काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवप्रताप दिनाचे वावडे?

विवेक मराठी    12-Nov-2022
Total Views |
शिवप्रताप दिनाच्या विषयात भाजपा व शिंदे गट वगळता बाकी सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर मौन बाळगलेले दिसले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी या विषयावर पोस्ट करणे टाळले. यामुळे आपला सेक्युलरपणा धोक्यात येऊ शकतो, असे त्यांना वाटत असावे. किंवा कोकाटे, खेडेकर यांच्यासारख्या भंपक इतिहासप्रेमींच्या मते असा वधच झाला नसेल... त्यामुळे त्यांनी पोस्ट केली नसावी... 
  
shivaji maharaj
दि. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. या पराक्रमाची, शौर्याची आठवण करण्याचा दिवस म्हणजे 'शिवप्रताप दिन'! हा दिवस सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. हा दिवसाचे महत्त्व महाराजांनी बलाढ्य अफजल खानाचा केलेला वध इतके मर्यादित नाही, तर तो वध म्हणजे संपूर्ण मुगलशाहीला दणका होता. महाराष्ट्रावर आलेले मोठे संकट यामुळे टळले होते. म्हणूनच हा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. त्याची आठवण करण्याचा, त्यापासून प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणून गेली काही वर्षे १० नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून गेली काही वर्षे महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. या दिवसाची आठवण म्हणून अनेक जण सोशल मीडियावर त्या प्रसंगाची पोस्टर्स टाकतात, लेख-कविताही पोस्ट करतात. राजकीय कार्यकर्तेसुद्धा अशा विषयांवर पोस्ट करत असतात. मात्र शिवप्रताप दिनाच्या विषयात भाजपा व शिंदे गट वगळता बाकी सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर मौन बाळगलेले दिसले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी या विषयावर पोस्ट करणे टाळले. यामुळे आपला सेक्युलरपणा धोक्यात येऊ शकतो, असे त्यांना वाटत असावे. किंवा कोकाटे, खेडेकर यांच्यासारख्या भंपक इतिहासप्रेमींच्या मते असा वधच झाला नसेल... त्यामुळे त्यांनी पोस्ट केली नसावी, असेही असू शकते. आणि मराठी माध्यमे त्यांना याबाबत जाबही विचारणार नाहीत.
 
 
मात्र हा मुहूर्त साधत शिंदे-फडणवीस सरकारने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम अगदी सर्जिकल स्ट्राइक करून पाडले. गेली अनेक वर्षे शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटना, संघ स्वयंसेवक येथील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करावे, अशी मागणी करत होते. संघप्रणित विश्व हिंदू परिषदेने येथे भरणार्‍या उरुसाला विरोध करणारे मोठे आंदोलनसुद्धा केले होते. आज या सर्वांच्या लढ्याला यश आले. अखेर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकर घेऊन या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम सर्जिकल स्ट्राइकने उद्ध्वस्त केले. याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजेत. तसेच अशा गोष्टींना कडक पायबंद कसा बसेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडून दर्गे, कबरी यांचे उदात्तीकरण सर्वत्र सुरू आहे. कपोलकल्पित इतिहास रंगवून दर्ग्यांचे महत्त्व वाढवले जात आहे. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराजवळच्या एका भागाला मुस्लिमांनी दर्ग्याचे स्वरूप देऊन तिथे नमाज पढण्यास सुरुवात केली आहे, विशाळगडावर दर्गे बांधले आहेत. काही दिवसांपूर्वीच कुलाबा किल्ल्यावर दर्गा बांधत असल्याचे फोटो कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुवीर आंग्रे यांनी समाजमाध्यमांवर अपलोड केले होते. अशी अनेक उदाहारणे आहेत. हे दर्गेसुद्धा शिंदे-फडणवीस सरकार उद्ध्वस्त करेल, अशी या निमित्ताने अपेक्षा करायला हरकत नाही.
 
 
 
मविआ सरकार जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. 'तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला, तरी हिंदुत्ववादी सरकारचे हिंदुत्व देवळात जाण्यापुरतेच ...मात्र हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकही काम दिसत नाही', अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. पण प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर शिवप्रेमींसह सर्वसामान्य लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
 
यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया नक्की होतील. पण त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणा-या या गडकिल्ल्यांचे संवर्धन होणेही अपेक्षित आहे. आपल्या राजाचा इतिहास पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी त्याची नितांत गरज आहे. आणि शिंदे-फडणवीस ते करावे, एवढी माफक अपेक्षा.
 
- अभय पालवणकर