लतादीदींनी पार्श्वगायनात नवनवे विक्रम करणारी कामगिरी केली. त्याचबरोबर संगीत दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी ‘आनंदघन’ या नावाने दर्जेदार कामगिरी केली. संगीताची जाणकारी, प्रत्येक वाद्यातील तंत्रज्ञान, संगीत कलेवरील प्रभुत्व व आत्मविश्वास जेव्हा प्राप्त झाला, तेव्हाच या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी मातबरी सिद्ध केली. संगीत दिग्दर्शन क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणारा लेख.
तन्मय तू तपस्विनी। चिन्मय तू मनस्विनी
नादब्रह्म हो प्रसन्न। जिंकिलेस चराचरा
वरील वर्णन जिला लागू पडते, ती ‘लता मंगेशकर’ ‘गानहिरा’ होती! असा हिरा, जिला धरती ते आकाश एवढे कोंदण लागेल. ‘सिनेमा लतास्वरस्य कारणम्’ असे उगीच म्हटलेले नाही. गायकीत आकंठ बुडालेल्या कलाकाराला संगीताचे संपूर्ण माहात्म्य अवगत असावे लागते. लता मंगेशकर संगीतात व गायकीत बहुआयामी होत्या.
गाता येते म्हणून संगीतकारही व्हावे व संगीत येते म्हणून गायकही व्हावे असा जो शिरस्ता सध्या चालू आहे, त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत. पण लता यांचे असे नव्हते.
संगीताची जाणकारी, प्रत्येक वाद्यातील तंत्रज्ञान, संगीत कलेवरील प्रभुत्व व आत्मविश्वास जेव्हा प्राप्त झाला, तेव्हाच या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी मातबरी सिद्ध केली.
1950पर्यंत पार्श्वगायन क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यावर, तत्कालीन दिग्गज दिनकर द. पाटील या रत्नपारख्याच्या आग्रहावरून ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाला सर्वप्रथम ‘कु. लता मंगेशकर’ या नावाने संगीत दिले. सी. रामचंद्र, मीनाताई (बहीण) व त्यांनी स्वत: या चित्रपटातील गाणी गायली आहेत. हा एक तमाशाप्रधान चित्रपट असूनही त्यासाठी उत्कृष्ट संगीत देऊन मातबरी सिद्ध केली. त्या चित्रपटातील खालील गाणी अजरामर ठरलीत -
‘ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे!’ - 1965 सालच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटात वरील गाण्यात निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकर, गीतकार जगदीश खेबुडकर, तसेच गायिका व संगीतकार लता मंगेशकर यांनी सर्वस्व पणाला लावून हे गाणे वास्तववादी केले. लोहाराच्या दैनंदिन जीवनातील धडपड, भाता, ऐरण, फुंकणी इ. आयुधांतून निघालेल्या आवाजाचे पार्श्वसंगीत, तसेच स्वरामध्ये तशीच आर्तता प्रकट करून कवीने श्रमाच्या पुजार्याची काव्यात गुंफलेली आर्त विनंती चपखलपणे आपल्या संगीताने सार्थ केली. वाद्यांचा इतका नैसर्गिक व वास्तववादी वापर संगीतकाराचे श्रेष्ठत्व सिद्ध करतो.
त्याच चित्रपटातील पुढील गाण्यांनी अमरत्व प्राप्त केले - 1) वाट पाहुनी जीव शिणला, 2) राजाच्या रंगमहाली, 3) नको देवराया, 4) माळ्याच्या मळ्यामंदी इ. मराठी मातीशी इमान राखणारे संगीत केवळ डिव्हाइन.
‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं। गुलाब जाई-जुई मोगरा फुलवीत।’ हे गीत भालजींनी ‘योगेश’ नावाने लिहिले होते. गानकोकिळेने ‘आनंदघन’ नावाने दिलेले संगीत व स्वत:च स्वरबद्ध केलेले हे गानपुष्प पडद्यावर लावण्यवती जयश्री यांनी अभिनित केले. या त्रयीच्या युतीने गाणे अमर न होईल तरच नवल! खेड्यातील घरामधील अस्सल ग्रामीण बाज ल्यायलेली, भाळावर मळवट, लोहारणीचा बाज हा नायिकेचा साज व मुखात लताचा स्वर, सोबत सुरेल संगीत अशा थाटात हे गाणे चित्रित झाले. संगीतात उंच स्वरातले गाणे नायिकेच्या तोंडी असणे चोखंदळ प्रेक्षकाला खूप आवडते, हे मर्म लतादीदींना अवगत होते. तसेच शुद्ध उच्चारही गायकाला खूप आवश्यक. या दोन्ही गोष्टींचे पथ्य त्या गायकाला पाळायला लावीत. गाणे तयार करताना इतका खोलवर विचार करणार्या संगीतकारालाच यश मिळते.
‘नको देवराया अंत असा पाहू’ - ही देवाची आळवणी हृदयनाथांकडून गाऊन घेताना, आळवणीतील आर्तता व भक्ताची लीन भावना प्रकट करण्यास मदत करणारी चाल व तद्वतच गाण्यातील गांभीर्य टिकविणारे पार्श्वसंगीत गाण्याला वेगळाच दर्जा देऊन गेले. हा अभंग संत कवयित्री कान्होपात्रा ह्यांनी 15व्या शतकात लिहिलेला आहे. तो साजेसा संगीतबद्ध करणे जिकिरीचे काम होते.
निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांचा संगीतविषयक सहवास दीर्घकाळ होता.
1963 साली सर्वप्रथम ‘मोहित्यांची मंजुळा’ या भालजींच्या चित्रपटापासून त्यांनी ‘आनंदघन’ हे नाव संगीतकार म्हणून धारण केले. इतिहासपर व सामाजिक जाणीव दृढ करणारे भालजींच्या लगोलग आलेल्या पुढील चारही चित्रपटांतील संगीताने ‘आनंदघन’ने मातीशी घट्ट संधान बांधून दिले. महाराष्ट्रातील मराठी गाण्यांची वीण ‘आनंदघन’ने जरतारी विणली. भालजींना संगीतातून जे अभिप्रेत होते, ते ‘आनंदघन’ने संगीतातून दिले. ते चित्रपट होते 1) मोहित्यांची मंजुळा (1963), 2) मराठा तितुका मेळवावा (1974), (3) साधी माणसं (1965) (4) तांबडी माती (1969).
‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ - 1963 सालच्या ‘मोहित्यांची मंजुळा’मधील स्वत:च्याच संगीतात नटविलेले हे गाणे जयश्री गडकर यांच्यावर चित्रित होणार होते, म्हणून त्या लावण्यवतीला साजेशा दिलखुलास आवाजात व पार्श्वसंगीतात हे गीत तयार केले. गाण्यात, चपखल संगीतामुळे अभिनेत्रीला अभिनयाच्या जागा सुलभपणे गवसत होत्या. जयश्री गडकर यांनी या गाण्याचे पडद्यावर सोने केले. सर्वच श्रेष्ठ! त्यातील खालील गाणीही अजरामर झाली आहेत.
1) ‘झाला साखरपुडा’, 2) ‘निळ्या आभाळी’, 3) सोन सकाळी सर्जा’.
‘झाला साखरपुडा’ - लता-उषा यांच्या आवाजातले हे नटखट व लग्न ठरलेल्या मुलीला मैत्रिणींनी चिडविण्याचा घरोघरी अनुभवास येणारा विनोदी प्रसंग या गाण्यात फार सुंदर सोप्या चालीत व मोजक्या वाद्यांच्या साथीत शब्दाला प्राधान्य देऊन सादर करीत मजा आणली. हे गाणे नंतर मराठी घरांत मैत्रिणीचा साखरपुडा झाल्यावर तिची छेड काढण्यासाठी ऐकू येऊ लागले. लतादीदींच्या संगीतातील कित्येक गाणी मराठी रसिकांच्या उत्सवात किंवा सणावारात नकळत वापरली जात.
