निमित्तमात्रं भव!

विवेक मराठी    28-Nov-2022
Total Views |
गेल्या बारा वर्षांत ‘नर्मदालय’ विविध अंगांनी विकसित होत गेलं. तीन शाळा, वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रोजचं साडेचारशे-पाचशे मुलांचं माध्यान्ह भोजन, जैविक शेती, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग याचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, 2017 सालापर्यंत 1700हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली पंधरा समग्र शिक्षण केंद्रं, हे सारं आज खरंच स्वप्नवत वाटतं. विशेष म्हणजे हे सगळं कुठलीही सरकारी मदत न घेता घडत आहे. समाजाने दिलेल्या भरघोस प्रतिसाद-प्रोत्साहनामुळे आणि गुरुतत्त्वाच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. स्वप्नवत वाटाव्या अशा काही घटना या बारा वर्षांत घडल्या.... भारती ठाकूर यांचे हे कार्य ‘गोष्ट नर्मदालयाची’ या विवेक प्रकाशनच्या आगामी पुस्तकातून वाचकांच्या भेटीला लवकरच येत आहे. या पुस्तकातील एक प्रकरण.

goshta Narmadalaichi
नाशिक सोडून नर्मदाकिनारी मंडलेश्वर-बैरागगढ येथे आले त्याला आता बारा वर्षं पूर्ण झाली. एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही बारा वर्षं? नर्मदाकिनारी एखाद्या गावात मुलांना शिकवावं, फावल्या वेळात नर्मदाकिनारी मनसोक्त भटकंती करावी, छान पुस्तकं वाचावीत, आध्यात्मिक साधनेसाठी अधिकाधिक वेळ द्यावा असा एक सुखद विचार घेऊन मी 2009 साली केंद्र सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकहून मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातल्या मंडलेश्वर गावी आले. संन्यास घ्यावा, अशीही अधूनमधून प्रबळ इच्छा होई; पण माझ्या स्वत:साठीच्या योजना आणि नर्मदामाईने म्हणा किंवा माझं श्रद्धास्थान असलेल्या श्री रामकृष्ण परमहंस-सारदा मां यांनी माझ्यासाठी केलेल्या योजना काही वेगळ्याच होत्या. स्वप्नवत वाटाव्या अशा काही घटना या बारा वर्षांत घडल्या. त्यामुळे ‘गोष्ट नर्मदालयाची’ हे पुस्तक म्हणजे ‘नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा’ या माझ्या पुस्तकाचा पुढचा भाग आहे.
  

गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर

https://www.vivekprakashan.in/books/goshta-narmadalaichi/

खरं तर ही एक अनुभवगाथा आहे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नर्मदाकिनारी असलेल्या बैरागढ (बैरागगढ) या एका छोट्याशा गावी वनवासी मुलांसाठी केलेल्या शैक्षणिक प्रयोगाची - नव्हे, प्रयत्नांची. मी कुणी शिक्षणतज्ज्ञ नाही. सरकारी नियमानुसार शाळेत शिकवण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता - म्हणजे B.Ed./D.Ed.ची पदवी-पदविकासुद्धा माझ्याकडे नाही. नाशिकला असताना वीस वर्षं जवळच्याच सेवा वस्तीतल्या मुलांना शिकवताना त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी-समस्या फार जवळून अनुभवल्या होत्या. इथल्या या मुलांना समजून घेताना त्याचा उपयोग झाला.
 
 
 
शालेय अभ्यासक्रमात अनेक अनावश्यक गोष्टींचा बोजा मुलांवर असतो, असं मी शाळेत असतानापासून मला जाणवायचं. त्यामुळे पाठ्यपुस्तकांतील आवश्यक तेवढाच - मुलांना समजेल तेवढाच भाग शिकवून त्यांना प्रत्यक्ष जीवनानुभव द्यावा, या विचाराने शालेय अभ्यासक्रमाच्या जोडीने सुतारकाम, वेल्डिंग, वीजजोडणी, प्लंबिंग, गोशाळा व्यवस्थापन, जैविक शेती, गृह व्यवस्थापन यासारखे विषय त्यांना शिकवायला सुरुवात केली. शालेय अभ्यासक्रमातला किती आणि कोणता भाग मुलांना शिकवायचा ते मुलं आणि शिक्षक ठरवतात. थोडक्यात, आमचा अभ्यासक्रम आम्ही ठरवतो.
 
 
 
नर्मदाकिनारी शाळा वगैरे काढावी, असा पुसटसा विचारही मी नाशिकहून निघताना केला नव्हता; पण सर्वस्वी अनोळखी अशा परप्रांतात, गेल्या बारा वर्षांत अत्यंत गरीब कुटुंबातील मुलांसाठी तीन नि:शुल्क शाळा सुरू झाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी जागा दान म्हणून मिळाल्या. सातपुडा-विंध्य पर्वतरांगांमधील अतिदुर्गम भागातल्या वनवासी मुलांसाठी वसतिगृहदेखील सुरू झालं. विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने समर्थित असा ‘फॅबलॅब’चा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2022 साली आम्हाला मिळाला. एम.आय.टी. युनायटेड स्टेट्स या प्रकल्पाचे मूळ प्रणेते आहेत आणि जगभरामध्ये केवळ दोन हजारांच्या आसपास हे प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पात आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रगत अशी यंत्रसामग्री मिळाली.
 
 
 
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता ‘व्यवसाय कौशल्य’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झालाय; पण खेडोपाडी त्यासाठी लागणारी यंत्रणा अथवा ते शिकवायला लागणारी प्रशिक्षित मंडळी उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घेऊन संपूर्ण भारतातली पहिली Mobile Vocational Training Van - जिला आम्ही Skills on Wheels आणि ‘कौशल्य रथ’ असं नाव दिलं आहे - तयार झाली आहे. Skills on Wheels ही बस ग्रामीण क्षेत्रातील शिक्षणासाठी एक क्रांतिदूत बनेल, असा विश्वास वाटतो.
 
 
 
आमच्या शाळेतले बेंच, डेस्क, टेबल, खुर्च्या, कपाटं, एवढंच नव्हे तर वसतिगृहात लागणारे पलंग असं संपूर्ण फर्निचर शाळेतले विद्यार्थीच बनवतात, अशी आमची भारतातली एकमात्र शाळा असावी. पंचेचाळीस गाई असलेल्या गोठ्याचं - अगदी दूध काढण्यापासून ते गाईंचं बाळंतपण करण्यापर्यंतचं सर्व व्यवस्थापन शाळेतली मोठी मुलं करतात. वसतिगृहात भोजनासाठी लागणारी अधिकांश भाजी आमच्या शेतातच उगवते. वसतिगृहातील सव्वाशे मुलांचा आणि पंचवीस कार्यकर्त्यांचा नाष्टा रोज सकाळी अकरावी-बारावीची मुलंच बनवतात. त्यात पोहे-उपम्यापासून इडली-डोसा, शिरा, बटाटेवडा, बुंदी-जिलेबी, गुलाबजामपर्यंत सर्व काही बनतं. मेतकूट, चिवडा, गरम मसाला, सांबार मसाला, वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवणं हेदेखील त्यांच्या जीवन शिक्षणात समाविष्ट आहे. आमच्या शाळेत अथवा वसतिगृहात सफाई कर्मचारी नाहीत. मुलांचे केस कापायला वसतिगृहात न्हावी येत नाही, तर मुलंच एकमेकांचे आणि कार्यकर्त्यांचे केस कापतात. अर्थात ज्याला जे शिकायला आवडतं फक्त तेच शिकवलं जातं.
 
 
 
संगीत या मुलांना मनापासून आवडतं. ज्या मुलांना शास्त्रीय संगीताची आवड आहे, त्यांना शास्त्रीय संगीतही शिकवलं जातं. हार्मोनियम, तबला, पखवाज, ऑक्टोपॅड, कोंगो, सिंथेसायझर यांसारखी वाद्यं मुलं वाजवायला शिकताहेत. शास्त्रीय रागांवर आणि लोकसंगीतावर आधारित फक्त पाठ्यपुस्तकांतील कवितांचा असा संपूर्ण भारतातील एकमेव वाद्यवृंद आमच्या या शाळेचा आहे. गंगा लहरी, भगवद्गीता, आदिशंकराचार्य आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांची असंख्य स्तोत्रं या मुलांना पाठ आहेत. विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातही ती मागे नाहीत.
 
 
 
नर्मदा परिक्रमेने बारा वर्षांपूर्वी मला आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. ते एक निमित्त झालं ‘नर्मदालय’च्या निर्मितीचं. गेल्या बारा वर्षांत नर्मदालय विविध अंगांनी विकसित होत गेलं. तीन शाळा, वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रोजचं साडेचारशे-पाचशे मुलांचं माध्यान्ह भोजन, जैविक शेती, प्लंबिंग, सुतारकाम, वेल्डिंग याचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, 2017 सालापर्यंत 1700हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली पंधरा समग्र शिक्षण केंद्रं, हे सारं आज खरंच स्वप्नवत वाटतं. विशेष म्हणजे हे सगळं कुठलीही सरकारी मदत न घेता घडत आहे. समाजाने दिलेल्या भरघोस प्रतिसाद-प्रोत्साहनामुळे आणि गुरुतत्त्वाच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. या प्रयत्नांना मला साथ मिळाली ती मनापासून काम करणार्‍या आमच्या कार्यकर्त्यांची. गेल्या बारा वर्षांच्या या अनुभवाला मी 'Divine planning' अर्थात ‘दैवी योजना’ असं म्हणते. भगवद्गीतेमधल्या ‘निमित्तमात्रं भव’चा तो अत्यंत सुंदर अनुभव होता.
 
 
 
माझी आई इंदुमती कन्हैयालाल ठाकूर हिचं 1984 साली निधन झालं. तेव्हापासून स्वत:ला व्यक्त होण्यासाठी दैनंदिनी लिहायची सवय लागली, तशीच स्वसंवादाचीही. अंतर्मनाशी झालेला तो संवाद ‘नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा’ या पुस्तकात मी ‘सखी’ या व्यक्तिरेखेच्या स्वरूपात सादर केला आहे. ही सखी कधी प्रेमळ सल्ला देते, कधी फटकारते, कधी माझ्या निर्णयांवर टीकादेखील करते, तर कधी साक्षीभावातदेखील असते. तिला माझी फ्रेंड -फिलॉसॉफर-गाइड म्हणू या हवं तर. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘दिवसातून एकदा तरी स्वत:शी संवाद करा. असं न केल्यास तुम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या भेटीस मुकाल.’
 
 
 
माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात चांगली व्यक्ती म्हणजे माझी ही सखी. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा या सखीवर बराच प्रभाव आहे. माझा मित्रपरिवार बहुभाषक असल्याने आणि अनेक वर्षं परप्रांतात राहिल्याने असेल कदाचित, फक्त मराठीत बोलायची मला सवय राहिलेली नाही. त्यामुळे ही ‘सखी’सुद्धा कधी मराठीत, तर कधी हिंदी-इंग्लिशमध्ये बोलते. गेल्या बारा वर्षांत तिचा-माझा स्नेहबंध अधिकच दृढ झाला आहे. ‘गोष्ट नर्मदालयाची’ या पुस्तकातदेखील वाचकांना ती अनेक ठिकाणी भेटेल.
 
 
- परिव्राजिका विशुद्धानंदा (भारती ठाकूर)