अभिनयापलीकडचा विक्रमकाका - सुनील बर्वे

विवेक मराठी    29-Nov-2022   
Total Views |
 रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांमध्ये प्रदीर्घकाळ लीलया वावरणारे साक्षेपी व संवेदनशील अभिनेते, दिग्दर्शक विक्रम गोखले यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याबरोबर अनेक वर्षं काम केलेल्या सहकलाकारांपैकी एक ज्येष्ठ अभिनेते, संस्कार भारतीचे विद्यमान कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे यांचं हे भावपूर्ण मनोगत. विक्रम गोखलेंच्या निधनाने प्रेक्षक चांगल्या संवेदनशील कलाकाराला मुकले हे खरंच आहे. पण त्यापलीकडे वर्षानुवर्षांचा सहवास लाभलेला एक सुहृद मी कायमसाठी गमावला आहे, हे अत्यंत हळव्या शब्दात सुनील बर्वे सांगून जातात.

vivek
 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणजे आमचा विक्रमकाका. कै. विनय आपटे यांच्या ग्रूपमधले आम्ही सगळे अनेकदा पार्ल्याला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या कट्ट्यावर बसलेले असायचो. कलाक्षेत्रात स्थिरावू पाहणारे आम्ही तरुण नवोदित कलाकार होतो. विनय आपटे आमचा या क्षेत्रातला गुरू. त्या वेळी आम्ही सगळे विनयचे फॅन होतो आणि त्याच्यासारखा दुसरा नट नाही अशी आमची धारणा होती. (अर्थात हे मत आजही तसंच आहे.) विनय आपटे आणि विक्रमकाका हे मित्र. त्या दोघांनी ‘दुसरा सामना’ नावाचं एक नाटक केलं होतं, जे विलक्षण गाजलं. आम्ही विक्रमकाकाचं काम पाहिलं, तेव्हा त्याच्या त्या रंगमंचीय वावराचा मनावर एवढा खोल ठसा उमटला की आमच्या श्रद्धास्थानातच हे नाव जोडलं गेलं. विक्रम गोखले हे त्या काळात मनोरंजन क्षेत्रातलं मोठं नाव होतं. प्रस्थापित असूनही विक्रमकाकाचं आम्हा तरुणांत मिसळणं इतकं सुखद आणि सहज होतं की तो आम्हाला आमच्यातलाच एक वाटायचा.
 
लपंडावमध्ये विक्रमकाकाच्या मुलाच्या ‘असीम’च्या भूमिकेत होतो. विक्रमकाकाचं सिनेमात तरुण दिसण्यासाठी मुलाचे कपडे घालणं, स्वत:मधला बदल दाखवण्यासाठी डोळ्यात आणलेली ती वेगळी चमक, ते प्रेमपत्र मिळाल्यानंतरचे त्याचे बदलणारे भाव, चेहर्‍यावर कायम एक बावळटपणा जपणं, त्याचे ते सुप्रसिद्ध पॉझेस हे सारंच इतकं देखणं आणि विलक्षण होतं.. विक्रमकाकाचं सर्वोत्तम मानलं जाणारं, विजया मेहता दिग्दर्शित ‘बॅरिस्टर’ नाटक पाहण्याचा मला योग आला नाही. पण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ‘लपंडाव’ नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट मला विक्रमकाकाबरोबर करता आला. विक्रमकाकाच्या एरवीच्या गंभीर भूमिकांच्या तुलनेत ही भूमिका खूपच वेगळ्या छटा असणारी होती. विक्रमकाका, लपंडावचे लेखक-पटकथाकार मंगेश कुळकर्णी, दिग्दर्शिका श्रावणी देवधर, अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते हे सगळे जुने मित्र. त्या मानाने मी त्या चमूत फारच नवखा होतो. मला आजही आठवतं की, या सिनेमाची पटकथा मंगेश कुळकर्णींनी खूप गोळीबंद आणि सुंदर लिहिली होती. त्या पटकथेच्या प्रेमात पडून विक्रमकाकाने त्याला एक व्हीसीआर भेट दिला होता. विक्रमकाका त्या वेळी स्वत: एक चांगला आणि स्थिरावलेला कलाकार होता. छान जमून आलेल्या स्क्रिप्टमुळे कलाकाराचं काम खूप सोपं होऊन जातं, हे आवर्जून सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. सहकलाकारांचं, आजूबाजूच्या माणसांचं कौतुक करण्याची कला त्याला फार छान अवगत होती, हे मला जाणवलं होतं आणि फार आवडलंही होतं. लपंडावमध्ये विक्रमकाकाच्या मुलाच्या ‘असीम’च्या भूमिकेत होतो. विक्रमकाकाचं सिनेमात तरुण दिसण्यासाठी मुलाचे कपडे घालणं, स्वत:मधला बदल दाखवण्यासाठी डोळ्यात आणलेली ती वेगळी चमक, ते प्रेमपत्र मिळाल्यानंतरचे त्याचे बदलणारे भाव, चेहर्‍यावर कायम एक बावळटपणा जपणं, त्याचे ते सुप्रसिद्ध पॉझेस हे सारंच इतकं देखणं आणि विलक्षण होतं.. बासच... त्याच्याबरोबर सीन करतानाही खूप मजा यायची. आमच्यासाठी तो चित्रपट हाच एक वेगळा अनुभव होता. विक्रमकाकाने पात्रासाठी केलेली प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी होती.
 
  
vivek
 
 
दोघेही कलाक्षेत्रातच कार्यरत असल्यामुळे त्यानंतरही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं. पण अभिनयापलीकडचा विक्रमकाका आणखीनच वेगळा आणि आवडणारा होता. सुरुवातीच्या काळात दीनानाथच्या कट्ट्यावर खूपदा भेटायचो. साधारण 1995-96नंतर आम्ही सगळेच आपापल्या कामात व्यग्र झालो, त्यामुळे दीनानाथचा कट्टा कमी होत गेला. पण तरीही जेव्हा आम्ही अधूनमधून भेटत असू, तेव्हा तो आवर्जून यायचा, तरुणांमध्ये मिसळायचा. विक्रमकाकाला बदलत्या काळाबरोबर स्वत:मध्ये बदल करणं, कालसुसंगत राहणं आवडायचं. अद्ययावत फोन, नवनवी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, त्यांची फीचर्स याबद्दल जाणून घेणं, त्याचा वापर करणं हे तो आवर्जून करत असे. दातृत्व हादेखील त्याचा आत्मसात करून घ्यावा असा गुण होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला त्याने मोठी देणगी दिली होती. कलाकार, पडद्यामागचे कलाकार यांनाही तो मदत करत असे. आम्ही एकदा एकत्र महिनाभर अमेरिकेला नाट्यदौर्‍यावर गेलो होतो. इकडे भारतात माझे वडील खूप आजारी पडले, ते आम्हाला परतल्यावर समजलं. बाबा आयसीयूमध्ये होते, तेव्हा त्याने मला स्वत:होऊन आर्थिक मदत केली होती आणि जेव्हा मी ते पैसे परत करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा माझ्यावर चिडलाही होता. “तुला आर्थिक मदत म्हणून हे पैसे दिले नाहीयेत. मी माझ्या वडलांसाठी म्हणून जे केलं असतं, त्याच भावनेतून मी हे केलंय” असंही म्हणाला. कलाकारापलीकडचा माणूस म्हणून माझ्यासाठी विक्रमकाकाचा हा एक अगदी वेगळाच अनुभव होता. तो संवेदनशील होता, म्हणून त्याला दुसर्‍यांची दु:खं, वेदना जाणवत असत. तो त्रास जणू काही स्वत:लाच होत आहे अशा भावनेतूनच तो मदत करत असे. त्याचा हा स्वभावच कदाचित त्याला भूमिका उत्तम वठवायला मदत करत असावा. कारण या संवेदनशीलतेमुळेच तो त्या पात्राचा स्वभाव, त्याची वेदना, त्याचं दु:ख याच्याशी उत्तम ‘रिलेट’ करू शकायचा, भूमिका समजून घेऊ शकायचा. कलाकाराने हुशार असायला हवं हे खरंच, त्याच वेळी त्याने संवेदनशील असणंही गरजेचं असतं, तरच तो समजून उमजून ते पात्र उभं करू शकतो. विक्रमकाका यात कायम उजवा ठरायचा आणि म्हणूनच त्याच्या भूमिकाही अगदी खर्‍या, नैसर्गिक वाटायच्या.
  
