मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी दलित सकारात्मकतेचे शिल्पकार!

विवेक मराठी    02-Feb-2022
Total Views |
सुधीर जोगळेकर | 9820016674
पेंग्विन बुक्सने प्रकाशित केलेलं सुदर्शन रामभद्रन आणि गुरू प्रकाश पासवान या अभ्यासक पत्रकार दुकलीचं ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ हे पुस्तक आहे. दलित समाजातील अनेक समाजसुधारकांचे व्यक्तिवेध व कार्याबद्दल माहिती यामध्ये वाचयला मिळते. महाराष्ट्रात समरसतेची चळवळ चालवणार्‍या सामाजिक समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणारं पुस्तक आहे.

book

पेंग्विन बुक्सने प्रकाशित केलेलं सुदर्शन रामभद्रन आणि गुरू प्रकाश पासवान या अभ्यासक पत्रकार दुकलीचं ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. वाचून झाल्यानंतर ते मराठी वाचकांपर्यंत जायला हवं आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात समरसतेची चळवळ चालविणार्‍या सामाजिक समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांनी ते वाचायला हवं, असं सारखं जाणवत राहिलं. हेच या लेखाचं प्रयोजन...
हे पुस्तक तीन भागात प्रस्तुत करण्यात आलं आहे, त्यातला पहिला भाग आहे प्रस्तावनेचा. दुसरा भाग आहे तो पाच हजार वर्षांपासूनच्या भारतीय इतिहासातील काही नामवंत दलित व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आणि तिसरा समारोपाचा भाग आहे तो एकविसाव्या शतकात दलित समाजाचं नेतृत्व करणार्‍या आणि सकारात्मकतेचा भाव जपत दलितहिताबरोबरच देशहिताला प्राधान्य देणार्‍या निवडक पंधरा-वीस व्यक्तिमत्त्वांच्या परिचयाचा. पहिल्या भागात आढावा घेण्यात आला आहे तो व्यास-वाल्मिकींपासून बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांच्यापर्यंतच्या सुमारे अठरा-एकोणीस व्यक्तिमत्त्वांचा आणि त्यांच्या कार्याचा. ही सारी व्यक्तिमत्त्वं तशी दलित समाजातील. वैयक्तिक जीवनात या सर्वांच्याच पदरी तथाकथित सवर्ण समाजाकडून अवहेलना आली, तरीही समाजाने केलेली उपेक्षा, घरचं अठराविशे दारिद्य्र या सर्वांवर मात करत ही मंडळी समाजात ताठ मानेने उभी राहिली, वैयक्तिक स्वत:ची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करत राहिली आणि समाजहिताला बाधा येईल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडणार नाही, किंबहुना समाजाचं आणि पर्यायाने राष्ट्राचं हितच साधलं जाईल याची काळजी उभं आयुष्य घेत राहिली.

 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
सवलतीच्या दारात ४००/- रुपयाला उपलब्ध.
https://www.vivekprakashan.in/books/social-justice-warrior-anna-bhau-sathe/

स्वत: रामभद्रन आणि पासवान यांनीच या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. जवळपास 45 पृष्ठांच्या या प्रस्तावनेत दलित या शब्दप्रयोगाच्या वापराचा, दलित समस्येचा, दलित साहित्यिक चळवळीचा, अर्वाचीन काळातील दलित प्रश्नांच्या मांडणीचा आणि सामाजिक एकात्मतेचे, सामाजिक ऐक्याचे आव्हान पेलताना घ्यावयाच्या काळजीचा, दलित समाजाला स्वयंपूर्णतेच्या दिशेने, स्वयंपूर्णतेच्या मार्गावर चालताना अपरिहार्यपणे स्वीकाराव्या लागणार्‍या सकारात्मक दृष्टीकोनाचा आढावा उभय लेखकांनी या प्रस्तावनेत घेतला आहे. ज्या व्यक्तिमत्त्वांवर रामभद्रन आणि पासवान यांनी लिहिलं आहे, त्यांचीच निवड पुस्तकासाठी का केली याचं मुद्देसूद विवेचनही लेखकांनी केलं आहे, जे मुळातून अभ्यासण्यासारखं आहे.


