डॉ. आंबेडकरांचे समतेचे स्वप्न

विवेक मराठी    05-Dec-2022   
Total Views |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खर्‍या अर्थाने जगायचे असतील आणि त्यांना नम्रपणे श्रद्धांजली वाहायची असेल, तर समतायुक्त हिंदू समाज ही आपल्या सर्वांची निकड झाली पाहिजे आणि ती व्यवहारातूनही व्यक्त झाली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर सामाजिक समतेचा अंगीकार केला, तर सामाजिक पातळीवर त्याचे प्रतिबिंब उमटायला वेळ लागणार नाही. अशा रितीने समाजजीवनात उपस्थित होणारी अकृत्रिम समता हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.
 
 
babasaheb
 
आपला हिंदू समाज समतेच्या अधिष्ठानावर उभा राहावा आणि जातिभेद, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी-परंपरांचा त्याग करून आपण सर्व समान आहोत ही धारणा सर्वांच्या मनात रुजावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले. प्रबोधन, कृती आणि नकार या तिन्ही मार्गांनी त्यांनी समतेचा आग्रह धरला होता. त्यांचे समतेचे स्वप्न आजही खर्‍या अर्थाने पूर्ण झाले असे म्हणता येत नाही. त्यांचे समतायुक्त समाजाचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी नाही का?
 
 
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचाराचा अभ्यास करताना आपल्याला पहिला प्रश्न पडतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सारा खटाटोप कशासाठी केला? आणि त्यामागची भूमिका काय? या प्रश्नांची पुढील दोन उत्तरे मिळतील. पहिले म्हणजे त्यांना समतेच्या पायावर हिंदू समाजाची उभारणी करायची होती आणि दुसरे उत्तर म्हणजे समाजाप्रती असणारा आंतरिक कळवळा. उच्चविद्याविभूषित होऊन भारतात परत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाचे योग्य परीक्षण केले. बालपणापासून अस्पृश्यतेचा विदारक अनुभव पाठीशी असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाचे वर्णन करताना म्हणतात, ”हिंदू धर्माचा सिद्धान्त ख्रिस्ती व महंमदी धर्मांच्या सिद्धान्तापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्त्वांना पोषक आहे. माणसे ईश्वराची लेकरे आहेत एवढ्यावरच न थांबता ती ईश्वराचीच रूपे आहेत, असे मोठ्या निर्भीडपणे हिंदू धर्म सांगत आहे. जेथे सारीच ईश्वराची रूपे आहेत, तेथे कोणी उच्च, कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही, हे त्या महान धर्माचे ओजस्वी तत्त्व आहे. समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा दुसरा मोठा आधार सापडणे कठीण आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाबाबत गौरवाने बोलतात, पण त्याच वेळी आचरणाच्या पातळीवरचे विदारक अनुभवही त्यांना माहीत असतात. जोपर्यंत ही विसंगती दूर होत नाही, तोपर्यंत समाज दुर्बळ राहणार, आपआपसांत भांडत राहणार. अस्पृश्यता-जातिभेद राहणार. या गोष्टी नको असतील, तर धर्माचा आचारात्मक भाग हा धर्माच्या तत्त्वज्ञानात्मक भागाशी सुसंगत असला पाहिजे. तत्त्व आणि व्यवहार यांची उत्तम सांगड असली पाहिजे आणि प्रबोधन, कृती आणि संघर्ष याच मार्गाने ही सांगड निर्माण होईल, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
 
 
समतेची पूर्वअट
 
 
समतेच्या अधिष्ठानावर हिंदू धर्म उभा करायचा असेल, तर त्यासाठी काय करावे लागेल? ’संधी’ ही समतेची पूर्वअट आहे. जे शतकानुशतके मागास आणि हीन स्वरूपाचे जीवन जगत आहेत, ज्यांची सावलीसुद्धा विटाळ मानली जाते, अशा मानवी समूहाला जे स्वत:ला स्पृश्य समजतात त्यांच्या बरोबरीने आणणे ही समानता येण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यासाठी समाजात जाणीवजागृती करणे गरजेचे होते. त्यासाठी सत्याग्रह आवश्यक होता. सत्याग्रह म्हणजेच लोकसंग्रह, समाजमनाला सकारात्मक दिशा देऊन सत्कर्माकडे घेऊन जाणे. या सत्याग्रहाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ”जिथे लोकसंग्रह आहे तिथे सत्कार्य आहे, ही आमची विचारसरणी आहे. आम्ही ती गीतेतून घेतली आहे. सत्याग्रहच गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. गीता हे भगवंताने दिलेले उत्तर आहे. गीतेचा आधार देण्याचे कारण गीता हा धर्मग्रंथ अस्पृश्यांना तसाच स्पृश्यांनाही मान्य आहे. लोकसंग्रह हा आमच्या चळवळीचा उद्देश आहे.” लोकांना संघटित करून आपल्या मूलभूत हक्काप्रती जागरूक करावे आणि त्यातून समतायुक्त हिंदू समाज, पर्यायाने हिंदू धर्म पुन्हा नव्याने साकार करावा ही बाबासाहेबांची इच्छा होती.
 
