हिंदू विचारविश्वातील स्वयंप्रकाशित तार्‍याची अखेर

विवेक मराठी    12-Nov-2022
Total Views |
@मोहन ढवळीकर 9223227965
 
सुधाकर राजे यांचे नुकतेच निधन झाले. एक पत्रकार, एक लेखक आणि एक स्तंभलेखक असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या लेखनात उथळपणा कधीच नव्हता. अफाट लेखन आणि अफाट विचार असंच त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा श्रद्धांजलीपर लेख...

vivek
 
गेली जवळपास सत्तर वर्षं ज्यांनी आपलं लेखन सातत्याने सुरू ठेवून एक चांगला आदर्श निर्माण केला, अशा सुधाकर राजेंचं 22 ऑक्टोबर रोजी निधन झालं आणि त्यांच्या रूपाने सुरू असलेलं एक लेखनपर्व संपुष्टात आलं.
 
 
 
मूळ बडोद्याचे, शिक्षणही बडोद्यातच झालेलं, पण नंतर अनेक वर्षं दिल्लीत पत्रकारितेत असलेले सुधाकर राजे साधारण 1980पासून मुंबईत स्थायिक झाले. विचारवंतांच्या तसंच समाजात ज्यांना काही महत्त्वाचं स्थान आहे, त्यांच्या बोलण्याला काही किंमत आहे अशा समाजातील एका महत्त्वाच्या घटकापर्यंत हिंदुत्वाचा विचार पोहोचवण्याचं काम सुधाकर राजेंनी केलं. त्यांनी या विचारवंतांच्या विश्वात हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. हिंदुत्व म्हटलं की अंगावर झुरळ पडल्यानंतर ते झटकून टाकणार्‍यांसारखं वागणार्‍या अनेक विचारवंतांपर्यंत हिंदू जगतातील जितंजागतं वास्तव उभं करून हिंदुत्वाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत झाली, असं म्हणता येईल. त्यांच्या लेखनाने या विचारवंतांच्या विश्वात हिंदुत्वाविषयी एक सकारात्मक परिणाम दिसून येत होता.
 
 
सुधारकरजींचा माझा परिचय विश्व संवाद केंद्राच्या कामातून झाला. केंद्राच्या विविध कामांमध्ये ‘हिंदू व्हिजन’ हे एक छोटंसं मासिक प्रकाशित करण्याचं काम होतं. प्रकाशक म्हणून विश्व संवाद केंद्र असलं, तरी ‘हिंदू व्हिजन’चे सर्वेसर्वा सुधाकर राजेच होते. हिंदू व्हिजनचे ते संपादक होते. हिंदू व्हिजनसाठी लागणार्‍या साहित्याची सर्व जुळवाजुळव ते स्वत: करीत असत. एकहाती असलेलं हे हिंदू व्हिजन म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग होता. हजार-बाराशे शब्दसंख्येच्या लेखांऐवजी छोटेखानी लेखांसाठी ते आग्रही असायचे. हिंदुत्वाविषयी समाजात घडणार्‍या घटना, वृत्तपत्रांनी त्याची घेतलेली दखल अशी सगळी माहिती हिंदू व्हिजनमध्ये असायची. त्यावरची सुधाकर राजेंची टिप्पणी फार महत्त्वाची असायची. ही टिप्पणी हाच हिंदू व्हिजनचा गाभा होता.
 
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
सवलत मूल्य 160/- ₹

 https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/

 
 
 
हिंदू व्हिजन प्रकाशित करताना त्याचा प्रत्येक अंक नीट असला पाहिजे, याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. अंकात कोणतीही चूक राहणार नाही, त्यातील लेख कसे असावेत, कुणाचे असावेत, अंकातील त्या लेखांची जागा याकडे त्यांचं लक्ष असायचं. काही मजकूर लक्ष वेधून घेण्यासाठी चौकटीत टाकणं आवश्यक असायचं. ही चौकटसुद्धा कुठे टाकायची याविषयीच्या त्यांच्या स्पष्ट सूचना असायच्या. पानावरील मोकळी जागा भरून काढण्यासाठी या चौकटीचा उपयोग करून घेण्यास त्यांचा विरोधच असायचा. ते सांगतील त्याच पानावर आणि जागेवर ती चौकट येईल, असं ते कटाक्षाने पाहायचे.
 
