2004चे प्रतापगडावरील आंदोलन

विवेक मराठी    25-Nov-2022
Total Views |
श्रीकांत पोतनीस । 9822615118
काही दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. हिंदू संरक्षक शासनाच्या कार्यतत्परतेची प्रचिती देणारे हे पाऊल होते. या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबर 2004 रोजी याच मागणीसाठी करण्यात आलेले ऐतिहासिक आंदोलन आणि तत्कालीन शासन-प्रशासनाची विरोधी भूमिका याचे अनुभवकथन करणारा लेख.

shivaji maharaj
 
ज्याने हिंदुस्थानात घुसखोरी करून सहिष्णू हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केला, ज्याने इथल्या माता-भगिनींवर बलात्कार केले, जगज्जननी तुळजाभवानीचे मंदिर उद्ध्वस्त केले, छत्रपतींनी ज्या अफझल्याचा कोथळा काढून त्याचे शिर कापून छत्रपती जिजाऊ महाराजांच्या चरणी ठेवले, त्या अफझल्याच्या कबरीचे उदात्तीकरण करून त्याला देवत्व बहाल करण्याचा घाट घालून काही स्थानिकांनी ‘अफझल बाबा उरूस’ सुरू केला. त्याला मुंबईतील अंडरवर्ल्डने पैसा पुरविला. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी त्या ठिकाणी काही काळ लपून राहिले. सत्तेत असलेले तत्कालीन पक्ष मतांच्या लाचारीने त्याच अनधिकृत बांधकामाचे रक्षण करत होते.
 
 
 
सुरुवातीला वाईतून विजयाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली याविरुद्ध आंदोलन छेडले. शिवप्रतापगड उत्सव समिती स्थापन करून अफझल खानाच्या नावे होणारा उरूस बंद पाडला. सरकारला आवाहन केले - थडग्यावरील अनधिकृत बांधकाम हटवा. पण सरकार काही बधेना. उत्सव समितीचे आंदोलन हळूहळू तीव्र होत गेले. बघता बघता सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत हे आंदोलन पसरले. आंदोलनकर्ते आंदोलन करीत होते आणि तत्कालीन सरकारचे दमनचक्र चालू होते.
फेब्रुवारी 2004मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या बैठकीत विहिंपचे त्या वेळचे क्षेत्रीय मंत्री (भौगोलिक महाराष्ट्र आणि गोवा) व्यंकटेश आबदेव यांनी “विहिंप प्रतापगड आंदोलनात सहभागी होणार” अशी घोषणा केली. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला अल्टिमेटम दिला की अनधिकृतरित्या बांधलेले बांधकाम सरकारने दि. 11 सप्टेंबरपर्यंत काढून घ्यावे, नाहीतर 12 सप्टेंबर 2004 रोजी हजारो बजरंगी सर्जिकल स्ट्राइक करून सदर बांधकाम नेस्तनाबूत करतील.
 
 
 
सुरुवातीला सरकारने आणि प्रशासनाने याला फारसे महत्त्व दिले नाही. पण जशाजशा निरनिराळ्या संघटना या आंदोलनात सहभागी होऊ लागल्या, तसे सरकारदरबारात खळबळ माजू लागली. पश्चिम महाराष्ट्राबरोबर कोकण आणि गोवा, देवगिरी प्रांत, विदर्भ येथे यासाठीच्या बैठकी चालू झाल्या. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
 
 
 
सातार्‍यात त्या वेळी सुबराव पाटील हे जिल्हाधिकारी आणि चंद्रकांत कुंभार हे जिल्हा पोलीस अधीक्षक होते. सातारा पोलीस सजग होताच त्यांनी सर्वप्रथम त्या वेळचे विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख (मंत्री) असलेले सातारास्थित बाबूजी नाटेकर यांच्याशी संपर्क केला. त्यांना भेटून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विहिंपने आंदोलन स्थगित करण्याविषयी विनंती केली. तेव्हा बाबूजी त्यांना विहिंपची भूमिका सांगताना म्हणाले, “विहिंप नेहमीच प्रशासनाला मदत करत असते, तशी मदत आजही करण्यास तयार आहे. पण जर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम काढले नाही, तर विहिंप ते पाडून टाकणार.” आता प्रश्न असा की अनधिकृत बांधकाम पाडणार कोण? विहिंप की पोलीस?
 
