अब तुमसा जहाँ में कोई नहीं है

विवेक मराठी    14-Feb-2022
Total Views |
 
@पद्मजा फेणाणी जोगळेकरआज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय. पावित्र्य, शुद्धता, चैतन्य, लय नि आत्यंतिक गोडवा यांची व्याख्या काय असे विचारले तर लतादीदींचा आवाज ऐकवता येईल एवढा परिपूर्ण हा आवाज होता. त्याचा ज्या ज्या गीताला परिसस्पर्श झाला, त्या त्या गीताचे सोने झाले.

padmaja
 
आज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय. पावित्र्य, शुद्धता, चैतन्य, लय नि आत्यंतिक गोडवा यांची व्याख्या काय असे विचारले तर लतादीदींचा आवाज ऐकवता येईल एवढा परिपूर्ण हा आवाज होता. त्याचा ज्या ज्या गीताला परिसस्पर्श झाला, त्या त्या गीताचे सोने झाले.

 
केशराच्या सुगंधी कुपीतून कुठचं केशर उचलू? किंवा रत्नखचित पेटार्‍यातून कुठली रत्नं वेचू? अशी मनाची अवस्था, दीदींची मला आवडणारी गाणी निवडताना झाली. प्रत्येक गाणंच सुंदर! काळीज कापत जाणारा टोकेरी, तरी मधाळ सूर! मास्टर दीनानाथांचं तेज ल्यालेला, तरी मुलायम रेशमी पोत. तरल, तरी वजनदार!.. न संपणारी विशेषणं! प्रत्येक गाणं ऐकताना वाटतं, हे आपल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या यादीत यावं. भिडणारा स्वर कसा असावा, कसा लागावा याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण!

सर्वात पहिलं गाणं आठवलं, ते म्हणजे जयदेवांचं, ‘प्रभू तेरो नाम’. यातला दैवी, पवित्र आवाज.. थेट परमेश्वराचं अस्तित्व दाखवणारा. दुसरं अनुराधा चित्रपटातील, पं. रविशंकरांची ‘साँवरे साँवरे’ ही भैरवीतील रचना, तशीच ‘मनमोहना’ ही जयजयवंतीमधील सरसर सरसर मोत्याचे टपोरे सर बरसावेत, अशा एकानंतर एक सपाट दाणेदार ताना असलेली रचना! यातील प्रत्येक कण आणि क्षण सोनेरी!


padmaja

शास्त्रीय संगीत कसं लालित्यपूर्ण, रंजक असावं, याचं ज्वलंत उदाहरण! ‘बाजीचय अत्फाल’ ही माझे गुरू पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गझल! सुरांच्या दिव्य, अगम्य, अफाट कसरती! ‘कुछ दिल ने कहा’ हे कुजबुजत्या (whisper) आवाजातलं स्वगत!

 प्रत्येकाला हे आपण स्वत:च गातोय असं वाटतं. ‘रैना बीती जाए’सारख्या अत्यंत आव्हानात्मक अशा कितीतरी रचना, ज्यात ऑड सूर लागतात, दीदींनी सहजगत्या पेललेल्या! दीदी गाताना बुद्धी आणि गळा यांच्या सुंदर मिलापाने, स्वच्छ, स्फटिकासम सुरांचा अपूूर्व आनंद मिळतो. भावपूर्ण शास्त्रीय आणि सुगम संगीत म्हणजे काय? आणि दैवी चमकदार स्वर म्हणजे काय? याचं एकमेव उदाहरण म्हणजे लता!
दीदींच्या जादुई स्वराशिवाय आम्हाला सवोत्कृष्ट संगीताचा निकष कळलाच नसता. भावपूर्ण, रसपूर्ण, अचूकपणा (perfection). कधी नाजूक, कधी ठोस, हळुवार शब्दोच्चाराचा नेमकेपणा कळला नसता. म्हणून दीदींच्या प्रत्येक गाण्याचा अभ्यास करताना असं वाटतं - ‘हम तेरे प्यार में, सारा आलम खो बैठे!’