 
 
हिंदू व्हिजन चाललं पाहिजे, ते वाचनीय असलं पाहिजे या त्यांच्या आग्रहाबरोबरच अंक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसा पोहोचेल याविषयी ते केंद्राचा कार्यवाह या नात्याने माझ्याशी बोलले होते. केंद्राचे कोषाध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं होतं. विश्व संवाद केंद्राची आर्थिक स्थिती त्या काळात फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ‘हिंदू व्हिजन’ सुरू ठेवणं कठीण जात होतं. त्यासाठी अंकात जाहिरातींची मदत घ्यावी, असा विचार झाला. एका बँकेची जाहिरात मिळालीदेखील आणि ती आम्ही छापलीदेखील. आपल्या अंकात एखादी जाहिरात असण्याबद्दल ते फारसे खूश नव्हते. तरीही जाहिरातीची जागा, ती कोणत्या पानावर असावी याबाबतचा संपादक या नात्याने त्यांचा एक विशिष्ट दृष्टीकोन होता आणि त्यासाठी ते आग्रही होते. मुळातच आपला अंक आकाराने, पृष्ठसंख्येने लहान, त्यातच जाहिरात छापली तर मजकुराला जागा कमी पडते असंही त्यांचं स्पष्ट मत होतं.
थोडक्यात, हिंदू व्हिजन चालवणं हे विश्व संवाद केंद्रासाठी आर्थिकदृष्ट्या तसं जरा कठीणच होतं. पण त्यासंबंधीची सुधाकरजींची निष्ठा, त्यांचे कष्ट पाहता ते बंद करण्याचं धारिष्ट्य आमच्यात नव्हतं, हीसुद्धा वस्तुस्थिती होती. कालांतराने हा निर्णय घेणं भाग पडलं. हा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमच्या दृष्टीने मोठं कठीण काम होतं. हा अप्रिय निर्णय त्यांनी स्वीकारला काहीशा नाराजीनेच. कारण आपल्या अपत्यावर जसं आपण प्रेम करतो, तसंच त्यांनी हिंदू व्हिजन सांभाळलं होतं.
 
 
 
हिंदू व्हिजनचे ते संपादक होते, त्यापूर्वी दिल्लीहून प्रसारित होणार्‍या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचं लेखन चौफेर होतं. पण हिंदुत्व हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता. तोच त्यांच्या लेखनाचा गाभा होता. हिंदुत्वासारखे विषय हाताळणारे सुधाकरजी स्वभावाने गंभीर असतील या कल्पनेला धक्का देणारं एक विनोदी सदर त्यांनी ‘ऑर्गनायझर’मध्ये लिहिलं. हे सदर राजकीय विषयावर उपरोधिक भाषेत जाणारं सदर होतं. त्यांनी जवळपास पन्नास वर्षं हे सदर चालवलं.
 
 
 
विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे इंग्लिश लेख प्रकाशित झाले आहेत. त्यातले काही लेख तर इंग्लंड-अमेरिकेतील नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले आहेत.
 
 
 
मराठीतील काही पुस्तकांचा परिचय करून देणारं ‘वेगळे जग’ आणि खनिज तेलाची कथा सांगणारं ‘ब्लॅक गोल्ड’ ही त्यांची पहिली दोन पुस्तकं. सुधाकर राजेंच्या हा पुस्तक लेखनप्रपंच 1969पासून सुरू झाला, तो 2020पर्यंत सुरूच राहिला. इंग्लिश, मराठी, हिंदी भाषांबरोबर गुजराथी भाषेतही त्यांची जवळपास 22 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
 
 
सुधाकरजी जसे स्वयंसिद्ध लेखक होते, तसेच उत्कृष्ट अनुवादकही होते. त्यांनी अनेक हिंदी-मराठी पुस्तकांचा इंग्लिशमध्ये अनुवाद केला आहे.
 
 
 
हिंदुत्वाभोवती सतत घोटाळत राहणार्‍या त्यांच्या वैचारिक लेखनापेक्षा वेगळ्या अशा एका पुस्तकाचा उल्लेख इथे आवर्जून करावा असं वाटतं, ते पुस्तक म्हणजे ‘कल्पनेच्या पलीकडले’ हा कथासंग्रह. त्यांचा हा एकमेव कथासंग्रह असावा. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच कल्पनेच्या पलीकडे जाऊन कुतूहल आणि आश्चर्य कथांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांच्या इतर सर्व लेखनापेक्षा या पुस्तकाचा विषय पूर्णत: वेगळा, काहीसा रंजक आहे. कारण हा विषयच पूर्णत: कल्पनेच्या पलीकडला आहे.
 
