सत्तेच्या हव्यासापोटीच सावरकरद्वेषाचा विखार

विवेक मराठी    24-Nov-2022
Total Views |
@मंजिरी मराठे
 
 भारत जोडो यात्रे दरम्यान युवराज यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांवर बेछूट आरोप केले. याआगोदर असे तथ्यहीन आरोप करून त्यांनी सावरकरप्रेमींना अनेकदा दुखावलं आहे. भारत जोडो यात्रेत सावरकरांवर आरोप करण्याचं काहीही कारण नव्हतं. ‘गळाभेटी’ घेऊन तुम्ही माध्यमांचं लक्ष वेधून घेऊ शकता, क्षणिक प्रसिद्धी मिळवू शकता. पण युवराज तुमच्या सततच्या ‘विद्वत्तापूर्ण’ वक्तव्यांमुळे तुम्ही जनतेच्या मनातून उतरत आहात हे निश्चित. काँग्रेसची सद्य:स्थिती पाहता तिला संपवण्यासाठी कोणालाच विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ते काम युवराजांनीच हाती घेतलं आहे.
swarkar
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसकडून सतत केले जाणारे आरोप ही काँग्रेसची अत्यंत घाणेरडी खेळी आहे. सावरकर या व्यक्तीला विरोध केला जात असला, तरी विरोध आहे तो त्यांच्या विचारांना, घाला आहे हिंदुत्वाच्या वाढत्या प्रभावावर.
पंतप्रधान इंदिरा गांधी, शरद पवार अशा अनेक नेत्यांनी वेळोवेळी सावरकरांचा गौरव केला असताना सावरकरांवरच्या आरोपांना अचानक सुरुवात झाली ती अटलबिहारी वाजपेयींचं हिंदुत्ववादी शासन आल्यावर. आता तर मोदी शासन आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या सावरकरांना लक्ष्य करणं ही आता काँग्रेसची, पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणार्‍या त्यांच्या ’युवराजां’ची नेहमीची खेळ झाली आहे. काँग्रेस पक्षासाठी अडचण निर्माण झाली, युवराजांचा प्रभाव कमी होतो आहे असं वाटलं की सुरू होतात सावरकरांवरचे बेछूट आरोप. मग सारे पक्ष, सारे हिंदुत्ववादी लागतात आरोप खोडून काढण्याच्या कामी.
 
‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरणारे ब्रिटिश आपले शत्रू तरी होते. पण केवळ राजकारणासाठी जातीपातीत तेढ निर्माण करण्याची खेळी बारामतीतून सुरू झाली. तेच या सगळ्यामागे आहेत असंही काहींचं म्हणणं आहे.
 
 
 
स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी डोईजड झाले होते. त्यातच 30 जानेवारी 1948 या दिवशीच ते ठरवलेल्या ध्येयधोरणांनुसार न चालणारी काँग्रेस बरखास्त करावी या त्यांच्या मागणीवर चर्चा करणार होते. आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी उपसल्या जाणार्‍या त्यांच्या उपोषणाच्या सततच्या अस्त्राने काँग्रेस नेतृत्व त्रस्त होतं. सावरकरांचा, हिंदू महासभेचा प्रभाव वाढत होता. नेहरूंपेक्षा पटेल यांना समर्थन वाढत होतं. त्यामुळे नेहरू सत्तास्थानी येण्यासाठी अडसर होता तो गांधी, पटेल आणि सावरकर या तिघांचा.
 
