भारत जोडो यात्रा उद्दिष्ट काय अन् फलित काय?

विवेक मराठी    19-Nov-2022
Total Views |
@राहुल गोखले 
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून केवळ भाजपा आणि रा.स्व. संघ यांच्यावर शरसंधान करून भागणार नाही. आपल्या पक्षाचा जनाधार का आक्रसत आहे याचे अध्ययन त्यांनी करावयास हवे. यात्रेचे यश तेव्हाच स्थायी असते, जेव्हा यात्रा पुढे गेली तरी त्याअगोदर सर केलेल्या प्रदेशात मूलभूत काम सुरू राहते. राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत सहभागी होता यावे, म्हणून काँग्रेस नेते आगाऊ सराव करीत असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. तेव्हा हीच स्थिती राहिली, तर जेथे जाईल तेथे भारत जोडो यात्रा तात्कालिक जल्लोश करू शकेल; पण जेथून यात्रा आली, तेथे काय पेरले आणि काय उगवले याचे चित्र फारसे उत्साहवर्धक राहणार नाही.
 
congress
 
पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही, पक्षातील वरिष्ठांमध्ये असणारी नाराजी, पक्षाला लागलेली गळती, पक्ष संघटनेत आलेली मरगळ, जनतेशी सुटलेली नाळ, निवडणुकांमध्ये वारंवार सपाटून खावा लागलेला मार, आक्रसणार्‍या जनाधारामुळे प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसकडे दुय्यमतेने पाहण्याचा दृष्टीकोन अशा चहूबाजूंनी ग्रासलेल्या काँग्रेसला गरज होती आणि आहे ती संघटनेत चैतन्य उत्पन्न करणार्‍या नेतृत्वाची. काँग्रेसची सूत्रे गेले पाव शतक सलगतेने गांधी कुटुंबीयांकडेच आहे. या काळात काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या साह्याने केंद्रात दहा वर्षे सत्ता स्थापन करता आली हे खरे, तथापि पक्ष म्हणून काँग्रेसची कामगिरी वर्धिष्णू होती असे नाही. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली, तेव्हा भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये जिंकलेल्या जागांच्या संख्येत अंतर केवळ सात इतकेच होते. मात्र भाजपाविरोधकांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा आलेख वर गेला आणि 2004च्या निवडणुकीत जिंकलेल्या 145 जागांच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसने 206वर झेप घेतली. तथापि त्यानंतर पाचच वर्षांत काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला, ती उतरती कळा काँग्रेसचा ’हात’ सोडायला तयार नाही. 2014ची लोकसभा निवडणूक ही भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटून टाकणारी निवडणूक ठरली. एक तर आघाडी सरकारचे पर्व या निवडणुकांनी संपुष्टात आणले. भाजपाने स्वबळावर केंद्रात सत्ता मिळविली. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या ’देशव्यापी’पणासमोर त्या निवडणुकीने आव्हान उभे केले. डाव्यांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आणि त्यामुळे आपला क्षीण जनाधार असूनही केवळ आघाडी सरकार वाचले पाहिजे, या अपरिहार्यतेचा बाऊ करून राष्ट्रीय राजकारणाला वेठीस धरणारे डावे पक्ष निष्प्रभ ठरले. त्यानंतर काँग्रेसने भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारलेले राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले, अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने केले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी मोदींसमोर मोठे आव्हान उभे करू शकतील आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असे भाकीत अनेक राजकीय अभ्यासकांनी केले होते. मात्र मतदारांनी त्या अभ्यासकांना तोंडघशी पाडले. काँग्रेसचे लोकसभेतील बलाबल वाढले हे खरे, पण अवघ्या आठ जागांनी - म्हणजेच 44वरून काँग्रेसचे बलाबल 52वर गेले, तर भाजपाचे बलाबल 2014च्या तुलनेत 21ने वधारत भाजपाला तब्बल 303 जागांवर स्वबळावर विजय मिळाला.
 
 
 
पक्षाध्यक्ष खर्गे, पण..
 
