शिल्लकांची वंचितांना साद

22 Nov 2022 15:00:26
 @अभय पालवणकर 
 
शिवसेना उद्धव गटाने आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी संभाजी ब्रिगेडनंतर भारिपा बहुजन पार्टीशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. पण भारिपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यांचा शिवसेनेशी वैचारिक संघर्षबरोबरच, अकोल्यातील स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये संघर्ष आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्ष एकत्र आले, तरी कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने एकत्र येतील का? तसेच वंचित आघाडीतील एमआयएमसह उद्धव गट एकत्र येईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
 
sena
 
 गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारिपा बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे एकत्र येणार अशा बातम्या येत होत्या. यामुळे माध्यमांत या दोघांच्या युतीची चर्चाही सुरू झाली. शिवसेनेतून बंडखोरी करून 40 आमदार गेल्यानंतर शिवसेना उद्धव गट अत्यंत कमकुवत झाला आहे. अशा वेळी अडगळीत पडलेल्या पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी नेहमीच धडपड करावी लागते. मग तो आपल्या समविचारी पक्षांशी युती करत असतो, तर कधी विचारांशी तडजोड करून युती करत असतो. वैचारिक तडजोड करणारी अशीच एक युती महाराष्ट्रात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती युती अशी जरी विशेषणे दिली जात असली, तरी प्रत्यक्षात मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही युती आहे, असे दिसत आहे.
 
 
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे दलित समाज शिवसेनेपासून दुरावला होता. त्यामुळे दलित समाज नेहमीच काँग्रेसकडे वळला होता. दलित समाजाची मते नेहमीच काँग्रेसच्या पारड्यात जात असत. सेना-भाजपा युतीला याचा मोठा फटका बसत असे. त्यामुळेच बाळासाहेबांनी काँग्रेसमुळे पराभूूत झालेल्या व अडगळीत पडलेल्या रामदास आठवलेंना 2009मध्ये युतीमध्ये येण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन रामदास आठवले युतीत सामील झाले. 2014च्या निवडणुकीत सेना-भाजपाला याचा फायदा झाला. आज रामदास आठवले हे भाजपाच्या कोट्यातून केंद्रीय मंत्री आहेत. पण रामदास आठवले यांची दलित समाजावरील कमांड कमी होत चालली आहे, तर दुसरीकडे भीमा कोरेगाव, एल्गार परिषद, दलितांवर होणारे अत्याचार यांचा आधार घेत प्रकाश आंबेडकर गेल्या काही वर्षांपासून दलित समाजात लोकप्रिय होत आहेत. दलित समाज कोणत्या मार्गाने एकत्र येऊ शकतो, याची नस त्यांनी अचूक ओळखली आहे. त्यामुळे भारिपाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच भाजपाला शह देण्यासाठी व शिवसेनेला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना वंचित आधार घेणे अपरिहार्य वाटते. पण यामुळे शिवसेनला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांची धरसोड वृत्ती... आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते कधी एका पक्षासोबत दीर्घकाळ राहिले नाहीत. कधी काँग्रेस-राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा द्यायचा, तर कधी वंचित म्हणून त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊ टीका करायची.. तर अकोल्यातील जि.प. सत्तेसाठी भाजपाची मदत घ्यायची. त्यामुळे प्रकाश आंबडेकर हे कोणत्याही राजकीय पक्षाशी फारसे जवळचे झाले नाहीत. नुकतीच त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडोवर टीका केली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला उद्धव गटाने सोबत घेतले, तर काँग्रेसला रुचेल का? भारिपा अकोल्यातील राजकारणात आजपर्यंत यशस्वी झाली आहे. अकोल्यात अनेक वर्षे महापालिकेत भारिपाची सत्ता आहे. तिथे खासकरून मुस्लिमांवर त्यांची भिस्त आहे आणि त्या राजकारणाच्या विरोधात शिवसेना लढत आली आहे. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या एवढ्या वर्षांच्या संघर्षाचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
 
उद्धव गट आणि एमआयएम एकत्र येणार का?
 
सध्या वंचित आघाडीमध्ये एमआयएम आहे. एमआयएम हा रझाकारांचा पक्ष आहे. मुस्लिमांचे तुष्टीकरण अशा एमआयएमच्या अनेक भूमिका नेहमी वादग्रस्त ठरल्या आहेत. सध्या वंचितच्या पाठिंब्यानेच संभाजीनगरचा एमआयएमचा खासदारसुद्धा आहे. मग जर वंचितशी उबाठा सेनेची युती  झाली, तर शिवसेनेला एमआयएमशी युती चालेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
मुंबई पालिकेत बेरजेची गणिते
 
 
मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा आत्मा आहे. राज्यातील सत्तेपेक्षा शिवसेनेला मुंबई पालिकेवर सत्ता हवी असते. यंदा भाजपा आणि शिंदे गटाच्या आव्हानाला तोंड देणे शिवसेनेला कठीण वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेने काही संघटना, पक्ष यांना जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी संभाजी ब्रिगेडला जोडले, आता भारिपाला जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत दलितमतदार मोठ्या संख्येने आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे सर्व केले जात आहे, असे बोलले जात आहे.
 
 
मूळ शिवसेनेतून शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेची वाताहत झाली आहे. आता पुन्हा शिवसेना उभी करायची आहे, हे लक्षात घेऊन शिवसेना विविध संघटनांशी युती करीत आहे. अगोदरच महाविकास आघाडीचा प्रयोग करून आपल्या पक्षाचे अस्तित्व मिटण्याच्या मार्गावर आहे, आता त्यात वंचित व संभाजी ब्रिगेडसारखे पक्ष घेऊन त्यात भर घातली जात आहे, यातून शिवसेनेची अधिकच अधोगती होत आहे असे दिसून येत आहे. 1984 साली भाजपाचा पराभव होऊन फक्त दोन खासदार निवडून आले होते. पण भाजपाने पक्षाला बळ देण्यासाठी समविचारी पक्षांशी युती केली. युती निभावणार्‍या नेत्यांशी संबंध जोडले. त्यामुळे आज 300 खासदार निवडून येऊन भाजपा बहुमताने सत्तेत आहे. आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपाकडून उबाठा पक्षप्रमुख हा धडा घेणार का? बाळासाहेबांचे विचार विसरून पक्ष संघटना बळकटीसाठी प्रबोधनकारांच्या काही विचारांची ढाल पुढे करून कट्टर हिंदुत्वविरोधकांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न किती यशस्वी होतो, ते येणार्‍या काळात समजेल.
Powered By Sangraha 9.0