भारतीय ‘प्रारंभ’

विवेक मराठी    23-Nov-2022
Total Views |
 @धनंजय जाधव
royaldevraj@rediffmail.com
’मिशन प्रारंभ’ अंतर्गत विक्रम एस या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले. त्यामुळे देशात खासगी रॉकेट विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अवकाश क्षेत्रातील अमेरिका, युरोप आणि चीनच्या स्पेस कंपन्यांची मक्तेदारी ह्या प्रारंभ मिशनने मोडून काढली आहे. स्कायरूटने विकसित केलेल्या स्वदेशी रॉकेट व प्रक्षेपणामुळे जगभरातील ग्राहक आणि गुंतवणूकदारांना खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यास स्कायरूट एरोस्पेस यशस्वी ठरली आहे.

Mission Prarambh
 
18 नोव्हेंबर 2022. सकाळी 11.30 वाजता ‘प्रारंभ’ श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवरून अवकाशाच्या दिशेने निघाले, लक्ष्य होते अवकाशात पृथ्वीच्या भ्रमणकक्षेपासून दूर 80 कि.मी. अंतरावर स्थिरावणे. पण ह्या ‘प्रारंभ’ने आपल्या उड्डाणाच्या पहिल्या प्रयत्नातच अवकाशात 89.5 कि.मी. अंतर गाठून सर्व भारतवासीयांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि ह्या मिशनमधील इस्रो, स्कायरूट एरोस्पेस, इन-स्पेस (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर)च्या टीमने एकच जल्लोश केला.
स्कायरूट एरोस्पेसची वाटचाल
 
 
 
हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस ह्या खाजगी स्पेस कंपनीने तशी 12 जून 2018 रोजी स्कायरूट एरोस्पेसची स्थापना करून आपल्या पहिल्या मिशन ‘प्रारंभ’ची सुरुवात केली होती. ह्या कंपनीने ऑगस्ट 2020मध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिनाची यशस्वी स्केल टेस्ट घेऊन भारतातील पहिली खाजगी कंपनी बनण्याचा बहुमान मिळवला होता, त्याचबरोबर सप्टेंबर 2020मध्ये त्यांनी भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले 3D-प्रिंटेड क्रायो इंजीन विकसित करून, लगेच डिसेंबर 2020मध्ये सॉलिड रॉकेट विकसित करून त्याची यशस्वी चाचणी करूनदेखील घेतली आणि अशा रितीने स्कायरूट एरोस्पेस परत एकदा भारतातील पहिली खाजगी स्पेस कंपनी बनली होती.
 
 
 
स्कायरूट एरोस्पेसने सप्टेंबर 2021मध्ये इस्रो आणि इन-स्पेस (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) यांच्याशी सामंजस्य करार केला. सप्टेंबर 2020मध्ये बनवलेल्या 3डी-प्रिंटेड क्रायो इंजीनची नोव्हेंबर 2021मध्ये यशस्वी चाचणी घेऊन सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.
 
 
 
स्कायरूट एरोस्पेसने मे 2022मध्ये विक्रम-एस (सिरीज - ख) रॉकेट ह्या सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लाँच व्हेइकलची यशस्वी चाचणी घेऊन सर्व जगाचे परत एकदा लक्ष वेधून घेतले होते. (भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून लाँच व्हेइकलला ‘विक्रम’ असे त्यांचे नाव देण्यात आले आहे.)
 
 
 
स्कायरूट कंपनीने विक्रम रॉकेटचे तीन प्रकार विकसित केले असून, विक्रम-ख-480 किलोग्रॅम पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये वाहून नेऊ शकतो, तर विक्रम-खख-595 किलोग्रॅम कार्गो उचलण्यासाठी सज्ज आहे, तर विक्रम-खखख- हे 815 किलोग्रॅम पेलोड घेऊन लो अर्थ ऑर्बिटमध्ये 500 कि.मी. लो इन्क्लिनेशन ऑर्बिट (कमी झुकाव कक्षा)मध्ये प्रक्षेपित करता येणार आहे.
 