book
रामभद्रन आणि पासवान यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य महत्त्वाचं आहे. व्यास आणि वाल्मिकी ऋषींच्या योगदानाचा संदर्भ घेत बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे, ‘हिंदूंना वेद हवे होते, त्यांनी व्यास मुनींना पाठवले, जे स्वत: हिंदू जातीतील नव्हते. हिंदूंना महाकाव्याची गरज होती, त्यांनी वाल्मिकी ऋषींना पाठवले, जे मुळातच अस्पृश्य गणले जात होते. हिंदूंना राज्यघटना हवी होती, त्यांनी मला पाठवले.’ त्यांनी हा शब्द वापरताना बाबासाहेबांचा निर्देश जगन्नियंत्याकडेच असणार, हे निश्चित. या पुस्तकातलं पहिलंच व्यक्तिमत्त्व आहे केरळचे बंडखोर दलित नेते अय्यंकली यांचं. त्यांच्या कार्याचं महत्त्व जाणून 1980 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी थिरुवनंतपुरममध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, तर 2014 साली सत्तेत आल्या आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली होती. परंतु इतकं असूनही इतिहासकारांनी मात्र आजवर त्यांची उपेक्षाच केली, असं लेखकांचं निरीक्षण आहे, आणि ते खरं असण्याची शक्यता अधिक आहे..
पुस्तकाचा दुसरा भाग आहे सुमारे 149 पृष्ठांचा आणि त्यात लिहिण्यात आलं आहे ते अठरा व्यक्तिमत्त्वांविषयी. बैलगाडीचा प्रवासदेखील ज्या काळी पुलयार समाजासाठी निषिद्ध मानला जात होता, अशा काळात अय्यंकली यांनी बैलगाडीत बसून शहरात प्रवास केला. दलित समाजाच्या मुलांना शिक्षण निषिद्ध मानलं जात होतं, अशा काळात त्यांना शिक्षण मिळावं यासाठी पुलयार यांनी बंड पुकारलं. पुलयार समाजाच्या स्त्रिया शरीराचा वरचा भाग वस्त्रांनी झाकू शकत नव्हत्या, अशा काळात समाजाच्या विरोधात बंड पुकारून त्यांनी पुलयार स्त्रियांना चोळ्या घालायला मोकळीक देऊ केली. समाजावरील अन्यायाच्या विरोधात उठवल्या जाणार्‍या आवाजाला परिणामस्वरूप काही भोगावं लागलंच, तर त्या अन्यायाची सुनावणी करण्यासाठी त्यांनी समाज न्यायालयं उघडली, समाजाला राजकीय प्रतिनिधित्व लाभावं यासाठी निवडणुका लढवल्या. पुलयार समाजाला प्रगत व्हायचं असेल तर देवावर विश्वास, आधुनिक राहणी, स्वच्छता, शिस्त आणि आज्ञाधारकपणा त्याने अंगी बाणवलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. पुलयार समाजाला इस्लाम आणि ख्रिश्चन बनण्याचं आमिष अनेकदा दाखवलं गेलं, परंतु हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहातच पुलयार समाज राहावा, यासाठी अय्यंकली यांनी आर्य समाज-हिंदू महासभा-केरळ हिंदू मिशन यांच्याबरोबर हातात हात घालून काम केलं. अय्यंकली, नारायणगुरू यांच्यासारख्या सुधारक व्यक्तींनी सामाजिक अभिसरणाचा जो आग्रह धरला, त्यामुळेच केरळ सरकारला सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांमध्ये दलित पुजारी नेमता आले.


