विष्णुसहस्रनामाचा महिमा

विवेक मराठी    30-Dec-2022
Total Views |
@डॉ. धनश्री साने 
विष्णुसहस्रनामांमध्ये जी विश्वव्यापी शक्ती, ऊर्जा सामावली आहे, त्या ऊर्जेचा शोध घेणारा महेश भावे यांचा अतिशय अभ्यासपूर्ण व संदर्भसंपन्न असा ग्रंथ म्हणजे ‘विश्वी विश्वभर कोंदलासे एक!’ चिकित्सक व्यासंगी वृत्तीने, तितक्याच सश्रद्ध भावनेने या ग्रंथाचे लेखन केल्याचे लक्षात येते.
 
vivek
 
विष्णू ही एक वैदिक व पौराणिक देवता. ऋग्वेदात विष्णूची स्तुती करणारी काही सूक्ते आहेत. त्या सहा ऋचांचे एक छोटेसे विष्णुसूक्त आहे. (ऋग्वेद-1.20,16-21) त्यानुसार विष्णूने सर्व जग आक्रमून टाकले आहे. तो विश्वाचा प्रतिपालक आहे. त्याला कोणी फसवू शकत नाही किंवा त्याचा कोणी पराभवही करू शकत नाही. तीन पावलांनी आक्रमण करून त्या प्रत्येक ठिकाणी त्याने सद्धर्माच्या विधी-नियमांची प्रस्थापना केली आहे, अशी त्याची महती सांगून तो इंद्राचा आज्ञाधारक होता, असेही म्हटले आहे.
ब्राह्मणकाळात ऋग्वेदातील तीन पावलांत त्रिभुवन व्यापणे हे विष्णुदेवतेचे कथाबीजच वाढविले आहे. उपनिषदकाळात विष्णुदेवतेचा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात समावेश झाला. सृष्टीचे धारण-पोषण करणारे अन्नरूपी परब्रह्म म्हणजे विष्णू असे मैत्री उपनिषदात म्हटले आहे. साधकाचे जे अंतिम साध्य, श्रैय तेच विष्णूचे परमपद होय, असे कठोपनिषदात म्हटले आहे. महाभारतात विष्णूचे माहात्म्य अधिक वाढले. विष्णू समस्त सृष्टीचा कर्ता, शास्ता ठरला. परमेश्वर ही उपाधी त्याला ब्रह्मदेवाच्या मुखाने दिली.
प्राचीन ऋषींनी ऋग्वेदापासून स्मृतिग्रंथांपर्यंतच्या वाङ्मयात निरनिराळ्या प्रसंगी या परमेश्वराचे ज्या नामांनी स्तवन केले, ती नामे ज्या स्तोत्रात एकत्रित केला आहेत, ते म्हणजे ‘विष्णुसहस्रनाम.’
 
 
 
वैष्णव सांप्रदायिकांच्या पाच प्रमुख आधारग्रंथांतील एक असे हे विष्णुसहस्रनाम. यामध्ये एकूण 107 श्लोक असून महाभारताच्या 13व्या अध्यायात अनुशासन पर्वात समाविष्ट आहेत. पितामह भीष्मांनी स्तोत्ररूपाने युधिष्ठिराला ही नामे सांगितली, अशी महाभारतात कथा आहे. यामधे विष्णूची एक सहस्र नामे गुंफली आहेत.
 
 
 
या विष्णुसहस्रनामावर महेश सखाराम भावे यांनी ‘विश्वी विश्वभर कोंदलासे एक!’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे.
 
या ग्रंथात विष्णुसहस्रनामाचा महिमा, वैशिष्ट्ये, त्या नामांमागील सरल अर्थ, आध्यात्मिक अर्थ, ऋग्वेदानुसार, वेदवाङ्मयातून मानला जाणारा अर्थ उलगडून सांगितला आहे.
 
 
 
या स्तोत्रातील प्रत्येक नाम सूत्रमय आहे. यातील एक हजार नामांपैकी एक तृतीयांश नामे - म्हणजे जवळपास 250 ते 300 नामे ‘विश्वं’ आणि ‘विष्णू:’ या दोन प्रधान नामांभोवतीच फिरतात. यातील हजार नामे केवळ या दोन नामांतच सामावली आहेत.
 
 
या नामांतील विश्व, वषट्कार, भूतात्मा, पुण्यात्मा, मनु, हिरण्यगर्भ इ. नावे वैदिक वाङ्मयातील असली, तरी अनेक नावे लौकिक आहेत - उदा., महेंद्र, अच्युत इ. यातील शर्व, शिव, रुद्र, शंभुः इ. प्रसिद्ध शिवनामे विष्णुवाचक म्हणून आलेली आहेत. प्रस्तुत लेखकाने त्या नामांची अर्थासह मांडणी केली आहे. या नामसहस्रात अनेक उपास्य दैवतांचा - उदा., हरिहरैक्याचा सुंदर समन्वय साधाला आहे, ते लेखकाने उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. शिवशंकराप्रमाणे ब्रह्मा या देवतेची सूचक अशी नामे एकापाठोपाठ देऊन, अर्वाचीन विचारवंत विनोबा भावे यांच्या विष्णुसहस्रनामावरील भाष्याचा आधार घेऊन नामांमधील व्यासांच्या व्यापक दृष्टीकोनाचा गौरव केला आहे.
 
 
 
एकाच अर्थाचा निर्देश करणारी अनेक नामे स्वतंत्रपणे देऊन लेखकाने त्यांचे विश्लेषण केले आहे- उदा., विष्णू ब्रह्मरूपाने स्थित असून वस्तुत: तो कधीही जन्माला येत नाही, हे अज, अयोनिज, अनादि या नामांच्या साह्याने विवरण केले आहे. तो नित्य, स्थिर असतो या गुणासाठी आलेली स्थाणु, शाश्वत, शाश्वतस्थाणु, स्थिर, ध्रुव, स्थावरस्थाणु, शाश्वत स्थिर अशी अनेक नामे देऊन त्या नामांची व्युत्पत्ती सांगितली आहे. विष्णूला जन्म नाही तसा नाशही नाही, हे स्पष्ट करताना अव्यय, अक्षर, निधिरव्यय, अमृत, अच्युत, बीजअव्यय, अनंत अशी अनेक नामे उलगडून सांगितली आहेत.
 
 
 
‘भर्ता’ या विष्णुनामाचा विचार करताना तो परमात्मा जगाच्या योगक्षेमाची जबाबदारी कशी निभावतो, याचे विवेचन करताना लेखकाने माता-बालक या नात्याबाबत पशु-पक्ष्यांचे अनेक दाखले दिले आहेत. त्या अनुषंगाने जलचर अशा विविध माशांच्या जननप्रक्रियेची, सर्जनाची, वात्सल्यपूर्ण संगोपनाची, पिल्लांच्या भरण-पोषणाची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातून प्रस्तुत लेखकाच्या समुद्री प्राण्यांच्या अभ्यासाची खोली जाणवते.
 
 
 
विष्णुसहस्रनामांचे वर्गीकरण करीत असताना लेखकाने संख्यावाचक नामांचे वेगळेपण नोंदवले आहे. त्यात शून्य ते सहस्र, पद्म, पद्म निभेक्षण, अनंत अशा चढत्या श्रेणीतील नामसंज्ञांचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. आकारदर्शक संज्ञा, आत्मवाचक नामे यांचा बारकाईने केलेल्या निरीक्षणातून अभ्यास केला आहे. त्यातून प्रतीकात्मकरित्या परमात्म्याच्या शक्तिमानतेचा प्रत्यय आणून दिला आहे.
 
 
 
परमात्म्याचे अलौकिकत्व लक्षात घेऊन महर्षी व्यासांनी त्याला सत्कर्ता, सतकृति:, सत्भूति:, सत्परायण, इंद्रकर्मा, महाकर्मा, कृतकर्मा अशी अनेक नामे बहाल केली आहेत. लेखकाने त्या प्रत्येक नामाचे अनेक अर्थांसह विस्तृत विवरण केले आहे. विष्णू नामसंज्ञा स्पष्ट करीत असताना त्या नामाची ऋग्वेदातील साम्यस्थळे, श्रीमद् आदिशंकराचार्य विरचित नामसहस्रातील नामे, कठोपनिषद, कैवल्योपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद, मांडुक्योपनिषद, मंडुकोपनिषद यातील अनेक संदर्भ दिले आहेत. याबरोबरच संत श्रीज्ञानेश्वर, श्रीनामदेव, श्रीतुकाराम या संताच्या वचनांचे दाखले देऊन त्या नामाचा अर्थ सुलभ केला आहे. या सहस्रनामातील सहस्रमूर्धा, सहस्राक्ष:, अनंताक्ष:, रविलोचना या नामांचा अर्थ लेखकाने खगोलविज्ञान, त्यातील शास्त्रीय संज्ञा यांच्या आधारे विशद केला आहे. त्यासाठी तक्ते, आकृती यांचा वापर करून नामांचा अर्थ आकलन पातळीवर आणला आहे.
 
 
विष्णुसहस्रनामांमध्ये जी विश्वव्यापी शक्ती, ऊर्जा सामावली आहे, त्या ऊर्जेचा शोध भावे यांनी या नामांमधून घेतला आहे. अतिशय अभ्यासपूर्ण व संदर्भसंपन्न असा हा ग्रंथ आहे. चिकित्सक व्यासंगी वृत्तीने, तितक्याच सश्रद्ध भावनेने या ग्रंथाचे लेखन केल्याचे लक्षात येते. यातील एकेक नाम विश्वव्यापक आहे हे सांगतानाच ‘विश्वं विष्णु:’ ही फक्त दोनच नामे तारक आहेत असा सात्त्विक निर्वाळाही त्यांनी दिला आहे.
 
 
 
अनेक संदर्भग्रंथांच्या सूचीसह श्रीविष्णुसहस्रनामांची वर्णानुक्रमाने केलेली सूची या ग्रंथाच्या अखेरीस दिली आहे, ती जिज्ञासूंना उपयुक्त ठरेल. 235 पृष्ठसंख्या असलेला हा ग्रंथ डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथाचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक व आकर्षक आहे.
 
 
 
 
आध्यात्मिक स्तोत्रांमागील अर्थ जाणून घेण्यास उत्सुक असणार्‍या सुजाण, जिज्ञासू वाचकांसाठी हा ग्रंथ निश्चितपणे मोलाचा ठरेल, हा विश्वास आहे.