‘स्टँड अप’च्या जगात

विवेक मराठी    31-Dec-2022   
Total Views |

Stand-up comedy
युवा जगतातल्या घडामोडी, ट्रेंडिंग घटना, त्यांची माध्यमांचा वापर करण्याची पद्धत यांच्यावर दृष्टिक्षेप टाकणारं आणि बदलांची नोंद घेणारं पाक्षिक सदर.

Stand-up comedy
  मोहिनी मोडक
 
“सीईटी द्यायची नाहीये मला, इंजीनिअरिंग करण्याऐवजी स्टँड अप-कॉमेडियन व्हायचंय मला.”
मयूरने हे अचानक घरी सांगितलं, तसा घरात गोंधळ माजला.
 
“हल्ली मुलांची अशी विचित्र स्वप्न असतात, पण त्याच्या मध्ये पालकांनी यायचं नसतं म्हणे. तो ’थ्री इडियट्स’ सिनेमा गाजल्यापासून नसता ताप झालाय. असतील काही पालक मुलांना ताण देणारे, पण मुलांना आपली कुवत काय, बाहेरचं जग काय असतं हे तरी कुठे कळतं या वयात? चांगले दोन रट्टे दिले म्हणजे उतरेल हे खूळ.” मयूरची आई वैतागून म्हणाली.
 
‘टिपिकल मध्यमवर्गीय पालक कसे वागतात हा तर भारतातल्या स्टँड अप कॉमेडियनचा अत्यंत लाडका विषय आहे आई. मला हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती.” इति मयूर.
 
 
“असतं काय पण हे स्टँड अप कॉमेडी प्रकरण?” आजोबांना प्रश्न पडला.
“कोणत्याही विषयावर खुसखुशीत बोलत लोकांना गुंतवून ठेवायचं. हसवायचं. त्यात नकला, नर्मविनोद, किस्से, गमतीदार प्रसंग, शेरेबाजी, उपहास, उपरोध असं काहीही असू शकतं.” मयूर म्हणाला.
 
 
“अरेच्चा! याचे पैसे मिळतात? आपले कितीतरी राजकीय नेते तर हे फुकटात करतात, मी त्यासाठीच बातम्या बघतो..” आजोबा.
“बाबा, पूर्वी बतावणी असायची किंवा वगनाट्यात सोंगाड्या असायचा. आठवतंय का ’विच्छा माझी पुरी करा’?” मयूरच्या बाबांनी आजोबांना समजावलं.
 
“बापरे! म्हणजे याला पूर्णवेळ सोंगाड्या व्हायचंय!” आजोबा चक्रावले.
 
“नाही हो. अत्र्यांची भाषणं तुम्ही ऐकलीत, पुलंना ऐकलंय तसंच काहीसं. माझ्या पिढीतले शिरीष कणेकर, संजय उपाध्ये किंवा दशकापूर्वीचे जॉनी लीवर, राजू श्रीवास्तव, शेखर सुमन वगैरेंचे एकपात्री कार्यक्रम म्हणजे आजची स्टँडअप कॉमेडीच.”
“हं.. किंवा हिवाळी अधिवेशनातली भाषणं?”
 
 
“तुम्ही हसताय काय! पुलंचा विनोद किती निर्विष होता. आताचे विनोद ओढूनताणून, बरेचदा कमरेखालचे. आपण सोडून सगळे मूर्ख, असं समजून बोलणं, टोमणे मारणं म्हणजे यांची स्टँड अप कॉमेडी.” आई वैतागलेलीच.
 
 
“द्य्वर्थी संवादाचं म्हणशील तर मागच्या पिढीचे अत्रे, नंतरचे दादा कोंडके तसं बोलायचे ते त्या त्या पिढीला आवडत होतंच.” मयूरचं लगेच प्रत्युत्तर.
 
 
“हे बघ मयूर, विनोदाच्या अनेक प्रकारांपैकी तो एक आहे, पण हल्ली तो सर्वव्यापी झाला आहे. कौटुंबिक शो म्हणता म्हणता त्या जत्रेतले विनोद पातळी सोडायला लागले आहेत. हवा यायची वाट पाहणार्‍या कार्यक्रमात दिसण्यावर, रंगावर आणि प्यायला बसण्यावर सुमार विनोद असतात. शहरातली मुलं येताजाता ’एफ’ वर्ड वापरतात म्हणून आपण कुठेही कमी नाही, हे दाखवायला गावातली मुलं त्यांच्या मातृभाषेतल्या वरताण शिव्या वापरतात. ती ’थेरगाव क्वीन’ की कोण.. फक्त शिव्या देते म्हणून हिट झाली होती.
 