 
shivaji maharaj
 
त्यातून सातारा जिल्हा प्रशासनाने याविषयी बैठकी चालू ठेवल्या. सतत दडपण वाढवत राहिले. 12 तारीख जशी जवळ येऊ लागली, तसे तसे जिल्ह्यात आणीबाणीसदृश वातावरण तयार झाले. म्हणता म्हणता जुलै महिना संपला. इकडे विहिंप पदाधिकार्‍यांनी जोरदार प्रवास करून लोकजागृती करून जास्तीत जास्त संख्या आंदोलनात सहभागी व्हावी यासाठी विहिंप पदाधिकार्‍यांचे प्रयत्न चालू होते. पोलीस प्रशासन आपल्या परीने कमीत कमी लोक कसे जमतील, यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत होते.
 
 
vivek
 
1 सप्टेंबरपासून व्यवस्थेतील कार्यकर्ते हळूहळू सातारा, वाई, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर येथे वेगवेगळ्या ठिकाणी येऊन राहू लागले. मुंबईमधून डॉ. दीपक गायकवाड 2000-2200 कार्यकर्त्यांसह महाड, पोलादपूर या भागात येऊन राहिले.
जिवा महाला गट
 
 
मी आणि बंडाभाऊ उर्फ संभाजी साळुंखे यांच्यावर जिवा महाला गट स्थापून, अफझल खानाचे उदात्तीकरण करणारे बांधकाम गनिमी काव्याने पाडण्याची जबाबदारी विहिंपच्या ज्येष्ठांनी सोपविली होती. त्यासाठी आम्ही कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि सातारा जिल्ह्यांतील बजरंगी, शिवभक्त तरुण, सर्व हिंदुत्ववादी पक्ष व संघटना यांमधून 100-125 तरुण एकत्र केले. त्यांना घेऊन महाबळेश्वर येथे एका अज्ञात स्थळी मुक्काम केला. विहिंप मुंबईचा एक कार्यकर्ता, जो पूर्वी महाबळेश्वरला संघ प्रचारक म्हणून काही काळ राहिला होता, त्याला आम्हाला जोडून दिले होते. त्याला महाबळेश्वरची इत्थंभूत माहिती आणि तेथील घराघरात ओळख. तो आला त्याच सायंकाळी आम्ही काही कार्यकर्ते, समविचारी पक्षाचा तेथील तालुका प्रमुख असे 8-10 जण जंगलातून खानाच्या थडग्याच्या हाकेच्या अंतरावर जाऊन पोहोचलो. तेथून पळत जाऊन अवघ्या काही वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो असतो.
 
 
 
त्यानंतर गटागटाने 3 वेळा जंगलातून तेथवर पोहोचायचा त्या 3-4 दिवसांत सराव केला. तोपर्यंत तिथे जंगलाच्या बाजूने पोलीस बंदोबस्त लावला नव्हता. जो काही बंदोबस्त होता, तो वाडा या गावापासून जिथे आपण प्रतापगडाकडे वळतो, तेथून पुढे होता. स्थानिक लोकांना आडमार्गाने पोहोचायचे रस्ते पाठ होते, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी तेथवर पोहोचत असू. आमची तयारी पूर्ण झाली. तारीख जशी जवळ येत होती, तसतसे मुलांच्या उत्साहात भर पडत होती. आम्ही प्रत्येकाचे मोबाइल जमा करून ठेवले होते. कारण उत्साहात ही सगळी गोपनीय तयारी पोलिसांना कळायला वेळ लागला नसता.
 
 
 
इकडे सातारा, वाईमध्ये प्रशासन जोरदार कार्यान्वित झाले होते. परिवारातील सर्व स्वयंसेवकांना नोटिस बजावण्यात आली होती. काहींना स्थानबद्ध करायची तयारी झाली होती. कुठल्याही परिस्थितीत बाहेरील लोक तिथे येऊ नयेत म्हणून नाकाबंदी करण्यात आली होती. सकाळ-संध्याकाळ बाबूजी नाटेकर, विजयाताई भोसले यांना बैठकीसाठी बोलावले जात होते.
 

shivaji maharaj 
 
 
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक रूपात अशीच एक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत बाबूजी, विजयाताई यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांचे पदाधिकारी बोलावले होते. त्या वेळी प्रशासनाने आक्रमक होत आंदोलन स्थगित करण्याविषयी दडपण आणले. काही संघटनांनीदेखील प्रशासनाची बाजू घेत विहिंप भाजपासाठी आंदोलनाचे नाटक करत असल्याच्या वल्गना केल्या.
 
