@डॉ. प्रिया प्रभू
डिसेंबर 2019पासून सुरू असलेल्या कोविड-19 या नूतन आजाराच्या जागतिक साथीतून जरा उसंत मिळतेय असे आत्ता कुठे वाटू लागले होते आणि तेवढ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022पासून मुंबईमध्ये गोवर या आजाराचे एकामागे एक उद्रेक सुरू झाले आणि पाठोपाठ बालकांच्या गोवर मृत्यूच्या बातम्यादेखील वाचायला मिळाल्या. हळूहळू मुंबईबाहेर आणि महाराष्ट्राबाहेर हे उद्रेक दिसून येऊ लागले. मात्र केवळ भारतात नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये हे उद्रेक दिसून येत आहेत. जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या मात्र भारतामध्येच आहे.

गोवरसाठी प्रभावी लस उपलब्ध असल्याकारणाने गोवर उद्रेक ही सर्वसामान्य घटना नक्कीच नाही. महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये एकूण 3 उद्रेक, 2020मध्ये 2 आणि 2021मध्ये केवळ 1 गोवर उद्रेक नोंदविला गेला होता. 2022च्या परिस्थितीशी या आकड्यांची तुलना केल्यास 12 डिसेंबर 2022 अखेर महाराष्ट्रात एकूण 126 गोवर उद्रेक नोंदविले गेले आहेत आणि एकूण 19 बालके मृत्यू पावली आहेत. त्यातील 4 बालमृत्यू एका वर्षाखालील, 10 बालमृत्यू 1 ते 2 वर्ष वयोगटातील, 4 बालमृत्यू 2 ते 5 वर्षे वयोगटातील आणि 1 बालमृत्यू 5 वर्षावरील वयोगटामध्ये घडला आहे. विशेष बाब म्हणजे यातील एकाही बालकाचे गोवर लसीकरण पूर्ण नव्हते, 18 मुलांनी तर गोवरची एकही लस घेतली नव्हती.
या उद्रेकांकडे पाहिल्यास लक्षात येते की बरेच उद्रेक विविध शहरी भागामध्ये - म्हणजे मनपा कार्यक्षेत्रामध्ये घडत आहेत. शहरी भागांमध्ये असणारी सघन लोकवस्ती आणि तुलनेने कमी प्रमाणात होणारे नियमित लसीकरण या कारणांमुळे इतरही शहरी भागांनी अशा उद्रेकांबाबत जागरूक व्हायला हवे.कोविड महासाथीच्या काळामध्ये केवळ भारतातच नाही, तर जगभरामध्ये बालकांचे लसीकरणपूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही आणि लाखो बालके जीवरक्षक लसींपासून वंचित राहिली. अशा वेळी कमी झालेल्या हर्ड इम्युनिटीमुळे विविध साथरोग वाढू शकतात, याविषयी या गोवर उद्रेकांनी धोक्याची घटना दिली आहे.
हा काळ पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी चिंता निर्माण करणारा आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय करावे? आणि गोवर झालाच तर काय काळजी घ्यायची? असे अनेक प्रश्न पडतात. आजच्या लेखामध्ये तुमच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे मिळवू या!
1. गोवरचा उद्रेक म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट भागामध्ये 4 आठवड्यांच्या काळामध्ये 5हून अधिक गोवर संशयित रुग्ण आढळून आले आणि त्यामधील कमीत कमी दोन रुग्ण प्रयोगशाळा तपासणीमध्ये गोवर बाधित आढळल्यास त्याला गोवर उद्रेक म्हणतात.
2. गोवर संशयित रुग्ण कोण असतात?
ज्यांना ताप व अंगावर पुरळ आहे, असा प्रत्येक रुग्ण गोवर संशयित समजला जातो व पुढील तपासण्या केल्या जातात. यासाठी वयाची अट नाही. कारण सर्वाधिक गोवर रुग्ण पाच वर्षांखालील असले, तरीदेखील हा आजार इतर वयोगटांमध्येही होऊ शकतो.
3. सध्या गोवर कोणकोणत्या वयोगटामध्ये दिसून येत आहे?
सध्याच्या गोवर उद्रेकांमध्ये 98% रुग्ण 15 वर्षांखालील आहेत. सर्वाधिक 44% रुग्ण 1 ते 4 वर्षे वयाचे आहेत. 9% रुग्ण 9 महिन्यांखालील आणि 10% रुग्ण 9 ते 11 वयोगटातील आहेत. 30% रुग्ण 5 ते 9 या वयाची मुले आणि 3% रुग्ण10 ते 14 या वयाची मुले आहेत. म्हणजे 50%हून अधिक मुले 5 वर्षांखालील असली, तरी त्याहून मोठ्या मुलांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे.