 
सलग दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आणि स्वाभाविक काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले. मात्र या मंथनात काँग्रेसच्या दारुण स्थितीला पक्ष नेतृत्वाला जबाबदार धरण्याची धमक नव्हती. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तरी पक्षाचे काळजीवाहू अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आले. तरीही देशभर होणार्‍या विविध निवडणुकांत काँग्रेसची स्थिती सुधारू शकली नाही. किंबहुना उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात प्रियांका गांधी यांनी सारी ताकद ओतूनही भाजपाचे सत्तेतील पुनरागमन काँग्रेस रोखू शकली नाही. पक्षात त्यामुळे असंतोष वाढत होता आणि जी-23 या नावाने प्रसिद्ध गटाने नेतृत्वाकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली. दरम्यान अनेक राज्यांत काँग्रेसला अपयशाची चव चाखावी लागत होतीच आणि काँग्रेसला रामराम ठोकणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत होती. यावर उपाय म्हणजे काँग्रेस पक्षाची धुरा गांधी कुटुंबीयांऐवजी अन्य कोणाकडे देणे हाच होता. तो अर्थातच काँग्रेस नेत्यांच्या गळी उतरणे शक्य नव्हते. मात्र अखेरीस सततच्या अपयशाचे धनी व्हावे लागलेल्या आणि आपला करिश्मा फिका पडतो आहे याची जाणीव झालेल्या गांधी कुटुंबीयांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे जाहीर केले आणि मुख्य म्हणजे गांधी कुटुंबीय त्यात उमेदवार नसतील हे अधोरेखित केले. बिगर-गांधी अध्यक्ष झाला की काँग्रेसच्या अवनतीच्या जबाबदारीतून गांधी कुटुंबीय अस्पर्शित राहतील, घराणेशाहीच्या आरोपापासून दूर राहू शकतील असा काँग्रेसच्या मुखंडांचा होरा असावा. मात्र अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे निश्चित झाले, तेव्हाच ही निवडणूक म्हणजे केवळ ’फार्स’ आहे हे सिद्ध झाले; कारण गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतलीच, तशीच राहुल गांधी यांचीही भेट घेतली. राहुल गांधी हे त्या वेळी भारत जोडो यात्रेत व्यग्र होते. दक्षिण भारतात जाऊन गेहलोत यांनी राहुल यांची भेट घेतली होती. राजस्थान काँग्रेसमधील नाट्यपूर्ण घटनांनंतर गेहलोत यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि मल्लिकार्जुन खर्गे उमेदवार झाले आणि शशी थरूर यांच्या विरोधात निवडणूक जिंकलेदेखील. यातील उल्लेखनीय भाग हा की अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाअगोदर दोनच दिवस खर्गे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हा आताही खर्गे अध्यक्ष झाले असले, तरी काँग्रेसवर गांधी कुटुंबीयांचा असणारा पगडा नाकारता येणार नाही. एरव्ही काँग्रेसमध्ये एवढे नेते असताना राहुल यांनीच भारत जोडो यात्रा काढावी आणि ते जेथे जातील तेथे यच्चयावत काँग्रेस नेत्यांनी त्यात हिरिरीने भाग घ्यावा, याचा अर्थ कसा लावणार? 62व्या दिवशी या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हा या यात्रेचा देशभर आणि मुख्यत: महाराष्ट्रात काँग्रेसला काय लाभ होणार, याचा मागोवा घेणे औचित्याचे.
 


congress
 
यात्रेच्या उद्दिष्टाबद्दल संभ्रम
 
 
भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचे अंतर पायी कापत ही यात्रा दीडशे दिवसांनी, बारा राज्यांतून वाटचाल करीत श्रीनगरला पोहोचेल. या यात्रेत ’कोअर’ यात्री 119 असतील आणि ट्रकवर उभारलेल्या कंटेनरमध्येच या सर्व काळात त्याचे वास्तव्य असेल. तेव्हा नियोजन म्हणून हे निराळेपण लक्षणीय. तथापि कोणत्याही यात्रेचे फलित हे यात्रेच्या नियोजनावर नव्हे, तर त्या यात्रेने साध्य काय केले आणि त्यासाठी मुदलात यात्रेचे उद्दिष्ट काय होते, यावर अवलंबून असते. भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट निवडणूककेंद्रित नाही असे काँग्रेस नेत्यांनी वारंवार सांगितले आहे. हा दावा हास्यास्पद आहे. या यात्रेनेदेखील निवडणुकीत काँग्रेसला ’हात’ दिला नाही, तर राहुल यांच्यावर दोषारोपण होऊ नये म्हणून अगोदरच शोधलेली ती पळवाट आहे का? असा संशय येण्यास त्यामुळे वाव आहे. काँग्रेसला नवी ऊर्जा देणे, पक्ष संघटनेत चैतन्य उत्पन्न करणे, पक्षाला नवसंजीवनी देणे, धार्मिक द्वेषभावना आणि ढासळती अर्थव्यवस्था या समस्या ऐरणीवर आणणे, बेरोजगारी आणि महागाई विरोधात आवाज उठविणे ही या यात्रेची प्रमुख उद्दिष्टे आहेत असे काँग्रेस नेते सांगत आहेत. मात्र हे सगळे साधले का? हे तपासण्याचे परिमाण कोणते हे त्या नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही. तथापि कोणाही सुज्ञाला हे समजू शकते की अखेरीस कोणत्याही राजकीय पक्षाचे यशापयश हे एकाच फूटपट्टीवर मोजले जाऊ शकते आणि ती म्हणजे त्या पक्षाला जनाधार किती. तेव्हा काँग्रेस नेते त्या परिमाणाला बगल देत असले, तरी त्याच निकषावर या यात्रेचे फलित मोजले जाईल, हे नाकारता येणार नाही. मात्र काँग्रेसला संजीवनी देण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून न घेता भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी का घेत आहेत, हाही प्रश्न उपस्थित होतो. आणि आता तर बिगर-गांधी अध्यक्ष असताना राहुल गांधी हे नेमक्या कोणत्या अधिकारात ही भारत जोडो यात्रा करीत आहेत? तेव्हा एक अंदाज असाही लावला जात आहे की यातून राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि एका प्रगल्भ राजकीय नेत्याची प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तसे असेल तर बिगर-काँग्रेस अध्यक्ष होणे हा देखावा ठरतो. शिवाय भारत जोडो यात्रेनंतरदेखील काँग्रेसची राजकीय कामगिरी सुधारली नाही, तर त्याचा दोष बिगर-गांधी अध्यक्षाचा की त्याचे अपश्रेय राहुल गांधी घेणार? आणि तसे झाले, तर पुढील काळात काँग्रेसमध्ये राहुल यांची नक्की भूमिका काय? हे सगळे सवाल ज्या भारत जोडो यात्रेने उपस्थित केले आहेत, त्या यात्रेने गेल्या सत्तरएक दिवसांत काय साधले याचा विचार करणे म्हणूनच आवश्यक.
 
 
 
यात्रेतील विरोधाभास
 
 


पश्चिम बंगाल, केरळ येथे काँग्रेस आणि डावे पक्ष प्रतिस्पर्धी आहेत, तेव्हा केरळमध्ये राहुल यांनी डाव्यांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर देताना डाव्यांनी ‘ही भारत जोडो यात्रा नसून सीट जोडो यात्रा आहे’ अशी खिल्ली उडविली.congress