 
गांधीहत्येला 'It was a permissive assassination' असं म्हणणारे गांधीचे चरित्रकार रॉबर्ट पाइन हे काही एकटे नाहीत. गांधीहत्या झाली, पटेल संपले. गांधीहत्या झाली आणि सावरकरांचीही राजकीय हत्या करण्यात आली. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व वेचलं, त्याच देशात सावरकरांना प्रचंड मानहानी सोसावी लागली आणि त्यांचे ते भोग त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेले नाहीत. गांधीहत्या होणार हे माहीत असूनही 3-4 व्यक्तींना पकडू न शकलेल्या शासनाने तीन दिवसात हिंदुसभेच्या, संघाच्या पस्तीस, चाळीस हजार कार्यकर्त्यांना पकडलं. एका ब्राह्मणाने हत्या केली, त्याची शिक्षा पुर्‍या ब्राह्मण समाजाला देण्यात आली, त्यासाठीचे दोषारोप आजही चालू आहेत. त्या वेळी झालेल्या हिंसाचारात कित्येक गावांतून ब्राह्मण निर्वंश करण्यात आले, हजारो देशोधडीला लागले. “गांधींची हत्या मुसलमानाने केली नाही हे बरं झालं” हे माउंटबॅटन यांचं वाक्य पुरेसं सूचक आहे. गांधी हत्येने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेला, जातीजातीतला विखार वाढला, वाढवला गेला, हा खरा इतिहास आहे. तो शिकायला हवा तो चुका टाळण्यासाठी. मागे काय घडलं ते सारं मागे सारून एव्हाना एकसंध समाज निर्माण व्हायला हवा होता. आपल्या देशाने खूप प्रगती केली असली, तरी समाजजीवनात मात्र अधोगतीच होते आहे.
 
 
सत्तेच्या मुकुटासाठी सावरकरांवर बेछूट आरोप केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा जातीजातीतला द्वेष वाढतो आहे. राहुल गांधींच्या आरोपांची री ओढत सावरकरांना त्यांच्या जातीमुळे लक्ष्य केलं जात आहे. छत्रपती शिवरायांनी कधीही म्हटलं नाही की, मी मराठा जातीचा आहे. त्यांच्या प्रत्येक मावळ्याची, सुभेदाराची, प्रधान मंडळाची जात होती स्वातंत्र्याची आस. पण शिवाजी महाराज आमचे म्हणणारेच सावरकरांना जातीवरून लक्ष्य करणार असतील, तर तुम्ही ज्यांना आपले म्हणता ते शिवाजी महाराजच तुम्हाला कळलेले नाहीत, तर ज्या सावरकरांना तुम्ही आपले मानतच नाही, ते तुम्हाला कसे कळणार?
 
 
 
आरोपात काही तथ्य असेल तर टीका व्हायलाच हवी. प्रत्यक्ष सावरकरही आपल्यावर काय टीका होते ते जाणून घ्यायला उत्सुक असत.
 
 

swarkar
 
14 वर्षांचा कारावास आणि 13 वर्षांची स्थानबद्धता अशी 27 वर्षं सावरकर ब्रिटिशांच्या तावडीत असताना युवराज म्हणत असतील की, त्यांनी चार-पाच वर्षं कारावास भोगला, तर ते त्याचं अज्ञान आहे. ब्रिटिशांनी सावरकरांशिवाय इतर कुठल्याही राजकीय नेत्याला 27 वर्षं डांबून ठेवलेलं नाही.
 
 
swarkar
 
अंदमानात असताना सावरकरांना पहिले सहा महिने एकांतवास दिला होता. ही सॉलिटरी कन्फाइन्मेंट, असा एकांतवास कुठल्याही राजकीय नेत्याने भोगलेला नाही. पण युवराज म्हणतात, “हमारे नेता - गांधीजी, नेहरूजी दस दस साल, पंद्रह साल सॉलिटरी कन्फाइन्मेंट में रहे.” गांधी-नेहरूंशी तुलना केल्यामुळे आता त्यांच्याही कारावासाबद्दल सांगणं आलं. गांधींना एकूण सात वर्षांचा कारावास झाला होता, त्यापैकी त्यांनी शिक्षा भोगली ती केवळ तीन-सव्वातीन वर्षं. उपोषण, अपेंडिक्सशी शस्त्रक्रिया यामुळे त्यांनी कधीही पूर्ण शिक्षा भोगली नाही.
 
1921 ते 1945 या काळात नेहरूंना एकूण सोळा वर्षांची शिक्षा झाली. त्यापैकी त्यांनी शिक्षा भोगली ती केवळ पाच-सहा वर्षं. ते प्रथम श्रेणी राजबंदी होते, त्यामुळे त्यांनी कारावास भोगला तो नैनी, नाभा, डेहराडून अशा थंड हवेच्या ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहात. त्या ठिकाणी उन्हाळा सुरू झाला की त्यांना तिथून हलवत असत. नेहरू नाभामध्ये असताना मोतीलाल नेहरूंनी ब्रिटिशांची माफी मागून त्यांना केवळ बारा दिवसांत तिथून बाहेर काढलं होतं. त्यांच्या, गांधींच्या बंदिवासाच्या अनेक सुरस कथा आहेत.
 
