विश्वचषक फुटबॉल 2022 मैदानाबाहेरचे वाद आणि मैदानावरचा खेळ

विवेक मराठी    25-Nov-2022
Total Views |
@ॠजुता लुकतुके ।9930360412
 
जगातील सहा खंडांमध्ये 170हून जास्त देशांत फुटबॉल खेळला जातो. अफाट लोकप्रियतेमुळे त्याला ‘द ब्युटिफुल गेम’ असं म्हणतात. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला लाखो लोक येतात. कतार देश आतापर्यंतचा स्पर्धेचा सगळ्यात छोटा आयोजक देश आहे. 2010 सालीच कतारला यजमानपद मिळालं. पण या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप, तसंच कतारमधील कडक कायदे आणि अन्य गोष्टी पाहता अनेक देशांनी विरोधही केला होता. मैदानाबाहेरचे काही वादाचे मुद्दे सोडले, तर बाकी वातावरणनिर्मिती, आयोजन अगदी फुटबॉल स्पर्धेला साजेसंच झालं आहे.
 
fifa
 
क्रीडा जगतात पुढचे 29 दिवस फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचाच माहोल असेल. म्हणजे फुटबॉलचा माहोल असेल. तरुणाईच्या भाषेत फुटबॉल फीव्हर! स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला याची चुणूक दिसलीही. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी नवख्या सौदी अरेबिया संघाने मातबर अर्जेंटिना संघाला (लायनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला!) धूळ चारली. तर, शेवटच्या क्षणी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जपानने त्याच्या पुढच्या दिवशी चक्क जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. आणि त्यानंतर गतविजेत्या स्पेन संघाने त्या मानाने अनुभवी अशा कोस्टा रिका संघावर एक नाही, दोन नाही, तर तब्बल सात गोल डागले. असे उलटसुलट निकाल आणि अव्वल संघांनाही विजयाची खात्री नसलेली ही चुरस मग चाहत्यांना हवीहवीशी वाटणारच. जगभरातले अब्जावधी चाहते दर चार वर्षांनी होणारा फुटबॉलचा हा कुंभमेळा अगदी उत्सुकतेने पाहतात, असाच या स्पर्धेचा लौकीक आहे.
 
 
 
मैदानावरील ही चुरस खेळाची रंगत वाढवते. पण खेळ किंवा स्पर्धा मैदानाबाहेर नेली तर ती रंगत बिघडवते. यंदा कतारमध्ये होणार्‍या या स्पर्धेविषयी असंच काहीसं घडलंय. किंबहुना कतारला यजमानपद जाहीर झालं 2010 साली. तेव्हापासून झालेल्या विरोधामुळे रंगत बिघडतच चालली आहे. पण मध्यवर्ती संघटना फिफाने दिलेल्या कणखर पाठिंब्यामुळे स्पर्धा सुरळीत सुरू झालेली आपल्याला दिसते आहे.
 
 
 
कतारच्या पाच शहरांमध्ये आठ स्टेडिअमवर ही स्पर्धा होणार आहे. 1930पासून 21 वेळा ही स्पर्धा पार पडली. पण आशियाई देशाकडे यजमानपद फक्त दुसर्‍यांदा आलंय. यापूर्वी फक्त जपान आणि दक्षिण कोरिया यांनी 2002 साली एकदा संयुक्त यजमानपद भूषवलं होतं. एरवी उत्तर अमेरिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका या खंडांतच स्पर्धेचं आयोजन फिरत आलंय. त्यामुळे फुटबॉलची मध्यवर्ती संघटना फिफावर आशिया आणि आफ्रिका खंडात स्पर्धेची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने दबाव होता आणि त्यानुसार आधी जपान, दक्षिण कोरियाला आयोजनाची संधी मिळाली, तर पुढे 2010मध्ये आफ्रिकन देश दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेचं आयोजन यशस्वी करून दाखवलं.
 