भारत जोडो यात्रेच्या प्रारंभी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन उपस्थित होते आणि त्यांनी राहुल गांधी यांना राष्ट्रध्वज प्रदान केला. द्रमुक आणि काँग्रेस हे मित्रपक्ष आहेत आणि त्यामुळे स्टॅलिन यांची उपस्थिती आश्चर्यकारक नाही. तथापि उल्लेखनीय भाग हा की ज्या कन्याकुमारी येथून या यात्रेला प्रारंभ झाला, तेथे भाजपाचा दबदबा आहे. या यात्रेदरम्यान मित्रपक्षांची, समविचारींचीदेखील मोट बांधण्याचे एक उद्दिष्ट आहे. वास्तविक डाव्या पक्षांनी केंद्रातील मनमोहन सिंग सरकारला सामर्थन दिलेले होते. अमेरिकेशी केलेल्या अणुकरारावरून डाव्यांनी तो पाठिंबा काढून घेतला हा भाग अलहिदा. मात्र हीच भारत जोडो यात्रा शेजारच्या केरळात तब्बल अठरा दिवस होती, तेव्हा डाव्यांनी या यात्रेवर तोंडसुख घेतले. ‘गुजरातमध्ये किंवा उत्तर प्रदेशात यात्रा नेण्याऐवजी राहुल गांधी अठरा दिवस केरळात काय करत आहेत?’ असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विचारला, तेव्हाच भाजपाविरोधी आघाडी किती भुसभुशीत आहे याचा प्रत्यय आला. पश्चिम बंगाल, केरळ येथे काँग्रेस आणि डावे पक्ष प्रतिस्पर्धी आहेत, तेव्हा केरळमध्ये राहुल यांनी डाव्यांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर देताना डाव्यांनी ‘ही भारत जोडो यात्रा नसून सीट जोडो यात्रा आहे’ अशी खिल्ली उडविली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतून भारत जोडो यात्रेची वाटचाल झाली. याच दरम्यान तेलंगणातील मुणूगोडे मतदारसंघात पोटनिवडणूक होती. जनमताचा कल कोणत्या बाजूने आहे याचा आडाखा बांधण्याच्या दृष्टीने पोटनिवडणूक निकाल फारसा उपयोगी नसला, तरी पुढच्या वर्षी तेलंगणात होणार्‍या विधानसभा निवडणुका आणि भारत जोडो यात्रा त्याच सुमारास तेलंगणात असल्याने कोणत्या पक्षाचा प्रभाव किती हे तपासण्याची ती उत्तम संधी होती. मुळात ही जागा काँग्रेसकडे होती, पण काँग्रेस आमदाराने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले. या पोटनिवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएसच्या) उमेदवाराचा विजय झाला, तरी काँग्रेसच्या उमेदवाराचा मात्र दारुण पराभव झाला, एवढेच नव्हे, तर त्या उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा दहा दिवस तेलंगणात असणार्‍या भारत जोडो यात्रेची ही फलनिष्पत्ती काँग्रेससाठी धक्कादायक असेल! मात्र याचाच दुसरा अर्थ असाही आहे की भाजपाविरोधी लढ्यात टीआरएस काँग्रेसबरोबर नसणार. कर्नाटकात भारत जोडो यात्रा सुरू असतानाच तेथील काँग्रेस नेते शिवकुमार हे दिल्लीत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी गेले होते. हाही मोठाच विरोधाभास. नागरिकांमध्ये मिसळून युवक-युवतींशी, खेळाडूंशी संवाद साधत राहुल गांधी यांनी तरीही यात्रा सुरू ठेवली आणि 62व्या दिवशी या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला.
 
 


congress
 
महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती चांगली नाही आणि महाविकास आघाडीत काँग्रेस सामील असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी सत्तेत असताना काँग्रेसला तिय्यम वागणूक दिली, हे विसरता येणार नाही. मुंबईतील प्रभागरचनेवरून काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते आणि शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नाही असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केले आहे. मात्र तरीही उद्धव गटाचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे हे दोघे या यात्रेत सहभागी झाले. तेव्हा महाविकास आघाडीच्या ऐक्याचे दर्शन यात्रेत तरी घडले, ते स्थायी आहे का? याचा प्रत्यय महापालिका निवडणुकांत येईल. बॉलीवूड अभिनेत्यापासून काही लेखकांपर्यंत अनेकांनी राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन दिले. राहुल यांची भेट घेऊन भाजपाच्या हिंदुत्वाला आव्हान देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाचा आसरा घेणे हा पर्याय नव्हे, असे या साहित्यिकांच्या शिष्टमंडळाने राहुल यांची भेट घेऊन आवाहन केले. कोणत्या राजकीय नेत्याला कोणी पाठिंबा द्यावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. मात्र भाजपाला आव्हान देणे यावर चर्चा करणे म्हणजे मुळात भारत जोडो यात्रेचा उद्देश निवडणूक-अभिमुख नाही या दाव्यातील हवा काढून घेण्यासारखे आहे, याचे भान ठेवणे आवश्यक होते. पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधी यांची भेट मिळाली आणि कथित जी-23 बंडखोर गट अस्तित्वातच नव्हता असे सांगून चव्हाण यांनी ही यात्रा काँग्रेसची नसून हे जनअंदोलन आहे असे म्हटले. तेव्हा यातूनही या यात्रेचे उद्दिष्ट स्पष्ट होते. असे असताना ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी करण्याचे कारण नाही आणि ते शहाणपणाचेदेखील नाही. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा चौदा दिवस असेल आणि राहुल यांच्या सभाही या दरम्यान होतील. तथापि तामिळनाडूपासून आजवर झालेल्या सभांत राहुल यांनी मांडलेले मुद्दे नवीन नाहीत. भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना लक्ष्य करणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा. मात्र टीका करताना पर्यायी कार्यक्रम काँग्रेसकडे आहे का, याचा पडताळा अद्याप आलेला नाही. जनतेच्या समस्या मांडणे हे एक भाग झाला, परंतु त्यावर तोडगा म्हणून पर्याय सुचविणे हे अधिक गरजेचे. राहुल यांनी ते केल्याचे अद्याप आढळलेले नाही.
 
