@नितीन वैद्य - 9405269718
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक अनिल अवचट यांचे 27 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या साहित्यसंपदेतील वैविध्यावर व त्यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकून शब्दरूपी आदरांजली अर्पण करणारा लेख.
पूर्णिया’ हा मी वाचायला लागलो त्या काळात अगदी सुरुवातीलाच लागलेला पहिला मोठा पडाव. 88 साली विकत घेतलेले ते माझे पहिले पुस्तक होते. पाचव्या आवृत्तीतले. अवचटांचेही हे पहिलेच पुस्तक. या छोट्या पुस्तकात जयप्रकाश आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रत्यक्षानुभवाच्या नोंदी आहेत. बिहारमधली जातीची अनुल्लंघनीय उतरंड, जमीनदारीमुळे आलेली कमालीची विषमता, शोषणाचा कहर, दारिद्य्रातून आलेली मूक हतबलता यांचे समीप दर्शन त्यात होते. वाचल्यावर वाटले, अशी पुस्तकेही मराठीत पाच आवृत्त्यांपर्यंत जातात? कमाल अनलंकृत, साधी तरी विलक्षण संवादी चित्रदर्शी शैली. निर्मम तरी सहानुभावाने ओतप्रोत स्वर. साहजिकच पुढे वाचनात अनिल अवचट हे नाव माग काढत राहावे इतके ‘मस्ट’ होत गेले.
नंतर आलेली ‘छेद’ आणि ‘वेध’ ही छोटी सदरांची पुस्तके म्हणजे सत्तरीच्या सुरुवातीच्या अस्वस्थ काळाचा दस्तऐवज आहे. भ्रष्टाचाराच्या रोज उघडकीला येणार्या कहाण्या, भोंदूगिरीला आलेला बहर, मध्यमवर्गीयांचे कोशात जाणे, राजकारणाचे हिडीस होत चाललेले स्वरूप यावर संदर्भाने केलेली प्रासंगिक, तात्कालिक तरी धारदार टिप्पणी यात आहे. पुढच्या दीर्घलेखनात दिसलेले निर्मम तरी सहानुभवी ताटस्थ्य (ज्याचा परिणाम अधिक होतो) यात नाही, ‘हे सगळं बदलून टाकू’ अशी तारुण्यातली काहीशी ऊर्मी दिसते.
‘हमीद’ हे छोटेसे पुस्तक दलवाई अकाली गेले त्याचे आठवणींच्या स्वरूपात केलेले आक्रंदन आहे. जेमतेम दशकभराच्या सहवासात त्याने आपल्यासह अनेकांचे आयुष्य कसे व्यापून टाकले, यांच्या कृतज्ञ भावाने केलेल्या नोंदी यात आहेत. समाजसुधारक हमीदइतकेच दलवाईंमधले निखळ माणूसपण यात दिसते. चांगली पुस्तके, सिनेमे, गाणी यात रमणार्या, पॉलिटिकल गॉसिप आवडणार्या, आयुष्याला सर्वांगाने कडकडून भेटू पाहणार्या हमीद दलवाईंचे हे दर्शन फार लोभस, चटका लावणारे आहे.
‘रिपोर्टिंगचे दिवस’ या खूप नंतर आलेल्या पुस्तकातले लेखनही याच काळातले आहे. इंदिरा गांधींच्या पुणे दौर्यापासून, भगवान बनलेल्या रजनीशांच्या आश्रमातील अंतर्गत खळबळजनक वाटतील अशा घटितांवरचे प्रत्यक्षदर्शी रिपोर्ताज यात आहेत.