book
बाबू जगजीवनराम
मोफत शिक्षणाचं, परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याचं आमिष ख्रिश्चन समाजाने बाबू जगजीवनराम यांनाही दाखवलं. परंतु बाबूजींची आई ठामपणे उभी राहिली, तिने बाबूजींना ख्रिश्चन शाळेत प्रवेशही घेऊ दिला नाही, मिशनच्या पैशाने परदेशात जाऊ दिलं नाही आणि ख्रिश्चन धर्मदेखील स्वीकारू दिला नाही. बाबू जगजीवनराम यांच्या लहान वयातली ही घटना त्यांच्या पुढच्या आयुष्यातही तसाच विचार टिकवणारी ठरलेली दिसते. बाबू जगजीवनरामांनी धरलेल्या आग्रहामुळेच काशीतल्या विश्वनाथ मंदिराचे, मदुराईतल्या मीनाक्षी मंदिराचे आणि पुरीतल्या जगन्नाथ मंदिराचे दरवाजे दलितांसाठी खुले झाले. 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली, तेव्हा झालेल्या संत-महंत-नेत्यांच्या बैठकीला काँग्रेस पक्षातून केवळ बाबू जगजीवनराम हेच एकटे उपस्थित होते. बाबू जगजीवनरामांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मकता त्यांच्या एका वक्तव्यात सहजी दिसून येते. ते म्हणत, “देशाच्या प्रगतीतच दलित समाजाची प्रगती अंतर्निहित आहे, देशाच्या मोक्षातच दलित समाजाला मोक्ष मिळण्याची शक्यता आहे आणि देशाच्या मुक्तीतच दलित समाजालाही मुक्ती लाभण्याची शक्यता आहे.”


book

तेलुगू कवी गुर्रम जशुवा
तिसरं व्यक्तिमत्त्व आधुनिक तेलुगू कवी गुर्रम जशुवा यांचं. जशुवा यांचं शिक्षण ख्रिश्चन मिशनरी शाळेत झालं, परंतु त्यांनी लिहिलेल्या ध्रुव विजयम, हिमधर्मका परिणयम यासारख्या काव्यामुळे ते हिंदुत्ववादी असल्याचा शिक्का मिशनने त्यांच्यावर मारला आणि त्यांना शाळेतूनच नव्हे, ख्रिश्चन धर्मातूनही बहिष्कृत केलं. जशुवांनी बहुतांश लेखन केलं ते राष्ट्रभक्तिपर, सामाजिक सुधारणापर. त्यांना महाकवी, नवयुगकवी असे संबोधलं गेलंच, तसंच त्यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी सन्मान आणि मानद डॉक्टरेट देऊनही गौरवण्यात आलं. जात, जातीयता आणि अस्पृश्यता या विरोधात जशुवांनी कडाडून लढा दिला. तेलुगू शाळांत आणि विद्यापीठांमध्ये जशुवांचं काव्य क्रमिक पुस्तकांमध्ये अंतर्भूत केलं गेलं.



book

दक्षायनी वेलायुधन
पुढचं व्यक्तिमत्त्व दक्षायनी वेलायुधन यांचं. दक्षायनीदेखील पुलयार समाजातल्या. ज्या काळात पुलयार समाजातील पुरुष शिक्षण घेऊ शकत नव्हते, सवर्ण जातात अशा रस्त्यांवरून चालू शकत नव्हते, अशा काळात पुलयार समाजातील स्त्रीनं शिक्षण घ्यायचं आणि भारताच्या सर्वोच्च मानल्या जाणार्‍या घटना समितीवर मान्यवर सदस्य म्हणून काम करायचं हे कुणाच्या कल्पनेतही बसणारं नव्हतं. परंतु दक्षायनी सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकल्या, मद्रास विद्यापीठातून संपूर्ण शिष्यवृत्तीवर त्यांनी पदवी प्राप्त केली, पदवी प्राप्त करणार्‍या देशातील पहिल्या दलित महिला म्हणून त्यांची नोंद झाली. त्यानंतर तब्बल दहा वर्षं त्यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. दक्षायनीचा अर्थ दुर्गा. पुलयार समाजातील स्त्रीला कंबरेवर कोणतंही वस्त्र घालायला समाजाची परवानगी नव्हती, अशा काळात तो निर्बंध मोडण्यासाठी लागणारं धाडस तिने दाखवलं. दक्षायनीने दलित नेते रामन केलन वेलायुधनशी 1940 साली लग्न केलं. पुढे दोघंही संसद सदस्य बनले. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी उभयतांचं लग्न लावलं. ख्रिश्चन धर्मात जाण्यासाठीची आमिष तिलाही दाखवली गेली. चर्चच्या शाळेत शिकूनही तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, हिंदुत्वाच्या व्यापक परीघात राहणंच तिने पसंत केलं. डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेविरोधात दक्षायनीने प्रखर लढा दिला, शेवटी केरळ सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि या ऐतिहासिक प्रथेला सोडचिट्ठी द्यावी लागली.


