लोकसाहित्यकाराचा लोकगौरव

विवेक मराठी    06-Dec-2022
Total Views |
@मधुरा डांगे
 

mande 
 
वयाची तब्बल 6 दशके एक विद्वान लोकाभ्यासाची अनवट वाट स्वीकारतो, अनेक अडथळे, अनेक कल्पना, विविधांगी परंतु एकसूत्री अभ्यासदिशा डोळ्यासमोर ठेवत अखंड प्रवास करतो, अभ्यास करतो आणि ही अनवट वाट एका रुळलेल्या पायवाटेत परिवर्तित करण्याचा यशस्वी प्रयत्न करतो.. अशा विद्वानाचा वयाच्या नव्वदीला आल्यावर एक सुरेख लोकगौरव घडून येतो.. हे केवळ अभ्यासाचं सार्थक नसतं, तर अध्ययनरत जगण्याच्या प्रत्येक क्षणाचं, त्या जगण्यात सामील असलेल्या प्रत्येक माणसाचं यश असतं. लोकगौरव हा अशा अनोख्या जगण्याचा सन्मान असतो!
 
 
असा एक अत्यंत हृद्य सोहळा दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे रंगला. औचित्य होते चतुरंग प्रतिष्ठानच्या 31व्या ’जीवनगौरव’ पुरस्काराचे आणि मानकरी ठरले ज्येष्ठ लोकसाहित्यकार प्रा. डॉ. प्रभाकर मांडे. चतुरंग प्रतिष्ठानचा 31वा जीवनगौरव पुरस्कार सोहळा यंदा पुण्यात रंगला. सत्यजित तळवलकर व सहकलाकारांचा ’लोकनाद’ आणि मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा ’खेळ मांडियेला’ हा लोकगीतांचा कार्यक्रम असे सुरेल श्रवणीय कार्यक्रम या सोहळ्याला पूरक ठरले.
 
 
डॉ. मांडे सरांचं काम हे महाराष्ट्रातील लोकसाहित्याच्या अभ्यासक्षेत्राला कलाटणी देणारे ठरले. त्यांच्या अथक प्रयत्नातून विद्यापीठीय स्तरावर लोकसाहित्य या विषयाला मान्यता मिळाली. पण केवळ विषयाला मान्यता मिळून काम थांबणार नव्हते. त्या विषयाच्या अनुषंगाने विविध संदर्भसाधनांची मराठीत निर्मिती होणे आवश्यक होते. मांडे सरांनी आपल्या संशोधन आणि अध्ययनाच्या साहाय्याने ही अडचण दूर केली. लोकसाहित्याची संकल्पनात्मक मांडणी आणि या क्षेत्रातील अगदी छोट्या छोट्या विषयांच्या अभ्यासपद्धतींची निर्मिती करण्याच्या हेतूने अनेक पुस्तकांची निर्मिती झाली. त्यात अगदी एखाद्या जमातीचा सांगोपांग अभ्यास असो वा मौखिक परंपरांचे संकलन आणि विश्लेषण असो, मांडे सरांनी यातील प्रत्येक विषयाला हात घातला.
 
 
 
त्यांच्या समग्र साहित्यपरंपरेत ’दलित साहित्याची समीक्षा’ हे विशेष उल्लेखनीय पुस्तक वाटते. लोकसाहित्याच्या कक्षेत येणारे, परंतु साहित्याचा धागा पक्का पकडून चालणारे हे पुस्तक केवळ समीक्षेच्या नाही, तर साहित्य आकलनाच्या अंगानेदेखील विशेष महत्त्वपूर्ण वाटते. याशिवाय गणेश नाथांची कविता, वैदिक-बौद्ध संबंध अशा विविधांगी अभ्यास विषयांना डॉ. मांडे यांनी समर्थ हातभार लावला.
 
 
सरांचे कार्य केवळ संशोधनाचे नाही, तर लोकसाहित्य विषयाला एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचेदेखील आहे. ’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या स्वतंत्र व्यासपीठाची स्थापना हा या कार्यातील एक मैलाचा दगड म्हणावा लागेल.
लोकसाहित्य हा विषय घेऊन डॉ. मांडे अभ्यासक्षेत्रात आले आणि ते अभ्यासक्षेत्रच त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले.. किंबहुना त्यांचे जगणेच ’लोक’ झाले. दुर्गाबाई भागवत, डॉ. रा.चिं. ढेरे, इरावतीबाई कर्वे, सरोजिनी बाबर या सगळ्या लोकसाहित्यकारांच्या पंक्तीत डॉ. मांडे यांचे एक विशेष महत्त्वपूर्ण स्थान आहे, यात शंका नाही.
 
 
अशा लोकसाहित्याचा वसा घेतलेल्या लोकसाहित्यकाराला ‘जीवनगौरव’ देऊन त्याचा सन्मान करावा आणि विशेष म्हणजे लोकसहभागातून साकार होऊन या पुरस्काराला ’लोकगौरवाचा’ यथार्थ दर्जा असावा, हे हेरून एक सुरेख सोहळा साकार केल्याबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचे विशेष कौतुक करावेसे वाटते.
 
 
 
हा लोकगौरव म्हणजे केवळ डॉ. मांडे यांच्या जीवनकार्याचा, अभ्यासाचा गौरव नसून नव्या पिढ्यांना प्रेरणा आहे. ’घेतला वसा टाकू नये’ म्हणतात. डॉ. मांडे यांनी लोकाभ्यासाचा आपला वसा घेतला, पूर्णत्वास नेला आणि पुढल्या पिढीला हा वसा देऊन लोकपरंपरेचा आदर राखला. चतुरंगने केलेला गौरव म्हणजे ’साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हटल्यास वावगे वाटू नये!
 
 
- मधुरा डांगे, नंदुरबार.