या ‘वॉर्मअप’ म्हणता येईल (पुरेशा गांभीर्याने लिहिलेली, तरी) अशा मुशाफिरीच्याच काळात लिहिलेली, पण नंतर आलेली ‘माणसं’, ‘धागे आडवे उभे’, ‘संभ्रम’, ‘कोंडमारा’, ‘गर्द’, ‘वाघ्यामुरळी’, ‘धार्मिक’ ही पुस्तके हे अवचटांचे मराठी साहित्याला दिलेले सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. या पुस्तकांतून अवचटांनी आपल्या लेखनात आणला तो प्रदेश अपवाद वगळता मराठी साहित्य विश्वाने पाहिला नव्हता. साहित्याच्या मुख्य प्रवाहात तोवर हे अंधारे जग (हा गुन्हेगारीचा अंधार नाही, उर्वरित समाजाने माणुसकीचा किमान प्रकाशही न दाखवल्याने साकळून राहिलेला दारिद्य्राचा, त्यातून आलेल्या हतबलतेचा अंधार आहे) पडद्यामागे एखादी झलक दिसावी तेवढेच जुजबी, अनुभवशून्य असे. या पुस्तकांच्या पानांतून ते पृष्ठभागावर आले. ‘कोसला’च्या संदर्भात पु.ल. देशपांडे ‘ही कॉट अस नॅपिंग’ असे म्हणाले होते. अवचटांच्या एकापाठोपाठ एक आलेल्या दीर्घ लेखांनी सुखवस्तू वाचकांची झोप चांगल्या अर्थाने उडवली. ‘माणसं’च्या प्रस्तावनेत ना.ग. गोरेंनी आत्मताडक सुरात म्हटलेय, ‘शब्द आणि विचारांच्या थप्प्या लावण्याव्यतिरिक्त तुम्ही-आम्ही दुसरे काय केलेय आजवर? महाराष्ट्रापुरता विचार केला, तर संतांच्या शिकवणीचे सार - दया करणे जे पुत्रासी। तेच दासा आणि दासी॥ हेच होते नं? त्याची काय बूज समाजाने राखली?’ वाचकांच्या मनात जागणारा - कदाचित तात्पुरताही असेल, तरी - हा अपराधगंड हे अवचटांचे देणे.
दुष्काळात केवळ जगण्यासाठी पुण्यात आलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या झुंडी गावभर शोधक आशाळभूत नजरेने फिरत असताना त्यांना आपल्या परीघाबाहेर ठेवण्यासाठी धडपडणारे सुखवस्तू शहर. मालधक्क्यापासून सर्वत्र शारीरिक हमाली करणार्या श्रमजीवींचे कल्पनातीत यातनामय जगणे (अवचट या लेखाला शीर्षक देतात, ‘कोण माणसं, कोण जनावरं’), वीटभट्ट्यांपासून हातभट्टीपर्यंत काम करणार्या माणसांचे रहिवास, आणि कसलेच स्थान कुठेच नसल्याने कायम विस्थापित असे ‘अनिकेत’ भटके लोक.. मी राहतो त्या जगातच हेही सगळे राहात होते, आहेत? (याच काळात त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या भंगीकामाची पाहणी केली. पंढरपूरसारख्या यात्रेच्या वेळी शहराच्या लोकसंख्येच्या कैकपट अधिक माणसे येतात, तेव्हा त्यांच्या मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाट कशी लावतात? टोपली संडास पद्धती चालू असण्याचा हा काळ. माणूसपणाच्या चिंध्या करणारे काम हे लोक कसे करतात, हे त्यांनी अनुभवून पाहिले होते. हा पूर्ण लेखनऐवज प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात गहाळ झाला. पुढे 30-35 वर्षांनी त्यांनी अमेरिकेत एका निवांत वेळी आठवणीतून त्यावर दीर्घलेख लिहिला.) निपाणीतल्या अवाढव्य तंबाखू कारखान्यात काम करता करता परिस्थितीने जवळजवळ वेठबिगार केलेल्या माणसा-बायकांचे आयुष्य वाचले, तर पुण्यातले कामगार पोट भरून ढेकर देत आहेत असे वाटायला लागते. सापेक्षता सिद्धान्त इतक्या भयानकपणे पटावा? पण आता हा तरी तळ आहे नं, का यांच्या खालीही कण्हतकुंथत जगू पाहणारे कुणी आहेत? असे ‘धागे आडवे उभे’ वाचताना वाटायला लागते. त्याच्या मनोगतात ते घशात आवंढा आणणारे प्रश्न उपस्थित करतात -
‘आपल्या स्वत:च्या कर्तृत्वाचा विचार मनात येतो, तेव्हा हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. इचलकरंजीच्या एखाद्या यंत्रमाग कामगारापोटी जन्मलो असतो आणि 5-6व्या वर्षी वहीफणीच्या कामात जुंपला गेलो असतो, तर? कामाठीपुर्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलो असतो, तर? माणसातल्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे खुनापेक्षाही भयंकर वाटतं मला. परिस्थितीच्या दबावाखाली होत असलेले माणूसपणाचे हे खून किती सहज पाहतो आपण.’