 
 
हिंदुत्व म्हटलं की त्याला चिकटवला गेलेला देव म्हणजे परमेश्वर आलाच. पण एक तिसरी शक्ती म्हणूनच सुधाकरजी त्याकडे पाहायचे. देव देव म्हणून ते पूजेअर्चेत कधीच अडकून बसले नाहीत किंवा स्वत:होऊन ते कोणत्या मंदिरात किंवा देवळात गेले नाहीत किंवा येता-जाता देऊळ दिसलं, शेंदूर फासलेला दगड दिसला की, त्याला नमस्कार करणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यांच्या सूनबाई हेमांगी यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास ते आस्तिक होते, पण नास्तिकही नव्हते आणि नास्तिक होते, पण आस्तिकही नव्हते. थोडक्यात नास्तिक-आस्तिकत्व त्यांनी आपल्या व्यवहारात कधीच आणलं नाही. पण असं असूनही त्यांनी आपल्या घरच्यांना यापासून दूर ठेवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही किंवा विरोधही कधी केला नाही. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करण्याची मोकळीक दिलेली होती, तीही अगदी मनापासून. घरात किंवा बाहेर जाऊन पूजा-अर्चा करण्यास त्यांनी कधीच विरोध केला नाही. पूजेचा प्रसाद म्हणून दिलेला शिरा ते आवडीने खायचे. पण तो शिरा आहे म्हणून. त्यांची तशी खाण्या-पिण्यात आवडनिवड फारशी नसली, तरी गोड पदार्थ मात्र मनापासून आवडायचे.
 
 
 
सुधाकरजी तसे काहीसे अबोलच. म्हणजे कमी बोलणारे. घरातही किंवा नातेवाइकांशी त्यांनी भरपूर गप्पा मारल्यात असे प्रसंग फारच कमी. त्यामुळे तसं कुणाकडे जाणं-येणं कमीच. आपल्या लेखनाविषयी ते तसे भरपूर बोलायचे. त्याच्यावरील प्रतिक्रिया जाणून घ्यायचे. कुणा नातेवाइकांकडे जाण्यात फारसा रस त्यांना नसला, तरी आपल्या घरच्यांनी कुणाकडेही केव्हाही आणि कुठेही जायला त्यांनी विरोध दर्शवला नाही. पण ते स्वत: कधी यात अडकले नाहीत किंवा ते त्यांच्या स्वभावातच तसे नव्हते.
त्यांचा दिनक्रमही ठरलेला असायचा. त्यात प्राधान्य अर्थातच लेखनाला असायचं. मग त्याबरोबर वाचनही आलंच. सकाळी लवकर उठून स्वत:चा चहा ते स्वत: करून घेत. घरात त्यांच्यासाठी असलेल्या खोलीतच ते स्वत:ला कोंडून घेत असत, असं काहीशा अतिशयोक्तीने म्हणता येईल. पण सकाळी लवकर उठण्यापासून रात्री उशिरापर्यंत जागून लेखन-वाचन यातच ते बुडालेले असायचे.
 
 
 
एक पत्रकार, एक लेखक आणि एक स्तंभलेखक असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या लेखनात उथळपणा कधीच नव्हता. पण त्यांच्या लेखनात आस्था दिसायची. अफाट लेखन आणि अफाट विचार असंच त्यांचं वर्णन करता येईल. कर्मठ आणि कर्मयोगी असाही त्यांच्यासंबंधीचा उल्लेख ऐकण्यात येतो. ते कर्मठ होते ते त्यांच्या विचारातून, लेखनातून स्पष्ट व्हायचे. सुधाकर राजे म्हणजे एक विचारविश्व होते.
 
 
एक वर्षापूर्वीच त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं. पण तोही धक्का त्यांनी सहन केला.
 
 
ते निस्सीम राम-कृष्णभक्त होते. ही त्यांची दैवतं होती, म्हणून ते कधीही पूजेअर्चेत अडकले नाहीत. त्यांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. या त्यांच्या पुण्याईमुळेच असेल कदाचित, दिवाळीच्या आधी एक दिवस - म्हणजे वसुबारसेच्या एका चांगल्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने हिंदू विचारविश्वाची न भरून येणारी हानी झाली आहे हे नक्कीच.