@राजस वैशंपायन
क्रौर्य, थंड डोक्याने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याची पद्धत, हिंसेचे चित्रण आदी गोष्टी रंजक नक्कीच आहेत. न्याय, एथिक्स, जीवनमूल्ये या पाश्चात्त्य तात्त्विक रचनेला सुरुंग लावण्याचे काम डेक्स्टर या सीरिजमधून मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. मनोरंजन माध्यमातील अशा क्रौर्याचा प्रेक्षकांच्या मनावर होणार्या परिणामांविषयी अभिनवगुप्त या दार्शनिकाने आपल्या ग्रंथात विश्लेषण केले आहे. क्रौर्याचे किंवा हिंसेचे आकर्षण हा प्रत्येक माणसाचा - अगदी ‘सहृदय रसिकाचाही’ स्थायिभाव आहे. त्याला नाकारून परिपूर्ण सौंदर्याचा अनुभव रसिकाला देता येणार नाही, असे ठाम मत अभिनवगुप्त मांडतो.
“आपल्या पाशवी कृत्यामागे, गुन्हा करण्याची कल्पना आणि तो लपवण्याची पद्धत यांची माहिती डेक्स्टरसारख्या मालिकांमधून मिळाली” असे आफताब म्हणतो, याचा अर्थ नक्की काय? अशा ‘सीरिज’ आणि त्यामध्ये दाखवली जाणारी रक्तरंजित हिंसा यांचा थोडा खोलात जाऊन विचार करू या.
काही दशकांपूर्वीपर्यंत मनोरंजनाची माध्यमे - उदाहरणार्थ नाटक, टीव्ही, सिनेमा, सीरियल अशा साधनांतून होणारे मनोरंजन याविषयी मनोविश्लेषक एका सिद्धान्ताची मांडणी करत असत. त्यानुसार ही मनोरंजनाची साधने आणि त्यातून मिळणारे मनोरंजन एक प्रकारे कॅथार्सिसचे काम करतात, असे म्हटले गेले होते. मानवी मनातील भावभावना, साचून राहिलेला राग, क्षोभ, इच्छा, भय इत्यादींचा निचरा होण्यासाठी ही साधने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अभ्यासकांचे म्हणणे होते.
पुढे ज्या गतीने मनोरंजनाचे स्वरूप आणि त्यातील कंटेंटचे रूप बदलत गेले, त्यावरून अभ्यासकांच्या लक्षात आले की काळाप्रमाणे लोकांची मागणी, मनोरंजनाच्या साधनाकडून अपेक्षाही बदलत आहे. तेव्हा जुन्या सिद्धान्ताचा नव्याने विचार केला गेला. मनोरंजनाचे साधन वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाचेच एक साधन असते असा प्राचीन समज पुन्हा वर आला. ठरावीक वयापर्यंत मनोरंजनातून आणि समोर दिसणार्या प्रौढांच्या वर्तणुकीतून आपण सतत शिकत असतो. आपल्या कॉन्शस व सबकॉन्शस मनावर हे संस्कार आपोआप होत असतात. हे झाले व्यक्तिमत्त्व घडण.
पण ठरावीक वयानंतरही आणि प्रौढांमध्येही पडद्यावर दिसणारी हिंसा, बीभत्स आणि भयावह गोष्टींचे इतके आकर्षण का असते? याचे कोडे सुटत नव्हते. त्याचे उत्तर मिळवण्यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले गेले. उदाहरणार्थ, एकच चित्रपट दोन वेगवेगळ्या गटांना त्यातील हिंसक कंटेंट एडिट करून आणि एडिट न करता दाखवला गेला. दोन्ही गटांच्या चित्रपट पाहतानाच्या आणि पाहून झाल्यावरच्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. त्यातून मानवी मनाच्या अतिशय वेगळ्या गुणधर्माचे दर्शन झाले. मजा दोन्ही गटांना आली. भावनांचे उद्दीपन दोन्ही गटांच्या बाबतीत दिसून आले. पण ज्यांनी एडिट केलेला चित्रपट पाहिला, त्यांनी प्रतिक्रिया दिली की त्यांना भावनांच्या बाबतीत एक परिपूर्ण अनुभव मिळाला. चित्रपटाची कथा आणि त्याची मांडणी, कथेचा शेवट यातून त्यांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळाले. तर दुसर्या गटाने सांगितले की हिंसा आणि भय यांच्या भावनिक व मानसिक अनुभवातून एक प्रकारच्या प्राणिज समाधानाची अनुभूती त्यांना मिळाली. त्या खलनायकाबरोबर असेच क्रूर काहीतरी व्हायला हवे होते, त्याला अशीच शिक्षा व्हायला हवी होती, अशा प्रकारचे हे समाधान होते.