 
“सद्य:स्थितीतील हिंदू समाज कसा आहे याचे बाबासाहेबांनी वर्णन केले आहे. ते म्हणतात, ”हिंदू धर्माची दोन अंगे आहेत - एक तत्त्वज्ञान व दुसरे आचार. त्यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान असले, तरी आचाराच्या दृष्टीने ते असमान नव्हे, अपवित्र आहेत. म्हणून त्यांच्याशी व्यवहार करणे हा अधर्म आहे.” ”
 
 
 
आचारधर्म
 
 
 
हा व्यवहार बदलून आचरणाच्या पातळीवर समता प्रस्थापित करणे हे बाबासाहेबांचे ध्येय झाले. त्यातूनच 1924 साली त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ संस्था स्थापन केली. या संस्थेचे केवळ अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजातीलच कार्यकर्ते होते असे नाही, तर तत्कालीन समाजव्यवस्थेतील समतेची जाण असणारे विविध समाजगटांतील लोकप्रतिनिधीसुद्धा होते. समाजात समता आधारित व्यवहार व्हायचा असेल, तर त्यासाठी काही उदाहरण घालून द्यावे लागते. असे उदाहरण घालून द्यायचे, तर शतकानुशतके अस्पृश्यांचे जीवन जगणार्‍या समाजाला त्याच्या अधिकाराची जाणीव करून द्यावी लागेल आणि स्पृश्य समाजाला अशा कामात सकारात्मक भान ठेवून सहभागी करून घ्यावे लागेल, अशी डॉ. बाबासाहेबांना जाणीव होती. कारण खरा धर्म उदयाला आणायचा असेल व समतायुक्त समाज उभा करायचा असेल, तर त्यात सर्व समाजाचा सहभाग आवश्यक आहेच. मार्च 1929च्या चवदार तळे सत्याग्रहाच्या अनुभवानंतर बहिष्कृत भारतच्या अग्रलेखात डॉ. बाबासाहेब लिहितात - ’स्पृश्य हिंदूंचे लोकमत अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल आहे, ही गोष्ट अस्पृश्य लोकांनी ध्यानात घेतली पाहिजे. ते अनुकूल कसे करता येईल? हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा प्रश्न आहे. (व त्यासाठी अस्पृश्य वर्गाविषयी) स्पृश्य हिंदूंच्या भावना दगडासारख्या कठीण का झाल्या आहेत, याचे पूर्ण आकलन होणे आवश्यक आहे.’ हिंदू समाजाचे मन असे दगडासारखे का झाले? याची दोन कारणे डॉ. बाबासाहेबांनी सांगितली आहेत. 1) स्वत: विचार न करता दुसर्‍याच्या विचाराने वागणारे लोक, 2) विचार करूनही त्याप्रमाणे आचार न करणारे लोक. या दोन्ही कारणांमुळे जर हिंदू समाजात जातिभेद, अस्पृश्यता यांचा उद्रेक होत असेल, तर आम्ही कोण आहोत हे एकदा सर्व समाजाला सांगावेच लागेल आणि त्यातूनच बाबासाहेबांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाचा पुढचा टप्पा निश्चित केला.
 
 
babasaheb
 
मानव्याचा जाहीरनामा
  
 
24-25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे सत्याग्रहींसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ”सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते, याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे. या अधोगतीतून बाहेर पडायचे असेल आणि पुन्हा एकदा समतेच्या पायावरचा सबळ समाज उभा करायचा असेल, तर समाजातील नागरिकाला त्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली पाहिजे.” याच परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुमात्रांच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा सर्वांसमोर मांडला, तो पुढीलप्रमाणे -
 
1) सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत व मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील.
2) वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहतील हाच राज्यव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे.
3) अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकाराचे व सत्तेचे उगमस्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्णाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले असतील, तर ते इतर कशाच्याही आधारावर - मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो - मान्य होण्यास पात्र नाहीत.
4) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. व्यक्तीला मर्यादा घालण्यात आली तर ती दुसर्‍या व्यक्तीला तिचा तशाच प्रकारचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा इतक्यापुरतीच घालता येईल. ती मर्यादा खुद्द लोकांनी केलेल्या कायद्यांनी ठरविली पाहिजे.
5) जेवढ्या गोष्टी समाजास विघातक होतील, तेवढ्याच कायद्याने बंदी केल्या पाहिजेत. जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल, ती करण्यास सर्वांना मुभा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट करणे कायद्याने आवश्यक ठरले नसेल, ती गोष्ट करावयास कोणासही भाग पाडता कामा नये.
6) कायदा म्हणजे अमुक एका वर्गानेच ठरवलेली बंधने नव्हेत. तो कोणत्या प्रकारचा असावा हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस पाहिजे. हा कायदा संरक्षणात्मक असो वा शासनात्मक असो, तो सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे आणि समाजरचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान, अधिकार व व्यवसाय यांच्याबाबतीत जात आड येता कामा नये.
 
 
धर्मसंगर
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हा जाहीरनामा केवळ अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांसाठीच आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा जाहीरनामा हिंदू समाजाला सामाजिक समतेच्या दिशेने घेऊन जाणारा असून या जाहीरनाम्याचा विषय अस्पृश्यांच्या वेदनामुक्तीचा असला, तरी आशय हा समग्र हिंदू समाजाच्या सबलीकरणाचा व सामाजिक आचरणात बदल करण्याचा आहे. आचरण हे मानसिकतेवर अवलंबून असते. हिंदू माणसे ही धर्म आणि देऊळ याच्याशी जोडलेली आहेत. जो देव तुमचा आहे तो देव आमचाही आहे, या भूमिकेतून 2 मार्च 1929 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरासमोर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला. तो 3 मार्च 1934पर्यंत चालू होता. नाशिकप्रमाणेच पर्वती (पुणे), अंबामाता (अमरावती) येथेही मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह झाले. अमरावतीच्या सभेत मंदिर प्रवेशाची भूमिका मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ”उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की, त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकारामांसारख्यांनी केली, तितकीच वाल्मिकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची, तितकीच अस्पृश्यांचीही आहेत. त्यावर जितका स्पृश्यांचा, तितकाच अस्पृश्यांचा वारसा आहे.”
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समताधिष्ठित हिंदू समाज उभा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही, उलट त्याला प्रचंड मानहानी, शारीरिक इजा पोहोचवण्यापर्यंत हिंदू समाजाची मजल गेली. महाड सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या दोन्ही प्रसंगी सत्याग्रहींना दगड-गोट्यांचा वर्षाव व लाठ्या-काठ्यांचे प्रहार सोसावे लागले. यातूनच बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले व येवला येथे 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी 21 वर्षांनंतर ऑक्टोबर 1956मध्ये केली. 1935नंतरचे डॉ. बाबासाहेब वेगळे आहेत. त्यांनी हिंदू धर्मावर, हिंदू समाजावर प्रचंड टीका केली आहे. असे असले, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मविध्वंसक नव्हते. 1935च्या आधी बाबासाहेबांनी आरंभलेल्या समता लढ्यात जर तत्कालीन धर्ममार्तंडांनी व समाजधुरीणांनी सक्रिय सहभाग घेतला असता, तर कदाचित बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील 1935नंतरचा कालखंड खूप वेगळा असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समतायुक्त समाज उभा करायचा होता. सामाजिक विषमता, अनिष्ट रूढी, परंपरा आणि जातिभेद, अस्पृश्यता यांना दूर करून एकच एक हिंदू समाज उभा करायचा होता, पण त्या वेळेस त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
 
 
स्वप्न पूर्ण करू या
 
डॉ. बाबासाहेबांनी आपले समतेचे स्वप्न राज्यघटनेच्या माध्यमातून साकार केले आहे. 1935नंतर वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब, ”हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा करणारे बाबासाहेब जेव्हा राज्यघटना लिहिण्याची वेळ येते, तेव्हा केवळ अस्पृश्यांचाच नाही, तर समग्र हिंदू समाजाच्या उन्नतीचा व सामाजिक समतेचा विषय मांडतात. बाबासाहेबांच्या लेखणीतून भारतीय नागरिकांना ’समान मत, समान पत’ मिळाली. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस हे मूल्य मिळाले. माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत हक्क मिळाले, त्याला कायद्याचे अधिष्ठान दिले. आपल्या देशात राज्यघटनेची अंमलबजावणी होऊन जवळजवळ सात दशके होत आली आहेत, पण कायद्याचे अधिष्ठान असूनही खर्‍या अर्थाने समतेची प्रस्थापना झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खर्‍या अर्थाने जगायचे असतील आणि त्यांना नम्रपणे श्रद्धांजली वाहायची असेल, तर समतायुक्त हिंदू समाज ही आपल्या सर्वांची निकड झाली पाहिजे आणि ती व्यवहारातूनही व्यक्त झाली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर सामाजिक समतेचा अंगीकार केला, तर सामाजिक पातळीवर त्याचे प्रतिबिंब उमटायला वेळ लागणार नाही. अशा रितीने समाजजीवनात उपस्थित होणारी अकृत्रिम समता हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001