‘निळ्या आभाळी कातरवेळी’ हे एक विरहगीत आहे. पतीच्या विरहाने त्याच्या आठवणीत दग्ध असलेली नायिका जयश्री गडकर यांच्यावर हे चित्रित झाले आहे. हे गाणे एक विरहिणी आहे. विरहिणीची आर्तता जशी शब्दांत प्रकट होते, त्याला अधिक गडद करण्याची किमया आनंदघनच्या संगीतात आहे. हे सर्व जमून आल्यास गाणे दीर्घकाळ रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते.
1964 साली ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील खालील गाणी माहीत नसणारा रसिक विरळाच!
‘रेशमाच्या रेघांनी, लाल-काळ्या धाग्यांनी’.. शांता शेळके यांनी लिहिलेली ही शब्दप्रधान दर्जेदार लावणी आशा भोसले यांच्याकडून अतिशय कसरदार व ठसक्यात म्हणवून घेतली ‘आनंदघन’ यांनी. आशाबद्दल काय बोलावे! पाहिजे तो भाव निर्माण करण्यात लतादीदींना जास्त कष्ट करावे लागले नाहीत. विशेष म्हणजे यातील वाद्यांमधील ‘ढोलकी’ इतकी उत्कृष्ट आहे की लावणीसम्राट संगीतकार वसंत पवार यांची आठवण यावी.
‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ - हृदयनाथांच्या आवाजातून व समर्पक संगीतातून शिवकाल उभा करणे सोपे काम नाही. ‘लढून मरावं, मरून जगावं, हेच अम्हाला ठावं’ या ओळीतील मराठी मावळ्याचा कणखर, निर्भय निर्धार, गायकीतून व साजेशा संगीतातून प्रकट करून घेण्यात आनंदघन यशस्वी झाल्या. तसेच पुढील अवीट गाण्यांची चिरकाल आठवण आनंदघननी आपल्या संगीतातून दिली आहे -
1) नाव सांग सांग गाव सांग, 2) अखेरचा हा तुला दंडवत, 3) मराठी पाऊल पडते पुढे.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ - 1969च्या मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातील हे शौर्यगीत लता, उषा मंगेशकर व हृदयनाथ यांनी गायले. शांताबाई शेळके यांच्या दमदार शब्दांना योग्य रितीने न्याय दिला आनंदघन या संगीतकाराने. लता-उषाच्या आवाजातील अंतर्यातील आर्ततेची पूर्ती हृदयनाथांच्या ध्रुवपदातील बाणेदार स्वरांनी उत्कृष्ट रितीने साधली आहे. शेवटच्या अंतर्यात पुरुष गायकांचा कोरसमधील ‘जय भवानी’चा घोष व तुतारीच्या वाद्याची साथ अप्रतिम वठविली आहे.
‘अखेरचा हा तुला दंडवत’ - हे गाणे निरोप देण्याच्या समयीचे आहे. निरोप घेऊन गाव सोडून बैलगाडीतून नाइलाजाने जाणारी नायिका हे गाणे गाते. मूळ आवाज लताचाच असून प्रतिध्वनीमध्ये उषा व मीना यांचा आवाज देऊन गाण्यात वेगळाच परिणाम साधला. उत्कृष्ट संगीतात घोळून हे गाणे मनाचा ठाव घेते. संगीतकाराची हीच तर किमया आहे. गाणे कुठलेही असो, आपल्या संगीतचातुर्याने ते सजविणे, संगीताच्या महिरपीत गायकाच्या गायकीला बसविणे हेच तर दर्जेदार संगीतकाराचे कसब असते.
चित्रपट माध्यमात जिथे शब्दाची उणीव भासते, तिथे संगीताचा उपयोग होतो. 1969 सालच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातील तांबड्या मातीच्या नादमाधुर्याने आनंदघन यांच्या संगीत देव्हार्यात सोन्याचा कळस चढविला.