book

संत रविदास
 
संत रविदास हे समरसतेच्या शिल्पकारांपैकी आणखी एक व्यक्तिमत्त्व. ते 121 किंवा 151 वर्षं जगले, असं मानलं जातं. वाराणसीजवळच्या गोवर्धनपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. तिथे आता श्री गुरू रविदास जन्मस्थान मंदिर उभारण्यात आलं आहे, जे दलित ऐक्याचं, दलित जागृतीचं केंद्र म्हणून ओळखलं जातं आहे. रविदास चांभार जातीत जन्मले, परंतु ते उच्चवर्णीय ब्राह्मणांसारखे राहत, तशी वस्त्रं घालत, शंख वाजवत, देवळातील घंटा वाजवत आणि कपाळावर टिळा लावत. देवनागरी लिपी वापरायला निम्नवर्गीयांना मज्जाव असल्याने रविदासांनी 34 मुळाक्षरांची गुरुमुखी लिपी बनवली, ज्या लिपीतून त्यांनी त्यांचे विचार संवादात्मक पद्धतीनं लोकांपुढे मांडले. गुरुमुखी मुळाक्षरांची निर्मिती संत रविदासांनीच केली असल्याची अधिकृत कबुली लाहोर न्यायालयानेच फाळणीपूर्वीच्या एका निवाड्यात दिली आहे. संत मीराबाई यांचे गुरू म्हणजे संत रविदास अशीही मान्यता आहे. मार्टिन ल्युथर किंग यांच्या ‘आय हॅव अ ड्रीम’ या ऐतिहासिक भाषणाच्या 500 वर्षं आधी संत रविदासांनी कल्पना मांडली होती समानता-मानवता आणि सर्व प्रकारच्या जातीय, वर्गीय आणि आर्थिक बंधनांपासून मुक्त अशा समाजाची. बेगमपुरा ही त्यांची कविता अश्रुविरहित शहराची - म्हणजेच दु:खरहित समाजाची कल्पना मांडणारी होती. संत रविदासांचे अनेक विचार पुढे भारतीय राज्यघटनेत उमटले. रविदासांच्या स्मरणार्थ बाबू जगजीवनरामांनी वाराणसी शहरात जे मंदिर बांधलं, त्याचे चहूबाजूंचे चार स्तंभ चार प्रमुख धर्मांची प्रतीकं, तर मंदिराचा मधला स्तंभ वैश्विक धर्माचं प्रतीक मानलं जातं.
 
