“आहार ही एक उपासना आहे” - आहारतज्ज्ञ रसिका देशमुख

“बाळासाहेब नाईक हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते” - प्रसिद्ध उद्योगपती शेखर देसरडा

विवेक मराठी    22-Nov-2022
Total Views |

vivek
 
“कोणत्याही वयोगटाच्या जीवनशैलीला उत्तम ठेवण्यासाठी चार आधारस्तंभ असतात - आहार, विहार, मन:शांती आणि विश्रांती. यापैकी तीन बिंदूचा परिणाम आहारावर होत असतो. आहार हा तुमची प्रकृती ठरवीत असतो. आहार ही एक उपासना आहे, त्याला भक्तिभावाने सामोरे जावे, याचे चांगले परिणाम म्हणजे आपण निरोगी होण्याच्या दिशेने केलेली वाटचाल असेल यासंबंधीचे विस्तृत विवेचन सा. विवेक प्रकाशित पुस्तक ‘आहार आणि उपासना’ यात आलेले आहे. कोविड काळात ज्यांच्या आहाराची बैठक उत्तम होती, त्यांनी या महामारीचा सहज सामना केल्याचे आपणास लक्षात येईल” असे आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी प्रतिपादन केले. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. 20 नोव्हेंबर रोजी निर्मलोत्तम न्यास आणि सा. विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या दामुअण्णा दाते सभागृहात आयोजित समारंभात ते बोलत होते.
 
 
 
या कार्यक्रमप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती शेखर देसरडा यांच्या हस्ते ‘आहार आणि उपासना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. “बाळासाहेब नाईक हे आहाराचे महत्त्व आणि त्यानुसार दैनंदिनी याचे आदर्श होते. राष्ट्रउत्थानासाठी आपले जीवन समर्पित करणारे बाळासाहेब हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते” असे शेखर देसरडा यांनी प्रतिपादन केले.
 
 
 
विश्वशांतीचे उपासक असलेले बाळासाहेब नाईक यांचा स्मृतिदिनदेखील समाजहितैषी व्हावा, हा सुविचार नाईक कुटुंबीयांच्या मनात होता. तेव्हा कोविड काळानंतर बदलेली परिस्थिती आणि जीवनशैली यावर प्रकाश टाकणार्‍या तज्ज्ञ मंडळींच्या चमूचे या स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शन आणि सा. विवेक प्रकाशित ‘आहार आणि उपासना’ या पुस्तकाचे प्रकाशन या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर आयुर्वेदाचार्य डॉ. संतोष नेवपूरकर, योगाचार्य महेश पूर्णपात्रे, आहारतज्ज्ञ रसिका देशमुख, हेडगेवार रुग्णालय मेडीसिन विभागप्रमुख डॉ. सागर गुप्ता, श्यामराव नाईक आणि सा. विवेकचे देवगिरी प्रांत प्रतिनिधी राजीव जहागीरदार उपस्थित होते. कार्यक्रमास औरंगाबादचे अनेक मान्यवर आणि श्रोतृवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
 
 

बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक
आहार आणि उपासना, सवलत मूल्य – 225/-

 
 
आपली दैनंदिनी आणि आयुर्वेद या विषयावर आयुर्वेदाचार्य डॉ. संतोष नेवपूरकर यांनी मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे देऊन आयुर्वेदावर आधारित दैनंदिनीचे आचरण आपणास कसे निरोगी ठेवू शकते, याचे स्पष्टीकरण दिले. आपली दिनचर्या ही प्रकृतीनुसार ठरवावी. त्यासाठी प्रथम आपल्या प्रकृतीची - म्हणजे आपल्या शरीराची ओळख करून घेणे महत्त्वाचे. आजच्या वर्क फॉर्म होमच्या बदलत्या जीवनशैलीत कशा प्रकारे आपण आपले शरीर निरामय ठेवू शकतो, याविषयी काही क्लृप्त्या डॉ. संतोष यांनी दिल्या.
 
 
 
“पन्नाशीनंतर दहापैकी आठ जणांमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब आढळून येतात. आजारात काळजी घेण्यासाठी तीन गोष्टींची नियमितता असावी - 1. शरीराची हालचाल ठेवणे, 2. चालू असलेली औषधे नियमित ठेवणे, 3. आहाराची काळजी घेणे. आजार हे जेनेटिक असतात. शरीराची नियमित तपासणी करणे, पुरेशी झोप, समाजकार्यात गुंतणे, छंद जोपासणे अशा अनेक गोष्टी आत्मसात करून आपले पन्नाशीनंतरचे आयुष्य आनंदी घालवू शकतो” असे डॉ. सागर गुप्ता यांनी सांगितले.
 
 
 
योगाचार्य महेश पूर्णपात्रे यांनी योग हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली देणगी आहे. प्राचीन भारतावर आक्रमणापश्चात आपल्या संस्कृती विस्मृतीत गेल्या आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून आले, याचा खेद व्यक्त केला. म्हणून आपण आपल्या मुळाकडे जायला पाहिजे. ऋतुमान, प्रकृती, निसर्ग या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेद आणि योग ही आपल्याला बहाल केलेली देणगी आहे, तिचे जतन आपण केले पाहिजे हे सांगतानाच त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांकडून काही क्रिया करून घेतल्या आणि आपल्या दैनंदिनीत त्याचे आचरण करण्याचे आवाहन केले.
 
 
 
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले बाळासाहेब यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदू व बौद्ध धर्माच्या समन्वयाचे कार्य केले. त्यासाठी त्यांचा प्रवास आणि समन्वय हा प्रेरणादायक आहे. रा.स्व. संघात संघटन बांधणीसाठी केलेले कार्य, माणसे जोडून त्याला देशहिताच्या कार्यास जोडण्याची कला बाळासाहेबांना उत्तम येत होती. अनेक प्रसंग सांगून श्यामराव नाईक यांनी बाळासाहेबांचा जीवनपट आणि त्यांचे समर्पण विशद केले.
 
 
राजीव जहागीरदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मेधा नाईक यांनी आभारप्रदर्शन केले.