अदानी समूहाला धारावीचे शिवधनुष्य पेलणार का?

विवेक मराठी    03-Dec-2022   
Total Views |
@अभय पालवणकर 
 

mumbai
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विकासक मिळत नाहीत, टेंडर भरत नाहीत, त्यामुळे अनेक वर्षे काम रखडले अखेर अदानी समूहाने टेंडर भरून ते मिळवले आहे. आता खर्‍या अर्थाने प्रकल्पाचा विकास सुरू होणार आहे. खरे तर धारावीचा विस्तार बघता पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणे अवघड काम आहे. तेथील रचना, लोकांचे पुनवर्सन, तेथील लघु व कुटीर उद्योगांना योग्य प्रकारे जागा देणे अशा अनेक समस्या असतीलच. पण सर्व अडचणींवर मात करून जेव्हा 10 ते 12 वर्षांनी सदर प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा निश्चितच अदानी समूह हे रियल इस्टेट क्षेत्रात एक मोठे नाव असेल, यात शंका नाही.  
  
 2004च्या निवडणुकांच्या आगोदर लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशींनी धारावीच्या विकासाची घोषणा केली. धारावीचा विकास... कसे काय शक्य? म्हणून अनेकांनी शंका व्यक्त केली. राजकीय नेत्यांनी थट्टा केली. कारण धारावी झोपडपट्टी म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, गलिच्छ वस्ती, दाटीवाटीने कसेबसे राहणारे लोक. अशा धारावीचा विकास करणे म्हणजे एक आश्चर्यच आहे. पण आज हा प्रकल्प उभा राहणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अदानी समूहाने लिलावात पाच हजार कोटीचे टेंडर मिळवले आहे. त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे दिसते.
 

mumbai 
 
आशिया खंडातील सर्वातमोठी झोपडपट्टी म्हणून जिचे नाव घेतले जाते, ती धारावी.. 557 हेक्टर क्षेत्रफळामध्ये वसलेली ही धारावी.. धारावी म्हणजे अनेक कुटिरोद्योगांची पंढरीच! असंख्य छोटे-मोठे उद्योेग येथे चालत असतात. चर्मकाम, कुंभारकाम, फर्निचर, विविध खाद्यपदार्थ अशा अनेक उद्योगांपासून ते अगदी गावठी दारू, चिकन-मटणपर्यंत संपूर्ण मुंबईत निर्यात केले जाते. दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, एका वेळीस एकच व्यक्ती जाऊ शकेल अशा चिंचोळ्या गल्ल्या, कमालीची अस्वच्छता, गुन्हेगारांंचे अड्डेही येथे आहेत, तर दुसरीकडे अगदी आध्यात्मिक संप्रादायांची छोटी केंद्रेही येथे आहेत. कोणालाही अतिशयोक्ती वाटेल, पण ही येथील वस्तुस्थिती आहे. मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय, दलित, बंगाली, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती आहे. भारत दर्शन घडविणारी धारावी म्हणजे मुंबईतील एक आगळेवेगळेच ठिकाण ठिकाण म्हणता येईल.
 

mumbai 
 
शिवसेनेचे मनोहर जोशी यांचा हा लोकसभा मतदारसंघ! त्यामुळे आपल्या मतदारसंघातील धारावीचा विकास करण्याचे त्यांनी स्वप्न 2004 साली प्रथम दाखवले. आज तबल 18 वर्षे रखडलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळालेली पाहायला मिळत आहे. पुनर्विकासासाठी 2009, 2016 आणि 2018 मध्ये म्हणजे आतापर्यंत एकूण तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कधी निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे निविदा रद्द करण्यात आली. आपल्याकडील कंपन्यांचा थंड प्रतिसाद पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी 2018मध्ये स्वत: दुबईल जाऊन शेखलिंक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी बोलणी केली. त्यांना प्रकल्पासाठी राजीसुद्धा केले. जवळपास असणार्‍या रेल्वेच्या 40 एकर जागेचा प्रश्न सोडवला. पण काही कायदेशीर बाबींमध्ये हे काम रखडले. पण देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दाखवलेला उत्साह कमालीचा होता. आजपर्यंत मुंबई आमची म्हणण्यातच फक्त उत्साह दाखवणारे धारावीसाठी काहीच करू शकले नाहीत. अगदी धारावीतून दोन वेळा काँग्रेस एकनाथ गायकवाड खासदार होते, त्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. अनेक वर्षे त्यांची कन्या आमदार, पण धारावीचा प्रकल्प जैसे थेच होता. अखेर पुन्हा राज्यात भाजपा आणि मित्रपक्षाचे सरकार आल्यानंतर प्रकल्पाला आता एक तगडा विकासक मिळाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होईलच, यात शंका नाही.

mumbai 

mumbai 
 
अदानी समूहाला शिवधनुष्य पेलणार का?
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विकासक मिळत नाहीत, टेंडर भरत नाहीत, त्यामुळे अनेक वर्षे काम रखडले अखेर अदानी समूहाने टेंडर भरून ते मिळवले आहे. आता खर्‍या अर्थाने प्रकल्पाचा विकास सुरू होणार आहे. खरे तर धारावीचा विस्तार बघता पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणे अवघड काम आहे. तेथील रचना, लोकांचे पुनवर्सन, तेथील लघु व कुटीर उद्योगांना योग्य प्रकारे जागा देणे अशा अनेक समस्या असतीलच, त्याचबरोबर कोणताही प्रकल्प पूर्ण करताना स्थानिकांना हाताशी धरून राजकीय पक्षांची होणारी आरेरावी याचा मोठा त्रास होण्याची शक्यता नाकारात येत नाही. पण अडचणी दूर करून अदानी समूहाला प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान असेल ते लघु आणि कुटिरोद्योगांचे पुनवर्सन कसे होईल त्याचे, कारण येथे चर्मकारांचे गाळे, कुंभारांच्या भट्ट्या आहेत, बेकरी व्यावसायिकांच्या भट्टया आहेत. यांचे पुनर्वसन करून त्यांना योग्य प्रकारे जागा देणे आवश्यक आहे. कारण कुटिरोद्योगांचे अर्थकारणही मोठे आहे, त्यातून हजारो लोकांना रोजगारही प्राप्त होत असतो. त्यामुळे जेव्हा या सर्व अडचणींवर मात करून जेव्हा 10 ते 12 वर्षांनी सदर प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा निश्चितच अदानी समूह हे रियल इस्टेट क्षेत्रात एक मोठे नाव असेल, यात शंका नाही.
 

bdd
 
बीडीडी चाळीकडे डोळा, मात्र धारावीकडे कानाडोळा
 
मुंबईतील अत्यंत मोक्याच्या जागी असणार्‍या बीडीडी चाळींच्या विकासाठी आदित्य ठाकरे नेहमीच आग्रही राहिले. अगदी अडीच वर्षांच्या सत्तेच्या कालवधीत आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करून वरळी बीडीडी चाळ विकासाची प्रक्रियासाठी असणार्‍या अडचणी दूर केल्या. पण ज्या धारावीच्या भागातून आपले नेहमीच नगरसेवक निवडून येतात, 2017 च्या निवडणूकीतही शिवसेनेचे 4 नगरसेवक धारावीतून निवडून आले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतसुद्धा ज्या धारावीकरांनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे, अशा धारावीकरांच्या समस्या शिवसेनेने कधीच समजून घेतल्या नाहीत. कोरोना काळातसुद्धा धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी खर्‍या अर्थाने तेथे मदत केली. महापालिकेच्या मदतीअगोदर स्वयंसेवक मदतीसाठी वस्तीवर पोहोचले होते. पण शिवसेनेेने धारावीकरांच्या समस्यांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे.
 
 
पालिका निवडणुका डोळ्यासामोर आल्यावर सदर विकासाचा मुद्दा आला असे विरोधकांना दिसत असले, तरी धारावीकरांचे जीवन सुखकर होणार आहे. भविष्यात येथील जागेचे भाव कोटीमध्ये जातील, याचा सामन्य धारावीकरांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे भाजपा मुंबईच्या विकासासाठी किती कटीबंध आहे हे दिसून येते.