के.आर. नारायण हे दलित समाजातून बनलेले भारताचे पहिले राष्ट्रपती. केरळ राज्यातल्या सध्याच्या कोट्टायम जिल्ह्यात किंवा तत्कालीन त्रावणकोर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. प्रचंड दारिद्य्रात वाढलेलं कुटुंब. नारायणन यांच्या वडिलांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय नारळ उतरवण्याचा. क्रमिक पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, शाळेत जाण्यासाठीचं 15 किलोमीटरचं रोजचं अंतर कापण्यासाठी बसकरता पैसे नाहीत, शाळेची फी भरायची ऐपत नाही अशा स्थितीत नारायणन शिकले, त्रावणकोर विद्यापीठातून पदवी प्राप्त करताना पहिली श्रेणी प्राप्त करणारे केरळ राज्यातले ते पहिले विद्यार्थी ठरले. त्यांना परदेशात शिकायची संधी मिळाली. 1948 साली भारतात परतल्यानंतर ते सनदी सेवेत रुजू झाले आणि भारताचे राजदूत म्हणून विविध देशांत त्यांची नियुक्ती झाली. पुढे ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर संसदेचे सदस्य बनले आणि भारताचे उपराष्ट्रपती बनले. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं - ‘सार्वजनिक जीवनात रबर स्टँप बनून वावरणार्‍या व्यक्ती हे समाजाच्या गळ्यातील लोढणं ठरतात.’ नारायणन यांनी कधीही स्वत:ला रबर स्टँप बनू दिलं नाही. नारायणन यांना जगभरातील अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरवलं.
मंडल आयोग हे नाव ज्यांच्यामुळे पडलं, ते जोगेंद्रनाथ मंडल. दलितांच्या हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जे झगडत राहिलं असं हे व्यक्तिमत्त्व. शिक्षण, न्यायालयं, अर्थव्यवस्था, राजकारण, सहकारी संस्था या प्रत्येकात दलितांना समान संधी मिळावी यासाठी झुंजत राहिलेला हा नेता. बंगालमधील सर्वात मोठी जात म्हणून ओळखल्या जाणार्‍या नामशूद्र जातीत मंडल जन्माला आले. बी.ए., एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मंडल बोस बंधूंच्या आणि कालांतराने बाबासाहेब आंबेडकरांच्याही संपर्कात आले. घटना समितीवर आंबेडकरांची नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणार्‍यात मंडल अग्रभागी होते असं सांगण्यात येतं. बंगालमध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात दोघांचाही सहभाग होता. घटना समितीवर निवडून जाण्यासाठी प्रांतिक विधिमंडळांनी इच्छुक उमेदवाराला निवडून दिलं असलं पाहिजे, अशी नवी अट ब्रिटिश सरकारने घातल्यानंतर आंबेडकर बंगालमध्ये गेले. मंडल यांच्या प्रयत्नाने पुरेशी मतं मिळवून आंबेडकर घटना समितीवर निवडून गेले. त्यांच्या या उमेदवारीला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. भारताच्या फाळणीला मंडल आणि आंबेडकर दोघांचाही विरोध होता. फाळणी होण्याने मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाहीत, आणि फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झालाच तर उभ्या दक्षिण-पूर्व आशियात पाकिस्तानइतका दुसरा अविकसित देश असणार नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. मुस्लीम लीगने जेव्हा 16 ऑगस्ट 1946ला स्वतंत्र मुस्लीम देशाच्या निर्मितीसाठी डायरेक्ट अ‍ॅक्शन डे घोषित केला, तेव्हा त्याच्या विरोधात उतरण्याचं आणि दलित बांधवांनी शांतता पाळण्यासाठीचं आवाहन मंडल यांनी केलं. दलित बांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला. पाकिस्तानी कवी अख्तर बलोच त्यांना म्हणाले, “तुम्ही यांच्यासाठी जीव देण्याची तयारी दाखवलीत, परंतु एक लक्षात ठेवा, हे लोक तुमच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहणार नाहीत.” दलितांना जबरदस्तीने इस्लाममध्ये परिवर्तित केलं जात असल्याचा वा तो धर्म न स्वीकारल्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानातील हिंदूंवर होणारे अत्याचार पाहून अस्वस्थ झालेल्या मंडल यांनी पाकिस्तान सरकारातील पदाचा राजीनामा दिला. 1950मध्ये मंडल भारतात परतले, पूर्व पाकिस्तानातून भारतात येणार्‍या हिंदू शरणार्थीच्या मदतीसाठी त्यांनी काम सुरू केलं. मंडल यांच्या या कामाची नोंद त्यांच्या अनुयायांनी पुरेपूर ठेवली असावी, कारण त्यामुळेच आज त्यांच्या नावाच्या असंख्य शाळा व कॉलेजेस पश्चिम बंगालमध्ये आहेत.

स – संविधानाचाया पुस्तकातून राज्यघटना स्वतः आपल्या निर्मितीची कथा मुलांना सांगणार आहे.
भावी पिढीतील संविधानाचे जे रक्षक आहेत, पालक आहेत म्हणजे आजची जी पिढी आहे यांच्यापर्यंत संविधान हा विषय पोहोचावा हा या मागील हेतू आहे.
5वी ते 10वीच्या मुलांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक…
आपली प्रत आजच नोंदवा.


