जर्मनीतील संघाचे नव्याने दर्शन

विवेक मराठी    04-Nov-2022
Total Views |
@सुनील खेडकर
संघ परिचय अनेक वर्षांचा आहे, हा माझा गर्व गळून गेला होता. मला पुन्हा एकदा जर्मनीत राहणार्‍या या आपल्या वंशाच्या तरुण पिढीने नव्याने हिंदू स्वयंसेवक संघाचे दर्शन घडवले असे वाटते...   
 
rss
 
काल मंगळवार, दि. 1 नोव्हेंबर या दिवशी जर्मनीत ऑल सेंट्स डेनिमित्ताने सार्वत्रिक सुट्टी होती. माझ्या सुदैवाने मी या दिवशी Stuttgart शहरातील प्रयत्न शाखेत उपस्थित होऊ शकलो.
 
 
गेल्या 52-53 वर्षांच्या संघआयुष्यादरम्यान यापूर्वी कॅनडात एका शाखेत प्रार्थना झाली होती. हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्याचा हा दुसरा योग होता.
 

 

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
सवलत मूल्य 160/- ₹

 

 

https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/

 

 
साधारणपणे वय वर्षे 30-35च्या आसपासचे तरुण-तरुणी किंवा कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आदी प्रांतांतील स्वयंसेवक उपस्थित होते. पश्चिम उत्तर प्रदेशच्या मेरठ आणि पूर्वेकडील गोरखपूर येथील स्वयंसेवक उपस्थित होते. यातील काही अनेक वर्षे जर्मनीत राहतात, तर काही गेल्या काही महिन्यांत पोहोचले आहेत. काही जण तिथून जवळ राहणारे होते, तर एक जण 45-50 किलोमीटर अंतरावरील दुसर्‍या ठिकाणाहून आला होता. काही शिशू अवस्थेपासून स्वयंसेवक, तर काही अगदी अलीकडे संघप्रवेश झालेले होते. काही जण दुसर्‍या पिढीतील स्वयंसेवक होते. आणखी एक विशेष म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मा. प्रांत संघचालक नाना जाधव यांची मुलगी केतकी, जावई आणि तीन वर्षांचा मुलगा हेदेखील शाखेत भेटले.
 
 
 
शहराबाहेरील एका जुन्या राजवाड्यासमोरील विस्तीर्ण मोकळ्या परिसरात ठरलेल्या वेळी दुपारी एक वाजता ही शाखा लागली. सुरुवातीला द्रुतयोग, मग सूर्यनमस्कार, खेळ असे जोरदार शारीरिक कार्यक्रम झाले. यादरम्यान जे आपल्या एक वर्षांपासून चार वर्षांच्या बाळांना घेऊन आले होते, ते आईवडील आळीपाळीने कार्यक्रमात सहभागी होत होते. छान कौटुंबिक वातावरणात कार्यक्रम सुरू होते आणि मी माझे आजोबापण उपभोगत होतो!
 
 
 
या शाखेत युरोप प्रांत प्रचारक सचिनजी नंदा हे थेट लंडनहून शाखेत सुमारे दुपारी 2.25च्या सुमारास पोहोचले. त्यांचे विमान पोहोचायला जवळजवळ दोन तास उशीर झाला होता. पण ते आल्यानंतर एक वेगळे वातावरण निर्माण झाले. सचिनजी हे तत्त्वज्ञान विषयात वाचस्पती (PhD) आहेत आणि काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यावर ते मागील दोन वर्षे प्रचारक आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात युरोपातील एकूण चौदा देश आहेत. विशेष म्हणजे ते भारताबाहेर आणि इंग्लंड येथे जन्मलेले तिसर्‍या पिढीतील सदस्य आहेत. याचा अर्थ त्यांचे खापरपणजोबा भारतात जन्माला आले होते. त्यानंतरच्या पिढ्या या जन्माने ब्रिटिश आणि वंशाने हिंदू अशा आहेत. सचिनजी यांची वयाच्या 22व्या वर्षी प्रथमच भारतभेट झाली होती. त्यांच्या वडिलांमुळे ते बालपणी शाखेत जायला लागले होते. अशा पार्श्वभूमीवर एक स्वयंसेवक अभिमानाने सांगतो की मी जन्माने ब्रिटिश असल्याचा आणि वंशाने हिंदू आहे आणि या दोन्हींचा मला अभिमान वाटतो आणि तो हिंदू स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडतो, हे सगळे विलक्षण आहे! संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, याची अनुभूती मी काल संघस्थानावर गेल्यापासून घेत होतो.
 
 
 
पण सचिनजी यांच्या शाखेतील ब्रिटिश उच्चारातील उद्बोधनामुळे मी थक्क झालो! त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघाची तीन मूलभूत तत्त्वे सांगितली. अतिशय सोप्या भाषेत पण स्पष्ट शब्दांत सांगितल्यामुळे जुन्या स्वयंसेवकांची उजळणी झाली असेल किंवा त्यांना अधिक स्पष्टता आली असेल आणि नव्यांना हे कशासाठी याचा व्यापक दृष्टीकोन मिळाला असेल असे वाटते.
 
 
rss
 
पहिला मुद्दा capacity building अर्थात व्यक्तिनिर्माण. समाजावर परिणाम करण्याच्या क्षमता स्वत:मध्ये निर्माण करणे.
दुसरा मुद्दा community building अर्थात समाजसंघटन अर्थात स्थानिक पातळीवर.
 
 
तिसरा मुद्दा सेवा.
 
आता या संपन्न देशात आपण काय सेवा देऊ शकतो, याचे त्यांनी बर्लिन येथील शाखेच्या सेवा कार्याचे नेमके उदाहरण दिले. तिथे स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिकांना भेटून, त्यांच्याशी बोलून त्यांचा एकटेपणा घालवतात. त्याचबरोबर त्यांची काही कामे नि:स्वार्थी बुद्धीने करतात.
 
 
 
त्यांनी या वेळी आजूबाजूच्या देशांमधील रक्षाबंधन कार्यक्रमात संपर्क, स्थानिक लहान मुलांना शाखेत खेळायला घेऊन जाणे अशी काही उदाहरणे दिली. त्यानंतर मोजकी प्रश्नोत्तरे झाली, प्रार्थना होऊन शाखा सुटली.
 
 
त्यानंतर ज्यांच्याकडे घरून पदार्थ करून आणण्याची जबाबदारी होती, त्यांनी जेवणाची तयारी केली आणि मग सगळे रांगेत उभे राहिले. वयाच्या ज्येष्ठतेमुळे किंवा भुकेने कळवळलेला माझा चेहरा बघून सर्वप्रथम मला जेवायचे ताट देण्यात आले! जेवताना विविध प्रांतांतील पदार्थ हे आणखी एक वैशिष्ट्य होते. सचिनजी थोडे गुजरातीत, थोडे हिंदीत अनौपचारिक गप्पा मारत होते. माझ्यादेखील सर्वांशी गप्पा भरपूर झाल्या आणि आम्ही सायंकाळी पाच वाजता तिथून निघालो.
 
 
 
आपला संघ परिचय अनेक वर्षांचा आहे, हा माझा गर्व गळून गेला होता. मला पुन्हा एकदा जर्मनीत राहणार्‍या या आपल्या वंशाच्या तरुण पिढीने नव्याने संघाचे दर्शन घडवले होते. आता या सर्वांना येत्या रविवारी आभासी पद्धतीने शाखेत भेटण्यासाठी मन आतुरले आहे.
 
सुनील खेडकर
पुणे महानगर प्रचार प्रमुख
(सध्या जर्मनी प्रवासात)