 
25 November, 2022 | 12:20
 
बाबूजी नाटेकर यांना कॉर्नर करण्यात येऊन सर्व बाजूंनी त्यांच्यावर दडपण आणण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाकडे एकांगीपणे निर्णय घेत इतर संघटना त्या बैठकीमधून निघून गेल्या. नंतर तेच पदाधिकारी सातारा विश्रामगृहात शासकीय पार्टी झोडताना दिसून आले.
 
 
 
बाबूजी एकटे पडले. ते सारखे सांगत होते, “एकटा मी आंदोलन स्थगितीचा निर्णय घेऊ शकत नाही. मुंबई येथील कार्यालयातून याबाबत निर्णय होईल.” पण जिल्हाधिकारीसाहेब ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी बळेबळेच पत्रकार परिषदेत बाबूजींकरवी आंदोलन स्थगित झाल्याचे घोषित केले आणि खानाचे उदात्तीकरण करणारे बांधकाम पुढील काही दिवसांत हटविले जाईल, असे लेखी दिले.
 
 
shivaji maharaj
 
शिवप्रतापगड उत्सव समिती स्थापन करणार्‍या विजयाताई भोसले

shivaji maharaj 
 
आंदोलन स्थगितीची बातमी माध्यमांतून प्रसारित झाली आणि आपण आनंदोत्सव साजरा करावा असे बाबूजींनी जाहीर केले, कारण प्रशासनाने खानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम हटवायचे आश्वासन लेखी दिले होते. त्या रात्री प्रा. आबदेव सरांचा फोन आला, “श्रीकांतराव, आपण जिंकलो. सरकारने आपले म्हणणे मान्य केलेय. अनधिकृत बांधकाम पाडून कबर पूर्वीच्या स्थितीत करण्याचे लेखी लिहून दिले आहे.”
 
 
आम्ही सर्व आनंदोत्सव साजरा करत जिवा महाला गट महाबळेश्वरमधून वाईत आणला. महाबळेश्वर सोडताना मात्र बांधकामावर हातोडा घालायची संधी गमावल्याचे दु:ख होत होते. तरीही जड अंत:करणाने आम्ही महाबळेश्वर सोडून वाईत दाखल झालो. आनंदोत्सव साजरा करायचा होता ना..
 
 
प्रशासनाच्या मनात काहीतरी वेगळेच असल्याचे कोणाला सांगूनसुद्धा पटले नसते. पण त्यांच्याकडून आलेल्या आदेशातून त्याची प्रचिती आली. प्रशासनाने आमच्यावर वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या गावांत प्रवेशाचा बंदी हुकूम जारी केला होता. त्या आदेशात त्यांनी आनंदोत्सव पाचवड येथे करा असे फर्मान काढले. प्रशासनाच्या मनातली खोट इथेच दिसून आली. इकडे तर लेखी आश्वासन दिले आणि वाईमध्ये प्रवेशास बंदीही घातली. शेवटी पाचवड येथे जमायचे, असा निरोप सर्व प्रांतांतून पाठविला.
प्रत्यक्ष 12 सप्टेंबर 2004च्या दिवशी सकाळपासून एक एक गाड्या भरून येऊ लागल्या. बघता बघता सर्व्हिस रस्ता भरून गेला. पाचवडमधील टिंबर मार्केटमध्ये तारळे, ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथील आमच्या वसतिगृहाचे व्यवस्थापक विसापुरे गुरुजी (मूळचे पाचवडचे) यांचे घर होते तिथे. तिथे विहिंपचे सारे अधिकारी लोक उतरले होते. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सोलापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरीबरोबरच मराठवाड्यातून, मुंबईतून पाचवड येथे बघता बघता हजारो विहिंप कार्यकर्ते जमा झाले. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न - सरकारने जर अनधिकृत बांधकाम पाडायचे लेखी लिहून दिलेय, तर मग पाचवडमध्ये रोखण्याची अडवणूक का? का आम्हाला आमच्या प्रतापगडावर जाण्यापासून रोखते सरकार? प्रशासनाच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत तर नाही ना?
 
