“भूमीला अंत:करणापासून आई मानतो, तोच कृषिसाधक असतो.” - भय्याजी जोशी

गोदाकाठचा कृषिसाधक दादा पवार ग्रंथ लोकार्पण

विवेक मराठी    18-Nov-2022
Total Views |
 
vivek
 
“पुण्यस्मरण हे पुण्यवंत, भाग्यवंत व्यक्तीचे केले जाते. स्वर्गीय दादा पवार हे पुण्यवंत होते. कुटुंब, समाज, कृषी, ग्रामविकास अशा विविध पातळ्यांवर निरपेक्षपणे निष्ठापूर्वक काम करत राहिले” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी उद्गार काढले. गोदाकाठचा कृषिसाधक दादा पवार या सा. विवेकने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या लोकार्पण कार्यक्रमात भय्याजी जोशी बोलत होते. देवगिरी प्रांताचे माजी संघचालक व कृषी क्षेत्रात सातत्याने नवे नवे प्रयोग करून कृषिविकास घडवून आणणार्‍या स्व. दादा पवार यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अच्युत महाराज कानसुरकर होते, तर देवगिरी प्रांत संघचालक अनिलजी भालेराव प्रमुख पाहुणे होते; तसेच दादा पवार स्मृती ग्रंथ समितीचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय मगर, सा. विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे, लक्ष्मण पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 
 

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/
सवलत मूल्य 160/- ₹

 
 
 
 
आपल्या भाषणात भय्याजी जोशी म्हणाले, “गंगाधरराव पवार यांनी आपल्या व्यवहाराने दादा हे नाव सर्वार्थाने सिद्ध केले होते. सर्व आदर्शाच्या मापदंडानुसार दादा कसोटीला उतरले. संघ दादांना शोधत गेला आणि दादा संघाचे झाले, त्यामुळे संघाला प्रतिष्ठा मिळाली. बाळासाहेब देवरसांनी ज्यांना ‘देवदुर्लभ कार्यकर्ते’ म्हटले, अशापैकी दादा पवार एक होते. त्यांचे कृषी क्षेत्रातील काम म्हणजे साधना होती. भूमीला अंत:करणापासून आई मानणारे ते कृषिसाधक होते.”
 
 
vivek
 
स्मृती ग्रंथ समितीचे कार्यवाह रावजी लुटे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सोनाली पवार यांनी पवार कुटुंबीयांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. दादाच्या विविध आठवणी सांगून त्यांनी पुढील वर्षांपासून दादा पवाराच्या नावाने पुरस्कार दिला जाईल असे घोषित केले. या प्रसंगी स्मृती ग्रंथ समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मगर यांचेही मनोगत झाले. अच्युत महाराज कानसुरकर यांनी अध्यक्षीय सामारोप केला. दादा पवार यांच्या कुटुंबीयांबरोबरच संघाचे व इतर सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.