4. या रुग्णांची लसीकरणाची स्थिती काय आहे?
यातील 67% रुग्णांनी चठ लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. 5% मुलांबाबत माहिती उपलब्ध नाही व साधारण 28% रुग्णांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतलेले होते.
5. लस घेतलेल्या मुलांमध्येदेखील गोवर कसा आढळून येतो?
कोणतीही लस 100% सुरक्षा देऊ शकत नसते. गोवरची लस प्रभावी असून एका डोसनंतर 80% सुरक्षा प्राप्त होते आणि दोन डोस घेतले असतील तर साधारण 97% सुरक्षा प्राप्त होते. म्हणजेच अगदी आदर्श परिस्थितीमध्येही गोवरचा कमीत कमी 3% धोका प्रत्येक मुलाला असतोच.
मात्र जेव्हा मुले कुपोषित असतात किंवा त्यांच्यामध्ये अ जीवनसत्त्वाची कमतरता असते किंवा इतर कारणाने इम्युनिटी कमी झालेली असेल, तर गोवरचा धोका वाढतो आणि लस घेतलेली असेल तरीही गोवर होऊ शकतो. मात्र लस घेतलेली असेल, तर होणारा गोवर सौम्य प्रकारचा असेल व गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होईल.
6. ज्यांना पूर्वी गोवर झाला होता, त्यांना पुन्हा गोवर होऊ शकतो का?
गोवरनंतर मिळणारी इम्युनिटी आयुष्यभराची असल्याने पुन्हा गोवर होत नाही. मात्र गोवरसारखे असणारे इतर काही आजारदेखील आहेत आणि दर वेळी गोवरसाठी रक्त तपासणी झालेली नसते, तेव्हा काळजी घेतलेली कधीही चांगली.
7. गोवरमध्ये गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका कोणाला अधिक आहे?
रुग्णाने लस घेतलेली नसेल, रुग्ण कुपोषित असेल किंवा अ जीवनसत्त्व कमतरता असेल, गरोदर स्त्री आणि 20 वर्षांवरील रुग्णांमध्ये इतर आजारामुळे इम्युनिटी कमी झाली असेल, तर गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो.
8. गोवरमध्ये कोणकोणती गुंतागुंत होऊ शकते?
गोवर हा सहसा स्वत:होऊन बरा होणारा आजार आहे, मात्र 5-8% रुग्णांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असल्याने आजारी मुलांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
सहसा पुढील गुंतागुंत दिसून येतात - न्यूमोनिया, जुलाब, कानामध्ये जंतुसंसर्ग, डोळ्यामध्ये जखमा व अंध्यत्व, तोंडामध्ये अल्सर्स,
कुपोषण.
क्वचित आढळून येणार्या गंभीर गुंतागुंती पुढीलप्रमाणे आहेत -
मेंदूदाह, हृदयाचा दाह,
SSPE (Subacute Sclerosing Pan-Encephalitis), Shock.अशा बालकांना रुग्णालयामध्ये दाखल करून योग्य उपचार केल्यास मृत्यू टाळता येतो.
9. बाळाला गोवर झालाय हे कसे ओळखायचे?
गोवरची सुरुवात एखाद्या व्हायरल आजारासारखीच असते. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये प्रत्येक तापाच्या रुग्णाला इतर मुलांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
सर्दी, नाक गळणे, घसा दुखणे, खोकला, अंग दुखणे, डोळे लाल होणे अशा सध्या लक्षणांनी आजाराची सुरुवात होऊ शकते. मुलाला तापदेखील येतो, जो सहसा जास्त - म्हणजे 102-104 इतका असू शकतो.
लक्षणे सुरू झाली की रुग्ण आजार पसरवायला सुरू करतो. यानंतर 2-3 दिवसांनी तोंडाच्या आतील बाजूला दाढांच्या बाजूला गालावर पांढरी, रव्यासारखे दाणे असल्यासारखी पुरळ दिसू शकते. याला ‘कोपलिक स्पॉट’ असे म्हणतात, जी केवळ गोवरमध्ये दिसून येते.
लक्षणे सुरू झाली की साधारण 4 दिवसांनी अंगावर पुरळ येण्यास सुरुवात होते. ही पुरळ सहसा चेहर्यापासून, विशेषत: कानामागून, कपाळावरून सुरू होते व नंतर अंगभर पसरते. ही पुरळ दुखत नाही, मात्र अंग खाजवू शकते. पुरळ बारीक लाल रंगाची असते व त्यामध्ये पाण्याचे फोड नसतात. जास्त पुरळ आल्यास चट्ट्यासारखे दिसू शकते.
पुरळ आल्यानंतर ताप कमी होण्यास सुरुवात होते. पुढील 5-7 दिवसांनी पुरळदेखील कमी होऊ लागते. पुरळ उठल्यानंतर पुढील 4-5 दिवस रुग्णापासून आजार इतरांपर्यंत पसरू शकतो. सध्या उद्रेक सुरू असल्याने ताप व पुरळ असलेल्या प्रत्येक रुग्णाची माहिती आरोग्य यंत्रणेला कळवणे बंधनकारक आहे.
10. गोवर कसा पसरतो?
गोवर हा हवेद्वारे पसरणारा अत्यंत प्रसारक्षम आजार आहे. कोविड एका रुग्णापासून साधारण 2 ते 3 जणांपर्यंत पसरायचा. गोवर एका रुग्णापासून 18 जणांपर्यंत पसरू शकतो. असे घडू नये, म्हणून लहान मुलांची गोवरविरुद्ध प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी.
रुग्णाच्या सर्दी, खोकला, शिंक याद्वारे गोवर विषाणू हवेमध्ये पसरतो. बंद खोली असल्यास तो हवेमध्ये साधारण दोन तासांपर्यंत टिकून राहू शकतो. तसेच रुग्णाच्या निकट संपर्कामुळे आणि स्रावांमधूनदेखील हा आजार पसरतो. पुरळ येण्यापूर्वी 4 दिवस व पुरळ आल्यानंतर 4 दिवस या आजाराचा संसर्ग पसरू शकतो.
विषाणूसंसर्ग झाल्यानंतर साधारण 7 ते 14 दिवसानंतर बाळाला लक्षणे दिसायला सुरुवात होते. त्यामुळे एखाद्या गोवर रुग्णाशी संपर्क आला असल्यास पुढील दोन आठवडे तब्येतीवर लक्ष ठेवायला हवे. बाळाला व्हायरल आजाराची लक्षणे दिसून आली की इतर मुलांपासून दूर ठेवावे व मूल मोठे असल्यास इतरांबरोबर खेळायला किंवा शाळेला पाठवू नये.
11. गोवर झाल्यास बाळाची काळजी कशी घ्यावी?
बाळाला ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे असतील, तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. तोंडामध्ये किंवा अंगावर पुरळ आढळल्यास गोवर संशयित रुग्ण समजून मुलाचे रक्त वा ीुरल तपासणीसाठी घेतला जाऊ शकतो. गोवर बरा झाला, तरी 4 आठवड्यापर्यंत रक्त तपासणी केली जाऊ शकते. उद्रेकाच्या काळामध्ये हे आवश्यक आहे.
बाळाची तपासणी करून बाळाला एखादी गुंतागुंत नाही याची खात्री केली जाते व इतर माहिती घेतली जाते. डॉक्टरकडे जाताना लसीकरण कार्ड असल्यास सोबत घेऊन जावे.
गुंतागुंत नसेल तर बाळाची काळजी घरी घेता येऊ शकते. बाळाच्या लक्षणानुसार औषधे दिली जातात.
गोवरविरुद्ध विषाणूविरोधी औषध नाही. मात्र अ जीवनसत्त्वाची मात्रा दिल्यास मृत्यूचा धोका 87%ने कमी होतो. त्यामुळे प्रत्येक गोवरबाधित बाळाला अ जीवनसत्त्वाची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी.
तापावरील औषध योग्य प्रमाणात 3-4 वेळा देता येते. पण ताप जास्त असल्यास बाळाचे अंग कोमट पाण्याने पुसून घ्यावे व ताप नियंत्रणात आणावा.
बाळाला हलका व मसालेदार नसलेला आहार द्यावा. थोड्या थोड्या वेळाने खाणे द्यावे. बाळ अंगावर पीत असेल तर आईचे दूध द्यावे. बाळाचे वजन कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
जर इतर जंतुसंसर्ग असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावी लागतात, मात्र प्रत्येक बाळाला द्यायची गरज नाही.
बाळाला तोंडामध्ये अल्सर असतील, तर कपभर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून दिवसातून चार वेळा तोंड धुऊन घ्यावे.