पहिल्यांदा हे वाचले, तेव्हा आलेला शहारा आठवून गेला. एकदम संवेदनेशी नातेच जोडले जाते. या पुस्तकात अवचट वेश्यांच्या वस्त्या, थिएटर कामगारांचे जग, तमाशाचे विश्व, सांगली परिसरातले हळद कामगार, सौंदत्तीची देवाला सोडलेली माणसे, इचलकरंजीतले यंत्रमाग कामगार अशा अनेक समूहांच्या पिचलेल्या, शोषणाने खचलेल्या जगाचे दर्शन घडवतात. ‘वाघ्या-मुरळी’त अनेक तरुण-तरुणींची नासलेली आयुष्ये, ‘कोंडमारा’मध्ये जातीय दंगलींचे प्रत्यक्षातले वास्तव असे किती आणि काय काय त्यांनी लिहिले आणि वाचकांना ‘वाचलंच पाहिजे’ अशा नैतिक धाकासह वाचायलाही लावले. असे याआधी झाले नव्हते, नंतरही गिरीश प्रभुणेंसारखा एखादा अपवाद वगळता दिसत नाही.
‘स्वत:विषयी’ हे स्वत:ची झाडाझडती घेणारे मराठी आत्मपर लेखातले महत्त्वाचे पुस्तक आहे. आपले बालपण, जडणघडण यात पुढे आपल्यात झालेल्या आमूलाग्र बदलांची पाळेमुळे शोधताना दिसतात अवचट. संगोपन, दहावीचे वर्ष, डॉक्टरी या त्यातल्या गाजलेल्या लेखांव्यतिरिक्त ‘धार्मिक’ या नावाचा महत्त्वाचा लेख यात आहे. घरचे सनातनी म्हणावे असे वातावरण, गावातली धार्मिकता यावर तपशिलाने लिहिताना शेवटी ते म्हणतात, ‘धर्म-जातींनी ग्रस्त समाजाचे मन समजायचे असेल तर ते आहे तसे पाहायला शिकले पाहिजे, शिक्के मारून चालणार नाही’. आपण आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही असे ते यात शेवटी म्हणतात, ते त्यांच्यातल्या स्वीकारशीलतेचे, माणसे समजून घेण्यातल्या अपार सहानुभावाचे महत्त्वाचे कारण आहे असे वाटते, अनेक वर्षे परिवर्तनवादी चळवळीशी आतड्याचे नाते असूनही नकारात्मक एकारलेपण त्यांच्यात आले नाही, याचेही.
त्यांच्या ‘मोरा’चेही मराठी ललित वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. मध्यमवर्गीयांनी ग्लॅमराइज करून ठेवलेल्या अनुभवांना वास्तवाचा आरसा दाखवतात अवचट. कुत्र्यांचे गोजिरवाणे वगैरे पिलू पाळण्याचा अनुभव, मोर जवळून पाहताना सौंदर्यानुभवापेक्षा त्यांच्या नजरेत दिसलेले भीतीने क्षणभर थिजवणारे क्रौर्य, माणसाच्या पतनाची सुरुवात कधी होते? आपल्याला आपल्याच वृत्तीचा भरोसा असतो? असे अनुभवातून पडणारे प्रश्न.. मनाच्या श्रांत अवस्थेत, कुठल्याही अनुभवांच्या पाळतीवर नसतानाही मनाच्या सांदीकोपर्यात काही साचत जाते. रवंथ केल्यासारखे ते आठवतानाही अवचट लिहितात, ते प्रश्न विचारणारेच असते. ‘दिसले ते’, ‘जगण्यातले काही’ या पुस्तकातही असे काही दृष्टी देणारे अनुभव आहेत. त्यांनी शब्दश: असंख्य व्यक्तिचित्रे लिहिली. त्यातही किती विविधता.. ‘आप्त’पासून ‘आपलेसे’पर्यंत. कामाचा डोंगर उभी करणारी सर्वार्थाने मोठी माणसे ते जगणे रेटावे लागत असतानाही समाधानी आनंदी असणारी सामान्य उद्योगी माणसे..
अलीकडची उत्तरायणात आलेली त्यांची पुस्तके मात्र वेगळी. वयोमानानुसार भटकंती थांबली, तसा मुळातल्या कुतूहलाचा पैस विस्तारत मुंग्यांपासून मधमाश्यांपर्यंत, मानवी शरीरातल्या रक्तापासून गर्भसंभवापर्यंत असंख्य विषय समजून घेण्याची आणि सोप्या संवादी शैलीत पोहोचवण्याची धडपड. या अफाट समृद्ध धडपडीच्या, थकवण्यार्या प्रवासातही आनंदी ठेवणार्या, आपल्यापुरती ‘स्पेस’ देणार्या चित्रकलेपासून, वादन-गायन, ओरिगामी, काष्ठशिल्प अशा छंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे लेखन.
