श्रीअरविंदांच्या दृष्टीने ‘अथर्वशीर्ष अभ्यासक्रम’

विवेक मराठी    03-Dec-2022
Total Views |
@राजस वैशंपायन । 8425084587
 
 
vivek

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अथर्वशीर्षाचा अभ्यास कसा करावा याबाबत श्रीअरविंदांनी मांडलेल्या मौलिक विचारांचा वेध घेणारा लेख...
 
 
द्धीची देवता म्हणजे श्री गणेश. गुप्तपूर्व काळापासून, तसेच इसवीसनाच्या 5व्या ते 6व्या शतकापासून श्री गणेशाच्या यक्ष आणि दैवी रूपातील आराधनेची पुरातत्त्वीय साधने उपलब्ध आहेत. ‘गाणपत्य’ संप्रदाय श्री गणेशाच्या पूजन, साधना, आराधना, त्याभोवती गुंफलेल्या कथा, साहित्य, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म अशा अंगांनी इसवीसनाच्या सातव्या शतकापासून पुढे विकसित झाला. आधी ‘विघ्नकर्ता’ ते ‘विघ्नहर्ता’ असे श्री गणेशाच्या दैवी कल्पनेचे स्थित्यंतर आपण इतिहासात पाहतो.
 
 
 
‘गणपती’ ही ज्यांची प्रमुख उपास्य देवता, सगुण ब्रह्मरूपात, परब्रह्म स्वरूपात ज्यांनी श्री गणेशाचे स्तवन केले, त्यांचा हा गाणपत्य संप्रदाय. आधीचा यक्षरूपी विघ्नकर्ता विनायक आणि त्यापुढे तंत्रमार्गाने बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही विचारविश्वांत विकसित श्री गणपती आज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत बनला आहे. गाणपत्य संप्रदायात सगुण ब्रह्म, परब्रह्म स्वरूपात ज्या उपनिषदात श्री गणेशाचे स्तवन केले गेले, ते म्हणजे श्री गणपती उपनिषद. ‘अथर्वशीर्ष’ याच उपनिषदाचा आणि गाणपत्य धर्म-दर्शनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग. सच्चिदानंदस्वरूप, कालातीत, गुणातीत, परब्रह्मस्वरूप असे श्री गणेशाचे स्वरूप यात वर्णिले असून, सगुण-साकार आणि निर्गुण-निराकार अशी श्री गणेशाची दोन्ही रूपे यात येतात.
 
 
 
अथर्वशीर्षाचे नियमित पठण केल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता, बुद्धीची कुशाग्रता, वाचा अशा अनेक गोष्टींचा व्यक्तीमध्ये विकास होतो अशी आपली श्रद्धा आहे. अथर्वशीर्षाचे तत्त्वज्ञान आणि त्यातील आध्यात्मिक ज्ञान यांचे सातत्याने मनन आणि निदिध्यासन करून माणसाच्या व्यक्तित्त्वात व दृष्टीकोनात आमूलाग्र बदल घडून येतो. ‘अथर्वशीर्ष’ व त्याचे पाठ, त्यामागील तत्त्वज्ञान व अध्यात्म, त्या अनुषंगाने गणपती आणि गाणपत्य संप्रदाय यांचा इतिहास व विकास याची लोकांना सखोल ओळख होण्यासाठी त्यावर अधिकाधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
 
 
vivek
 
पण आपण इतक्यावरच थांबायचे का? मंत्र, स्तोत्र, उपनिषदे, ऋचा, वैदिक सूक्ते यांचे पठण करून व्यक्तिमत्त्व विकास, भौतिक विकास, आध्यात्मिक उन्नती, नवी तात्त्विक दृष्टी माणसाला प्राप्त करून देणे इतकाच या रचनांमागील उद्देश होता का? यावर सखोल विचार करून नव्या काळाला सुसंगत अभ्यासपद्धती विकसित करू शकतो का? त्यातून मानवजातीच्या आणि विश्वाच्या विविध क्रिया, प्रक्रिया यांचा थांग लावता येईल? अशा प्रकारच्या वैचारिक आणि संशोधनात्मक अभ्यासप्रणालींचा विकास करता येईल का? असे प्रश्न श्रीअरविंद त्यांच्या ‘सिक्रेट ऑफ द वेदाज’ आणि ‘हाइम्स टू द मिस्टिक फायर’ या ग्रंथांत उपस्थित करतात.
वरील दृष्टीने विचार करताना अरविंद नव्या मानसशास्त्रीय अभ्यासपद्धतीची मांडणी करतात. या मांडणीत मानसशास्त्रीय म्हणजे ‘सायकोलॉजी’ इतकीच अभ्यासाची मर्यादा नाही. ‘मनस्तत्त्व’ या दार्शनिक संकल्पनेच्या अंगाने ते विचार करतात. ‘साइकी किंवा साइक’ (Psyche)पेक्षा मनस्तत्त्व, ‘चित्’ किंवा चैतन्याच्या अधिक जवळचे तत्त्व म्हणून दर्शनात अंगीकारलेले अरविंद नमूद करतात. ‘साईकी किंवा साईक’ भाव-भावना, मानसिक क्रिया आणि प्रतिक्रिया यांना जवळची असते. त्यापुढे मनस्तत्त्व आणि तिथून पुढे शुद्ध चैतन्याकडे प्रवास अशी वैकासिक मांडणी अरविंद करतात.
 
 
 
दैवी प्रज्ञा आणि प्रतिभेतून ऋषी-मुनींना रचना स्फुरल्या, दृग्गोचर झाल्या, श्रुत झाल्या. पण हे स्फुरण कोणा बहिस्थ देवतेच्या, परमतत्त्वाच्या कृपेने झाले असे अरविंद मानत नाहीत. मनस्तत्त्वाच्या प्रगत अवस्थेत अंत:स्थ, शुद्ध चिरंतन तत्त्वाचा साक्षात्कार होऊन या रचना साकार झाल्या. चिरंतनातून स्फुरलेल्या असल्याने त्यांचा कोणी कर्ता नाही किंवा त्यांची निर्मितीही नाही. या रचना शाश्वत आहेत.
 
 
 
पण मग मुळात या रचना कशासाठी? काही देवी-देवता, नैसर्गिक शक्ती यांना प्रसन्न करण्यासाठी इतकी उठाठेव कशाला करायला हवी? त्यासाठी तप, योग आदी साधने वापरून स्वत:च्या चित्ताची उन्नत अवस्था कशाला प्राप्त करून घ्यायला हवी? या प्रश्नांची उत्तरे अरविंदांना सांख्य दर्शनात मिळतात.
 
पुरुष आणि प्रकृती अशी मूळ रचना संख्या दर्शनात दिसते. शाश्वत, चल, गतिमान, परिणत होणारे, सृष्टीच्या मुळाशी असलेले मूलभूत तत्त्व म्हणजे प्रकृती. मूळ तत्त्वातून आवतीभोवती दिसणार्‍या, अनुभवाला येणार्‍या सृष्टीची उत्क्रांती होते. ही उत्क्रांती काही अपघात नाही. त्यामागे प्रगल्भ असे बुद्धितत्त्व कार्यशील असते. ज्ञान, क्रिया आणि इच्छा या तिन्ही मार्गांनी प्रकृतीमधून बुद्धितत्त्व प्रकट होते. यालाच ‘महत्’ असे संबोधले आहे. या बुद्धीचे शाश्वत प्रतीक म्हणजे श्रीगणेश.
  
 
वैदिक वाङ्मयाच्या स्फूर्तीमागे अरविंद चार महत्त्वाच्या मानसिक-बौद्धिक प्रक्रिया असल्याचे नमूद करतात. या प्रक्रिया, सृष्टीच्या तळाशी असलेल्या मूलभूत बुद्धितत्त्वापर्यंत पोहोचण्याची धडपड दर्शवतात. ज्यातून निसर्गाची, त्याच्या विशिष्ट प्रक्रिया, त्रिकाल यांची रचना उदयास आली, अशी ‘प्रकट आणि गुह्य बुद्धी’ मानवाला आत्मसात करायची चिरंतन इच्छा आहे.
 
 
 
भवताल, स्वत:, आपला समूह, समाज या वस्तुस्थितींच्या मुळाशी असणारे असामान्य बुद्धितत्त्व समजून घेऊन संपूर्ण रचनेची उकल करण्यासाठी माणूस अनादी काळापासून धडपडत आहे. याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञ ‘फर्स्ट प्रिन्सिपल’ म्हणतात. आपल्या दर्शनांनी या महत्-बुद्धीला ‘विज्ञान’ म्हटले आहे. भौतिकशास्त्र - मग ते न्यूटनचे असो की वैशेषिकांचे, एखाद्या धर्माचे साहित्य असो की दिव्य वेद वाङ्मय, त्या त्या काळानुसार आणि बौद्धिक व मनस्तत्त्वाच्या विकासानुसार अवगत झालेले ज्ञानच प्रकट करते.
मनस्तत्त्वाशी निगडित चार महत्त्वाच्या प्रक्रिया म्हणजे प्रेरणा, विवेक, अंत:प्रज्ञा आणि साक्षात्कार. निरीक्षणे, माहिती, अनुभव, इच्छा अशा घटकांनी प्रेरणांचे विश्व संपन्न होते. त्यातील उत्कट गोष्टींनी आपल्या मानसिक प्रेरणा आकार घेत असतात. यावर सातत्याने विचार, प्रयोग, अभ्यास, छाननी, अध्ययन करून सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, श्रेयस काय आणि प्रेयस काय यासारख्या तर्कशुद्ध विचार-अभ्यासप्रक्रियेतून विवेक आकार घेत असतो. जी ध्येये आणि अभ्यास विश्वाच्या कल्याणासाठी माणसाला क्रियाशील करतात, त्यातून माणसाची सुप्त अंत:प्रज्ञा जागृत होते. अंत:प्रज्ञा, इच्छा, ज्ञान आणि कर्म या अंगांनी शुद्ध चैतन्याकडे माणसाचा प्रवास होत असताना साक्षात्काराचे दरवाजे उघडे होतात. सिद्धान्त, प्रमेय, साहित्य, कलाकृती अशा विविध अंगांनी साक्षात्कार प्रकट होतो. हे प्रकटन फक्त व्यक्तीपुरते मर्यादित न राहता त्याचा प्रसार होऊन संपूर्ण मानवजातीची बौद्धिक व वैचारिक उत्क्रांती होते.
 
 
 
वैदिक ऋचा, उपनिषदे, मंत्र, स्तोत्र यांची स्फूर्ती या मार्गाने झाल्याचा प्रगल्भ सिद्धान्त श्रीअरविंद मांडतात. वैदिक ऋचा, उपनिषदे यांचा अर्थ लावण्याची वेगळी ‘मनस्तत्त्व’ अधिष्ठित मानसशास्त्रीय निर्णयपद्धती ते विकसित करतात. देवता आणि त्यातील मूलभूत शक्ती, तत्त्वे, अंत:स्थ सत्य आणि परम ध्येय यांच्या प्रतीकरूपात साहित्यात प्रकट होतात. दिव्यत्व, सत्य, अमरत्व, स्वयंप्रकाश, शक्ती, सौंदर्य ही आपली अंत:स्थ तत्त्वे व ध्येये आहेत. ऋषींच्या रचनांचा अभ्यास या पद्धतीने व्हायला हवा, असे अरविंदांचे म्हणणे आहे.
 
 
 
विशिष्ट काळात माणसाने भौतिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आघाड्यांवर जी प्रगती झालेली असते आणि ज्या ध्येयाकडे झेप घ्यायची असते, या सर्वाचा सारभूत परिपोष वैदिक ऋचा, उपनिषद यांसारख्या मौलिक रचनांमध्ये असतो. त्यातील प्रतीके भौतिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्व पातळ्यांवर समजून घेणे आवश्यक असते.
 
 
 
अशा प्रकारचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की समोर असलेली रचना विशिष्ट ऐतिहासिक कालखंडात बद्ध आहे. त्यामुळे अभ्यास म्हणजे पाठ करणे आणि भाषांतर समजून घेणे नाही. त्या रचनेवर काळाप्रमाणे नव्याने संस्कार होणे आवश्यक असते. यातून भाष्य-परंपरा निर्माण होते.
 
 
अरविंदांच्या मते ऋचा, उपनिषदे यांवर कालसुसंगत भाष्य होणे आवश्यक आहे. त्यात मानवाने केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे, बदलेल्या सामाजिक-सांस्कृतिक परिघांचे पडसाद उमटले पाहिजेत. आपल्या चिरंतन ध्येयवादाची नव्या परिभाषेत पुनर्मांडणी त्यात झाली पाहिजे. यासाठी ते म्हणतात की आजचे वेद आणि उपनिषदे आजच लिहिली गेली पाहिजेत. महामहोपाध्याय टी. कपाली शास्त्री, महामहोपाध्याय मधुसूदनजी ओझा यांनी या दृष्टीने नवी भाष्ये लिहिली आहेत.
 
 
अथर्वशीर्षाचे पाठ करून अभ्यास करताना त्याकडे विशिष्ट ऐतिहासिक कालखंडात बद्ध रचना म्हणून पाहणे किंवा सर्वच प्रश्नांची उत्तरे यात आहेत या आविर्भावात याचा अभ्यास करणे चुकीचे ठरेल. त्यासाठी नव्या दृष्टींतून ते लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे. ‘अथर्वशीर्ष’ श्रीअरविंदांच्या पद्धतीने अभ्यासले की ते स्तोत्र, स्तवन, आध्यात्मिक सार किंवा पुरातन साहित्य राहत नाही, तो एक चैतन्यपूर्ण साधना-विषय होतो.