गोंयची बाय

15 Feb 2022 11:24:13
@किशोर अर्जुन  8329256556
सुमारे 60 वर्षांहूनही अधिक काळ आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मोहून टाकणार्या लतादीदींची मोहिनी त्यांच्या मंगेशी या गावावरही प्रचंडच आहे. महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो, ही उक्ती तर गोमंतक मराठा समाजातील कलाकारांनाच समर्पित आहे, असे मानले जाते. याच उक्तीला गोमंतककन्या लतादीदी यांनी नवे परिमाण देत फक्त महाराष्ट्रच नाही, तर ‘भारत गोव्याच्या - म्हणजेच पर्यायाने लताच्या गळ्याने गातो’ असे जगाला म्हणायला लावले.


lata mangeshkar
पणजीपासून फोंड्याच्या दिशेने जाताना साधारणत: 23 कि.मी.वर मंगेशी हे गाव. मंगेशी आणि म्हार्दोळ ही तशी जोडगावे. एक संपून दुसरे कुठे सुरू होते, ते कळत नाही. तर या दोन गावांच्या वेशीवर मुख्य रस्त्यापासून 500 मीटरवर स्थापित आहे मंगेश देवस्थान. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणची मंगेश म्हणजे शंकराची मूर्ती ही अन्यत्र आढळणार्या शंकरमूर्तीप्रमाणे नसून ती दाढीमिशीधारी आहे. देशात अन्यत्र क्वचितच अशी शंकरमूर्ती पूजली जात असेल. तर या मंगेशी देवस्थानाशी आणि या गावाशी जोडले गेलेले कुटुंब म्हणजे ‘मंगेशकर’.
 
प्रसिद्ध संगीतकार, गायक नट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे हे मूळगाव. वास्तविक दीनानाथांचे मूळ आडनाव हर्डीकर. पण दीनानाथांच्या वडिलांकडे या मंदिरातील मूर्तीच्या अभिषेकाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना ‘अभिषेकी’ म्हणून संबोधत असत. पण पुढे आपल्या गायन कलेला मोठा वावर मिळावा, म्हणून दीनानाथ गोव्यातून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मात्र त्यांनी आपले हर्डीकर आणि त्यानंतर त्यांना ‘दिलेले’ अभिषेकी ही दोन्ही आडनावे बाजूला ठेवली आणि आपल्या गावाची, मातीची ओळख आपल्याशी जोडून घेत ‘मंगेशी’चा तो ‘मंगेशकर’ असे म्हणून स्वत:ला नवे उपनाम बहाल केले, जे पुढे त्यांची आणि पिढ्यांची अमीट ओळख ठरली. दीनानाथ मंगेशकरांच्या स्वरशिस्तीमध्ये वाढलेल्या मंगेशकर भावंडांनी हे नाव आणि आपले गाव जगभरात पोहोचवले. यामध्ये लतादीदींचा वाटा अर्थातच खूप म्हणजे सर्वार्थाने खूपच मोठा होता. सुमारे 60 वर्षांहूनही अधिक काळ आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मोहून टाकणार्या लतादीदींची मोहिनी त्यांच्या गावावरही प्रचंडच आहे.


lata mangeshkar
लतादीदींचा जन्म जरी गोव्यामध्ये झाला नसला, तरी त्यांच्या वडिलांचा जन्म गोव्यातील मंगेशी या गावामधील. त्यांचे जन्म आणि राहते घर आजदेखील मंगेशीमध्ये आहे. वडिलांमुळे लतादीदींचे आणि संपूर्ण मंगेशकर भावंडांचे गोव्याबरोबरचे ॠणानुबंध आजन्म राहिले. दीनानाथांच्या मातोश्री या गोव्यातील ‘गोमंतक मराठा समाजा’च्या कन्या. त्यामुळे ते स्वत:देखील गोमंतक मराठा समाजाचे पुत्र ठरतात. पुढे त्यांच्या पत्नी आणि मंगेशकर भावंडांच्या मातोश्री यादेखील गोमंतक मराठा समाजाच्याच कन्या. आणि गोमंतक मराठा समाज म्हणजे पूर्वाश्रमीचा ‘गोमंतक गायक समाज’. जन्मजातच संघर्ष पूजलेल्या या समाजाने जिद्दीच्या आणि अपार कष्टाच्या, तसेच आपल्या कलेच्या आणि बुद्धीच्या जोरावर जगभरात आपले नाव गाजवले. ‘महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो’ ही उक्ती तर गोमंतक मराठा समाजातील कलाकारांनाच समर्पित आहे, असे मानले जाते. याच उक्तीला गोमंतककन्या लतादीदी यांनी नवे परिमाण देत फक्त महाराष्ट्रच नाही, तर ‘भारत गोव्याच्या - म्हणजेच पर्यायाने लताच्या गळ्याने गातो’ असे जगाला म्हणायला लावले.

गोवा मुक्तिलढ्यामध्ये दिले योगदान

19 डिसेंबर 2021 रोजी गोव्याने आपल्या एकसष्टीमध्ये प्रवेश केला. सुमारे साडेचारशे वर्षांच्या कराल पोर्तुगाली पाशातून माणकुल्या गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी गोंयकारासह देशभरातील विविध जणांनी आपापल्या परीने शक्य ती सगळी मदत केली. अशा वेळी गोव्याच्या मातीशी ज्यांची नाळ जोडलेली होती, त्या लतादीदी तरी या सगळ्यामध्ये कशा मागे राहतील? कोणत्याही चळवळीला आर्थिक रसद लागतेच. आणि इथे तर प्रश्न एका प्रदेशाच्या मुक्तीचा होता. त्या वेळी प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके हे थेट गोवा मुक्तिलढ्यामध्ये सक्रिय होते आणि लतादीदी त्या काळात तर प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. लतादीदींचे गोवा कनेक्शन सुधीर फडक्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी दीदींना एक विशेष कार्यक्रम करण्याची आग्रही विनंती केली. दीदींनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता होकार दर्शवला आणि पुण्यामध्ये त्यांची ही विशेष संगीत रजनी सादर झाली. या संगीत रजनीमध्ये जमा झालेला सगळा निधी लतादीदींनी गोवा मुक्तिलढ्यासाठी समर्पित करत गोव्याबरोबरचे आपले नाते अधिक दृढ केले.


lata mangeshkar
 
पुढे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर लतादीदी गोव्यामध्ये विविध प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. 29 डिसेंबर 1999 ते 29 डिसेंबर 2000 हे वर्ष दीनानाथ मंगेशकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून गोवा सरकारच्या कला अकादमीच्या वतीने साजरे करण्यात आले. या वेळी समारोपाच्या दिवशी आयोजित ‘दीनानाथ मंगेशकर दर्शन सोहळ्या’ला लतादीदींची विशेष उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमामध्ये त्यांना चतुरंग संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या ‘चतुरंग’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर थेट 11 वर्षांनी 2011मध्ये लतादीदी गोव्यात आल्या. या वेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांना स्वराभिवादन करणार्या ‘स्वरमंगेश’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गोव्यातील स्वास्तिक संस्थेेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मात्र वयोमानानुसार त्यांनी प्रवास टाळले. त्यामुळे गोंयकारांना दीदींच्या भेटीचा पुनर्योग पुढे आला नाही.

आणि आता तर नाहीच!
Powered By Sangraha 9.0