आजवरही कुठे पोहोचायचे असे नव्हतेच. पण समृद्ध करणारी, तरी चढ असलेली दमसासाची परीक्षा असणारी भटकंती होती. आता इथून पुढे मस्त मस्त उतार म्हणत ‘ग्रीन सॅलड डेज’मध्ये लिहिली नाही ती कविताही लिहिली. पण त्यातही ‘पुण्याची अपूर्वाई’ हे पुण्यावरच्या पुस्तकांत वेगळे उठून दिसावे, अनिवार्य असावे असे पुस्तक. सामान्य उद्योगी, श्रमजीवींच्या आपल्या अतिओळखीतल्या, कदाचित त्यामुळेच एरवी नजरेसमोरून नुसत्याच सरकून जाणार्या पुण्याची ही वेगळीच पण अपरिहार्यपणे असायला हवीच अशी ओळख यात आहे.
या सगळ्या लेखनात दिसते ते विलक्षण म्हणावे असे स्मरण. निव्वळ आठवणीतून उभा केलेला तपशिलांचा मनोरा आपण समोर पाहात आहोत, असा फील येण्याइतका जिवंत.
प्रातिभ कल्पना, रचिते यांच्या चुकूनही वाट्याला न जाता लेखनाचे एवढे मोठे दालन त्यांनी अनुभव याच गुरूच्या आणि भांडवलाच्या बळावर उभारले. पर्वत येत नसेल आपल्याकडे तर आपणच पर्वताकडे जायला हवे म्हणत महाराष्ट्र, त्याचा सीमाभाग अशी सतत भ्रमंती करत असंख्य अनुभवांनी भरलेली आपली पोतडी जिवंत लेखनातून रिती केली. त्यातून अशा वेगळ्या लेखनाच्या वाटेवरच्या निळू दामलेंपासून मिलिंद बोकील यांच्यापर्यंत अनेकांच्या वाटा मोकळ्या झाल्या. लेखनाच्या तोवरच्या सगळ्या संकेतांना न जुमानता केलेल्या या लेखनाने त्यांना भारतीय लेखक म्हणून आयोवातल्या रायटर्स वर्कशॉपमध्ये नेले.
कसलाही विद्रोहाचा आव न आणताही साहित्याचे सगळे प्रचलित नॉर्म्स नाकारत वेगळीच जिवंत धाटणी त्यांनी समोर ठेवली असे म्हणता येईल, पण हेही तसे खरे नाही. काहीही न नाकारता पण कसल्याच निकषांचा दबाव न घेता सहज बोलू तशा शैलीत त्यांनी लिहिले. याचा काहीसा अतिरेक शेवटच्या लेखनात झाला, पण सुरुवातीच्या पुस्तकांत त्यातून प्रत्यक्षानुभवाची धग जाणवते, ती कमाल आहे.
‘मी नकळत लेखक झालो आहे, पाहिलं ते सांगावंसं वाटलं म्हणून लिहिलं, एवढंच’ असं ते म्हणालेत. तो आणलेला आव नाही, वस्तुस्थितीच आहे. ते सहज प्रश्नोत्तरातून सांगत राहतात,
शैली कमवावी लागते.
म्हणजे तालमीत जोर-बैठका काढून शरीर कमावतात तशी?
लिहायचं तर भरपूर शब्दसंपत्ती हवी..
म्हणजे शब्दकोश पाठ करायचे?
पुढे ते कमावलेल्या शैलीतील भरपूर शब्दसंपत्ती वापरून लिहिलेला मजकूर जर संवादी, आपण सहज गप्पा मारतो, बोलतो त्यात लिहिला तर किती फरक पडतो परिणामात, याची उदाहरणे देत राहतात. यातही पुन्हा आग्रह नाही.
यात उपरोध आहेच. पण त्यापेक्षा प्रांजळ सहजता अधिक आहे. म्हणून तर अस्वस्थ करणारा ऐवज असूनही तो एवढ्या प्रमाणावर वाचला गेला. ‘माणसं’ आणि ‘स्वत:विषयी’ ही त्या त्या जॉनरमधली एपिक म्हणावी अशी पुस्तके. माणसे असतील तोवर ‘माणसं’ असेल. आत्मपर लेखनाचा आढावा ‘स्वत:विषयी’विना अपुरा असेल. प्रवासानुभव वाचताना ‘अमेरिका’ आठवेलच.
अवचट गेले आणि ही आणि त्यांची इतरही पुस्तके आणि वाचतानाचा आपलाही ओढाळ काळ स्मृतीत उतरून आला. माणसे आणि त्यांचे जगणे यांच्याबद्दल इतके अपार सहानुभवी, निरागस कुतूहल त्यांच्या जाण्याने शांत झाले आहे..