‘डौल मोराच्या मानेचा’ व ‘जिवाशिवाची बैलजोडी’ - ह्या दोन गाण्यांत हृदयनाथांनी शेतकर्याच्या वृषभप्रेमाचा धागाच उलगडून दाखविला. मराठी भूमीचा नैसर्गिक रांगडेपणा, तसेच भोळाभाबडा स्वभाव इ. गुणांचा सुगंध दरवळण्याची ताकद आनंदघनच्या संगीतात होती. प्रत्येक गाण्यातील संगीत विलास स्वर्गीय व दुर्दम्य आहे.
‘अपर्णा तप करिते काननी’ (1969)च्या या चित्रपटात, शांता शेळके यांच्या शब्दकळेला स्वर- व संगीतकळेत परवर्तित करून, आनंदघन यांनी हे भक्तिप्रधान गीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविले. 1) ‘मागते मन एक काही’, 2) ‘माझ्या कपाळीचे कुंकू’, 3) ‘जा जा राणीच्या पाखरा’ इ. ‘तांबडी माती’तील गाणी सर्वश्रुत आहेत.
‘मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते’ - लतादीदींनी या दु:खी प्रसंगातील गाण्यात आपल्या स्वराने इतकी सार्थ आर्तता प्रकट केली की रसिकांना तिच्या दु:खाची परिपूर्ण जाणीव उलगडते. मनातील इच्छेचे फलित सकारात्मक किंवा नकारात्मक हे सर्व दैवाच्या अधीन असते, हा संकेत स्पष्टपणे आपल्या गायकीतून प्रकट करून संगीतातही मानसिक दौर्बल्य जाहीर करण्यात त्या यशस्वी ठरल्या. संगीतकाराला पडद्यावरील प्रसंगाचे गांभीर्य, तसेच गाण्यातून दिग्दर्शकाला कुठला भाव अपेक्षित आहे याचीही जाण असावी लागते.
‘माझ्या कपाळीचं कुंकू’ - उंच स्वराला मोकळेपणाने पसरवून अंबाबाईसमोर गायलेले देवाला विनवणी करताना पडद्यावर नायकिणीने स्वत:ला मळवट लेवून गातानाचे हे गाणे देवीच्या गाभार्यातील शान ठरले. जिथे जशी सुरावट पाहिजे, तशी चाल व प्रसंगानुरूप गाण्याला कोंदण घालणारे पार्श्वसंगीत याचे ज्ञान संगीतकार म्हणून लतादीदींना होते.
‘जा जा राणीच्या पाखरा’ - हे मुक्तपणे गायलेले गीत अतिशय बहारदारपणे संगीतबद्ध केलेले आहे. अंतर्यामध्ये बासरीचा वापर करून अंतर्यातील स्वर उदात्त केले आहेत. पाखराला संदेश देण्यासाठी माहेरी धाडण्याची कल्पित ओढ मोहक रितीने सांगितली आहे. गाण्याचे सोने करणे किंवा माती करणे हे केवळ संगीतकाराच्या हाती असते.
केवळ पाच चित्रपटांना संगीत देऊन त्यांनी संगीताचा सेतू बांधला. 1969नंतर मराठी चित्रपट जगताला आनंदघनच्या संगीताचा लाभ झाला नाही.
‘साधी माणसं’ व ‘तांबडी माती’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘साधी माणसं’ चित्रपटाच्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा व पार्श्वगायनाचा राज्य पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळाला.
संगीतकार म्हणून छोट्याशा कारकिर्दीतही भरभरून देऊ शकण्याचा आनंद लता मंगेशकर यांना होता. त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्याचे गारूड रसिकांच्या हृदयावर आजही आहे. ही गाणी मराठी रसिकांच्या घरातील पारंपरिक दागिना बनून आहेत.
आदल्या दिवशी 5 फेबुवारीला ‘सरस्वती पूजन’ होते व ते चांगल्या रितीने पार पाडून 6 तारखेला या ‘गानसरस्वतीने’ स्वर्गास प्रयाण केले.
‘गानहिरा तू रत्नांमधील दिपविलेस रसिका’
अधिक काय लिहावे! शब्दकोश रिता होतो, एवढेच म्हणता येईल. अखेरचा हा तुला दंडवत!!