आहाराचे समग्र शास्त्र

विवेक मराठी    05-Nov-2022
Total Views |
@अरविंद जोशी 
 
आहाराचे विज्ञान आपण जाणतो, पण आहारामागचे अध्यात्म आपल्याला माहीत नसते. भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात आहाराविषयी सांगितलेले शास्त्र उलगडून सांगणारे पुस्तक म्हणजे सा. विवेक प्रकाशित व स्नेहा शिनखेडे लिखित ‘आहार आणि उपासना’. या पुस्तकाचा थोडक्यात परिचय.
 
book
 
पुस्तकाचे नाव - आहार आणि उपासना

लेखिका - स्नेहा शिनखेडे
 
प्रकाशक - विवेक प्रकाशन

पृष्ठसंख्या - 192.
 
मूल्य - 250 रु.

नोंदणीसाठी संपर्क : 9594961858

https://www.vivekprakashan.in/books/diet-and-fasting/
 
या विश्वात जीव अस्तित्वात आला, तेव्हापासून त्याचे खाणे सुरू आहे. मनुष्यप्राणी विकसित होत गेला, तसा त्या खाण्याच्या विविध पैलूंचाही विकास झाला. खाणे आणि आहार हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. आपण काय खातो, कसे खातो, खाण्याविषयी आपल्या समाजात कोणत्या प्रथा रूढ आहेत, आरोग्याचा आणि आपल्या आहाराचा किती निकटचा संबंध आहे, आपली खाद्यसंस्कृती आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी कशी निगडित असते अशा कितीतरी अंगांनी आपल्याला या खाद्यसंस्कृतीच्या वाटा शोधता येतात. त्यांची नेहमीच चर्चा सुरूही असते. पण आहाराचा आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरांशी कसा संबंध आहे, याचा अभ्यास मोठा खोलवर जाणारा आहे आणि त्यामुळेच आहाराचे हे दोन पैलू उलगडून दाखवणारे अभ्यासू आणि व्यासंगी लेखकही कमी आहेत. सोलापूरच्या स्नेहा सुनील शिनखेडे या अशाच दुर्मीळ अभ्यासू लेखिका आहेत. त्यांनी आपल्या आहाराची धार्मिक आणि आध्यात्मिक अंगाने चर्चा करणारे पुस्तक लिहिले आहे. ‘आहार आणि उपासना’ या शीर्षकाने ते साप्ताहिक विवेक प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.
 
 
 
आहाराचे हे अनेकानेक पैलू स्पष्ट करणारे एक सदर त्यांनी साप्ताहिक विवेकमध्ये चालवले होते. ते फार लोकप्रियही झाले होते. शिवाय त्यांची याच विषयावरील भाषणेही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून प्रसारित झाली होती. या भाषणांना आणि साप्ताहिक विवेकमधील सदरात आलेल्या लेखांना पुस्तकाचे रूप देण्यात आले आहे. या पुस्तकात 80 लेख आहेत आणि त्यात आपल्याला आपल्याच खाद्यसंस्कृतीशी निगडित असलेल्या अनेक प्रथा, परंपरा आणि पद्धती यांचा अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे.
 
 
 
आपल्या जेवणातल्या अनेक प्रथा आपण अज्ञानाने पाळत असतो. काही प्रथा-परंपरांना आपण कालबाह्य आणि अर्थहीन ठरवून टाकलेले असते. कारण आपल्या आधीच्या पिढीकडून आपल्याकडे केवळ ती प्रथा, परंपराच हस्तांतरित झालेली असते. तिचा अर्थ आणि तिच्यामागचे शास्त्र आपल्याकडे हस्तांतरित झालेले नसते. ते कोणाकडून समजून घ्यायला जावे, तर त्याचे ज्ञान असणारे आसपास कोणी नसते. ते ज्ञान बाळगणारे आता हयातही नाहीत. एकेक पिढी अस्तंगत होत असतानाच तिच्याबरोबर हे ज्ञानही अस्तंगत झालेले आहे. मात्र स्नेहा शिनखेडे यांच्याकडे ते ज्ञान आहे. त्यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीमागचे हे विज्ञान आणि त्यामागे असलेला अर्थ उलगडून दाखवला आहे.
 
 
 
आपल्या आहारातल्या काही गोष्टी आपल्या पुराणांतल्या कथा-आख्यायिकांशीही संबंधित आहेत. त्याही कथा या पुस्तकात आल्या आहेत आणि त्या स्नेहाताई शिनखेडे यांनी विस्ताराने दिल्या आहेत. उपवास, फलाहार, आहार आणि उपासना यांचा काय संबंध आहे, हे त्यांनी आपल्या या पुस्तकात मनोरंजकपणे सांगितले आहे.
 
 
 
आहाराचे आपल्या शरीरावर सखोल परिणाम होत असतातच, तसेच मनावरही परिणाम होतात. मनावर परिणाम होतो म्हणजे आपल्या स्वभावावरही परिणाम होत असतो. अन्नात तमोगुण असतात आणि सत्त्वगुण असतो. तो ओळखला पाहिजे आणि त्यावर नजर ठेवून आहार घेतला पाहिजे, तरच आपले खाणे हे आपली उपासना ठरते, असे या पुस्तकातले प्रतिपादन आहे.
 
 
आपल्या संतांनी आणि सत्पुरुषांनीही आहाराविषयी अनेक परींनी काही काही सांगितलेले आहे. त्या संबंधाने अनेक कथा रूढ आहेत. त्यांचाही ऊहापोह या पुस्तकात आहे.
 
 
 
आहाराचे विज्ञान आपण जाणतो, पण आहारामागचे अध्यात्म आपल्याला माहीत नसते. ते विविध कथांच्या स्वरूपात या पुस्तकात येते. त्यामुळे पुस्तकातले प्रतिपादन उद्बोधक होते आणि आपण खाण्याचा विषय किती उंचावर नेऊ शकतो, याचा प्रत्यय येतो. दही, दूध, आंबा, कांदा, लसूण, आवळा यांच्या संबंधाने बरे-वाईट असे अनेक परींनी बोलले जाते, त्यात काय तथ्य आहे? याची मीमांसा स्नेहाताईंनी या पुस्तकात केली आहे. खाण्याची चर्चा आली की पाण्याचीही चर्चा टाळता येत नाही आणि खाणे-म्हणजे जेवण विड्याने संपते, म्हणून स्नेहाताईंनी पाण्यावरही आपल्या खास दुर्मीळ माहितीसह प्रकाश टाकला आहे आणि गोविंद विड्याने पुस्तकाची समाप्ती केली आहे.
 
 
 
आपण खाण्याचा, आहाराचा आणि जेवणाचा विचार करीतच असतो. पण स्नेहाताई आपल्या या पुस्तकात या संबंधाने फार वेगळी माहिती देतात, म्हणून हे पुस्तक खास वाचनीय होऊन जाते.