अंधेरी पोटनिवडणूक जिंकूनही पराभूत

विवेक मराठी    09-Nov-2022
Total Views |
@अभय पालवणकर 
 
शिवसैनिक मतदारांना बाहेर काढतात, मतदारांच्या चुलीपर्यंत उमेदवारांचा प्रचार करणारी यंत्रणा शिवसेनेत आहे. पण  अंधेरीत यंत्रणाच राबवली न गेल्याने मतदारांच्यात निरुत्साह दिसला. परिणामी लटके यांना फक्त 66,530 मते मिळाली. निकाल जरी लटकेंच्या बाजूने असला, तरी उबाठा सेनेचा आत्मविश्वास वाढवणारा नाही. कार्यकर्त्यांना उत्साह देणारा नाही.
 
shivsena
 
अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव गटाच्या शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे 10 मे रोजी निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली गेली. उठाच्या शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्या विजयी झाल्या. भाजपाने अगदी ऐन वेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने लटके यांच्या विजयाचा मार्ग अगदी सोपाच झाला होता, निवडणुकीची औपचारिकता तेवढी बाकी होती. त्यामुळे लटके यांचा विजय किती मताधिक्याने होतो यापेक्षा त्यांना किती मतदान होते हे पाहणे महत्त्वाचे होते. पण प्रचारातील निरुत्साहामुळे मतदानही मोठ्या प्रमाणात न झाल्याने उबाठा सेनेचा आगामी मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे.
 
 
वास्तविक राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र, त्यानंतर भाजपाने घेतलेली माघार यामुळे या निवडणुकीतील रंगच निघून गेला होता. भाजपाने आगामी महानगरपालिका निवडणुकांचा विचार करून येथील उमेदवार मागे घेतला, असे बोलले जाते आहे. त्यात बर्यापैकी तथ्यही आहे. त्याबरोबरच अन्य कारणेही होती. सहानुभूतीच्या लाटेवर अशा निवडणुकीत उमेदवार निवडून येेतो हे भाजपाला माहित होते. कारण अशा जागेवर पक्षही निधन झालेल्या आमदाराच्या आप्तजनांनाच संधी देतो. काही अपवादात्मक निवडणुका वगळता आजवर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांचा निकाल पाहता हे दिसून येते. त्यामुळे अंधेरीत आपला पराभव झाला तर त्याचा थेट परिणाम मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भोगावा लागेल हे भाजपाला माहित होते. महानगरपालिकेत भाजपाला आपले कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी भाजपाने गेल्या निवडणुकीच्या पराभवानंतरच तयारी सुरू केली आहे. तेव्हा भाजपाचा अंधेरीच्या पोटनिवडणुकीतला पराभव शिवसेनेचे आत्मबळ वाढवू शकतो, हा धोका भाजपाला पत्करायचा नव्हता. म्हणून आपले अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी भाजपाने मागे घेतली. मुरजी पटेल यांनी मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना 45 हजारपेक्षा जास्त मतदान झाले होते. त्यामुळे या वेळी ते भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून चांगली लढत देऊ शकले असते. पण भाजपाने त्यांची उमेदवारी मागे घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारले.
 
 
ऋतुजा लटके यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का?
 
शिवसेनाचा उपनगरातील एक गट नेहमीच मातोश्रीच्या जवळ असल्याचा फायदा घेत असतो, याची प्रचिती 2019मधील विधानसभा निवडणुकीत आली होती. 2015 साली शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांचे नाव घेतले जायचे, त्या बाळा सावंत यांचे आकस्मिक निधन झाले होते. पोटनिवडणुकीत त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी काँग्रेसमधून नारायण राणे यांनी येथे निवडणूक लढवली होती. त्यामुळे ती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. सहानुभूती आणि बाळा सावंत यांचे कार्य यामुळे तृप्ती सावंत यांनी राणेंचा अगदी सहज पराभव केला. मात्र त्यानंतर सावंत यांनी आपल्या पतीप्रमाणे आपला जनसंपर्क ठेवला. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत विद्यमान आमदार म्हणून त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांना खात्री होती. पण मातोश्रीच्या जवळ असलेल्या कायदेपंडितांनी त्यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी आपले समर्थक माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देऊ केली. महाडेश्वर यांना उमेदवारी देताच तृप्ती सावंत यांनी अपक्ष लढून 25 हजार मते मिळवली. मतदारसंघातली आपली ताकद दाखवून देत सावंत सेनेचे अधिकृत उमेदवार महाडेश्वर यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. सेनेच्या हक्काच्या जागी काँग्रेसचे रिजवान सिद्दिकी निवडून आले.
 

shivsena 
 
या पार्श्वभूमीवर आता अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून आल्या असल्या तरी त्यांना पुन्हा 2024 साली उमेदवारी मिळेल का? की तृप्ती सावंत यांच्यासारखाच त्यांचा पत्ता कट केला जाईल? याचे उत्तर अगामी काळातच मिळेल.
 

 
भाजपाने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे शिवसेना गाफिल राहिली. खरे तर शिवसेनेला या निमित्ताने आपले नवे चिन्ह, पक्षाचे नाव जनतेमध्ये व सोशल मीडियाद्वारे पोहोचवण्याची संधी होती, पण शिवसेनेने ती गमावली. निवडणूक जिंकण्याची खात्री असलयाने आदित्य वगळता, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व अन्य मोठे नेते तिकडे फिरकलेच नाहीत. समोर शत्रू नसल्याने त्यांनी आपली तलवारच म्यान केली. माध्यमातूनही याचा फारसा गवगवा झाला नाही. असे म्हणतात की, शिवसैनिक मतदारांना बाहेर काढतात, मतदारांच्या चुलीपर्यंत उमेदवारांचा प्रचार करणारी यंत्रणा शिवसेनेत आहे. पण ही यंत्रणाच येथे राबवली न गेल्याने मतदारांच्यात निरुत्साह दिसला. परिणामी लटके यांना फक्त 66,530 मते मिळाली. निकाल जरी लटकेंच्या बाजूने असला, तरी उबाठा सेनेचा आत्मविश्वास वाढवणारा नाही. कार्यकर्त्यांना उत्साह देणारा नाही. भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा विजय नाही. त्यामुळे आपला एक आमदार कायम राखण्यापुरता या विजयाचा अरूथ उबाठा सेनेसाठी मर्यादित आहे. त्यामुळे जिंकूनही उबाठा सेना पराभूत झाली आहे, असे म्हणावे लागेल.
 
 
काँग्रेस-राष्ट्रवादीची मते कुठे गेली?
 पोटनिवडणूक होण्याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होईल असे महाविकास आघाडीचे नेते ओरडून सांगत होते. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या किती नेत्यांनी प्रचारात भाग घेतला? 2009 पर्यंत अंधेरी पूर्व हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अमिन कुट्टी यांना 27000 मते मिळाली होती. मग या पोटनिवडणुकीत ही मते कुठे गेली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.