पतंगे, करंबेळकर, शेलार दोषमुक्त

विवेक मराठी    02-Dec-2022
Total Views |
'साप्ताहिक विवेक'ने ऑक्टोबर २००९मध्ये 'प्रताप वर्दीतील अफजलखानांचे' हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकात या भागात विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचे प्रत्यक्ष त्या स्थानी भेट देऊन केलेले वस्तुस्थितीदर्शक वार्तांकन होते. सांगली, मिरज व इचलकरंजी परिसरांत या विशेषांकाची मोठ्या प्रमाणात विक्री व प्रसार झाला. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी विवेकचे संपादक रमेश पतंगे, मुद्रक-प्रकाशक दिलीप करंबेळकर व या विशेषांकाचे संपादक किरण शेलार यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.
 
vivek
 
मुंबई : २००९ साली मिरज येथील एका सार्वजनिक गणेश उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफझलखान वधाचा देखावा दर्शविला होता. त्या देखाव्याच्या विरोधात तेथील मुस्लीम समाजातील अतिरेकी गटाने दंगलीला सुरुवात केली. मिरज, सांगली, इचलकंरजी भागातील हिंदू समाजात त्या दंगलीची तीव्र प्रतिक्रिया उठली. तेथील पोलीस अधिकार्‍यांनी दंगलखोर समाजावर कारवाई करण्याऐवजी स्वसंरक्षण करणार्‍या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले व तेथील जनमानसात त्याची तीव्र प्रतिक्रिया उठली. तेथील पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता 'साप्ताहिक विवेक'ने ऑक्टोबर २००९मध्ये 'प्रताप वर्दीतील अफजलखानांचे' हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकात या भागात विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचे प्रत्यक्ष त्या स्थानी भेट देऊन केलेले वस्तुस्थितीदर्शक वार्तांकन होते. सांगली, मिरज व इचलकरंजी परिसरांत या विशेषांकाची मोठ्या प्रमाणात विक्री व प्रसार झाला. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी विवेकचे संपादक रमेश पतंगे, मुद्रक-प्रकाशक दिलीप करंबेळकर व या विशेषांकाचे संपादक किरण शेलार यांच्यावर भारतीय दंड विधानाचे कलम १५३ (अ) (जातीय विद्वेष निर्माण करणे) व कलम ५०५ (सरकारविरुद्ध विद्रोह करायला चिथावणी देणे) या गुन्ह्यांखाली इचलकरंजी न्यायालयात ५ ऑगस्ट २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले.
 
 
 
या कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याकरिता गृह खात्याची अनुमती घ्यावी लागते व त्याचबरोबर या कायद्याखाली अधिकाधिक तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे भारतीय दंड विधानाच्या ४६८ (१) (क)नुसार कथित गुन्हा घडल्यानंतर तीन वर्षांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. परंतु या खटल्याबाबत या दोन्ही तरतुदी पोलिसांनी पुर्‍या केल्या नव्हत्या. त्यामुळे हे आरोपपत्र रद्द करावे असा युक्तिवाद इचलकरंजी न्यायालयात केला. परंतु तो न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. त्यामुळे तेथील सत्र न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली व इचलकरंजीचे मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नेर्लेकर यांनी हे आरोपपत्र रद्द करून रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर व किरण शेलार यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला. 'विवेक'च्या वतीने इचलकरंजी येथील अ‍ॅड. अक्षय खांडेकर यांनी या खटल्यात युक्तिवाद केला. अ‍ॅड. विनायक भस्मे हे त्यांचे साहाय्यक होते.