 
 
आताही कतार या मध्य-पूर्व आशियातील एका देशाला यजमानपद देताना फिफाने अशीच भूमिका मांडली होती. शिवाय कतारमध्ये आणि एकूणच आशियात तुलनेने कमी लोकप्रिय असलेला फुटबॉल हा खेळ इथे रुजावा, असाही त्यामागचा होरा होता. पण यजमानपदाच्या निवड प्रक्रियेवर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप, कतार देशाने स्पर्धेच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत मानवी हक्कांच्या केलेल्या पायमल्लीच्या बातम्या, कतार या मुस्लीम देशातले स्त्रियांविषयीचे आणि समलैंगिक संबंधांविषयीचे काही कडक नियम यामुळे कतारला खासकरून पाश्चात्त्य देशांनी मधल्या बारा वर्षांत कडाडून विरोध केला. महत्त्वाचं म्हणजे यातला एकही आरोप कानाडोळा करण्याइतका साधाही नाही.
 
 
fifa
 
इतर कुठल्याही जागतिक स्पर्धेप्रमाणे फुटबॉल विश्वचषकासाठी आयोजनाचा हक्क मिळवताना कुठल्याही देशाला बहुसंख्य देशांची संमती मिळवावी लागते. कतारने ती मिळवण्यासाठी भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यातून फिफा संघटनाच आतून पोखरली गेली असल्याचाही घोटाळा बाहेर आला आणि या प्रकरणी तेव्हाचे फिफा अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. याशिवाय संघटनेच्या दीडशेच्या वर अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाले. भरीस भर म्हणून ब्लॅटर यांनी पुढे जाऊन “कतारला यजमानपद देणं ही माझी सर्वात मोठी चूक होती”, असं एक विधानही राजरोसपणे केलं.
हा पहिला धक्का कतारने पचवेपर्यंत स्पर्धेसाठी स्टेडिअम आणि इतर पायाभूत सुविधा उभारताना देशाने मानवी हक्कांंचं उल्लंघन केल्याचेही आरोप झाले. बीबीसी आणि सीएनएनसह इतर सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी त्यावर बातम्या केल्या. कामगारांना कामाच्या जागी पुरेसं अन्न आणि पाणी मिळालं नाही, त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले असे आरोप कतारवर होते. बांधकाम सुरू असताना तीन वर्षांत 500 नेपाळी आणि 700 भारतीय कामगारांचा जीव गेल्याची बातमी या वेळी प्रसारित झाली. बीबीसीच्या तीन पत्रकारांना वार्तांकन करताना कतारच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. भारत सरकारने मात्र तेव्हा भारतातून लक्षावधी कामगार कतारमध्ये दर वर्षी जात असताना मृत्यूंचं हे प्रमाण नेहमीसारखंच आहे अशी भूमिका घेतली होती. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि व्यापार संघटना यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागितली आणि या प्रकरणात कतारची बरीच मानहानीही झाली.
 
 
fifa
 
याहून मोठं संकट आयोजनावर आलं ते मुस्लीम राष्ट्र असलेल्या कतारमध्ये स्त्रियांचं सामाजिक स्थान आणि समलैंगिकांना गुन्हेगाराची वागणूक देणारे इथले कायदे. जगभरात या दोन्ही प्रश्नांविषयी समाज आता चांगलाच सजग झाला आहे. इंग्लंडचा फुटबॉलपटू जेक डॅनिअल्स याने आपण गे असल्याचं उघडपणे सांगून एक नवा पायंडा पाडला आहे आणि त्याला इंग्लिश संघटनेबरोबरच जगभरातल्या फुटबॉल लीगचा पाठिंबा आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन फुटबॉल सामन्यांदरम्यान ‘वन लव्ह रेनबो आर्मबँड’ घालून मैदानात उतरतो. एलजीबीटीक्यू समाजातील लोकांना स्वीकारण्याच्या दृष्टीने खेळातली सर्वसमावेशकता दाखवणारे हे आर्मबँड आहेत. केनबरोबरच आठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी ते घालण्याची परवानगी फिफाकडे मागितली होती. पण फिफाने आधी तशी परवानगी दिली आणि मग खेळाडूंची समजूत काढून त्यांनाच मागणी मागे घ्यायला लावली. या बाबतीत फिफाचा सूर आताच आग्रही भूमिका नको, हळूहळू बदल होईल असा आहे. ऑस्ट्रेलियाचा गे फुटबॉलपटू जोश केव्हालोनेही कतारमध्ये स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. स्पर्धेच्या निमित्ताने एलजीबीटीक्यू समाजाच्या मागण्यांचा देशातही विचार होईल आणि तिथे आवश्यक बदल घडतील, कायदे बदलतील अशी अपेक्षा त्याने व्यक्त केलीय. सध्या समलैंगिक संबंध ठेवल्याचं सिद्ध झालं तर कतारमध्ये तीन ते सात वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. आणि ती व्यक्ती मुस्लीम असेल तर धार्मिक कायद्यांमुळे व्यक्तीला चाबकाच्या फटक्यांचीही शिक्षा होते.
 