 
विनोदाचा अभ्यास नाही, वाचन नाही, चार रील्सला लाइक आले की स्वत:ला स्टार समजायला लागतात.
वाटेल ती भाषा वापरून ’रोस्ट’ करायचं म्हणजे स्टँड अप कॉमेडी असते का!”मयूरच्या ताईने आता वादात उडी घेतली.
“हे रोस्ट काय आता?” आईसाठी हे प्रकरण नवीन होतं.
 
 
 
“रोस्ट म्हणजे बोलावलेल्या पाहुण्याची किंवा प्रेक्षकातल्या कुणाचीही खिल्ली उडवणं. फार कमी कॉमेडियन असे आहेत, जे प्रेक्षकांना खजील न करता त्यांची गंमत करू शकतात. तसं म्हटलं तर रोस्ट करायला चांगली विनोदबुद्धी आणि बुद्धिचातुर्य लागतं, पण ते असणारे विनोदवीर फार कमी.” ताईने स्पष्ट केलं.
 
 
 
“ताई, रोस्टिंगमुळे खिलाडूवृत्ती वाढते. त्याचं स्क्रिप्ट लिहिणं सोपं नसतं. अनेकदा ते उत्स्फूर्त असतं, मुख्य म्हणजे उघड उघड असतं. उलट बाबांचे मित्र किंवा तुमच्या मैत्रिणी जे गॉसिप करता, ते मागून केलेलं रोस्टिंग असतं. लग्नात नातलग जमले की चार लोकात खुशाल ’काय लाडू/पेढे केव्हा देणार’, ’किती बारीक आहेस तू’, ’किती टक्के मिळाले’ असले प्रश्न विचारतात, ते काय असतं!” मयूरने ताईचा चेंडू परतवला.
 
 
“मयूर, रोस्टिंग इथेच थांबत नाही. ती मूळ अमेरिकन पद्धत आहे. त्याला भारतीय रूप दिलं असलं, तरी ती त्यांची केविलवाणी कॉपीच आहे आणि आता ते डँक म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा पातळीवर पोहोचलं आहे. स्वत:ला अतिशहाणे समजणारे काही कॉमेडियन इन्स्टाग्रामवर भाबडे प्रेक्षक गळाला लावतात आणि रेडिटसारख्या मंचावर आपल्यासारख्या उद्धट लोकांचे अड्डे तयार करतात. कोणी विरोध केला तर त्याची टर उडवतात. लहान गावातली तरुण मुलं यांची प्रसिद्धी पाहून हे जे काही करतात, त्यालाच खरी स्टँड अप कॉमेडी समजतात.
 
 
 
शहरी मुलांना आकर्षित करायचं, म्हणून यातले काही जण ठरवून वादग्रस्त विषय निवडतात. आपल्या सणवारांची, मूल्यांची कायम टिंगल करतात. काही राजकीय पक्षांनी यांना हाताशी धरून विरुद्ध पक्षावर कुरघोडी करायचा प्रयत्न सुरू केला आहे.
कॉमेडियन व्हायला कोणी नाही म्हणणार नाही तुला, पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा पैशासाठी म्हणून तू या मार्गाला लागणार असशील, तर ते चालणार नाही.” ताईने सरळ सांगितलं.
 
 
 
“ताई, कुणाल कामरा किंवा तन्मय भटसारख्यांचे स्टँड अप शो पाहून सगळे राजकारणाचा वापर करतात असं तुला वाटतं. हे खरं आहे की काही जण एनआरआय प्रेक्षक मिळवण्यासाठी मुद्दाम वाद उकरून काढत असतात. पण भारतीयांच्या जीवनपद्धतीवर मार्मिक बोलणारे, सांस्कृतिक आणि सामाजिक गमतींवर भाष्य करणारे काही वेगळे कॉमेडियन्ससुद्धा आहेत. केनी सबॅस्टियन, अरविंद सुब्रह्मण्यम, झाकीर खान, अदिती मित्तल.. कितीतरी. सरसकट हे क्षेत्र वाईट नाही. यात कलेला वाव आहे,
 
 
हजरजबाबीपणाला इथे दाद मिळते. व्यक्त होण्याची ही नवी पद्धत आहे. मुलांना त्यांच्या जगण्यातल्या घटनांवर केलेल्या मजेदार कॉमेंट, समाजातल्या दांभिकतेला घेतलेले चिमटे आवडतात. विनोदाच्या अस्तराखाली असल्याने यातलं तथ्य बोचतही नाही, मग काय हरकत आहे याकडे करियर म्हणून पाहायला?” मयूर हे गंभीरपणे विचारत होता.
 
 
 
“सोशल मीडियावर स्वत:ला कॉमेडियन म्हणत रील करणारे बरेच दिसतात. त्यांची नावंही लक्षात राहत नाहीत. या क्षेत्रात नाव करायचं तर भाषेवर प्रभुत्व पाहिजे. शब्द हवे तसे फिरवता आले पाहिजेत. तुम्हाला जे यातले हिरो वाटतात, त्यांनी वर्षानुवर्षं धडपड केली आहे. आतासुद्धा चांगलं लोकांना आवडेलसं सतत लिहीत राहणं किंवा लिहून घेणं, लाइक्स मिळवत राहणं, शोला प्रेक्षक मिळवत राहणं, मिळाले तर ते टिकवून ठेवणं आणि हे वर्षानुवर्षं न थकता करणं त्यांच्यासाठीसुद्धा सोपं नाहीये, हे कळतंय का तुला?” बाबांनी थेट प्रश्न केला.
 
 
 
“हो, कळतंय. पण हे आव्हान आता आम्हाला सगळ्या क्षेत्रात असणार आहे. नोकरी केली तरी स्पर्धा आहे. मी भाषेवर मेहनत घेतोच आहे. आता अगदी मराठीतसुद्धा स्टँड अप कॉमेडियन वाढायला लागले आहेत. भाडिपाच्या सारंग साठ्येचे शो बघितलेत का! तृप्ती खामकर, ॐकार वैद्य.. कितीतरी जण. ह्यांचे विषय बरेचदा मुंबई-पुण्याभोवती घोटाळणारे असले, तरी विलास शिरसाठसारखे अगदी अहिराणीत म्हणजे बोलीभाषांमध्ये शो करणारेही वाढत चाललेत. शहरात आल्यावर होणारे गोंधळ, प्रेम, शिक्षणक्षेत्र, राजकारण असे विषय छान हाताळतात ही मुलं.” मयूरने ठासून मत मांडलं.
 
 
“सगळ्याची तयारी असेल, तर जरूर जा या क्षेत्रात. पण आधी एक भक्कम पदवी मिळव, दुसरीकडे या क्षेत्राचा खोलात शिरून अभ्यास कर, स्वत:ला चाचपून बघ. जर तुला दर्जेदार कलाकार होणं जमलं, तर खरंच जगण्यातले सगळे त्रास विसरायला लावून एखाद्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासारखं दुसरं पुण्य नाही.” मयूरचे बाबा मनापासून म्हणाले.
 
 
 
आजोबांनी विषय संपवत म्हटलं, “कळलं नं बाबा काय म्हणाले ते! नीट समजून उमजून यात पड, नाहीतर तुझी गत अशी व्हायची की तू स्टँड अप करणार हे कळल्यावर प्रत्येक जण तुला हसला आणि प्रत्यक्षात करायला लागल्यावर प्रेक्षकातलं कुणीच हसत नाहीये!”

मोहिनी महेश मोडक

 वेब सर्व्हिसेस पुरवणाऱ्या अकोलास्थित कंपनीच्या संचालिका आहेत. नेटवर्क इंजीनिअरिंग कोर्सेसची प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सध्या त्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखे विविध कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने शिकवतात.
त्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात द्विपदवीधर
असून त्यांनी वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे.
त्या समाजमाध्यमांच्या अभ्यासक व ब्लॉगर आहेत, तसेच
विविध सामाजिक, साहित्यिक व व्यावसायिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत.