@दिलीप हेर्लेकर 7045413772
शहरी शेतीचा प्रयोग करण्याचा पहिला मान कै.डॉ. रमेश दोशी यांच्याकडे जातो. वांद्रे (मुंबई) येथील आपल्या बंगल्याच्या गच्चीवर त्यांनी मका, ज्वारी, केळी या फळपिकांसह प्रयोग यशस्वी करून दाखवला, पुढे पाचगणी-महाबळेश्वरची मक्तेदारी असणार्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन डॉ. दोशींच्या बंगल्याच्या गच्चीवरील शेतीत आले आणि डॉ. दोशींच्या प्रयोगांकडे सर्व माध्यमांचे लक्ष वळले. भक्कम वैज्ञानिक आधारावर त्यांनी शहरी शेती तंत्राचे पेटंट मिळवले.

शहरात शेती करणे ही कल्पनाच अभिनव आहे. ही कशी अस्तित्वात आली ते जाणून घेऊ या. मुंबईतील वांद्रे येथे राहणारे डॉ. रमेश दोशी हे अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेले गृहस्थ, तसेच व्यवसाय म्हणाल तर रासायनिक खतांची विक्री करण्याचा. कालपरत्वे व्यवसायातून अंग काढून तो कुटुंबातील पुढच्या पिढीकडे सोपवला आणि त्यानंतर त्यांनी कामशेत (जि.पुणे) येथे असलेल्या शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. तिथला जमाखर्च ते मांडू लागले. हा तोट्याचा व्यवहार असल्याचे पहिल्या वर्षीच लक्षात आले. मग पुढच्या वर्षी जरा काटेकोर राहून जमाखर्चाची आकडेवारी तपासली, तरी तूट होतीच. याविषयी अभ्यास करायला सुरुवात केली. वाचन व विचारविमर्श केला. तेव्हा जपानच्या मासानोबू फुकुओका यांचे ’वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ हे पुस्तक वाचनात आले. त्यात मांडलेली निसर्ग शेतीची कल्पना भावली. तसेच प्रा. श्रीपाद दाभोलकरांची पुस्तके वाचनात आली. त्यांच्या प्रयोग परिवाराविषयी माहिती झाली. कालांतराने प्रा. दाभोलकरांची समक्ष भेटच झाली. शेती विषयासंबंधी दीर्घ चर्चा झाली आणि त्यातून पुढे शहरी शेती आकाराला आली. अनेकानेक प्रयोग केले गेले आणि त्यातून ’शहरी शेती’चे तंत्र विकसित झाले.
डॉ. दोशी यांचा वांद्रे येथे बंगला होता व तिथे 110 चौ. मीटरची गच्ची उपलब्ध होती. नमुना शेत म्हणून त्याचा वापर करायचे ठरले. प्रा. दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगांना सुरुवात झाली. कमी कालावधी लागणारी पिके म्हणून भाज्यांपासून सुरुवात झाली. मग मका, ज्वारी, ऊस, केळी करत इतर फळांची व फळभाज्यांची लागवड करायला सुरुवात झाली. येत असलेल्या अडचणींवर मात करत मार्गक्रमणा सुरू होती.
प्रा. श्रीपाद दाभोलकर व निळू दामले यांच्या समवेत
डॉ. दोशी यांच्या डोक्यात कामशेतच्या शेती व्यवहारातील तोटा होता. त्यामुळे खर्च कसा कमी राहील यावर लक्ष होते. वेगवेगळ्या पिकांच्या गरजा कशा भागवता येतील याची काळजी घेतली जात होती. पाणी किती लागेल याचाही विचार केला जात होता. कारण गच्चीवरून गळतीची तक्रार यायला नको. तसेच सेंद्रिय मार्गाने ही पद्धत कशी पुढे नेता येईल हेही साध्य केले जात होते. आणि मग एकेक करत विशिष्ट भाज्या तसेच धान्य व फळे यांचे उत्पादन यायला सुरुवात झाली. यातून काही प्रमाणात डॉ. दोशींचे अनुभवाधारित शिक्षण झाले. कोणती भाजी पिकवताना काय करावे, तसेच काय टाळावे याचे आडाखे तयार झाले. तसेच फळपिकांच्या बाबतीतले ठोकताळे लक्षात आले. पिंपात लावलेल्या डाळिंबाला सहा मोठी (बाजारात मिळतात तेवढी) फळे यशस्वीरित्या घेता येऊ लागली. तसेच खेडेगावात सहज उपलब्ध असणार्या काही गोष्टींची शहरात वानवा असते. त्याला पर्याय शोधण्यात आले. पाचगणी-महाबळेश्वरची मक्तेदारी असणार्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन डॉ. दोशींच्या बंगल्याच्या गच्चीवरील शेतीत आले आणि डॉ. दोशींच्या प्रयोगांकडे सर्व माध्यमांचे लक्ष वळले.

मग नियतकालिकांत लेख आले. मुलाखती आल्या, फोटो छापून आले. आकाशवाणीवर व दूरदर्शनवर मुलाखती झाल्या. मग डॉ. दोशींच्या बंगल्याच्या गच्चीतील शेती बघायला रीघ लागली. हौशे-गवशे-नवशे सगळ्या प्रकारचे लोक होते. कौतुक करायचे, काही तपशील विचारायचे व लिहून घ्यायचे, पण मग पुढचा जो गट आला तो म्हणायला लागला, “आम्ही फी देतो, तुम्ही आम्हाला हे शिकवा.” इथे डॉ. दोशींना अडचण आली. विज्ञानाची पार्श्वभूमी नसल्याने हे तंत्र शिकवणे आपल्या आवाक्यातले नाही, याची जाणीव झाली. दरम्यान केलेल्या कामाचे श्रेय कोणी अन्य व्यक्तीने घेऊ नये, या विचाराने डॉ. दोशींनी या शहरी शेती तंत्राचे एकस्व (पेटंट) मिळवले. मराठी विज्ञान परिषदेचे काम माहीत झाल्याने डॉ. दोशींनी परिषदेकडे प्रस्ताव मांडला. सगळी माहिती देऊ केली आणि शहरी शेती तंत्र शिकवायची विनंती केली. यावर विचार करून परिषदेने सुरुवातीला विज्ञान भवनाच्या गच्चीवर डॉ. दोशींच्या देखरेखीखाली शहरी शेती तंत्राने बगिचा विकसित करून घेतला. तसेच एका व्यक्तीला या तंत्राचे प्रशिक्षण दिले. ऑक्टोबर 1994पासून या तंत्राची ओळख करून देणारे वर्ग घ्यायला सुरुवात केली. आजही ते वर्ग (दरमहा पहिल्या रविवारी) सुरू आहेत. हे शहरी शेतीचे तंत्र सहजी दहा ते बारा हजार व्यक्ती परिषदेतून शिकून गेल्या आहेत. तसेच असा शहरी शेतीचा बगिचा गच्चीवर असला, तरी या कारणाने गच्ची गळत नाही याचा एक ठोस पुरावा उभा राहिला. शहरी शेती तंत्राचा वापर सगळ्यांना विनामूल्य करता येतो. कारण डॉ. दोशींना ह्या समाजोपयोगी तंत्राचा प्रसार करायचा होता. हे तंत्र डॉ. रमेश दोशींनी विकसित केलेले आहे, याची फक्त पोच देण्याची गरज आहे. डॉ. दोशींना जी मागणी आली, त्याची अशी पूर्तता झाली याचे ’शहरी शेतीच्या जनका’ला खूप मोठे समाधान लाभले आहे, असे म्हटले तर उचित ठरेल. या महनीय व्यक्तीचे 19 मार्च 2007 रोज निधन झाले.
लेखक शहरी शेती ज्येष्ठ अभ्यासक आहेत.