 
Mission Prarambh
 
स्कायरूट एरोस्पेसचे संस्थापक आणि टीम
 
 
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन चंदना, जे आयआयटी-खरगपूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवी आणि थर्मल सायन्स इंजीनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तर दुसरे आहेत नागा भारत डाका. हे आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक व व्हीएसएल डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
 
 
 
पवन चंदना हे स्कायरूटच्या आधी, इस्रोच्या मुख्य रॉकेट बिल्डिंग फॅसिलिटीमध्ये कार्यरत होते, विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्यांनी सहा वर्षे काम केले असून, इस्रोने आतापर्यंत बांधणी केलेले सर्वात मोठे रॉकेट GSLV-Mk3 (LVM3) च्या प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
 
 
 
नागा भारत डाका हेदेखील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये कार्यरत होते. तिथे ते कॉम्प्युटर इंजीनिअर म्हणून काम पाहत होते. त्यांनी अनेक ऑनबोर्ड कॉम्प्युटर मॉड्यूल्ससाठी हार्डवेअर आणि फर्मवेअर तयार करण्यास मदत केली असून लाँच व्हेइकलचा सिक्वेन्स, नॅव्हिगेशन, कंट्रोल आणि गायडन्स यामार्फत केले जाते.
 
 
ज्ञानगांधी व्ही. हे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत. हे स्कायरूट फर्मचे लिक्विड प्रोपल्शन आणि क्रायोजेनिक डेव्हलपमेंट सांभाळतात. त्यांना प्रोपल्शनचा 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून ते भारतातील क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते मानले जातात.
 
 
ईश्वरन व्ही.जी. हे एक सॉलिड प्रोपल्शन एक्स्पर्ट असून, जगातील तिसरे सर्वात मोठे सॉलिड फ्युएल (घन इंधन) असलेल्या रॉकेट (GSLV-Mk3 / LVM3) चे माजी प्रकल्प संचालक होते.
 
 
सेल्वाराजू एस. हे इस्रो मुख्यालयामध्ये सिस्टम रिलायबिलिटी आणि क्वालिटी डिपार्टमेंटचे माजी डायरेक्टर होते. यांच्याकडे 50+हून जास्त लाँचसाठी गुणवत्तेची खात्री करण्याचे कौशल्य आहे.
 
 
 
Mission Prarambh
 
स्कायरूट एरोस्पेसचे पुढील लक्ष्य
 
 
स्कायरूट एरोस्पेस 2024मध्ये 08 कमर्शिअल रॉकेट्स लाँच करणार आहे, तर..
 
2025मध्ये 12 कमर्शिअल रॉकेट लाँचेस,
 
2026मध्ये 18 कमर्शिअल रॉकेट्स लाँच करण्याचे स्कायरूटचे पुढील लक्ष्य असणार आहे.
 
‘प्रारंभ’ हे रॉकेट आपल्याबरोबर तीन कस्टमर पेलोड (SpaceKidz India, Bazoomq Armenia आणि N-Space Tech Indiaने विकसित केलेले तीन पेलोड) घेऊन अवकाशात यशस्वीरित्या स्थिरावले, भविष्यात आगामी कमर्शिअल रॉकेट लाँचेसमधून स्कायरूट एरोस्पेसला 10 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. स्कायरूट एरोस्पेसच्या पहिल्या यशस्वी सबऑर्बिटल उड्डाणानंतर अंतराळ उद्योगमध्ये प्रक्षेपण वाहनांपासून ते अंतराळ पर्यटनापर्यंत भारतातील अंतराळ उद्योग खूपच वाढणार आहे.
 
 
भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील विकास का महत्त्वाचा आहे?
 
 
अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी भारत सरकारने नवीन अंतराळ धोरण आखले आहे. अंतराळ विभागासाठी 2022-23 आर्थिक वर्षासाठी भारताची एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 13,700 कोटी रुपये इतकी आहे. भारतीय अंतराळ उद्योगाचे मूल्य 2019मध्ये 07 अब्ज डॉलर्स इतके होते आणि हे 2024पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारने उपग्रह, प्रक्षेपण आणि अवकाश-आधारित सेवांमध्ये खाजगी कंपन्यांना लेव्हल प्लेइंग फील्ड प्रदान करण्यासाठी अवकाश क्षेत्रात सुधारणांची घोषणा केली आहे. त्यानुसार 2019च्या कायद्यानुसार इस्रोने विकसित केलेले परिपक्व तंत्रज्ञान भारतीय उद्योगांना हस्तांतरित करणे बंधनकारक आहे.
 
 
आतापर्यंत, भारतात रॉकेट सोडण्याची मक्तेदारी सरकारी संस्था इस्रोची होती, पण भारत सरकारने खाजगी अंतराळ उद्योग विकसित करण्याच्या हेतूने व परवडणार्‍या रॉकेट लाँच मोहिमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पाऊल उचलण्याचे ठरवल्यानंतर , किमान 150 स्टार्टअप्सनी अंतराळ क्षेत्रात स्वारस्य दाखवले आहे. ह्या 150 स्टार्टअप्सनी भारत सरकारकडे अंतराळात जाण्यासाठी अर्ज पाठवले आहेत, तर भारत सरकारने यातील पाच स्टार्टअप्सना परवानगी दिली आहे.
 
 
अंतराळ क्षेत्राचा विकास भारताच्या दृष्टीने फार गरजेचा असून खाजगी क्षेत्र हे भांडवलकेंद्रित आणि उच्च तंत्रज्ञानाची मागणी असलेल्या ह्या अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक आणि कौशल्य वाढविण्यास फार मोठा हातभार लावणार आहे.
 
 
भारत कृषिप्रधान देश असून, हवामानाच्या अंदाजांबद्दल अधिक अचूक माहिती आणि हवामानातील दीर्घकालीन ट्रेंडचे मूल्यांकन करण्यासाठी अंतराळ क्षेत्रातील विकास भारताला गरजेचा आहे.
 
 
भूकंप, त्सुनामी, पूर, जंगलातील आग, खाणकाम इत्यादी नैसर्गिक आपत्तींविरुद्ध रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि येणार्‍या संकटावर तातडीने उपाययोजना आखण्यासाठी, त्या धोक्याची सूचना लवकर मिळून त्यावर उपाय आखण्यासाठी अंतराळ क्षेत्रातील विकास फार गरजेचा आहे.
 
 
भारताच्या दोन्ही बाजूंनी शत्रुराष्ट्रे असताना संरक्षणातील अनेक उद्देशांसाठी रिअल-टाइम ट्रॅकिंगचा वापर करण्यासाठी भारताला अंतराळ क्षेत्र फार गरजेचे आहे.
 
 
भारतातील दुर्गम/अतिदुर्गम भागात पोहोचण्यासाठी व तिथे असलेल्या पारंपरिक दळणवळण नेटवर्कला पूरक पायाभूत सुविधा देण्यासाठी अंतराळ क्षेत्रातील विकास भारतासाठी गरजेचा आहे.
 
 
स्कायरूट एरोस्पेसचे खाजगी रॉकेट उड्डाण करण्यामागील उद्दिष्ट व कारणे
 
 
अंतराळ क्षेत्रामध्ये जगभरातील कार्यरत असलेल्या स्पेस-टेक इकोसिस्टिममधील कंपन्यांपैकी 56.4% लीडरशिप एकट्या अमेरिकन स्पेस कंपन्यांकडे आहे, तर उर्वरित मक्तेदारी ही युनायटेड किंग्डम 6.5%, कॅनडा 5.3%, चीन 4.7% आणि जर्मनी 4.1% ह्या देशांतील स्पेस कंपन्यांकडे आहे.
 
 
स्कायरूटचे प्रारंभ रॉकेट प्रक्षेपण मिशन हे एक डेमॉन्स्ट्रेशन (प्रात्यक्षिक) व फुल्ल स्केल (पूर्ण-प्रमाणात) सबऑर्बिटल प्रक्षेपण होते, ज्याचे उद्दिष्ट खाजगी कंपनीचे अवकाश क्षेत्रातील आपले स्थान बळकट करणे आणि विक्रम रॉकेटचे तंत्रज्ञान, इंजीन आणि डिझाइन्सचे प्रमाणीकरण करून ते लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये जड असे पेलोड अवकाश क्षेत्रात लाँच करण्यास सक्षम असल्याचे जगभरातील स्पेस कंपन्यांना व त्या क्षेत्रातील जगभरातील ग्राहकांना दाखवून देणे होते.
 
 
 
अवकाश क्षेत्रातील अमेरिका, युरोप आणि चीनच्या स्पेस कंपन्यांची मक्तेदारी ह्या प्रारंभ मिशनने मोडून काढली आहे.स्कायरूटने विकसित केलेल्या स्वदेशी रॉकेट व प्रक्षेपणामुळे जगभरातील ग्राहक आणि गुंतवणूकदारांना खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यास स्कायरूट एरोस्पेस यशस्वी ठरली आहे.
 
 
अंतराळ उद्योग आणि खाजगी भारतीय कंपन्या
 
 
भारताचा अंतराळ उद्योग प्रामुख्याने राष्ट्रीय भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोद्वारे चालविला जातो. या अंतराळ उद्योगामध्ये 500पेक्षा जास्त खाजगी पुरवठादारांचा आणि अवकाश विभागाच्या इतर विविध संस्थांचा समावेश असून 45,000पेक्षा जास्त लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे.
 
 
सध्या, अंतराळ क्षेत्रात भारतामध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्या अग्रस्थानी असून, भारत सरकारच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रवासामध्ये ह्या कंपन्या मोलाचा वाटा उचलत आहेत -
 
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
 
अग्निकुल कॉसमॉस प्रा.लि.
 
टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम लिमिटेड.
 
अँट्रिक्स कॉर्पोरेशन लि.
 
स्कायरूट एरोस्पेस प्रा.लि.
 
बेलाट्रिक्स एरोस्पेस. यांच्यासह सुमारे 30 हून अधिक कंपन्या या कामाशी जोडलेल्या आहेत.
 
 
भविष्यातील अंतराळ कार्यक्रम
 
 
खाजगी स्पेस कंपनी स्पेस ऑरा एरोस्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड लवकरच भारतात स्पेस टुरिझममध्ये पदार्पण करत आहे.
अ‍ॅस्ट्रोबोर्न स्पेस अँड डिफेन्स टेक्नॉलॉजीज लवकरच भारतात क्रू मॉड्यूल्स आणि स्पेस सूट्स डेव्हलपमेंटच्या योजना आखत आहे.
 
 
अग्निकुल कॉसमॉस कंपनी डिसेंबर 2022मध्ये त्याच्या दोन-स्टेज बूस्टर असलेल्या रॉकेटची चाचणी प्रक्षेपणाची योजना आखत आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्याबरोबर, त्या प्रक्षेपणाच्या निष्कर्षांवर आधारित ही स्टार्टअप कंपनी लगेचच मार्च किंवा एप्रिल 2023मध्ये दुसर्‍या ग्राहकांचे व्यावसायिक पेलोडसह लाँच करण्याची योजना आखत आहे.
 
 
150 स्टार्टअप्सनी अंतराळ क्षेत्रात स्वारस्य दाखवले असून ह्या 150 स्टार्टअप्सनी भारत सरकारकडे अंतराळात जाण्यासाठी अर्ज पाठवले आहेत.
 
 
 
स्कायरूट एरोस्पेसच्या खाजगी रॉकेट लाँचेसबरोबर भारतात सुरू झाले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रवासातील एक नवीन सुरुवात, एक नवीन पहाट आणि एक नवीन ‘प्रारंभ’. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल आहे. स्वत:चे स्वदेशी रॉकेट आणि भारताच्या स्टार्टअप चळवळीचा हा एक टर्निंग पॉइंट असून कधीही न संपणार्‍या, स्वप्नातीत - अनंत अशा स्पेस ट्रॅव्हलच्या युगाची नांदी ...
 
 
आणि
 
तिकडे अब्जाधीश इलॉन मस्कच्या मालकीची स्पेस एक्स कंपनी, डबघाईला आलेल्या ट्विटरच्या चिमणीला सांगत बसली आहे..
चिऊताई, चिऊताई... अवकाशाचे दार उघड!!