शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह नाव - निधी ब्रोकिंग सर्व्हिसेस

विवेक मराठी    22-Nov-2022
Total Views |
@अमिता बडे 
 शेअर मार्केट म्हणजे सट्टा केंद्र, जुगार, आर्थिक जोखीम असा विचार आतापर्यंत प्रत्येक जण करत होता. परंतु बदलत्या काळानुसार याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत गेला आहे. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी अभ्यास आणि उत्तम सल्ला देणार्‍याची गरज असते. ठाण्यातील ओमप्रकाश साही यांच्या निधी ब्रोकिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही गरज भागवली जाते. सचोटी, विश्वास आणि पारदर्शक व्यवहार या त्रिसूत्रीच्या आधारावर आज ओमप्रकाश साही यांनी 400 कोटींचा उद्योग उभारला आहे.

ncb
 
 
शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार अशी समजूत वर्षानुवर्षांपासून कायम होती. थोड्याफार प्रमाणात आजही ही समजूत कायम आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना योग्य आर्थिक नियोजन, अभ्यास आणि योग्य सल्ला देणारी व्यक्ती जर असेल, तर हा उत्पन्नाचा एक चांगला स्रोत नक्कीच होऊ शकतो.
 
 
 
समाजामध्ये शेअर मार्केटविषयी असलेला पूर्वग्रह काही प्रमाणात दूर झाला आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना योग्य आणि त्यांच्या हिताचा सल्ला देणार्‍या मार्गदर्शकाची गरज असते, जेणेकरून या आर्थिक व्यववहारांमधून त्याला निश्चित फायदा होऊ शकेल. असा सल्ला देण्यासाठी एक विश्वासार्ह नाव म्हणून ठाणे शहरातील ओमप्रकाश साही यांच्या ‘निधी ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’कडे पाहिले जाते.
 
 
 
ओमप्रकाश यांचे मूळ उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचे. परंतु वडिलांच्या नोकरीनिमित्त त्याचे सर्व शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता इथे गेले. ओमप्रकाश यांचे वडील सेंच्युरी प्लाय कंपनीमध्ये नोकरीला होते. वडिलांचे सर्व आयुष्य नोकरीभोवती केंद्रित असल्यामुळे आपण मोठे झाल्यानंतर नोकरी करायची नाही, तर स्वतःचा व्यवसाय करायचा हे ओमप्रकाश यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना ठरवले होते. परंतु व्यवसायासाठी गाठीशी अनुभव हवा, या दृष्टीने त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अर्ज केले. मर्चंट बँकेमध्ये त्यांची निवड झाली. नोकरीच्या निमित्ताने ओमप्रकाश यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी ठाण्यात वास्तव्यास पसंती दिली. मुंबईत आल्यानंतर पाच ते सहा वर्षे ते नोकरी करत होते. ओमप्रकाश यांना पहिल्यापासून आर्थिक गुंतवणूक या विषयात, त्यातही खासकरून शेअर मार्केट आणि त्यासंबंधित इतर गोष्टींमध्ये रस होता. त्या गोष्टी त्यांना खुणावत होत्या. परंतु नोकरी करत असल्याने त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. अखेर नोकरीतून दांडगा अनुभव आणि पुरेशी गंगाजळी जमा झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. खरे तर ओमप्रकाश यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नोकरीत चांगली झेप घेतली होती. त्यांना आकर्षक पद, भरभक्कम पगार होता. परंतु व्यवसाय करण्याची ओढ असल्याने त्यावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी होती. अर्थात ओमप्रकाश यांना कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने प्रारंभी त्यांनाही घरातून विरोध झाला. परंतु व्यवसाय करण्याचा त्यांचा निर्धार ठाम असल्याने त्यांनी घरातल्यांची मने वळवली. त्यानंतर त्यांनी एक-दोन व्यवसाय सुरू केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मग ओमप्रकाश यांनी त्यांच्या आवडीच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी ठरले.
 
 
 
ncb
 
त्याबद्दल ओमप्रकाश यांनी सांगितले की, “शेअर मार्केट म्हणजे जुगार, शेअर मार्केट म्हणजे सट्टा, शेअर मार्केट म्हणजे आर्थिक धोका असे काहीसे समीकरण आपल्याकडे आहे. माझा मात्र याबाबतचा विचार वेगळा आहे. पहिल्यापासून मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याने त्याचा अभ्यास आहे. या अभ्यासाच्या जोरावर एक गोष्ट मी खात्रीने सांगतो की, इथे काम करताना तुमचे निरीक्षण, अभ्यास याच्या जोरावर निर्णय घेत काम केले, तर तुम्ही यात नक्की यशस्वी होऊ शकता. शेअर मार्केट कधीही बंद होणार नाही. जोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत हा व्यवसाय आहे. जागतिक पातळीवर चालणारा हा उद्योग आहे. मोठ्या कंपन्या बंद होतील, पण शेअर मार्केट बंद होणार नाही. त्यामुळे इथे गुंतवणूक करताना अभ्यासूपणे आणि सजगपणे करायला हवी. अशाच पद्धतीने आम्ही आमच्याकडे येणार्‍या ग्राहकांना सेवा देत असल्याने त्यांचा आमच्यावर विश्वास आहे.”
 
 
 
साही यांनी 2000मध्ये स्वतःची ‘निधी ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ सुरू केली. आज या कार्यालयात 20 कर्मचारी काम करत आहेत. हे सर्व कर्मचारी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजन करून काम करतात. इथे येणार्‍या ग्राहकांचा फायदा कसा होईल, याचा प्राधान्याने विचार करत त्यांनी विश्वासाने गुंतवायला दिलेले पैसे परत देताना त्यात वाढ कशी होईल, याचा विचार केला जातो. त्यामुळेच साही आणि त्यांच्या टीमने चांगल्या कंपन्या कोणत्या आहेत त्याची वेगळी यादी केली आहे. तसेच चांगले आणि फायदा देणारे म्युच्युअल फंड कोणते आहेत याचा अभ्यास करून त्यांची यादी तयार केली आहे. मार्केटच्या परिस्थितीप्रमाणे ती सतत अद्ययावत होत असते. यामुळे निधी ब्रोकिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍यांचा निश्चित फायदा होतो. ग्राहकांचा होणारा फायदा आणि इथल्या कर्मचार्‍यांवरील ग्राहकांचा विश्वास या जोरावर निधी ब्रोकिंग सर्व्हिसेस साडेतीन हजार ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.
 
 
 
शेअर मार्केटमध्ये अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍यांना काय सल्ला द्याल? असे विचारले असता साही यांनी सांगितले की, “आमच्याकडे येणार्‍या प्रत्येक गुंतवणूकदाराचा फायदा कसा होईल, याचा आम्ही प्राधान्याने विचार करतो. त्यामुळे येणार्‍याच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. त्यानुसार आम्ही त्यांना काही पर्यायही देतो. ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे, अशा गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील किमान पाच लाख रुपये चार ते पाच वर्षे विविध ठिकाणी गुंतवण्याचा सल्ला आम्ही त्यांना देतो. या गुंतवणुकीतून त्यांना कसा फायदा होईल याचा बारकाईने अभ्यास करून हा सल्ला आम्ही देतो. यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होतो.”
 
 
 
भविष्यातील योजनांबद्दल ओमप्रकाश साही यांनी सांगितले की, “आगामी चार वर्षांमध्ये निधी ब्रोकिंगची उलाढाल एक हजार कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण मेहनत घेत आहोत. हे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर मी सल्लागाराच्या भूमिकेत जाणार आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील जिल्हा पातळीवर निधी ब्रोकिंग गुंतवणूक प्रतिनिधी नियुक्त करण्याचा आमचा मानस आहे. त्याला लॅपटॉप, फोन आणि मासिक पगारही दिला जाईल. यासाठी जे इच्छुक असतील त्यांना यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्याची आमची तयारी आहे. तसेच समाजामध्ये शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा विचार आहे. त्यासाठी एखाद्या महाविद्यालयात अथवा मॅनेजमेंट स्कूलमध्ये यासाठी लागणारा अभ्यासक्रम सुरू करण्याची आमची तयारी आहे. या अभ्यासक्रमाचे नियोजन आमच्याकडे तयार आहे. यासाठी जे महाविद्यालय इच्छुक असेल, त्यांच्यासाठी निधी ब्रोकिंग सर्व्हिसेसतर्फे अभ्यासक्रम सुरू केले जातील.”
 
 
 
शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार असा दृष्टीकोन होता. आता या दृष्टीकोनामध्ये बदल होत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यांना योग्य आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शनासाठी निधी ब्रोकिंग सर्व्हिसेस तत्पर आहे. ओमप्रकाश साही यांच्याच शब्दांत सांगायचे, तर “शेअर मार्केट म्हणजे संपत्ती उभारणीचे केंद्र आहे. त्यातून देशाच्या आर्थिक जडणघडणीस हातभार लावला जातो.”