विक्रमकाका एक चांगला फोटोग्राफर होता, हे अनेकांना माहीत नसेल. लपंडाव सिनेमाच्या वेळेस एकदा त्याने माझे फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती मी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. एक दिवस त्यानेच मला लवकर उठवून शूटिंगच्या आधी बंगल्याच्या गच्चीवर नेलं आणि वेगवेगळ्या अँगलने माझे भरपूर फोटो काढले. मला म्हणाला, “यापुढे हेच फोटो तू कामासाठी सगळ्यांना देत जा.” तरुणांबद्दल त्याला खरंच खूप जिव्हाळा होता, खूप काळजीही वाटत असे. त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, याचाही तो कायम विचार करत असे.
  
vivek
 
 
काही वर्षांपूर्वी विक्रमकाका संस्कार भारतीचा कोकण प्रांत अध्यक्ष होता आणि मी उपाध्यक्ष होतो. तरुण कलाकारांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन करणं, आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून संस्कार भारतीच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं, कलाकारांना मार्गदर्शन करणं हे सगळं तो जाणीवपूर्वक करत असे.तो खरं तर खूपच बिझी होता, पण तरीही तो हे सारं करत असे. मला त्याच्या या धावपळीचं कौतुक वाटायचं. प्रकृतीच्या कारणास्तव त्याने या जबाबदारीतून मोकळं व्हायचं ठरवलं, त्याच वेळी माझं नावही अध्यक्ष म्हणून त्याने सुचवलं होतं, हे मला संस्कार भारतीच्या मंडळींकडूनच समजलं. खरं तर माझी ती पात्रता नव्हती. प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले यांच्यासारख्या मोठ्या माणसांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पण विक्रमकाकाने ज्या विश्वासाने माझं नाव सुचवलं, ते समजल्यावर मला स्वत:चाच अभिमान वाटला. काका मुळात जातिधर्म न मानणारा माणूस होता. तरीही त्याला संस्कार भारतीबाबत, हिंदुत्वाबाबत विलक्षण जिव्हाळा, आदर होता. माझं नाव अध्यक्ष म्हणून सुचवण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक दिवस त्याचा मला फोन आला आणि म्हणाला,
“ “सुन्या (तो मला अशीच हाक मारायचा), आपण इतकं काम करतो, हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यात रुजवणं अत्यावश्यक आहे. आपण आपल्या कला जोपासल्या पाहिजेत, त्या पुढच्या पिढ्यांकडे सोपवल्या पाहिजेत. नाहीतर त्या लोप पावतील. तुझ्यापरीने संस्कार भारतीच्या माध्यमातून त्यासाठी तू ते अवश्य करावंस. मी माझ्यापरीने ते केलं. ते तसंच करावं यासाठी मी तुझ्यावर बंधन घालणार नाही. पण ते तू करू शकतोस आणि त्यासाठी मी तुला पूर्ण मोकळीक देतो.””

 इतक्या छान शब्दात त्याने मला त्याची भूमिका समजावून सांगितली.
 
 
 
स्पष्टवक्तेपणा हा सुरुवातीपासूनच विक्रमकाकाच्या स्वभावाचा एक भाग होता. त्याने अनेकदा काही व्यक्तींबाबत, घटनांबाबत आपलं मत ठामपणे मांडलं. मला वाटतं त्यासाठी मनाचं धाष्टर्य खूप महत्त्वाचं असतं, ते त्याच्या स्वभावातच होतं. लोक अनेकदा कुंपणावरची भूमिका घेतात, त्याने तसं कधीच केलं नाही. लोकांपर्यंत पोहोचणं, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जनतेला आवाहन करणं, कारगिलच्या युद्धाच्या वेळी जनसहभागासाठी आवाहन करणं अशा अनेक गोष्टी तो कायम करत आला. त्याच्या संवेदनशील मनाला अनुसरून जेव्हा जेव्हा पुढाकार घेणं शक्य होतं, तेव्हा त्याने तो घेतला.
 
 
 
vivek
 
विक्रमकाका आणि आम्ही सगळे हे काही पूर्वीसारखे रोज भेटत नव्हतो. पण आपल्या डोळ्यांना त्याचं मनोरंजन क्षेत्रातलं काम बघण्याची सवय लागली होती. त्याचा तो वावर पाहणं हे किती सुखद होतं. रंगमंचावर प्रकाशामध्ये लाइटमध्ये आल्यानंतरचा त्याचा दीर्घ अर्थवाही पॉझ, त्याची वाक्य ऐकणं, त्याचं पात्र उभं करणं, प्रेक्षकांचं त्या पात्रासह पुढे नाटकात रमणं हे सारं खूप आनंददायक असे. त्याच्यासारखं काम आपल्याला जमत नाही हे माहीत असलं, तरी ते करणारी व्यक्ती आपल्यात आहे ही भावना आश्वस्त करणारी असते. विक्रमकाकाच्या जाण्याने अशी हरहुन्नरी आणि गुरुस्थानी असलेली व्यक्ती मी गमावली आहे. आधी विनय आणि आता विक्रमकाका.. माझ्या आयुष्यातली ही पोकळी भरून निघणं खरंच अशक्य आहे.
***
शब्दांकन - मृदुला राजवाडे