या भावनेचा संबंध माणसाच्या अतिप्राचीन पूर्वजाच्या मनापर्यंत जातो. समूहजीवन ठरावीक नियमांनी बांधले गेल्यावर, निसर्गातील जीवनाचे ठरावीक नियम असल्यावर वेगळी वर्तणूक किंवा विचार समूहाच्या अस्तित्वाला धोकादायक असतो, हे अनुभवाने आलेले आणि अंत:प्रेरणेने सज्ज झालेले ज्ञान क्रूर किंवा हिंसक शिक्षेच्या मागे उभे राहते. शिक्षेतील क्रौर्य जितके पाशवी असेल, तितकाच वचक अधिक असे समीकरण निर्माण होते. अंत:प्रेरणेतून निर्माण झालेल्या क्षोभरूपी भावनेचे हिंसा पाहून उद्दीपन होते आणि त्यातून प्राणिज स्वरूपाचे मानसिक समाधान मिळते. समाजातील अधिकांश लोकांना हे समाधान प्रिय असते, तिकडे आपला नैसर्गिक ओढा असतो. कारण भावनांच्या बाबतीत आपण अंत:प्रेरणेच्या अधिक जवळ असतो. मन तिकडे पटकन आकृष्ट होते.
यात आणखी एक गोष्ट लक्षात आली. असे हिंसक आणि रक्तरंजित चित्रपट ज्यांना मनापासून आवडतात, त्यांच्या मनातील सहानुभूती, दुसर्याला समजून घेण्याची क्षमता, जिव्हाळा अशा गुणांचा हळूहळू र्हास होऊ लागतो आणि मुळातच ज्या व्यक्तींच्या मनात या भावनांची कमतरता आहे, ते फक्त आकृष्ट होऊन थांबत नाहीत, तर तशी हिंसा करायची मानसिक तयारी करू लागतात.
हे झाले मनोविश्लेषण. हिंसेचा तात्त्विक विचार केल्यास एरिक फ्रॉम या पाश्चात्त्य तत्त्वज्ञाने प्रत्यक्ष दिसणार्या हिंसेची तीन स्तरांत विभागणी केली आहे. यातील पहिला स्तर म्हणजे जी हिंसा आपल्याला दिसते, जी व्यक्ती किंवा समूह म्हणून आपल्या वाट्याला येते. उदाहरणार्थ, खून, दहशतवादी हल्ला, हत्या इत्यादी. ही वरवर दिसणारी आणि प्रत्यक्ष अनुभवाला येणारी हिंसा आहे. त्याखाली असलेला दुसरा स्तर हा वस्तुनिष्ठ परिस्थिती, व्यवस्था किंवा संस्थात्मक रचना, परंपरारूपी धार्मिक किंवा सामाजिक प्रेरणा, माध्यमांची मांडणी, प्रसाराची साधने यांचा असतो. दिसणार्या हिंसेची पद्धती व प्रकार हे यातून ठरत असतात. हा स्तर आपल्याला दिसत नाही, किंवा स्पष्टपणे अनुभवास येत नाही. आणि याखाली असलेला तिसरा स्तर हा मूलभूत विचारप्रणालीचा, धर्म किंवा समाजविचाराचा असतो. जीवनाची मूलभूत तत्त्वे, आदर्श, सांस्कृतिक पाया यांचा हा अतिशय गहन आणि ऐतिहासिक स्तर असतो. साधारणपणे हिंसेला प्रतिक्रिया फक्त पहिल्या अतिशय वरच्या स्तरावरच समाजाकडून आणि संस्कृतीकडून नोंदवली जाते. त्या-त्या हिंसेच्या खाली असणार्या दुसर्या आणि तिसर्या स्तरांचा विचार गंभीरपणे केला जात नाही.
अमेरिकेतील एका ठिकाणच्या तपासयंत्रणेत काम करणारा त्यांचा ’डॉ. साळुंखे’ म्हणजे ‘डेक्स्टर’. लहानपणीच हिंसक घटनेला तोंड द्यावे लागल्याने काहीसा अंतर्मुख झालेला डेक्स्टर, एका पोलिस अधिकार्याच्याच घरात लहानाचा मोठा होतो. फॉरेन्सिक एक्स्पर्ट होतो. इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे जे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून वाचतात, अशांना पकडून तो आपल्या फॉरेन्सिक स्टाइलमध्ये शिक्षा देण्याचे काम सुरू करतो. सीरिजमध्ये पुढे पुढे त्याच्या हातून काही निष्पाप नागरिक, अगदी शेवटी स्वत:ची बहीणदेखील फॉरेन्सिक स्टाइलमध्ये मारली जाते. अशी ही प्रेरक कथा. त्यातील क्रौर्य, थंड डोक्याने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याची पद्धत, हिंसेचे चित्रण आदी गोष्टी रंजक नक्कीच आहेत. न्याय, एथिक्स, जीवनमूल्ये या पाश्चात्त्य तात्त्विक रचनेला सुरुंग लावण्याचे काम डेक्स्टर या सीरिजमधून मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. त्यावर तिकडे ‘क्रिटिकल’ टीकाही झाली आहे. फ्रॉमच्या मांडणीनुसार हा झाला हिंसेचा दुसरा स्तर. आता त्यामागे कोणती विचारप्रणाली आहे, कोणते विघातक ‘निहायलिस्ट’ तत्त्वज्ञान काम करत आहे याची छाननी हा लेखापेक्षा वेगळा विषय होईल.
पण दुसर्या स्तरावर, हिंसक मनोरंजन आणि त्यावर श्रीमंत होणारी प्रसारमाध्यमे या स्तरावर आपण आपल्या दार्शनिक आणि सांस्कृतिक परिघातून हस्तक्षेप करू शकतो का? याचे उत्तर ‘अभिनवगुप्त’ या 10व्या शतकातील काश्मिरी तत्त्वज्ञाच्या ‘अभिनवभारति’ आणि ‘लोचन’ या ग्रंथांत मिळते.
क्रौर्याचे किंवा हिंसेचे आकर्षण हा प्रत्येक माणसाचा - अगदी ‘सहृदय रसिकाचाही’ स्थायिभाव आहे. त्याला नाकारून परिपूर्ण सौंदर्याचा अनुभव रसिकाला देता येणार नाही, असे ठाम मत अभिनवगुप्त मांडतो. भावभावनांचा या उद्दीपनातून रसिकाला पुढे कुठे न्यायचे, याचे खास तत्त्वज्ञान म्हणजे अभिनवगुप्ताचे सौंदर्यशास्त्र. ‘नवरस’ म्हणजे शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत. यातील प्रत्येक रस मनोरंजनाच्या दृष्टीने रसिकाला परिपूर्ण अनुभव देऊ शकतो.
बीभत्स रसाने ओतप्रोत भरलेली कलाकृती किंवा सादरीकरण पाहूनदेखील रसिक त्या रसाविष्काराशी एकरूप होऊ शकतो. त्याच्या अंत:प्रेरणेतून बीभत्सता उद्दीपित होऊन त्याच्या संपूर्ण मनावर कब्जा घेऊ शकते. असे होत असेल तर निश्चितच ते त्या कलाकृतीचे यश आहे. पण हे यश अर्धवट आहे.
अभिनवगुप्त
अभिनवगुप्त मानतो की फक्त उद्दीपित करून रसिकाला सोडून देणे म्हणजे वादळात बिनशिडाची नाव सोडून देण्यासारखे आहे. रसास्वादाच्या माध्यमातून, एखाद्या भावाला चरम उत्कर्षापर्यंत नेऊन तिथून पुढे त्या रसिकाला अंतर्मुख करणे आणि शुद्ध रसास्वादातून रसिकाला मनातील स्थिर, चिरंतन अशा चैतन्यमय पण शुद्ध शांत तत्त्वाचे दर्शन घडवणे, हे कलाकृतीचे खरे यश. हे अध्यात्म नाही. हे मानवी मनाच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावणे आहे.
जसा बीभत्स हा मनाचा स्थायिभाव आहे, तसाच शांत हादेखील मनाचा स्थायिभाव आहे. आणि कलाकृतीमध्ये हा स्थायी ‘शांत’ भाव एखाद्या माळेतील सूत्राप्रमाणे अंत:स्थ असावा, असे अभिनवगुप्त सांगतो. बीभत्स रसाने चरम उत्कर्ष गाठला की पुढे लगेच अंत:स्थ शांत रसाने रसिकांचा हात धरून त्यांना जाणिवेच्या सत्त्वयुक्त पुढल्या पायरीवर न्यायचे काम करायचे असते. अभिनवगुप्त हेही म्हणतो की सादरीकरणात किंवा कलाकृतीमध्ये रसाची निर्मिती करणे म्हणजे रसिकाची अंतर्मुख होण्याची शक्ती त्याच्यापासून काढून घेण्यासारखे आहे. रसाचे फक्त सूचन करायचे असते, कायम भडकपणा दाखवून रसिकांची कल्पनाशक्ती मारायची नसते. पुढे तर अभिनवगुप्त रसास्वाद ते ब्रह्मास्वाद असा सौंदर्यशास्त्राचा पुढचाही प्रखर सिद्धान्त मांडतो. ‘डेक्स्टर’चा लेखक आणि दिग्दर्शक जर अभिनवगुप्त असता तर.. याची रसिक म्हणून आपण कल्पना करू या.