जसवंतीबेन जमनादास पोपट हे नाव अनेकांना नवे असेलही, पण या नावापुढे आज ‘पद्मश्री’ जसवंतीबेन जमनादास पोपट या बिरुदावलीत हे नाव अधिक शोभून दिसते आहे. ‘लिज्जत’ वाढवणारी संस्था म्हणून लिज्जत पापड निर्माण करणार्या पद्मश्री जयवंतीबेन यांच्या कार्याबद्दल पद्म गौरव लेखमालेत या वेळी आपण जाणून घेणार आहोत. हा प्रवास जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने ‘लिज्जत’ वाढवणारा आहे!
महाराष्ट्रात, पर्यायाने मुंबईत 62 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आज 43 हजार महिलांना स्वावलंबी करणार्या, 24 देशांमध्ये 800 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल असणार्या ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ समूहाच्या एक संस्थापक सदस्य जसवंतीबेन पोपट यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नव्वदी पार केलेल्या जसवंतीबेन आजही दररोज सकाळी 5 वाजता मूळ शाखेत उपस्थित राहून रोजच्या कामकाजात सहभागी होतात आणि रात्री साडेनऊला घरी जातात. त्यांच्या कार्यमग्नतेमुळे प्रत्येक खवय्याच्या जेवणाची आणि जीवनाचीही ‘लिज्जत’ वाढवणारी ही संस्था इतकी मोठी झाली आहे.
भारतीयांच्या जेवणातील प्रत्येक गोष्टीचे एक आपले स्थान आहे. वरण, भात, भाजी, पोळी ते अगदी कोशिंबीर आणि लोणच्यापर्यंत बनवण्याच्या पद्धती गेल्या कित्येक पिढ्या परंपरेने चालत आलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘पापड’. सद्य:स्थितीत अनेकांना पापड घरी बनवणे शक्य नसल्याने ते बाजारातून येतात आणि आज पापड म्हटले की एकच नाव समोर येते, ते म्हणजे ‘लिज्जत’.
62 वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगाव भागात लोहाना चाळींमध्ये काही गृहिणींनी दुपारच्या वेळेचा सदुपयोग आणि कुटुंबाला मदत करण्याच्या हेतूने कमी भांडवल लागणारे, उपलब्ध कौशल्यातून करता येणारे आणि घरोघरी आवडणारे पापड लाटून विकण्याची कल्पना काढली. चाळीच्या तत्कालीन विश्वस्तांनी चाळीची गच्ची त्यांना या कामासाठी उपलब्ध करून दिली. या स्त्रियांनी पहिल्या दिवशी एक किलो पापड लाटून परिसरातील ‘आनंदजी प्रेमजी आणि कंपनी’ या दुकानात विक्रीसाठी दिले. ते सगळे पापड हातोहात खपले आणि त्यातून स्त्रियांना पन्नास पैशांचा नफा मिळाला. दुसर्या दिवशी त्यांनी दोन किलो पापड लाटून दिले, तेही लगेच विकले जाऊन एक रुपयाचा नफा झाला. पापड विक्रीतून मिळकत होऊ शकते, असा विश्वास या स्त्रियांच्या मनात निर्माण झाला. त्यातूनच या घरगुती उद्योगाला व्यापक स्वरूप देण्याचे ठरले आणि ‘लिज्जत पापड’चा आणि पर्यायाने ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’चा जन्म झाला.
जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उजमबेन कुंडलिया, बानूबेन तन्ना, चुताडबेन गावडे आणि लगूबेन गोकानी या सात अल्पशिक्षित गृहिणींनी आपले लक्ष्य ठरवले. त्यांना त्यांच्या परिसरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांनी प्रोत्साहन आणि 80 रुपये भांडवल उपलब्ध करून दिले. त्यातून 15 मार्च 1959 रोजी एका उद्योगाची सुरुवात झाली. त्याचा एवढा मोठा उद्योग समूह होईल याची कल्पनाही या स्त्रियांना नव्हती. पुरुषोत्तम दामोदर दत्तानी उर्फ दत्तानीबाप्पा यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पुढच्या तीन-चार महिन्यांत स्त्रियांची संख्या वाढत जाऊन दोनशेपर्यंत गेली आणि वडाळा येथे एक शाखा सुरू झाली. 1966मध्ये मुंबई विश्वस्त कायद्यांतर्गत संस्थेची आणि सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली. तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडूनही त्यांना मान्यता मिळाली. त्याच वर्षी महाराष्ट्राबाहेर पहिली शाखा गुजरातमधील वालोद येथे उघडण्यात आली. आज देशभरात त्यांच्या 81 शाखा आहेत आणि अमेरिका, इंग्लंड, थायलंड, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये संस्थेच्या उत्पादनांची निर्यात होते. पापडांबरोबरच ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या संस्थेकडून आता गव्हाचे पीठ, चपात्या, अप्पलम (दक्षिणेत लोकप्रिय असलेले पापड), कपडे धुण्याची पावडर आणि साबण, मसाले अशा अनेक पदार्थाचे उत्पादन केले जाते.
आज वयाची 90 वर्षे पार केलेल्या जसवंतीबेन पोपट या कर्जतजवळील एका खेड्यातल्या सामान्य गुजराती कुटुंबातील अल्पशिक्षित स्त्री आहेत. लहान वयात लग्न होऊन 1950च्या दशकात मुंबईतील गिरगाव येथे आल्या. एक मुलगा आणि दोन मुली अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाच काही समविचारी स्त्रियांसह त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पापड लाटून विकायला सुरुवात केली. नंतर तेच त्यांचे उपजीविकेचे साधन झाले. लिज्जत उद्योग समूहाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या संपूर्ण वाटचालीत जसवंतीबेन यांची महत्त्वाची भूमिका आहे.
‘महिलांकडून महिलांसाठी’ चालवली जाणारी ही सहकारी संस्था आहे. या संस्थेत कुणीही एक मालक नसून सर्व सहभागी स्त्रिया, यांना बेन असे संबोधले जाते, त्या याच्या समान मालक आहेत. संस्थेला होणारा नफा किंवा तोटा यांच्या त्या समान भागीदार आहेत. संस्थेत सहभागी होणार्या स्त्रीला तिची जात, धर्म, शिक्षण, कौटुंबिक माहिती विचारण्यात येत नाही, मात्र तिला एक शपथपत्र भरून द्यावे लागते. दर्जाचे सातत्य राखण्यासाठी त्यांनी पदार्थामधील घटकांचे प्रमाणीकरण केले असून पदार्थ तयार करण्याची एक कार्यप्रणाली विकसित केली आहे. उदा., उडदाची डाळ म्यानमार तसेच काठियावाडमधून, हिंग अफगाणिस्तानमधून, काळीमिरी आणि इतर मसाल्याचे पदार्थ केरळमधून आणण्यात येतात. त्यामुळे देशभरातील कोणत्याही शाखेत तयार होणार्या पदार्थाची चव आणि दर्जा समान राखणे शक्य झाले आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या परिसरात राहणार्या स्त्रिया सकाळी स्वत:होऊन पीठ न्यायला केंद्रावर येतात. पण लांब राहाणार्या स्त्रियांची संस्थेच्या वाहनातून केंद्रात ने-आण केली जाते. संस्थेत पापड लाटून अनेक स्त्रियांच्या संसाराला आर्थिक हातभार लागला असून त्यांचे आयुष्य सुखकर झाले आहे. मुलांचे शिक्षण, घरबांधणी संस्थेतून होणार्या मिळकतीतून भागवण्यात येत असल्याने स्त्रियांना संस्थेचा मोठा आधार वाटतो, नव्हे, ते त्यांना दुसरे माहेरच वाटते. संस्थेच्या नफ्यातील वाटा स्त्रियांना दिला जातोच आणि त्यांनी संस्थेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून आर्थिक बक्षीसही वेळोवेळी दिले जाते.
‘वर्क फ्रॉम होम’, आत्मनिर्भर भारत, महिला सबलीकरण, ‘मेक इन इंडिया’, व्यवसायांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी या संकल्पना आपण आज पाहतो, पण या गृह उद्योगाने 60 वर्षांपूर्वीच कृतीत आणल्या. आज हा 81 शाखांमध्ये 27 विभागांमध्ये कार्यरत आणि सुमारे 43 हजार महिलांना स्वावलंबी करणारा, 24 देशांमध्ये 800 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल करणारा सहकारी तत्त्वावर चालणारा बहुधा एकमेव उद्योग ठरला आहे.
पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांच्या सहकार क्षेत्रातल्या उत्तुंग कार्यासाठी भारत सरकारने त्यांना 2021 साली पद्मश्री सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. भारतीय स्त्रीने ठरवले तर सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग उद्योग उभारून आपल्याबरोबर हजारो भारतीय स्त्रियांचे आयुष्य सुखकर करू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांचा यशस्वी प्रवास. आपली तत्त्वे वयाच्या 91व्या वर्षी पाळत आणि ती आपल्या पुढल्या पिढीकडे सुपुर्द करत सहकार क्षेत्रात मापदंड ठरलेल्या पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांचे कार्य प्रेरणादायक आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे.