महाराष्ट्रात चतुरच्या सहा नव्या प्रजातींचा शोध...

विवेक मराठी    03-Dec-2022
Total Views |
@डॉ. दत्तप्रसाद सावंत
 
chatur
आंबोली आणि आजूबाजूच्या परिसरात चतुरांचे आणि टाचण्यांचे फोटो काढायला सुरुवात केली होती. चतुर आणि टाचण्या (’ओडोनेट’) यांच्या अद्भुत विश्वामुळे हेमंत आणि मी, आम्ही दोघांनी या आवडीचे रूपांतर एका शोधमोहिमेत केले. आंबोलीतील निसर्ग अभ्यासक राकेश देऊलकर, अभिषेक नार्वेकर आणि निखिल गायतोंडे हेसुद्धा सामील झाले. सलग तीन वर्षे आंबोली, चौकुळ, नेने आणि पारपोली हा परिसर पिंजून काढल्यावर आम्हाला अनेक आश्चर्यकारक चतुर आणि टाचण्या मिळाल्या. या सर्वांची परिणती एका मोठ्या शोधनिबंधांमध्ये झाली, जो नोव्हेंबर 2022मध्ये ’जर्नल ऑफ थ्रेटण्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. आंबोली परिसरातून तब्बल 93 प्रजातींची नोंद यात करण्यात आली. त्यापैकी 6 प्रजाती महाराष्ट्र राज्यात प्रथमच आढळून आल्या.
 

chatur 
डॉ. दत्तप्रसाद सावंत
। 8793839148
  
जून महिना उजाडला, तरी आंबोलीमध्ये पावसाने जोर पकडला नव्हता. पण चतुर आणि टाचण्या आंबोलीच्या झर्‍यांमध्ये मोठ्या संख्येने अवतरल्या होत्या. हेमंत ओगले, त्यांचा मुलगा सृजन आणि राकेश देऊलकर रोज बाहेर पडत आणि चौकुळच्या जंगलात चतुर शोधायला जात. रोज नवनवीन प्रकारचे चतुर आणि टाचण्या शोधताना त्यांना काळ्या-पिवळ्या रंगाचा एक छोटा ’क्लबटेल’ चतुर दिसला. एक एक करता करता त्याच्यासारखे शेकडो चतुर ’जांभळकोंड’ झर्‍याच्या आसपास उडताना दिसू लागले. हेमंत आणि राकेश दोघांना हा चतुर वेगळाच वाटला. तो चतुर आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्याच चतुराशी जुळत नव्हता. हेमंत यांनी मला त्या चतुराचा फोटो पाठवला. फोटो पाहून चतुर कोणता आहे हे ओळखता येत नव्हते, त्यामुळे मी त्यांना तो चतुर पकडण्याचा सल्ला दिला. लगोलग हेमंतनी चतुराचे नमुने पकडून माझ्याकडे पाठवले. ’नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’चे शास्त्रज्ञ आणि कीटक संशोधक शंतनू जोशी यांनी त्या नमुन्यांचे बारकाईने विश्लेषण केले. शरीरशास्त्राच्या आणि आकारशास्त्राच्या आधारे तो चतुर इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध झाले. आता ही सगळी माहिती शास्त्रीय पद्धतीने लिहून त्यावर शोधनिबंध सादर करणे हा यापुढचा अवघड टप्पा होता. शंतनू, हेमंत आणि मी तेही आव्हान पेलले आणि मे 2022मध्ये ’झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा चतुर ’स्पाइनी हॉर्नटेल’ (बर्मागोम्फस चौकुळेन्सिस) या नावाने दिमाखात झळकला.
   

chatur

केवळ दक्षिण भारतात मिळणार्‍या चतुर आणि टाचण्या आपल्या सिंधुदुर्गातही आढळतात, ही गोष्टच रोमांचकारक आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती एकट्या सिंधुदुर्गात सापडतात, ही अभिमानाची बाब आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढेल यात शंका नाही. मात्र हे वैभव टिकवण्यासाठी आंबोलीसारखी जंगले राखण्याची नितांत गरज आहे. पाणथळ जागांचे आणि एरवी निर्जन वाटणार्‍या सड्यांचे संवर्धनही आवश्यक आहे.
  
ज्या शोधमोहिमेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा नवा चतुर मिळाला, ती शोधमोहीम 2019 सालापासूनच सुरू झाली होती. आंबोलीचे प्रख्यात निसर्ग संशोधक आणि फूलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले आणि मी (तसा मूळचा देवगडचा, सध्या मुंबईला सायन रुग्णालयात कार्यरत) केवळ आवड म्हणून आंबोली आणि आजूबाजूच्या परिसरात चतुरांचे आणि टाचण्यांचे फोटो काढायला सुरुवात केली होती. चतुर आणि टाचण्या (ज्यांना एकत्रितपणे शास्त्रीय भाषेत ’ओडोनेट’ असे म्हणतात) यांच्या अद्भुत विश्वामुळे हेमंत आणि मी, आम्ही दोघांनी या आवडीचे रूपांतर एका शोधमोहिमेत केले. यात हेमंत यांची पत्नी सोनाली आणि मुलगा सृजन, माझी पत्नी प्रतीक्षा, तसेच आंबोलीतील निसर्ग अभ्यासक राकेश देऊलकर, अभिषेक नार्वेकर आणि निखिल गायतोंडे हेसुद्धा सामील झाले. सलग तीन वर्षे आंबोली, चौकुळ, नेने आणि पारपोली हा परिसर पिंजून काढल्यावर आम्हाला अनेक आश्चर्यकारक चतुर आणि टाचण्या मिळाल्या. या सर्वांची परिणती एका मोठ्या शोधनिबंधांमध्ये झाली, जो नोव्हेंबर 2022मध्ये ’जर्नल ऑफ थ्रेटण्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. आंबोली परिसरातून तब्बल 93 प्रजातींची नोंद यात करण्यात आली. त्यापैकी 6 प्रजाती महाराष्ट्र राज्यात प्रथमच आढळून आल्या.
 

chatur 
 
चतुर आणि टाचण्या या सर्वांना लहानपणापासूनच माहीत असतात. पण या कीटकांवर मोठा अभ्यास होऊ शकतो हे फार थोड्या लोकांना माहीत असते. आकाराने अतिशय लहान असलेले हे कीटक अत्यंत कसलेले शिकारी असतात. जवळपास 95% इतक्या अचूकतेने हे कीटक आपल्या भक्ष्याचा फडशा पाडतात. मात्र आपण त्यांना घाबरायची गरज नाही. कारण यांचे इवलेसे दात आपल्या त्वचेमध्ये जाऊच शकत नाहीत. मनुष्यप्राण्यासाठी चतुर आणि टाचण्या कोणत्याही प्रकारे अपायकारक नाहीत, उलट त्यांची आपल्याला मदतच होते. चतुरांचे आणि टाचण्यांचे जीवनचक्र गोड्या पाण्यावर अवलंबून असते. अर्थात याला काही अपवाद आहेत. सामान्यपणे चतुराची मादी गोड्या पाण्यात अंडी घालते. त्यातून काही दिवसांनी अळी बाहेर येते. चतुराची अळी जन्मत:च उत्तम शिकारी असते. डास आणि चिलटे यांच्या अळ्या खाऊन चतुराची अळी माणसाला फार मोठी मदत करते. इतर अळ्यांचा यथेच्छ फडशा पडल्यावर चतुराची अळी कोषावस्थेत जाते आणि सरतेशेवटी योग्य वेळ साधून त्यातून चतुराचा किंवा टाचणीचा जन्म होतो. जन्मत:च चतुर आणि टाचणी पूर्णपणे विकसित झालेले नसतात. काही तासांच्या अवधीनंतर त्यांना सुंदर रंग येतात आणि पंखात कमालीची ताकद येते. एकदा पंख सुकले आणि उडण्यास सज्ज झाले की हे ’हेलिकॉप्टर्स’ आकाशावर अधिराज्य गाजवू लागतात. कोणत्याही कोनातून पाहता येण्याची आणि चारही पंख वेगेवेगळ्या वेगात फडकवता येण्याची क्षमता, तसेच धारदार जबडे यांच्या मदतीने चतुर आणि टाचण्या क्षणार्धात कोणत्याही कीटकाचा फज्जा उडवू शकतात. रंगीत चतुर आपल्याला खूपच सुंदर आणि मोहक दिसत असले, तरी इतर कीटकांसाठी ते यमदूतच असतात! प्रौढ चतुराचे खाद्य म्हणजे चिलटे, डास, माश्या आणि इतर लहानसहान कीटक. यातही विशेषत: डास खाऊन चतुर मलेरिया, डेंगी यासारख्या धोकादायक रोगांपासून माणसाचे निसर्गत: रक्षण करतात.
 
 
chatur

आमचे मित्र हेमंतदादा, दत्तप्रसाद आणि सृजन यांच्यासोबत चतुर आणि टाचण्या यांच्यामागे फिरायला सुरुवात केली, तेव्हा या फिरण्याचे रूपांतर एका संशोधनात होईल असे अजिबात वाटले नव्हते. निसर्गात समतोल राखण्यात चतुरांचा आणि टाचण्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना जवळून पाहिल्यावरच त्यांच्या अवर्णनीय सौंदर्याची अनुभूती येते. आमचे घरच पश्चिम घाटात असल्याने हा अभ्यास अगदी सहज शक्य झाला. 

chatur

- राकेश महादेव देऊलकर (निसर्ग अभ्यासक)
 
 
 
जीवविविधतेचा खजिना असलेल्या आंबोलीत चतुरांचा आणि टाचण्यांचा योग्य अधिवास असूनही आजपर्यंत काही अपवाद वगळता चतुरांचा आणि टाचण्यांचा सखोल अभ्यास झाला नव्हता. गेल्या काही वर्षांत आंबोली आणि परिसरातून 22 नव्या प्रजातींचा शोध लावला गेला होता. विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे या ठिकाणी दक्षिण पश्चिम घाटातील प्रजातीही आढळून येतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चतुर आणि टाचण्यांच्या यादीमुळे यावर शिक्कामोर्तब झाले. तब्बल 6 प्रजातींचे चतुर आणि टाचण्या यांची महाराष्ट्र राज्यातून पहिल्यांदाच नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात प्रथमच नोंद झालेल्या प्रजाती -
 

chatur 
 
या 6 प्रजातींपैकी रेड-स्पॉट रीड टेल आणि सह्याद्री सेबर-टेल या प्रजाती आय.यू.सी.एन.च्या (IUCNच्या) यादीप्रमाणे ’नष्ट होण्याचा धोका असलेल्या’ प्रजातींमध्ये समाविष्ट आहेत. विशेष म्हणेज या सर्व प्रजाती फक्त पश्चिम घाटातच आढळून येतात. अ‍ॅबनॉर्मल क्लॉ-टेल वगळता इतर 5 प्रजाती फक्त दक्षिण भारतातूनच ज्ञात होत्या. आंबोलीच्या संशोधनामुळे या प्रजातींचे उत्तर-पश्चिम घाटातले, पर्यायाने महाराष्ट्र राज्यातले अस्तित्व अधोरेखित झाले आहे. सह्याद्री सेबर-टेल आणि सॅफ्रन-विंग शॅडो डान्सर या दोन अतिदुर्मीळ प्रजाती केवळ हिरण्यकेशीच्या देवभूमीत मिळाल्या असून आंबोली परिसर हा मोठ्या सस्तन प्राण्यांपासून ते लहान कीटकांसाठी अतिशय योग्य अधिवास असल्याचे पुन्हा एका सप्रमाण सिद्ध झाले आहे.
 
  
आंबोली आणि परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या ‘चेकलिस्ट’ अर्थात प्रजातींची शास्त्रीय वर्गीकरणानुसार यादी प्रकाशित होणे खूप गरजेचे आहे. आतापर्यंत आंबोलीतून 22 विविध प्रकारच्या प्रजाती शोधण्यात आल्या आहेत. परंतु त्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या चेकलिस्ट आंबोलीतून प्रकाशित झालेल्या नाहीत. त्या दृष्टीने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मला वाटते. यासारख्या शास्त्रीय संशोधनाद्वारे इथल्या पर्यावरणाची माहिती जगापर्यंत तर पोहोचतेच, त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी याचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो.

chatur

- हेमंत ओगले, निसर्ग अभ्यासक
 
 
डॉ. आशिष टिपळे आणि डॉ. पंकज कोपर्डे यांच्या 2015 सालच्या संशोधनानुसार महाराष्ट्र राज्यातून चतुरांच्या आणि टाचण्यांच्या 134 प्रजाती ज्ञात होत्या. मात्र यानंतर महाराष्ट्रातून काही नवीन प्रजातींचा शोध लावण्यात आला, तसेच दक्षिण भारतात आढळणार्‍या काही प्रजाती महाराष्ट्रातही दिसून आल्या. त्यामुळे हेमंत ओगले, मी आणि देऊलकर आम्ही महाराष्ट्राची यादी अद्ययावत करून त्यात 25 प्रजातींची पुराव्यांनिशी भर घातली. मात्र शास्त्रीय वर्गीकरणाच्या नियमांनुसार टिपळे आणि कोपर्डे यांनी नोंद केलेल्या यादीतून 15 प्रजाती बाहेर काढल्या. परिणामत: महाराष्ट्राच्या सर्वंकष यादीत एकूण 10 प्रजातींची भर पडली असून सध्या राज्यात 144 प्रजाती आहेत.
 

गोष्ट नर्मदालयाची

https://www.vivekprakashan.in/books/goshta-narmadalaichi/
लेखिका : भारती ठाकूर
भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?

या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.

 
चतुर आणि टाचण्या हे गोड्या पाण्याच्या उत्तम गुणवत्तेचे दर्शक असतात. उदाहरणादाखल काही ’क्लबटेल’ जातीचे चतुर केवळ पर्वतीय प्रदेशातील स्वच्छ पाण्याच्या झर्‍यामध्येच जगू शकतात. पाण्याचे स्रोत कोणत्याही कारणाने दूषित झाले, तरी या चतुरांना तेथे टिकून राहता येत नाही आणि परिणामी त्या जागेतून ते नाहीसे होतात. बेसुमार जंगलतोड, पाणथळ जागी घातले जाणारे भराव, दूषित नद्या, सड्यांवर झालेली अतिक्रमणे यासारख्या असंख्य कारणांमुळे चतुरांचा आणि टाचण्यांचा अधिवास कमी होत चालला आहे. आंबोलीसारख्या छोट्याशा जागेतून एकूण भारताच्या एक पंचमांश प्रजाती आढळून येतात, ही खरे तर फार मोठी गोष्ट आहे आणि ही समृद्ध जीवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अधिवासाचे संवर्धन होणे खूप महत्त्वाचे आहे.