पुढचे पाऊल कोण उचलणार?

विवेक मराठी    25-Nov-2022   
Total Views |
 
परभणी जिल्ह्यातील काळगाववाडी गावात होलार समाजाला मारुती मंदिरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश देण्यात आला. ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल पुढचे आहे, भेदभावाचा नाश करणारे आहे, असे कौतुक करताना याच घटनेने महाराष्ट्राचे सामाजिक वास्तव उघड केले आहे. हे वास्तव समजून घेऊन त्यात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक मानसिकता तयार करण्यासाठी पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न आहे.
 
vivek
 
दिवाळीच्या पाडव्याला परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील काळगाववाडी या छोट्या गावात हिंदू समाजाने भविष्यात कशी वाटचाल करावी या संदर्भात दिशादर्शन करणारी घटना घडली आहे. म्हटले तर आडवाटेला असणार्‍या या छोट्या गावाचा आदर्श संपूर्ण हिंदू समाजाला घ्यावा लागेल. कारण या गावात जो उपक्रम झाला, त्यातून हिंदू समाजातील भेद लयाला जात असल्याची ग्वाही दिली आहे. गावच्या सार्वजनिक मारुती मंदिरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावातील तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणार्‍या होलार समाजबांधवांना प्रवेश करता आला. गावातील सामाजिक जाणीव असलेल्या युवकांनी पुढाकार घेऊन वर्षानुवर्षे चालू असलेल्या कुप्रथेला मूठमाती दिली. या घटनेच्या पाठीमागे विवेक विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन आणि कष्ट यांचे अधिष्ठान आहे. समाजातील व्यंग ओळखून ते दूर करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या या तरुणांचे अभिनंदन केले पाहिजे. एका छोट्याशा गावात हा मंदिर प्रवेश यशस्वी झाला. त्यामुळे सर्वच स्तरांतून ग्रामस्थांचे आणि तरुणांचे अभिनंदन केले जात आहे. मंदिर प्रवेश यशस्वी होण्यासाठी जितका तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा होता, तितकाच जुन्या पिढीतील मंडळींनी मंदिर प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नाचा स्वीकारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही अलौकिक घटना घडली आहे.
 
 
 
एकाच गावात वर्षानुवर्षे राहत असताना आणि एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदत असताना आपलेच काही गावकरी बांधव मारुतीचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ही सामाजिक स्थिती जुन्या पिढीला प्रथा वाटत होती. त्यामुळे जुन्या पिढीतील मंडळींनी या असमानतेचे निवारण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पण हा सामाजिक भेदभाव नव्या पिढीच्या, तरुणांच्या लक्षात आला आणि त्यांनी ही कुप्रथा बंद करण्याचा केवळ विचार केला नाही, तर कृतीतून सामाजिक समतेचा संदेश दिला. काळगाववाडीतील गावकरी आणि त्याच गावातील होलार समाजाचे बांधव यांनी एकत्रितपणे मारुतीरायाचे दर्शन घेऊन स्वत:बरोबर समाजाला बलशाली करण्यासाठी पाऊल उचलले आहे. आता या पाऊलवाटेवरून सातत्याने प्रवास सुरू राहिला पाहिजे. मुळात कोणत्याही दैवताला भेदभाव मंजूर नाही. भेदभाव करतात ती माणसे. माणसे अस्पृश्यता पाळतात. ही मानसिक विकृती आहे. या मानसिकतेची व्याख्या करताना श्रीगुरुजी म्हणाले होते, “स्पृश्याच्या मनातील संकुचित भावनेला अस्पृश्यता म्हणतात.” ही अस्पृश्यता नष्ट करून काळगाववाडीतील ग्रामस्थांनी कृतीतून संदेश दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्याचा कसा स्वीकार करतो, ते लवकरच कळेल.
 
 
 
मंदिर प्रवेश हा विषय महाराष्ट्राला नवीन नाही. अगदी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा इतिहास आपण तपासून पाहिला, तर या विषयावर किती मूलभूत स्वरूपाचे काम झाले आहे, ते लक्षात येते. विदर्भात गणपती महाराजांनी 1913 साली आपले खाजगी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला. विनोबा भावेंनी पवनार परिसरात अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. साने गुरुजींनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. भारतीय राज्यघटना अमलात आली आणि कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली गेली. एवढा प्रदीर्घ वारसा आणि कायद्याचे संरक्षण असताना गेल्या पंचाहत्तर वर्षांत संपूर्ण देशभर मंदिरात भेदभाव का सुरू आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. काळगाववाडीतील ग्रामस्थांनी आपले व्यंग मान्य केले आणि आपले सामाजिक वर्तन सुधारले. पण काळगाववाडीतील ग्रामस्थांनी आपले व्यंग मान्य करून ते दूर केले याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र सुधारला, राज्यघटनेनुसार सामाजिक जीवनात भेदभावमुक्त झाला असा होत नाही. उलट या ग्रामस्थांनी महाराष्ट्राची असंवेदनशीलता वेशीवर टांगून आपल्या पुरोगामित्वाची झूल टराटरा फाडली आहे.
 
 
vivek
 
आपल्या देशाला प्रबोधनाचा वारसा लाभला आहे. अनेक महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते की, प्रत्येक माणसाला आपल्या धर्मश्रद्धा व्यक्त करण्याची संधी हवी असते, सन्मानाची भूक असते आणि ती भागवण्यासाठी तो विविध मार्गांनी प्रयत्न करत असतो. ही भूक भागवण्यासाठी जर अवरोध निर्माण झाला, तर तो अन्य मार्ग स्वीकारतो. धर्मश्रद्धा व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही म्हणून हिंदू समाजाला त्यागून अन्य धर्मात जाणारे लोक केवळ आर्थिक आमिषाला भुलून गेलेले नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “माणसाला जिवंत राहण्यासाठी भाकरीइतकीच धर्माची गरज आहे.” ही धर्मश्रद्धा जपण्याची, व्यक्त करण्याची संधी आजही मिळत नाही. उलट मंदिरासमोरून तथाकथित अस्पृश्य गेला तरी त्याला मारहाण करण्यात येते. अशा अनेक घटना आजही आपल्या आसपास घडत असतात. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करून सामाजिक बहिष्कार टाकला जातो किंवा देव कोपेल, वाईट होईल अशी भीती उत्पन्न केली जाते. शतकानुशतके सुरू असलेली कुप्रथा कायद्यातून पळवाटा शोधून जपली जाते आणि ती जपताना आपण आपल्यासारख्याच ईश्वरी अंशाचा अपमान करत आहोत, याचे भानही महाराष्ट्र हरवून बसला आहे. काळगाववाडीच्या ग्रामस्थांनी भानावर येऊन पुढचे पाऊल उचलले आहे.
 
 
 
कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली आहे, मात्र ती व्यवहारात आहे. आणि ती जपताना परंपरा, रूढी, श्रद्धा अशी कारणे पुढे केली जातात. ही सर्व कारणे माणसाच्या मनाशी - म्हणजे मानसिकतेशी जोडली आहेत. कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी न करण्याची मानसिकता ही केवळ संविधानविरोधी नाही, तर आपल्या सनातन संस्कृतीची ही पायमल्ली आहे. आजही अनेक गावांमध्ये अस्पृश्य समजल्या जाणार्‍या बांधवांना मंदिरात प्रवेश मिळत नसेल, तर आपण आजही किती मागास आहोत हे लक्षात येते.
 
 
 
आपल्या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण संकटकाळात एकसंघ होतो.. मग ते संकट मानवनिर्मित असो की नैसर्गिक. संकटाच्या वेळी भेदभाव विसरून एकत्रित प्रवास होतो. मागील काही वर्षांपूर्वी जेव्हा पाण्याची समस्या निर्माण झाली, तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. शासनाने जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली, तर समाजाने लोकसहभागातून अनेक ठिकाणी या समस्येला तोंड दिले. अस्पृश्यता दूर करण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजाचे मन तयार करणे आणि त्यानुसार कृती करणे यासाठी एकाच वेळी खूप जोरदार प्रयत्न करावे लागतील. अनेक गावांमध्ये भेदभावाचा प्रश्न आमच्याकडे नाही असे सांगितले जाते. पण ते जाहीरपणे सांगितले पाहिजे. त्यासाठी कायद्याच्या धाकापेक्षा मनाची तयारी अधिक गरजेची आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेणार? हा प्रश्न आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001