 
25 November, 2022 | 12:20

 
पाचवड ते वाई रस्त्यावर स्टेज उभारले होते. कार्यक्रम चालू झाला, पण विजयोत्सव वगैरे विषय कुठेच नव्हते. प्रतापगडावर जाण्यासाठी रोखल्याचा राग आणि होत असणारी फसवणूक असा सगळा रागरंग होता. मंचावरील पदाधिकारी तसेच समोर हजारोंच्या संख्येत उपस्थित शिवबाचे मावळे. हे करू नका, ते करू नका अशा पोलिसांच्या सूचना सारख्या चालू होत्या. मंचावरील वक्त्यांनाही जेव्हा पोलीस वारंवार सूचना देऊ लागले, तेव्हा सारा जनसमुदाय भडकला. जोरजोरात घोषणा देऊ लागला. पोलीस वारंवार कार्यकर्त्यांना डिवचत होते. कार्यकर्ते भडकत गेले.
 
 
 
तेवढ्यात विजयाताईंनी आणि मिलिंद एकबोटेंनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अडविला. पोलीस यंत्रणा शांतपणे महामार्ग अडविताना पाहत उभी होती. त्यांच्या इच्छेनुसार सर्व चालू होते. त्यातून मीडिया मध्ये मध्ये घुसून छायाचित्रण करत होती. कॅमेरा दिसला की कार्यकर्ते जोरात घोषणा द्यायचे. या घोषणांची संधी साधून बाजूला उभ्या असलेल्या काही पोलिसांनीच दगडफेक केली. पाच-पंचवीस छोटे छोटे दगड पोलिसांनी फेकलेले मी स्वत: आणि बंडा साळुंखे यांनी पाहिले आहेत. आम्ही पोलिसांच्या मध्येच उभे होतो, त्यामुळे आम्हाला या सार्‍या गोष्टी प्रत्यक्षात पाहता आल्या. आमच्या दोघांच्या तब्येतीकडे बघून पोलीस अम्हाला सध्या वेशातील पोलीस अधिकारी समजत होते. पोलिसांनी दगडफेक करताच मेगाफोनवरून लाठीचार्जची ऑर्डर देण्यात आली. पाहतो तो काय.. एका मोठ्या अधिकार्‍याने मा. आबदेव यांच्या डोक्यात सगळ्यात पहिली लाठी मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तोंडातून अर्वाच्य शिव्या देत त्यांनी आबदेव सरांना अटक केली. चोहोबाजूंनी एकदम गोंधळ माजला. मी आणि बंडा साळुंखे शक्य तितक्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडवून पळून जाण्यास सांगत होतो. विजयाताईंना तेथील एका घरात बसवून त्यांच्या रक्षणासाठी एका पोलिसाला विनंती केली. तो बिचारा आम्हाला अधिकारी समजून शेवटपर्यंत विजयाताईंची राखण करत उभा होता. इतर सार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांना आणि 200-300 कार्यकर्त्यांनाही अटक केली होती. सार्‍यांना भुईंज पोलीस स्थानकात आणण्यात आले. अटकसत्र चालू असताना आणखी एक धक्कादायक गोष्ट आम्ही पाहिली - कार्यकर्ते ज्या गाड्यांतून आले होते, ती सारी वाहने सर्व्हिस रस्त्यावर आणि त्याच्या बाजूच्या शेतात सुरुवातीला पोलिसांनीच पार्क करायला लावली होती, ती सारी वाहने पोलिसांनी लाठ्यांनी फोडली. जवळजवळ शे-दीडशे गाड्या पोलिसांनी फोडलेल्या सगळ्यांनी बघितल्या आणि त्या फोडलेल्या गाड्यांचे चित्र मीडियामध्ये प्रसारित करून कार्यकर्त्यांनीच धुडगूस घालून सदर महामार्गावर ये-जा करणार्‍या गाड्या फोडल्याचे खोटेच सांगितले.
 
 
vivek
 
प्रामुख्याने प्रा. व्यंकटेश आबदेव, बाबूजी नाटेकर, मिलिंद एकबोटे, नंदू एकबोटे, कल्याणी पंडित आणि सुधीर जोशी वंदुरकर या सहा जणांना प्रमुख आरोपी करून प्रशासनाने पद्धतशीरपणे रा.स्व. संघाला दोषी ठरवायचे कुभांड रचले. संघाने समाजात तेढ निर्माण केली, लोकांची माथी भडकविली, हिंदू-मुसलमानांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी हे आंदोलन केले, भाजपाचे इलेक्शन कँपेन राबवीत आहेत असा काहीसा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार प्रशासनाने केला. या हिंदुस्थानावर आक्रमण करून आलेल्या अतिरेकी अफझल खानाचा कोथळा हिंदुपदपादशाह छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे काढला, त्याचे उदात्तीकरण रोखण्यास जनता रस्त्यावर उतरली, त्यांच्या ध्येयाचा, निष्ठेचा अवमान प्रशासनाने केला.
 
 
 
भुईंज पोलीस स्टेशनमध्ये अटकसत्र चालू होते. पोलीस स्टेशन खूप लहान होते. एवढे सारे लोक तिथे मावत नव्हते. बाहेर बांधकामाच्या खडीचा ढिगारा होता, त्यावर सार्‍या कार्यकर्त्यांना बसविले. कोर्ट पोलीस स्टेशनमध्ये पाचारण करण्यात आले होते. रात्री 1-2 वाजता कधीतरी अटक प्रक्रिया संपली. तोपर्यंत सारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी थंडीत कुडकडत त्या खडीवर बसून होतो. विचार करा, रात्रभर प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्याला सकाळी नाश्ता मिळाला असेल-नसेल, अशा अवस्थेत दुपारी 12 वाजता अटक करून रात्री 2 वाजेपर्यंत बोचर्‍या थंडीत त्या खडीवर बसवून ठेवले होते. पोटात अन्न नाही, प्यायला पाणी दिले तर पिऊ देत नव्हते.
 
 
 
एकूण 292पैकी प्रमुख 6 सोडून इतर 286 कार्यकर्त्यांवर विविध कलमे लावून त्यांना कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. उर्वरित प्रमुख 6 पदाधिकार्‍यांना प्रमुख आरोपी करून सातारा येथील कारागृहात ठेवले.
 
 
 
मी स्वत:, शंकरराव गायकर (तत्कालीन क्षेत्रीय बजरंग दल संयोजक) आणि संभाजी उर्फ बंडा साळुंखे 13 सप्टेंबर रोजी भल्या सकाळी कोल्हापूरचे तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांना सगळी माहिती देऊन कळंबा कारागृहामध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांना घेऊन आम्ही कळंबा कारागृह गाठले. सोबत बिस्किटांचे पुडे, भरपूर प्रमाणात फळफळावळ घेऊन गेलो. स्वत: आमदारसाहेबांनी तुरुंगाधिकार्‍यांकडून परवानगी मिळवत आम्ही तिघे कार्यकर्त्यांना ठेवलेल्या बॅरिकेडमध्ये गेलो. आम्हाला पाहताच सार्‍यांनी जोरदार घोषणा दिल्या, “जय भवानी, जय शिवाजी”, बरोबरच “जय श्रीराम”, “जय कार वीर बजरंगी” अशा सार्‍या घोषणांनी तुरुंग हादरून सोडला. पाठोपाठ कारागृहामधील अन्य कैद्यांनीही अशा सार्‍या घोषणा देऊन आंदोलकांना एक प्रकारे पाठिंबा दर्शविला.
 
 
vivek
 
 
कार्यकर्ते एकदम संवेदनशील होते, आम्ही त्यांना भेटताच फार भावुक झाले. प्रत्येकाने आपापले नाव सांगून घरचे फोन नंबर्स देत घरी फोन करून सुखरूप असल्याचे घरच्यांना सांगायचे निरोप दिले. यांना काही हवे-नको ते पाहून बंडाभाऊ आणि मी तडक सातारा गाठायचो. तिथे मा. मिलिंदजी परांडे, मा. भुजंगराव घुगे, दीपकजी गायकवाड, रा.स्व. संघाचे कोल्हापूर विभाग प्रचारक अनिरुद्ध पंडित आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची जामीन व्यवस्था आणि झालेल्या वाहनांची नुकसानभरपाई यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्यांना भेटून तेथील अथवा वाईतील काही कामे असल्यास ती पूर्ण करीत असू, कारण सातार्‍यातील सर्व कार्यकर्ते एक तर अटकेत किंवा पोलिसांच्या धाकापायी अप्रत्यक्षपणे सक्रिय असलेले. स्थानिक लोकांनी आम्हाला मदत करू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण ताकदीनिशी तेथील कार्यकर्त्यांना दडपून टाकले होते.
 
 
 
सातारा येथील काम संपवून रात्री कोल्हापूरला जाऊन परत सकाळी कारागृहामधील संपर्क, तेथील व्यवस्था झाली की परत सातारा असे आमचे रुटीन झाले होते.
 
 
 
 
कोर्ट तारीख पडली. 300 लोकांना जामीन मिळण्यासाठी प्रत्येकी 3 याप्रमाणे 100 जामीनदार हवेत. कुठून आणणार इतके जामीनदार? पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने कोणीही मदतीला नाही, अशा स्थितीत 100 जामीनदार आणणार तरी कुठून? तरीही जेवढे होतो, तेवढे ठामपणे उभे राहिलो. वेळप्रसंगी कोल्हापूर, पुणे, कराड, येथून जामीनदार आणायचे आणि तारखेला उभे करायचे. त्यातच एका तारखेला मिलिंद एकबोटे आणि जज मॅडम यांच्यात वाद झाला. कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ. गणेश चतुर्थी जवळ येऊ लागली होती. कार्यकर्त्यांमध्येे चलबिचल वाढू लागली होती. पुढील तारखेला जामीन झाला, पण अट होती प्रत्येकी एक जामीनदार हवा. म्हणजे 300 जामीनदार. पोलीस प्रशासनाने तसूभरही कमतरता ठेवली नव्हती अडचणी आणण्यात.
परत जज मॅडमना विनंती केली आणि एक जामीनदार तिघांना जामीन देऊ शकतो अशी कोर्ट ऑर्डर घेऊन सगळ्यांचा जामीन झाला. मध्यंतरीच्या काळात वकीलपत्रावर सही घेण्यासाठी वकिलांना कारागृहामध्ये घेऊन गेलो, त्याच वेळी जामीन अर्जावरही वकिलांनी सही घेऊन ठेवली होती. त्यामुळे जामिनाची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
 
 
25 November, 2022 | 12:21

 
बरोबर रात्री 9 वाजता जामीन प्रक्रिया पूर्ण होऊन सुटकेचा हुकूमनामा ताब्यात घेऊन आम्ही कोल्हापूर गाठले. कळंबा कारागृहामध्ये तो सुटकेचा लखोटा तेथील पत्रपेटीमध्ये टाकला. दुसर्‍या दिवशी - म्हणजे गणेश चतुर्थीला सकाळी 9 वाजल्यापासून सर्वांना सोडण्यात येईल असे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे एक एक करत सायंकाळी 4 वाजता शेवटचा 286वा कार्यकर्ता बाहेर आला. तत्पूर्वी सकाळी विहिंपची प्रांत-क्षेत्र-केंद्रीय स्तरावरील सारी प्रमुख मंडळी कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी कळंबा कारागृहाच्या दाराशी हजर होती. सगळ्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. राधाकृष्ण मंदिर, शाहूपुरी, कोल्हापूर येथे त्यांना आणण्यात आले. स्नान-संध्येपासून तब्बल 9 दिवस दूर असलेल्या त्यांना प्रथम स्नान करून, छान भोजन करून, परतीच्या प्रवासखर्चासाठी पैसे देऊन सुखरूपपणे आपआपल्या घरी रवाना करण्यात आले.
 
 
 
हे सगळे आज आठवले, कारण राजकीय इच्छाशक्तीचा वाईट आणि चांगला उपयोग कसा होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रतापगडचे आंदोलन.
 
 
 
चांगल्या विचारांनी संस्कारित, प्रखर देशभक्त असलेले देवेंद्रजी यांनी शिवभक्ती काय ती दाखवून दिली.
या आंदोलनाचे फलित -
 
 
1. दर वर्षी शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला.
 
 
2. अफझल खान ट्रस्ट बेकायदेशीर ठरविण्यात आला.
 
 
3. तिथे चालणारा अफझल खानाचा उरूस बंद पाडण्यात आला.
 
 
4. समस्त महाराष्ट्राचा राग असलेले उदात्तीकरण सरकारने हटविले.
 
 
 
विशेषत: सातार्‍यातील ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच आंदोलन अत्यंत प्रभावीपणे राबविले. विशेषत: अतुल शालगर, रवी कोठाले, शिरीष दिवाकर, बंडोपंत चव्हाण, अरविंदराव कांबळे यांचे योगदान प्रभावी झाले. बाबूजी नाटेकर यांच्या कुशल आणि संयमी नेतृत्वामुळे आंदोलन यशस्वी झाले.