या मनात असले, तरी ते लष्कराबद्दल तसे बोलू शकत नाहीत. लष्कराने ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली असून त्यांच्यावर या प्रकरणात कायदेशीर कारवाई करायचा मनोदय त्यांच्या प्रसिद्धी खात्याने काढलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे. तसे झाले, तर इम्रान राजकारणातूनच संपून जातील.
 
 
 
इम्रान यांचा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगावरही राग आहे. ते म्हणजे पाकिस्तान मुस्लीम लीगचे बाहुले आहे, असे त्यांचे म्हणणे. त्यांचा न्यायव्यवस्थेवरही राग आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थाही आपल्याला नीट वागवणार नाही, अशी त्यांची खात्री आहे. म्हणजे सर्व संस्था बाद आहेत आणि हे एकटेच धुतल्या तांदळासारखे आहेत, असे त्यांना वाटते. ‘तोशखाना’ म्हणजे भेटवस्तूंच्या प्रकरणात न्यायव्यवस्थेने आपल्याला निवडणूक लढवायला पाच वर्षे अपात्र ठरवून अन्याय केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान या नात्याने मिळालेल्या सर्व भेटवस्तू त्यांनी घरी नेल्या किंवा विकल्या, असा त्यांच्यावर आरोप होता. आपल्याला सलमान तसीर यांच्यासारखे ठार करायचे होते, असा दावाही त्यांनी केला, पण सलमान तसीर यांना कोणत्या प्रकरणात हौतात्म्य मिळाले ते त्यांच्याकडून सांगितले जात नाही. सलमान तसीर हे पंजाबमध्ये गव्हर्नर होते आणि त्यांनी पहिल्यापासून ईश्वरनिंदा कायदा (ब्लास्फ्मी) हा रद्द व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. ज्या आसिया बीबीला न्यायालयाने दोषी ठरवून फाशी द्यायचा निकाल दिला, तिला जीवनदान दिले पाहिजे यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. नंतर ती सर्वोच्च न्यायालयात निर्दोष ठरली आणि तिने कॅनडामध्ये आश्रय घेतला. असा आवाज आज इम्रान उठवतील का? सलमान तसीर यांचे नाव इम्रान घेतात, पण याच कारणासाठी बळी गेलेले अल्पसंख्याक मंत्री शाहबाज भट्टी यांचे नाव उच्चारत नाहीत. अर्थात त्यांचे नाव उच्चारण्याची इम्रान यांची हिम्मत होणारही नाही.
 
 
जाता जाता एक गोष्ट स्पष्ट आहे की या गोळीबार प्रकरणाचा जेवढा आणि जसा फायदा अपेक्षित होता, तसा तो इम्रान यांना मिळायची शक्यता दिसत नाही. हा लेख लिहून प्रसिद्ध होईपर्यंतच्या काळात त्यांचा लाँग मार्च पुढे निघाला असेल. त्यांच्या वाटेत आणखी कोणते काटे पेरले गेले आहेत तेही काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. आणखी पंधरा दिवसांनी जेव्हा ते इस्लामाबादमध्ये पोहोचतील, तेव्हा काय घडेल ते पाहणे औत्सुक्याचे आहे.