सह्याद्री बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही आहे. कारण तेही मराठ्यांइतकेच शूर आहेत! ‘राजा शिवछत्रपती’ या कांदबरीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सह्याद्रीचे केलेले वर्णन...
अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्री जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री. त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरुषी आहेत. त्याचे खेळणें-खिदळणेंही पुरुषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळाकभिन्न रामोश्यासारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेंच त्याचें सौंदर्य. तरी पण कधी काळीं कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणीं घातलीं. त्याच्या आटीव अन पीळदार देहाला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाका घातला. मनगटांत किल्ले-कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवलें सजवलें, तरी पण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोश्यासारखा! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोश्यासारखा!
सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात! मुसळधार पावसांत तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यांवरून धो धो धारा खालच्या काळदरींत कोसळूं लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणें, खिदळणें तें! बेहोष खिदळत असतो.
दाट दाट झाडी, खोल खोल दर्या, भयाण घळी, अतिप्रचंड शिखरें, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारें, भीषण अन् अवघड लवणें, घातकी वाकणें, आडवळणी घाट, अडचणींच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा! असें आहे सह्याद्रीचें रूप. सह्याद्री बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही आहे. कारण तेही मराठ्यांइतकेच शूर आहेत!
सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याही. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरांमधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळें बसलीं आहेत. दोन डोंगर-रांगांच्या मधल्या खोर्याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडीं नांदत आहेत.
मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हें मावळचे आवडतें पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येतें! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजांतून अशी ही स्निग्न प्रीत द्रवते.