 
 
याव्यतिरिक्त फुटबॉल चाहत्यांना खेळाचा आनंद लुटताना बिअरचा आस्वाद घेण्याचीही सवय आहे. पण कतारमध्ये अल्कोहोल प्राशनाचेही कडक कायदे आहेत.
 
 
fifa
 
फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅन्टिनो
 
अशा सगळ्या गोष्टींना पाश्चात्त्य जगताचा विरोध होता आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे दुर्लक्ष करण्यासारखेही नव्हते. पण राजकीय आणि सामाजिक स्वरूपाच्या या मुद्द्यांमुळे खेळाचा रंगभंग नको, असा फिफाने विचार केला आणि कतारच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले. आताही स्पर्धेच्या निमित्ताने दोहामध्ये दाखल झालेले फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅन्टिनो यांनी पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांपूर्वी एक तासाचं भाषणच पत्रकारांना दिलं. “भेदभाव म्हणजे काय हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी ते आम्हाला सांगू नये. आज मला कतारी असल्यासारखं वाटतंय, अरब असल्यासारखं वाटतंय, आफ्रिकन असल्यासारखं वाटतंय, गे असल्यासारखं वाटतंय, अपंग असल्यासारखं वाटतंय, कामगार असल्यासारखं वाटतंय!” असं ते जमलेल्या लोकांना म्हणाले. थोडक्यात, पाश्चात्त्य देश इतकी वर्षं भेदभाव करत आलेत, त्यांनी आम्हाला न शिकवता भेदभाव दूर करण्याच्या कामी आम्हाला मदत करावी असं त्यांना सुचवायचं होतं. इन्फॅन्टिनो यांच्या भाषणानंतर अख्खं सभागृह गप्प झालं. फिफाचा कतारला असलेला पाठिंबा, ज्याची सुरुवातीला मी वाच्यता केली तो हाच.
 
 
 
त्यामुळेच कतारला ही स्पर्धा आयोजित करणं शक्य झालंय. सलग बारा वर्षांच्या कठीण काळात कतारमधली राष्ट्रीय फुटबॉल संघटना आणि फिफा एकमेकांना धरून राहिले. अर्थात, विरोधाचे मुद्दे साधे सरळ नव्हते. त्यामुळे कतारनेही येणार्‍या काळात त्यांचा विचार करावा.
 
 
 
बाकी फुटबॉल विश्वचषकाचं म्हणाल तर ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. यजमान देश म्हणून कतारला यात खेळण्याची संधी मिळाली आहे. पण पहिल्याच सामन्यात इक्वेडोर संघाकडून त्यांचा 0-2 असा पराभव झाला. एरवी यजमान देशाचा पहिल्या सामन्यात पराभव होण्याची ही 80 वर्षांच्या इतिहासातली पहिलीच वेळ.
 
 
 
आणि हा पराभव हेच सांगतो की, यजमानपद मिळालं असलं तरी कतारमध्ये फुटबॉल तितकंसं रुजलेलं नाही, ही गोष्ट खरीच आहे. मागच्या बारा वर्षांत मात्र देश फुटबॉलमय झालाय. देशात जागोजागी फुटबॉलविषयी होर्डिंग लागलेली आढळतात. राष्ट्रीय संघासाठी परदेशी कोच नेमण्याची परंपरा देशात सुरू झालीय. आणि गंमत म्हणजे कतार एअरवेजच्या विमानाने मधल्या काळात तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला आठवेल - सुरक्षाविषयक नियम सांगणारा व्हिडिओ तिथल्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला घेऊन काढण्यात आलाय आणि फुटबॉलमधली आणि विमानातली सुरक्षा आणि त्यातील साम्य अशी त्याची मध्यवर्ती कल्पना आहे. पण देशात फुटबॉल फीव्हर दिसत असला, तरी लगेचच काही खेळाचा चाहता वर्ग तयार होणार नाही. त्यामुळे मोठ्या खर्चाने बांधलेली स्टेडिअम रिकामी राहतात की काय, अशीही एक भीती आहे. फुटबॉल फारसा लोकप्रिय नसलेल्या देशात ही भीती साहजिक आहे.
 