डोळ्यातून पाणी येत असल्यास घाबरू नये, मात्र चिकट स्राव किंवा पू येत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे. डोळ्यामध्ये स्टीरॉइड औषधे वापरू नयेत. आवश्यकतेनुसार नेत्ररोगतज्ज्ञांना भेटावे.
बाळाला जुलाब सुरू झाल्यास शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी जठड द्यावे. जुलाबांचे प्रमाण अधिक असल्यास किंवा बाळ मलूल वाटल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आजारपणानंतरदेखील बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी. दोन आठवड्यापर्यंत नेहमीपेक्षा एक वेळ अधिकचे खाणे द्यावे, जेणेकरून बाळ अशक्त होणार नाही.
बाळाच्या श्वासाच्या गतीवर लक्ष ठेवावे, बाळाला धाप लागतेय असे वाटले, तर डॉक्टरांना भेटून न्यूमोनिया नाही ना याची खात्री करावी. 1 महिन्याच्या बाळाची श्वासाची गती एका मिनिटात 60हून अधिक नसावी, 1 महिना ते 1 वर्षापर्यंत 50हून अधिक नसावी आणि एका वर्षाहून मोठ्या बाळांची श्वासगती एका मिनिटात 40हून अधिक नसावी, असा संकेत आहे.
लस घेतलेली असल्यास हा आजार सौम्य असतो व कोणतीही गुंतागुंत न होता 10-12 दिवसांमध्ये बाळाची लक्षणे कमी होतात.
12. गोवर संसर्ग पसरू नये म्हणून काय करता येईल?
आजारी बाळाला इतरांपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. घरातील 1-2 व्यक्तींनी बाळाची काळजी घ्यावी. बाळाचे व काळजी घेणार्या व्यक्तींनी हात वारंवार साबणाने धुवावेत. इतर मुलांनादेखील हात चेहर्याला न लावणे व हातांची स्वच्छता याविषयी योग्य सवय लावता येईल.
घरामधील वायुविजन चांगले ठेवावे.
तापाने आजारी मुलांना शाळेमध्ये पाठवू नये. गोवर असल्यास घराबाहेर पाठवू नये.
आजारी मोठ्या मुलांनी व काळजी घेणार्या व्यक्तींनी मास्क वापरला, तरीही सुरक्षा वाढू शकेल.
तुमच्या भागामध्ये उद्रेक सुरू असल्यास सरकारकडून दिल्या जाणार्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व तपासण्यांसाठी व लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणांना सहकार्य करावे.
13. गोवरपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
प्रत्येक बाळाला वयाच्या 9 ते 12 महिन्यांमध्ये MR लसीचा पहिला डोस आणि वयाच्या 16 ते 24 महिनेमध्ये MR लसीचा दुसरा डोस द्यायला हवा.
जर हे डोस दिले गेले नसतील, तर सरकारतर्फे विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. अशा मुलांना 15 ते 25 डिसेंबरमध्ये पहिला डोस व 15 ते 25 जानेवारीपर्यंत दुसरा डोस दिला जाईल.
तसेच जिथे उद्रेक सुरू आहे, अशा भागांमध्ये 9 महिने ते 5 वर्षे वयाच्या बालकांना अधिकची सुरक्षा म्हणून MR लसीचा ORI म्हणजे ज्यादाचा डोस दिला जाईल.
ज्या ठिकाणी 9 महिन्यांखालील बालकांमध्ये गोवर आढळून येतोय, अशा ठिकाणी 6 महिन्यांच्या बालकांनादेखील ज्यादाचा एक डोस दिला जाईल. ज्यादा डोस घेतला तरीही नियमित लसीकरणाचे दोन डोस नक्की घ्यायचे आहेत. तसेच आपल्या परिचितांमधील इतर बालकांनीदेखील लसीकरण केले आहे, याची खात्री करून घ्या.
शाळांमध्ये लस न घेतलेली बालके असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी व त्यांच्या पालकांना लस घेण्याबाबत समुपदेशन करायला हवे. तसेच इतर आजारी मुलांपासून अंतर ठेवावे व मुलांच्या हातांची स्वच्छता वारंवार करावी.
MR लस सुरक्षित आहे.
मूल पाच वर्षाचे होईपर्यंत दर सहा महिन्यांनी बाळाला अ जीवनसत्त्वाची मात्रा द्यावी, सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असते.
14. भागामध्ये उद्रेक सुरू असल्यास उद्रेक थांबविण्यासाठी काय करता येईल?
भागामध्ये उद्रेक सुरू असल्यास तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरी येऊ शकतात. त्यांना योग्य व खरी माहिती देणे. गेल्या 4 आठवड्यांमध्ये घरी कोणाला ताप व पुरळ असल्यास त्यांची रक्त तपासणी करण्याचा सल्ला मिळू शकतो. अशी तपासणी अवश्य करून घ्या.
घरी कोणाला ताप व पुरळ आल्यास गोवर संशयित रुग्ण म्हणून रुग्णाची नोंदणी करून घ्या व पुढील तपासण्यांमध्ये सहकार्य करा. असे इतर रुग्ण माहीत असल्यास आरोग्य यंत्रणेला त्यांची माहिती देऊन प्रसार थांबवण्यामध्ये सहकार्य करा.
गोवर अतिशय वेगाने पसरतो व काही मुलांमध्ये जीवघेणा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोवर रुग्णाने व संशयिताने गोवरचा प्रसार थांबविण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत.
उद्रेक असलेल्या ठिकाणी लसीचा ज्यादा डोस घेण्याचा सल्ला दिल्यास असा डोस अवश्य घ्यावा. बाळाबरोबर इतर मुलांचीदेखील सुरक्षा होते.
बाळाचे वजन कमी असल्यास त्यावर उपाययोजना करावी व अशा मुलांची विशेष काळजी घ्यावी.
15. शाळांनी काय काळजी घ्यावी?
तापाने आजारी मुलांना शाळेमध्ये न येण्याचा सल्ला द्यावा. सर्व मुलांचे रोज निरीक्षण करून आजारी मुलांना घरी पाठविण्याची सोय करावी. अशा आजारी मुलांना कमीत कमी 5 दिवस तरी घरी राहण्यास सांगावे.
एखाद्या विद्यार्थ्यास गोवारचे निदान झाल्यास शाळेला तशी सूचना देण्यास सांगावे व त्या विद्यार्थ्याच्या वर्गमित्रांनी पुढील 14 दिवस तब्येतीकडे लक्ष द्यावे, लक्षणे दिसल्यास शाळेमध्ये येऊ नये.
ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना विशेष लसीकरण मोहिमेमधून लस घेण्यास प्रोत्साहन द्यावे.
16. गोवर उद्रेक का महत्त्वाचा आहे?
जेव्हा नियमित लसीकरणाचे प्रमाण कमी होते किंवा काही लोकसमूह लसीकरण नाकारतात, अशा वेळी लसीकरणाने टाळता येणारे आजार पुन्हा डोके वर काढू शकतात. जगभरामध्ये पोलिओ व गोवर यांचे रुग्ण वाढत आहेत. यापाठोपाठ इतर आजारांचेदेखील रुग्ण वाढायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे लसीकरणाचा टक्का पुन्हा वाढायला हवा, सर्व बाळांचे नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण व्ह्यायला हवे. तसेच इतर आजार वाढत आहेत का यावरदेखील लक्ष ठेवायला हवे.
17. डॉक्टरांनी उद्रेक काळामध्ये काय करावे?
ताप व पुरळ असलेल्या सर्व वयोगटातील प्रत्येक रुग्णाची नोंद गोवर संशयित अशी करून आरोग्य यंत्रणेला त्याची माहिती अवश्य कळवावी. गोवरची संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने प्रत्येक रुग्णाची नोंद होणे महत्त्वाचे आहे. याविषयी पालकांचे समुपदेशन करावे.गोवरच्या उपचाराविषयी माहिती घेऊन गुंतागुंत वेळेत ओळखावी व अशा रुग्णांना रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रणाची काळजी घेऊन उपचार करावेत.
सुरक्षित लस उपलब्ध असतानादेखील केवळ गैरसमजुतीमधून लस घेणे टाळले जाते व त्यामुळे गोवरसारख्या आजारामुळे मुलाचा जीव गमवायची पाळी येते, हे दुर्दैवी आहे.
भारताने 2023मध्ये गोवर आजाराचे भारतातून उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्रेक म्हणजे या प्रयत्नांना धोक्याची सूचना आहेत. पुढील वर्षभरामध्ये आपण सर्वांनी जर एकत्रित प्रयत्न केले, तर गोवर आजाराच्या समूळ उच्चाटनाचे स्वप्न नक्की साकार होईल. जनतेच्या सहकार्याने कठीण गोष्टीदेखील सोप्या होतात. गोवर लसीकरणाच्या साथीने गोवरच्या उद्रेकांवर लवकरच मात करण्यात येईल, हे नक्की.
लेखिका मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.