 

swarkar
 
गांधी, नेहरू यांना दिलेल्या विशेष वागणुकीबद्दल माउंटबॅटन म्हणतात, "...most were living in very comfortable surroundings. They had all their books. They had free contact. They were politely and nicely treated. We always had very pleasant officers who looked after them. They had absolutely no complaint about how they were treated in prison.' (Mountbatten and independent India by Larry Collins & Dominique Lapiere Part I : Interviews, page 7) हे सगळ्यांपर्यंत पोहोचल्यावर अधिकच बदनाम होणार आहेत ते युवराज.
 
 
 
तोच मुद्दा माफीचा. या विषयावर तर सावरकर अभ्यासक सतत उत्तरं देत आहेत. पण कुठल्याही पत्रकाराला असा प्रश्न विचारावासा वाटत नाही की, मुक्ततेनंतर सावरकरांनी नेमकं काय कार्य केलं? कारावासात खितपत पडून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यामुळे बाहेर पडा आणि पुन्हा कामाला लागा, असं सावरकरांचं सांगणं होतं.
  
 
लाहोर कटाच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झालेले क्रांतिकारक सचींद्रनाथ संन्याल हे सावरकरांप्रमाणेच आवेदन देऊन सुटले. मुक्तता झाल्यावर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतिकार्य सुरू केलं आणि काकोरी कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेप झाली. आपल्या ‘बंदी जीवन’ या आत्मचरित्रात ते लिहितात, ‘सावरकरांनी केलेल्या आवेदनांत माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, माझी सुटका झाली पण त्यांची का नाही?... कारण शासनाला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.’
   
सावरकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देश स्वातंत्र्याची शपथ घेतली, त्यात त्यांनी म्हटलं होतं - ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन.’ त्या वयातही त्यांचे विचार स्पष्ट होते.. मारीत मारीत मरण. कुठल्याही लढवय्याला खितपत पडून मरण नको असतं, मरण हवं असतं ते लढताना. पुन्हा लढण्यासाठीच सावरकरांना कारागृहाबाहेर पडायचं होतं.
   
सावरकर मार्च 1910मध्ये लंडनमध्ये पकडले गेले. तिथल्या ब्रिक्स्टनच्या कारागृहातून त्यांना सोडवण्याचे प्रयत्न झाले. त्यांना भारतात आणलं जात असताना त्यांनी फ्रान्सच्या मार्साय बंदराजवळ अथांग सागरात उडी घेतली ती भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि स्वत:ची मुक्तता व्हावी यासाठी. त्यांचा पहिला उद्देश सफल झाला. छत्रपती शिवरायांनी आग्र्याहून सुटका करून घेतली, म्हणून पुढचा इतिहास घडला ना? सावरकरांचा तसाच प्रयत्न होता. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. अंदमानातून त्यांना सोडवण्यासाठी जर्मनीची युद्धनौका एम्डेन अंदमानात दाखल झाली होती. पण ब्रिटिशांनी ती नष्ट केली. रासबिहारी बोस यांनीही डिसेंबर 1915मध्ये नौका पाठवून सावरकरांच्या मुक्ततेचा प्रयत्न केला होता.
 
 
 
हिंदुस्थानच्या भूमीपासून दूर असलेल्या, चहूबाजूंनी समुद्राने वेढलेल्या अंदमानातून मुक्तता करून घेण्यासाठी सावरकरांकडे मार्ग होता तो नैर्बंधिक, कायदेशीर. अंदमानात गेल्यापासूनच सावरकर आपल्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी आवेदनं करत होते. आपल्या मुक्ततेसाठी त्यांनी पहिलं आवेदन केलं ते 1913मध्ये. त्यानंतरही त्यांनी 1914, 1917, 1918, 1920 अशी अंदमानातून पाच आवेदनं केली. ‘माझी जन्मठेप’ या आत्मवृत्तात त्यांनी स्वत:च त्याची माहिती दिली आहे.
 
  
त्या आवेदनात स्वाक्षरी करताना त्यांनी "Your obedient servant' असं लिहिलं म्हणून युवराज बोंबाबोंब करत आहेत. पण मग गांधी-नेहरूंनीही Your obedient servant' असंच लिहिलं आहे. युवराज कुठल्या माध्यमात शिकले? पत्राच्या शेवटी "Your obedient servant' हे लिहिण्याची पद्धत होती, आहे. आपण नाही का मराठीत ‘आपला आज्ञाधारक’, ‘आपला कृपाभिलाषी’ लिहीत! पण त्यावरून कोणी कृपा करावी म्हणून पत्रलेखकाने याचना केली असा अर्थ काढत नाही ना? (याबाबतचे पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे प्रसिद्ध केले आहेत.) युवराजांना सामान्य ज्ञान नाही, हे त्यांनी छउउ म्हणजे काय असे प्रश्न विचारून वेळोवेळी सिद्ध केलं आहेच.
 
 

 
बंदिवान जे आवेदन करतो, त्याला ‘दयेचा अर्ज’ - ‘मर्सी पिटिशन’ असंच म्हटलं जातं. ब्रिटिश दस्तऐवजात या आवेदनांना स्पष्टपणे V D Savarkar's petition for an amnesty for all political offenders (not necessarily including himself) असंच म्हटलं आहे.
 
 
 
आपल्या 1913च्या आवेदनात सावरकरांनी अनेक मागण्या केल्या आहेतच, तसंच ब्रिटिशांवर ते क्रांतिकारकांना अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. माफीपत्रात असे आरोप कोणी करेल का?
ऑक्टोबर 1914च्या आवेदनात ते लिहितात, ‘मी जे लिहिलं आहे, त्याबाबत सरकारच्या मनात शंका असेल तर मला अजिबात मुक्त करू नये. पण इतर सर्वांना मात्र सोडावे.’
  
 
5 ऑगस्ट 1917च्या आवेदनाच्या शेवटी सावरकर लिहितात, ‘जर सरकारला हे सर्व मी माझ्या मुक्ततेसाठी लिहीत आहे असं वाटत असेल किंवा सर्वांच्या सुटकेत माझं नाव असणं हाच मुख्य अडथळा असेल, तर माझं नाव गाळावं. मला माझ्या सुटकेने जितकं समाधान मिळेल, तितकंच समाधान मला इतरांच्या सुटकेने मिळेल. या राजबंद्यांबरोबरच भूमिगत असलेल्या, स्वत:च्या मातृभूमीपासून दुरावलेल्या क्रांतिकारकांनाही परत येण्याची संधी मिळावी.’
 
 
14 नोव्हेंबर 1913चं आवेदन देताना सावरकरांनी ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली होती. हे आवेदन सरकारकडे पाठवताना आपल्या 23 नोव्हेंबर 1913च्या अहवालात ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक लिहितात, ‘... सावरकरांचे आवेदन हे दयेचे असले तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. खेद, खंत नाही ती माफी कशी असेल?
 
 
 ....सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही भारतीय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्त्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय अराजकवादी त्यांना सोडवण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अमलातही आणतील. त्यांना जर सेल्युलर जेलबाहेर, अंदमानात धाडले तर त्यांची सुटका निश्चित आहे... ते बाह्य समाजाला धोकादायक असल्याने उर्वरित काळात त्यांना तुरुंगातच बंदिवास भोगावा लागेल.’
  
 
1920मध्ये अंदमानातल्या शेकडो बंदिवानांना राजक्षमा मिळाली. ती सावरकर बंधूंना मात्र मिळाली नाही. त्यानंतर आपला धाकटा भाऊ नारायणराव सावरकर यांना पाठवलेल्या पत्रात सावरकर लिहितात, ‘जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हांला या कोठडीत खितपत पडावे लागते आहे, तरी आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणार्‍या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हांला वाटतात; आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, आवेदन यांच्या द्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली, तिचे आम्हांला फळ मिळाल्याचे समाधान वाटते.’
 
 
vivek
 
 
सावरकर बंधूंना अंदमानातून मुक्त केलं 1921मध्ये. त्यांना मुक्त केलं तो त्यांनी केलेल्या आवेदनांचा परिणाम नव्हता, तर सावरकर बंधूंना सोडावं यासाठी जनमताचा रेटा वाढत होता.
 
 
ब्रिटिशांसाठी सावरकर किती धोकादायक बंदिवान होते, याची ब्रिटिशांना, आपल्या शत्रूला जाणीव होती. पण ‘महान’ युवराजांना आणि तथाकथित बुद्धिवाद्यांना ती जाण नाही.
 
 
सावरकरांवर युवराज आणखी एक आरोप वारंवार करतात तो म्हणजे सावरकर पेन्शन घेत होते. मुळात ते पेन्शन नाही, तो निर्वाह भत्ता आहे. स्थानबद्धतेतल्या बंदिवानाला त्याच्या चरितार्थासाठी भत्ता देणं ही शासनाची जबाबदारी असते.
ब्रिटिश सरकारने 1928पासून स्थानबद्धतेत असलेल्यांसाठी निर्वाह भत्ता मंजूर केला होता. तसंच बंगालमधल्या बंदिवानांच्या कुटुंबीयांना वीस ते चाळीस रुपये वेगळे दिले जात असत.
 
  
सावरकरांना 1910मध्ये अटक झाली, तेव्हाच त्यांचं घरदार, संपत्ती जप्त करण्यात आली होती. 1924मध्ये रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना त्यांनी चरितार्थासाठी मला वकिली किंवा काही काम करू द्यावं अशी मागणी केली. पण ती मान्य झाली नाही. तेव्हा सावरकरांनी निर्वाह भत्त्याची मागणी केली.
 
  
1 ऑगस्ट 1929पासून सावरकरांना महिना 60 रुपये भत्ता मिळू लागला. जेव्हा इतरांना कपडे इत्यादीसाठी दिली जाणारी वार्षिक रक्कम मिळून दरमहा सुमारे 150 रुपये निर्वाह भत्ता दिला जात होता. गांधीजी आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्धतेत होते, त्यांचा खर्च शासनच करत होतं, तरीसुद्धा त्यांना 550 रुपये भत्ता मंजूर झाला होता. गांधींच्या सुरक्षा रक्षकालासुद्धा 100 रुपये दिले जात होते, असं असताना आरडाओरडा होतो आहे तो सावरकरांना दिल्या जाणार्‍या 60 रुपये भत्त्याचा, जो त्यांना केवळ 1929पासून ते 1937मध्ये त्यांची पूर्णपणे मुक्तता होईपर्यंतच दिला गेला.
 
 
vivek
 
 
‘भारत जोडो यात्रा’ या नावातच केवळ ‘जोडो’ आहे. बाकी काम चालू आहे ते भारत तोडण्याचंच. सावरकरांवर बेछूट आरोप करून युवराजांनी सावरकरप्रेमींना अनेकदा दुखावलं आहे. भारत जोडो यात्रेत सावरकरांवर आरोप करण्याचं काहीही कारण नव्हतं. त्या आरोपांमुळे त्यांनी महाराष्ट्राला दुखावलं आहे, महाराष्ट्राला तोडलं आहे हे निश्चित. त्यांनी प्राधान्य द्यायला हवं होतं त्या त्या भागातल्या प्रश्नांना. धारेवर धरायला हवं होतं शासनाला. पण त्यांनी अधिक महत्त्व दिलं सावरकरांवर आरोप करण्याला. ‘गळाभेटी’ घेऊन तुम्ही माध्यमांचं लक्ष वेधून घेऊ शकता, क्षणिक प्रसिद्धी मिळवू शकता. पण युवराज, तुमच्या सततच्या ‘विद्वत्तापूर्ण’ वक्तव्यांमुळे तुम्ही जनतेच्या मनातून उतरत आहात हे निश्चित. काँग्रेसची सद्य:स्थिती पाहता तिला संपवण्यासाठी कोणालाच विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ते काम युवराजांनीच हाती घेतलं आहे.