 
 
फलित तपासण्याचा निकष
 
 
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब या राज्यांतून प्रवास करेल. पैकी मध्य प्रदेशात यात्रा 16, तर राजस्थानात 18 दिवस असेल. या दोन्ही राज्यांत 2023 साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हा तेलंगण, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान येथे काँग्रेसची कामगिरी कशी राहिली आणि काँग्रेसच्या कामगिरीवर भारत जोडो यात्रेचा अनुकूल परिणाम झाला का, याची या पुढील वर्षभरातील निवडणुका कसोटी असतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मनोबल कसे राहते हेही हे निकाल ठरवतील. मुळात काँग्रेसला नेतृत्व, संघटन, कार्यक्रम या सगळ्याच्या अभावाने ग्रासले आहे. निष्क्रियता आणि मरगळ यांमुळे काँग्रेस संघटन प्रभावी राहिलेले नाही. याच्या कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असेल, तर त्यांनी केवळ भाजपा आणि रा.स्व. संघ यांच्यावर शरसंधान करून भागणार नाही. आपल्या पक्षाचा जनाधार का आक्रसत आहे याचे अध्ययन त्यांनी करावयास हवे. यात्रेचे यश तेव्हाच स्थायी असते, जेव्हा यात्रा पुढे गेली तरी त्याअगोदर सर केलेल्या प्रदेशात मूलभूत काम सुरू राहते. राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत सहभागी होता यावे, म्हणून काँग्रेस नेते आगाऊ सराव करीत असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. तेव्हा हीच स्थिती राहिली, तर जेथे जाईल तेथे भारत जोडो यात्रा तात्कालिक जल्लोश करू शकेल; पण जेथून यात्रा आली, तेथे काय पेरले आणि काय उगवले याचे चित्र फारसे उत्साहवर्धक राहणार नाही. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असतानाच जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा दिवस होता. नेहरू यांचे ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तक प्रसिद्ध आहे. राहुल गांधी यांच्यासाठी भारत जोडो यात्रा ही एका अर्थाने डिस्कव्हरी ऑफ इंडियाच असेल. यात सामान्य नागरिकांच्या समस्या राहुल यांना समजतीलही; पण त्या समस्यांचे निराकरण करायचे, तर त्यासाठी हाती सूत्रे असावयास हवीत आणि ती सत्तेची सूत्रे मतदार आपल्या हाती का देत नाहीत, याचा शोध राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत घ्यायला हवा. हा शोध घेऊन राहुल स्वत:च्या आणि पक्षाच्या प्रतिमेत काय परिवर्तन करतात हा जसा महत्त्वाचा मुद्दा, तद्वत या यंत्रतेला मिळणार्‍या प्रतिसादाच्या दाव्यांना निवडणुकीतील मतदानाचे आकडे पुष्टी देतात का, हेही पाहणे औत्सुक्याचे. भारत जोडो यात्रेची फलनिष्पत्ती तपासण्याचा दुसरा सयुक्तिक निकष कोणता?