‘शोगिनी’चे जनक विजय मुकुंद उर्फ दादासाहेब आठवले

विवेक मराठी    23-Dec-2022
Total Views |
@चित्रा नातू
 इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील पी.सी.बी. (Printed Circuit Board)) निर्मिती करणार्‍या भारतातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक म्हणजे ‘शोगिनी टेक्नोआर्ट्स प्रा.लि.’ ही कंपनी. पुणे-सातारा द्रुतगती महामार्गावर शिवापूरमध्ये शोगिनीचा भव्य कारखाना प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रकल्पाचे जनक विजय मुकुंद उर्फ दादासाहेब आठवले यांचे 13 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

vivek
 
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या आणि पुढे हजारो कुटुंबांचे पोट भरणारा उद्योग उभा करणार्‍या विजय मुकुंद आठवले यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचे शिवधनुष्य त्यांनी अगदी लीलया पेलले. 01 जानेवारी 1946 रोजी त्यांचा जन्म झाला. विजय एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. संघ स्वयंसेवक असणार्‍या वडलांच्या आणि काकांच्या संस्कारांमध्ये त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे शिस्त, काटेकोरपणा, व्यावहारिक रोखठोकपणा या गुणांचे बाळकडूच त्यांना मिळाले. वडील आणि काका पुण्यातील सदाशिव पेठेत टेलरिंगचा व्यवसाय करत होते. म्हणावी तशी आर्थिक संपन्नता नव्हती. विजय यांचे शालेय शिक्षण नू.म.वि.मध्ये झाले. प्रत्येक वर्षी उत्तम गुण मिळवत विजय यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. मुलाच्या उच्चशिक्षणासाठी लागणारा पैसा मुकुंदरावांच्या हाती नव्हता, पण तरीही मुलाने स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचाराने वडलांनी विजय यांना मेकॅनिकल ड्राफ्ट्समनच्या दोन वर्षांच्या कोर्सला घातले. 1964 साली विजय यांनी वाडिया कॉलेजमधून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर लगेचच जे.एन. मार्शल कंपनीत साठ रुपये महिना पगारावर ते नोकरीत रुजू झाले. रोज साधारण 15 किलोमीटर सायकल चालवत ते कंपनीत ये-जा करत असत. पण त्याचा त्यांना कधीच त्रास वाटला नाही, कारण कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करणार्‍या वडलांकडे आणि काकांकडे पाहात ते लहानाचे मोठे झालेले होते. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचे तर कष्टांना पर्याय नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
 
 
 
पुढे अंबरनाथमधल्या ‘टॅक मशिनरी’ या क्रेन बनवणार्‍या कंपनीमध्ये 180 रुपये पगारावर आणि त्यानंतर 67-68 साली ठाण्यातल्या ‘व्होल्टास’ या मोठ्या कंपनीत 650 रुपये पगारावर काम करायला त्यांनी सुरुवात केली. 28 मे 1968 रोजी शोभा भिडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर कर्जतमध्ये भाड्याच्या घरात या नवदांपत्याने वडील मुकुंद आठवले यांना सोबत घेऊनच आपला संसार थाटला. विजय आठवले यांच्या पत्नी आणि वडील विजय यांच्या यशस्वी घोडदौडीचे साक्षीदार होते. प्रतिकूल काळात विजय यांना पत्नीची आणि वडलांची खंबीर साथ लाभली, म्हणूनच व्यावसायिक आणि आर्थिक संपन्नता अनुभवत असताना ते नेहमीच वडील आणि पत्नी यांच्याबद्दल शेवटपर्यंत कृतज्ञ राहिले.
 
 
 
सकाळी सव्वासहापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत ते नोकरीसाठी घराबाहेर असत. रोज कर्जत-ठाणे असा लोकल प्रवास करत होते. नीता आणि गीता या दोन मुलींच्या जन्मानंतरही हा दिनक्रम असाच सुरू राहिला. या काळात पत्नीने कुठल्याही प्रकारची तक्रार न करता दिलेली साथ त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची ठरली.
 
 
shogini
 
2005च्या भूकंपबाधितांसाठी सकाळ रिलीफ फंडाला मदतनिधी देताना. 
 
 
सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असताना नियतीच्या मनात काही निराळेच होते. काही कारणाने ‘व्होल्टास’मधली नोकरी त्यांना गमवावी लागली आणि आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले. या काळात पत्नी शोभा यांनी कोर्टामध्ये स्टेनो टायपिस्ट म्हणून नोकरी केली आणि कुटुंबाची आर्थिक बाजू तोलून धरली. दरम्यान विजय पुन्हा पुण्यात आले आणि भाड्याच्या पत्र्याच्या घरात राहू लागले. नोकरी सोडून परतलेल्या विजय यांना जे.एन. मार्शलमधील तत्कालीन सहकार्‍यांकडून कंपनीत पुन्हा येण्याविषयी विचारणा करण्यात आली. व्होल्टासमधून शिफारस पत्र घेऊन विजय आठवले पुन्हा एकदा जे.एन. मार्शल कंपनीत रुजू झाले. या वेळी मात्र इलेक्ट्रॉनिक आर्टवर्कचे काम आणि महिना 1700 रुपये पगार त्यांना मिळू लागला. त्यानंतर त्यांच्या पत्नी कोर्टातली नोकरी सोडून पुण्याला आल्या आणि संसाराची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली.
 
 
आजवर काम करत असलेल्या प्रत्येक ठिकाणी केवळ पगारासाठी काम न करता ते स्वत: काहीतरी शिकत होते, विकसित होत होते. मोठा उद्योग उभारण्याचे उरी बाळगलेले स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. जे.एन. मार्शलमध्ये काम करत असताना विजय आठवले यांनी पीसीबी डिझाइनच्या क्षेत्रातील बारकावे आत्मसात केले. विजय यांच्या कामातील कौशल्य, चिकाटी, प्रामाणिकपणा त्यांचे वरिष्ठ श्री. गुजराथीसाहेबांच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी पी.सी.बी.चे पायोनिअर रवी ओक यांच्याशी विजय यांचा परिचय करून दिला. विजय यांच्या कामातील नेटकेपणा पाहून रवी ओक यांनीही त्यांचे कौतुक केले आणि आपल्या कंपनीसाठी अर्ध वेळ काम करण्यास सांगितले. हीच घटना विजय यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरली.
 
 
 
विजय यांच्या कामावर खूश होऊन श्री. शाह यांनी ‘इलेक्ट्रोटेक’ या सात-आठ कर्मचारी असलेल्या त्यांच्या नव्या कंपनीत 2000 रुपये पगारावर मॅनेजर पदावर काम करण्याविषयी विजय यांना विचारले. सकाळी 6 ते रात्री 8 असे 14-14 तास काम करताना विजय यांनी पी.सी.बी. निर्मितीतील सर्व प्रकारची प्राथमिक माहिती समजून घेतली. आर्टवर्क आणि डिझाइन यातील ज्ञान तर त्यांना होतेच. पी.सी.बी.च्या सर्व ग्राहकांशी जवळून परिचय झालेलाच होता. ‘इलेक्ट्रोटेक’चे सर्व ग्राहक विजय आठवले यांच्याकडूनच काम करून घेण्यासाठी आग्रही होते. ग्राहकांना खूश ठेवायचे, तर प्रामाणिकपणा, चिकाटी, कौशल्य यांच्याबरोबरीने जास्तीत जास्त अचूक आणि वेळेत काम पूर्ण करून देणे गरजेचे आहे, याची विजय आठवले यांना जाणीव होती. या गुणांमुळे ग्राहकप्रिय झालेल्या विजय आठवले यांनी शाह यांच्या व्यवसायात भागीदारी करावी, असेही परिचयातील ग्राहकांनी त्यांना सुचवून पाहिले. परंतु त्यासाठी शाहांकडून 50,000 रुपयांची मागणी झाल्यावर मात्र विजय यांनी तो विचार कृतीत आणला नाही. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कामातील कौशल्याबरोबरच आवश्यक असणारी व्यावसायिक परिपक्वताही त्यांच्यात विकसित होत होती.
 
shogini
 
जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचा पुरस्कार स्वीकारताना विजय आठवले 
 
 
पुढे ‘इलेक्ट्रोटेक’च्या ग्राहकांपैकी अनेक जण विजय आठवले यांना वैयक्तिकरित्या कामे देऊ लागले. घरीच मोठ्या प्रमाणावर काम येऊ लागल्यामुळे आठवले यांनी शाहांकडील नोकरीचा राजीनामा दिला. घरी सुरू केलेल्या कामात पत्नी आणि वडलांची मदत मिळू लागली. आठवले यांची चुलत बहीण आणि मेहुणी याही अगदी नियमितपणे कामाला येऊ लागल्या. काम वाढत होते. जागा अपुरी पडत होती. एका मित्राच्या ओळखीतून शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत त्यांना मोठी जागा उपलब्ध झाली. त्या जागेत पत्र्याची शेड टाकून कामाला सुरुवात झाली. ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड’ बनवण्याच्या या छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या नव्या व्यवसायाचे ‘शोगिनी’ असे नामकरण करण्यात आले. अखंड कार्यमग्न असणारे विजय आठवले तितकेच कुटुंबवत्सलही होते. पत्नी शोभा, दोन मुली - गीता आणि नीता यांच्या अद्याक्षरांना विजय आठवले यांनी कंपनीच्या नावात स्थान दिले. विशिष्ट नाव धारण करून स्वतंत्रपणे नव्या व्यवसायाला सुरुवात झाली आणि आठवले कुटुंब नव्या पेठेतून शिंदे आळीत वास्तव्यास आले. हळूहळू काम वाढत होते, तशी कामगार संख्याही वाढत होती. पुढील वर्षभरातच आणखी मोठ्या जागेची गरज भासू लागली. शिळीमकर नावाच्या एका मित्राच्या ओळखीतून शिवापूरमध्ये तीस हजार रुपये एकर याप्रमाणे विजय यांना पुणे-सातारा महामार्गालगत दोन एकरची जागा मिळाली. 1982 साली या जागेत ‘शोगिनी’ मोठ्या दिमाखात उभी राहिली ती आजतागायत. आज सत्तावीस एकरच्या जागेत 350 कोटीची उलाढाल करणारी एक नावाजलेली कंपनी म्हणून ‘शोगिनी’ला जागतिक दर्जा लाभलेला आहे. आजघडीला टेल्को, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑडी, वोक्सवॅगन, फियाट, फ्लॅश व्हेरॉक, बजाज, टी.व्ही.एस. स्टार अशा बड्या उद्योग कंपन्या या शोगिनीच्या ग्राहक आहेत.
 
 
गेल्या 40 वर्षांत शोगिनीने प्रतिदिन 1600 चौ.मीटर काम करण्याची क्षमता विकसित केलेली आहे.
 
 
संगणक प्रणालीचा उदय झाला नव्हता, अशा काळात हस्तकौशल्याच्या बळावर सुरू केलेल्या पीसीबी निर्मितीच्या कामात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. कामातील गुणवत्ता कायम राखून दर्जेदार उत्पादन देणार्‍या शोगिनीने जागतिक बाजारपेठेतही नावलौकिक मिळवलेला आहे. शोगिनीच्या आजपर्यंतच्या यशाचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे.
 
 
व्यवसायातील तांत्रिक गोष्टींची जाण आणि पुढील पिढीने त्या व्यवसायात दाखवलेला रस या दोन गोष्टी व्यवसाय यशस्वी होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, असे विजय आठवले यांचे ठाम प्रतिपादन होते. म्हणूनच त्यांनी कुटुंबातील अनेकांना आपल्या व्यवसायात अतिशय प्रेमाने सामावून घेतले आणि खूप विश्वासाने महत्त्वाच्या पदांच्या जबाबदार्‍याही देऊ केल्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्या नीता या बी.कॉम. आहेत, तर जावई पं. विजय कोपरकर हे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. दुसर्‍या कन्या गीता या बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर आहेत. कंपनीच्या सर्व डिझाइन, प्री-इंजीनियरिंग आणि व्यवस्थापकीय कामात त्या लक्ष घालत आहेत, तर जावई अभिजित ताम्हनकर हे बी.ई. (कॉम्प्युटर) पदवीधर असून सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. ते शोगिनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अजिंक्य ताम्हनकर मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेऊन शोगिनीमध्येच काम करत आहे.
 
 
 
सीमा या त्यांच्या तिसर्‍या मुलीचा जन्म पुण्यात झाला. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर त्या गृहिणी म्हणून कार्यरत आहेत, तर जावई हृषीकेश मोडक हे बी.ई. (प्रॉडक्शन) असून, शोगिनीच्या प्रॉडक्शन विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
 
विजय यांचे चुलत भाऊ विनायक उर्फ सतीश आठवले तर 1983पासून 2017पर्यंत शोगिनीमध्ये विपणन विभागात (मार्केटिंग) व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. विजय आठवले यांचा पुतण्या सचिन विनायक आठवले यांनीसुद्धा एम.सी.एम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शोगिनीमध्ये संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ग्राहकांच्या संतोषासाठी नेहमीच आग्रही असणार्‍या विजय आठवले यांनी कामगारांच्या आनंदाचा, स्वास्थ्याचा विचारही वेळोवेळी केला. त्यांनी शोगिनीच्या कर्मचार्‍यांसाठी कंपनीमध्येच जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यांना सर्व कामगारांच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती असायची. कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन, त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. विशेषत: महिलांना सुरक्षित वाटेल असे कंपनीचे वातावरण असावे, यावर त्यांचा कटाक्ष असे. परिणामी कामगारवर्ग ‘शोगिनी’शी आत्मीयतेने जोडला गेला.
 
 
गुरुदेव शंकर अभ्यंकर, ओशो, स्वामी स्वरूपानंद, सद्गुरू वामनराव पै यांची प्रवचने ऐकणे, मेडिटेशन करणे आणि सातत्याने कार्यमग्न राहणे हे त्यांचे जणू छंदच होते. स्वकर्तृत्वावर मोठे झाल्यावर आभाळाला हात टेकत असताना, जमिनीवरचे पाय सुटू न देण्याचे भान त्यांनी कायम राखले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मोठेपणाचा बडेजाव कुठेही दिसत नसे, त्यामुळेच आपल्या कार्यकाळात त्यांनी असंख्य माणसे जोडली. अडल्या-नडल्यांच्या मदतीसाठी दादासाहेबांचा हात कायम पुढे असे.
 
 
आपल्याबरोबरच सहकार्‍यांनाही पुढे घेऊन जाणारे दादासाहेब सामाजिक बांधिलकी जपण्यातही कधी मागे नव्हते. आर्थिक परिस्थिती जशी सुधारली, तसे सत्पात्री दानही सहजी होऊ लागले. बनेश्वरजवळ माळेगावात दोन एकरची जागा घेऊन, त्यांनी तिथे ‘विजय मुकुंद आठवले विद्यालया,ची स्थापना केली. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी ही शाळा उत्तम नागरिक घडवत आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण आश्रमालाही त्यांनी वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले. आंबाजोगाई येथे भक्तनिवासाची खोली बांधण्यासाठी, आजूबाजूच्या गावात रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी, गावातील सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडाविषयक उपक्रमांसाठी त्यांनी आर्थसाहाय्य देऊ केले. 2006मध्ये दक्षिण महाराष्ट्रातील त्सुनामीग्रस्तांना त्यांनी सकाळ रिलीफ फंडातून 2 लाख रुपयांची, तर केसरी रिलीफ फंडातून 1.50 लाख रुपयांची मदत केली. अहमदनगर येथील स्नेहालय संस्था, 1998-99मधील कारगिल युद्धातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, 1993मध्ये लातूरमधील किल्लारी भूकंपग्रस्त अशा अनेक ठिकाणी गरजेच्या वेळी ’शोगिनी’तर्फे आर्थिक मदत पोहोचलेली आहे. 2018 साली सांगली-कोल्हापुरात झालेल्या महापुरानंतर मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 51 लाखांचा निधी त्यांनी देऊ केला. वनवासी कल्याण आश्रम, श्रीरामदास स्वामी संस्थान (सज्जनगड), स्पंदन प्रतिष्ठान (पुणे), नूमविय 62 माजी विद्यार्थी संघ, विंझर येथील समाज शिक्षण मंडळ, शहापूर-बेळगाव येथील सरस्वती वाचनालय, श्रीरामजन्मभूमी (अयोध्या), भारतीय संस्कृती संशोधन संस्था (मोतीबाग, पुणे) क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय (भोर, पुणे), फ्लाइंग बर्ड एज्युकेशन फाउंडेशन (पुणे) अशा अनेकविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी भरघोस आर्थिक सहकार्य केले.
 
 
पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा देणार्‍या विजय आठवले यांच्या ‘शोगिनी’ला आतापर्यंत विविध पुरस्कार लाभले आहेत. आयकर विभागातर्फे देण्यात येणारा टॅक्स सन्मान पुरस्कार (1998-99), आंत्रप्रूनर इंटरनॅशनलतर्फे देण्यात येणारा बेस्ट आंत्रप्रूनर अ‍ॅवॉर्ड (2008), जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणारा ‘बेस्ट इंडस्ट्रियालिस्ट’चे द्वितीय पारितोषिक (2001) अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या शोगिनी टेक्नोआर्ट्स प्रा.लि.ची ‘विजय’गाथा नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक ठरणारी आहे.
 
 
सन 1982मध्ये उद्योगधंद्यांच्या दृष्टीने फारसे प्रगत नसलेल्या खेड शिवापूरसारख्या भागात येऊन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून पुढील 40 वर्षांत त्याचे स्वरूप प्रिंटेड सर्किट बोर्ड उत्पादनातील जागतिक दर्जा मिळवण्यापर्यंत उंचावणे हे केवळ दादासाहेबांसारख्या द्रष्टा, ध्येयवेडाच करू शकतो. गेले वर्षभर तब्येत साथ देत नसतानाही क्षणाची उसंत न घेता अखेरच्या श्वासापर्यंत, मृत्यूलाही हुलकावण्या देत शेवटपर्यंत त्यांनी शोगिनीचाच विचार प्रथमस्थानी ठेवला. अशा शिवगंगा खोर्‍यातील एका ध्येयासक्त, मनस्वी युगपुरुषाला आमचे कोटी कोटी प्रणाम! ध्येयाप्रती जाण्याचा त्यांनी दिलेला हा वारसा ‘उतणार नाही, मातणार नाही’ या उक्तीप्रमाणे सर्वांनी जपावा, हीच त्यांना श्रद्धांजली.