https://www.vivekprakashan.in/books/of-the-constitution/


महर्षी वाल्मिकी यांचं मूळ नाव रत्नाकर. रत्नाकरचा वाल्मिकी कसा झाला आणि त्याचा आदिकवी कसा बनला, याचे असंख्य तपशील शालेय इतिहासात आपण शिकलो आहोत. 24 हजार श्लोकांचं रामायण नेमकं कधी लिहिलं गेलं ते ठाऊक नाही, परंतु एका अंदाजानुसार ते ख्रिस्तपूर्व 3000 सालात लिहिलं गेलं असावं. याचाच अर्थ त्याला आता पाच हजारहून अधिक वर्षं होत आली असावीत. पण वाल्मिकींचं योगवासिष्ठ सहाव्या ते चौदाव्या शतकादरम्यान लिहिलं गेल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वाल्मिकीविषयी इतिहासात नोंद नाही असं काहींचं म्हणणं. वाल्मिकी जयंती म्हणजेच आश्विन पौर्णिमेचा दिवस हा दिवस प्रगत दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशात वाल्मिकींची अनेक मंदिरं आहेत, परंतु सर्वात जुनं, म्हणजे 1300 वर्षांपूर्वीचं वाल्मिकी मंदिर चेन्नई शहरात ईस्ट कोस्ट रोडवर असल्याचं सांगण्यात येतं. वाल्मिकी समाजाची संख्या भारतात एकूण लोकसंख्येच्या 16 टक्के इतकी भरते. वाल्मिकी समाज प्रामुख्याने भरती केला जातो तो नगरपालिकांत, दवाखान्यांत आणि सरकारी ऑफिसात सफाई कामगार म्हणून. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र हा समाज राजकारणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येऊ लागला, बुटासिंग हे याचं नेमकं उदाहरण.
वेदव्यास हेच मुळात सामाजिक एकात्मतेचं मूर्तिमंत प्रतीक मानायला हवं. याचं कारण व्यासांचे वडील महर्षी पराशर हे उच्च वर्णातले आणि त्यांची आई कोळी समाजातली. त्यामुळे व्यासांचा जन्म आंतरजातीय विवाहातून झालेला. त्यांनी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करावं आणि त्यांची जन्मतिथी ही गुरुपौर्णिमा म्हणून हिंदू कालगणनेत साजरी व्हावी, हेच किती वैशिष्ट्यपूर्ण! वाल्मिकींनी रामायण लिहिलं, तर व्यासांनी महाभारत. एखाद्या माणसाचा जन्म कोणत्या कुळात झाला आणि त्याची पार्श्वभूमी काय यावर त्या माणसाचं प्राक्तन ठरत नसतं, हेच महर्षी व्यासांच्या रूपाने जगासमोर आलं.
सावित्रीबाई फुले आणि सोयराबाई अशा या मालिकेतील आणखी दोन क्रांतिज्योती. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या क्रांतिकारक कार्याविषयी मराठी माध्यमात भरपूर लिहिलं गेलं आहे. त्यांच्यानंतरचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर सडकून टीका केली, पण त्याहीपेक्षा अधिक टीका त्यांनी मार्क्सवादावर केली, कम्युनिस्ट विचारप्रणालीवर केली. सामाजिक बहिष्कार हा कायद्याने गुन्हा ठरावा यासाठी आंबेडकरांनी कसून प्रयत्न केले. 2012 साली आउटलुक मासिक, सीएनएन-आयबीएन आणि हिस्टरी चॅनेलने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंतीचं भारतीय नेतृत्व हा मान बाबासाहेबांच्या वाट्याला आला. गांधी, नेहरू आणि पटेल यांचे क्रमांक त्यांच्यानंतर लागले.
सरदार उधमसिंह हे या पुस्तकात वर्णिलेल्या व्यक्तिमत्त्वांमधलं शेवटचं व्यक्तिमत्त्व. उधमसिंहांची आई वयाच्या तिसर्‍या वर्षी, तर वडील वयाच्या सातव्या वर्षी गेले आणि उधमसिंह पोरका झाला. अमृतसरमधल्या एका खालसा अनाथालयात भावाबरोबर उधम वाढला, पण भाऊही 1917मध्ये, म्हणजे उधमच्या वयाच्या अठराव्या वर्षी गेला आणि उधम एकटा उरला. उधमचा जन्म कंबोज जातीतला. त्याला दारिद्य्राला तर सामोरे जावं लागलंच, तसेच जातिव्यवस्थेचे भीषण चटके त्यालाही बसले. तो 32 सिख पायोनिअर्स या ब्रिटिश लष्करातील पलटणीत रुजू झाला. परंतु त्याला कामं मिळाली ती प्रत्यक्ष लढण्याऐवजी रेल्वे-बोटी दुरुस्तीची. त्याला तीन वर्षांसाठी बगदादला पाठवण्यात आलं, तिथे त्याने सुतारकाम केलं. उधमने नोकरी पत्करली होती ती पोट भरण्यासाठी. त्याला ही असली कामं सहन होईनात. त्याने ती नोकरी सोडून आफ्रिकेला जायचं ठरवलं. मधल्या काळात याच काळात जालियानवाला हत्याकांड घडलं. ते घडलं, तेव्हा उधम प्रत्यक्ष तिथे होता. आपण हतबल आहोत, काही करू शकत नाही ही भावना त्याला अस्वस्थ करून गेली आणि तो पेटून उठला. त्याच्या हातून जनरल डायरची हत्या झाली ती त्यातून.
पुस्तकाचा तिसरा आणि अखेरचा भाग आहे सुमारे 21 पृष्ठांचा. सकारात्मकतेला प्राधान्य देत जीवन जगणार्‍या आणि ते जगता जगता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या 13 व्यक्तिमत्त्वांविषयी यात लेखकद्वयाने लिहिलं आहे. त्यात डिक्की या दलित उद्योजकांच्या राष्ट्रव्यापी फोरमची स्थापना करून आपल्या उद्योगांद्वारे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती देणार्‍या, देशभरातील दलित उद्योजकांना एकत्र आणणार्‍या मिलिंद कांबळे यांच्याविषयीचाच पहिला लेख आहे, तर दुसरा लेख केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या टीना दाबीविषयी आहे. प्रशासकीय पद्धतीत बदल घडवून आणायचा असेल तर बाहेर राहून चालणार नाही, तुम्ही प्रशासकीय यंत्रणेत गेलं पाहिजे आणि आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हणणारी टीना राजस्थानात नियुक्त आहे. ती म्हणते “टीका सकारात्मकतेने घ्या, पण त्यच वेळेला तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संघर्ष करायला तयार राहा, तुम्ही तुमच्या स्थानावर खंबीर राहा.” अर्जुन राम मेघवाल हे तिसरं व्यक्तिमत्त्व. ते सध्या केंद्र सरकारात मंत्री आहेत. ते म्हणतात, “माझ्यावर आंबेडकरांचा प्रभाव आहे, मी आंबेडकर वाचले आहेत आणि मी आंबेडकरांच्या तत्त्वांनुसार जगतो आहे.” मेघवाल एका सामान्य कोष्ट्याच्या घरात जन्मले, तिथून त्यांनी कष्टाने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, ते सनदी अधिकारी बनले आणि पुढे खासदार बनून केंद्र सरकारात मंत्री बनले.
राधिका गिल या जम्मू-काश्मीरच्या अ‍ॅथलीट. त्या वाल्मिकी समाजाच्या. 1957 साली वाल्मिकी समाजाच्या दोनशे कुटुंबांना पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं. त्यांनी तिथे सफाई कामगाराची किंवा मैला वाहून नेण्याची नोकरी पत्करावी अशीच जणू तेव्हाच्या सरकारची इच्छा. स्थलांतराच्या बदल्यात नोकरीबरोबरच तिथे स्थायिक होण्यासाठीची परवानगी देण्याचं आणि त्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचं आश्वासनही सरकारने दिलं. पण राधिकाच्या म्हणण्यानुसार आज इतकी वर्षं उलटूनही ना त्यांना जात प्रमाणपत्र मिळालं, ना राहण्यासाठी स्वत:चं हक्काचं घर. राधिकाने काश्मीरच्या स्वायत्ततेशी संबंधित घटनेच्या 35 ए कलमालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या तत्कालीन सरकारने जात प्रमाणपत्र नसल्याचं कारण पुढे करून तिला सनदी सेवा नाकारली. मोदी सरकारने कारकिर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात काश्मीरला लागू करण्यात आलेलं घटनेचं कलम 370 आणि 35 ए रद्द करून एक प्रकारे राधिकासारख्या अनेकांना न्यायच देऊ केला आहे.
रंगास्वामी इलांगो स्वत: दलित समाजातील. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये त्यांनी दीर्घकाळ शास्त्रज्ञ म्हणून नोकरी केली आणि तमिळनाडूतील सात गावांना सामाजिक समानता प्राप्त करून दिली. या गावांना समानतेची वागणूक तर हवी होतीच, परंतु 50 टक्के दलित लोकसंख्या असलेली ही गावं बेकायदा दारू गाळप, दारुड्यांचा मुक्त वावर, जीवघेणी आरोग्य व्यवस्था आणि विभक्त कुटुंबांची वाढती संख्या यामुळे मेटाकुटीला आली होती. इलांगो याच्या प्रयत्नाने 2000 साली पहिल्यांदा समत्वपुरम नावाची 50 जोड बंगल्यांची वसाहत उभी करण्यात आली. या जोड बंगल्यातील एक घर दलिताचं असायचं, तर एक सवर्णाचं. त्या योजनेला मिळालेलं यश पाहून पुढे तामिळनाडू सरकारने या योजनेचा अंगीकार केला आणि राज्यभर ती योजना राबवण्यात आली. इलांगो स्वत: पंचायत समितीचे सभापती राहिले होते, त्यांनी तमिळनाडूतील हजार ग्रामपंचायत सभापतींची परिषद बोलावली आणि त्यांना अशा सामाजिक एकात्मतेच्या दिशेने वळवलं.
उतर प्रदेशने आणि बिहारने दिलेले तीन गुणसंपन्न दलित नेते म्हणजे रामविलास पासवान, संजय पासवान आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविद. रामविलास तर दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिले आणि सव्वाचार लाखांच्या फरकाने लोकसभेसाठी निवडून येऊन त्यांनी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वत:चं नाव अंकित केलं. संजय पासवान सध्या बिहार विधानसभेचे सदस्य आहेतच, तसेच उत्तम संवादक आहेत, विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि ‘कबीर के लोग’ या शीर्षकाखाली आयोजित केल्या जाणार्‍या संवादांद्वारे एकविसाव्या शतकाचा दलित अजेंडा पुढे नेण्यात आणि विस्मृतीत गेलेले दलित नेते लोकांपुढे आणण्यात अग्रेसर आहेत. रामनाथ कोविद हे के.आर. नारायणन यांच्यानंतर झालेले दुसरे दलित राष्ट्रपती. राष्ट्रपती झाल्यानंतर कानपूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी त्यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सन्मानाचे 12 मुकुट त्यांना अर्पण केले जाणार होते. त्या बारा मुकुटांत अकरा चांदीचे होते, तर उरलेला बारावा सोन्याचा. रामनाथजी यांनी ते मुकुट तर नाकारलेच, परंतु त्या मुकुटांसाठी वापरल्या गेलेल्या चांदीची आणि सोन्याची विक्री करून येणारा पैसा गावातील गरीब मुलींच्या विवाहासाठी खर्च करण्यास सांगितलं.
स्व-कर्तृत्वावर मोठी झालेली, समाजाबरोबरच देशहितासाठी आपलं तन-मन-धन वेचलेली कोविद-गिल-इलांगो-कांबळे-मुणगेकर-सरोज-पासवान यांच्यासारखी आणखीही काही व्यक्तिमत्त्वं दलित समाजात आहेत. या पुस्तकात सर्वांचाच समावेश होणं शक्य नव्हतं, नाहीही. परंतु हे पुस्तक वाचून आपणही तसं काही भव्य-दिव्य करावं अशी प्रेरणा जरी या मंडळींच्या मनात उत्पन्न झाली, तरी पुस्तक लिहिण्याचे परिश्रम कारणी लागले, असा साक्षात्कार लेखकद्वयाला होईल. इतकं महत्त्वाचं डॉक्युमेंटशन या निमित्ताने झालं, यासाठीही त्यांना धन्यवाद.