 
 
स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी कायम एप्रिल, मे, जून महिन्यात ही स्पर्धा होत आली आहे. म्हणजे उन्हाळ्यात. जगभरातील इतर फुटबॉल लीग आणि ऑलिम्पिकचं वेळापत्रकही त्यानुसार आखलं जातं. पण कतारमधला तीव्र उन्हाळा लक्षात घेता तापमान 50 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची भीती होती. त्यामुळे यंदा पहिल्यांदा फुटबॉल विश्वचषक कतारमधील हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये होतोय आणि तरीही उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन एका महिन्याच्या आत म्हणजे 29 दिवसांत स्पर्धा संपवण्यात येणार आहे.
 
 
 
जगातील सहा खंडांमध्ये 170हून जास्त देशांत फुटबॉल खेळला जातो. अफाट लोकप्रियतेमुळे त्याला ‘द ब्युटिफुल गेम’ असं म्हणतात. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला लाखो लोक येतात. पण कतार देश आतापर्यंतचा स्पर्धेचा सगळ्यात छोटा आयोजक देश आहे. अख्ख्या देशाचं क्षेत्रफळ आहे साडेअकरा हजार चौ. किलोमीटर आणि लोकसंख्या आहे तीस लाखांहून कमी. अशा वेळी बाहेरून आलेले साधारण पंधरा लाख फुटबॉलप्रेमी हा देश कसे सांभाळणार? असा एक प्रश्नही विचारला जातोय. छोट्या आकारमानामुळे स्पर्धेसाठी उभारलेली आठही स्टेडिअम राजधानी दोहाच्या आसपास आहेत. त्यामुळे एकाच जागी गर्दी होण्याचीही शक्यता आहे. आपण हा विचार करत असताना स्पर्धेचा एक आठवडाही पार पडलाय आणि अजून कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही.
 
 
fifa
 
मैदानावरच्या रेफरीही महिला असणार
 
एरवी स्त्रियांना दुय्यम भूमिका देणार्‍या या मुस्लीम देशात फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने एक अनोखी गोष्ट घडणार आहे. स्पर्धेसाठीच्या मॅच ऑफिशिअल्समध्ये महिलांचा समावेश आहे आणि मैदानावरच्या रेफरीही महिला असणार आहेत.
 
 
 
मैदानाबाहेरचे काही वादाचे मुद्दे सोडले, तर बाकी वातावरणनिर्मिती अगदी फुटबॉल स्पर्धेला साजेशीच झाली आहे. स्पर्धेच्या परंपरेप्रमाणे धक्कादायक निकालांचा सिलसिलाही कायम आहे. कारण, पूर्वी विजेतेपद पटकावलेल्या अर्जेंटिनाला आणि जर्मनीला पराभवाचा धक्का बसलाय. येणार्‍या दिवसांमध्येही हीच चुरस कायम राहो, असंच फुटबॉल रसिकांना वाटत असणार.
तुम्ही जर भारतीय फुटबॉल रसिक असाल, तर फ्रान्स, क्रोएशिया, नेदरलँड्स, अर्जेंटिना, जर्मनी, मेक्सिको, ब्राझिल अशा कुठल्याही अव्वल टीमला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. कायलन एमबापे, करीम बेन्झेमा (दोघेही फ्रेंच), केव्हिन दी ब्रून (बेल्जिअम), लायनल मेस्सी (अर्जेंटिना), रॉबर्ट लेवानडोवस्की (पोलंड) यांना चिअर करण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. कारण भारतीय फुटबॉल टीम या स्पर्धेचा भाग नाही. फुटबॉलमध्ये राष्ट्रीय संघांना प्रेमाने टोपण नाव देण्याची पद्धत आहे - उदा., ब्रिटिश संघ म्हणजे रॉयल आर्मी, जपानी संघाचं नाव आहे जपानी सामुराई, जर्मन संघाला जर्मन मेकॅनिक्स म्हणतात. तसं भारतीय संघाला ‘ब्लू टायगर्स’ म्हटलं जातं. पण हे वाघ मैदानावर काही डरकाळी मारू शकलेले नाहीत. 1950च्या विश्वचषकात एकदाच आपण अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरलो होतो, तेसुद्धा इतर संघांनी माघार घेतली म्हणून. शेवटी आपणही स्पर्धेतून माघारच घेतली. तात्पर्य, आजतागायत आपण फुटबॉल विश्वचषक खेळलेलो नाही. आताही फिफा क्रमवारीत आपला क्रमांक 106वा आहे. पण आता फुटबॉल विश्वचषक स्पर्धा युरोप, अमेरिका सोडून आफ्रिकेत आणि आशियात आलीय, त्याचा उपयोग इथल्या देशांमध्ये फुटबॉल आणखी रुजायला होईल, अशीच आशा करू या.