लोकराजा सुधीर कलिंगण - दशावतारातील मि. परफेक्शनिस्ट

09 Feb 2022 14:43:11
@नीलेश  जोशी  ९४२२६३२१५६

लोकराजा सुधीर कलिंगण म्हणजे उपजत देखणेपण आणि आवाजातील माधुर्य घेऊन या भूतलावर अवतरलेला स्वर्गलोकीचा गंधर्वच. जणू स्वर्गलोकीच्या सर्व देवेदेवतांनी आपली विविध रूपे साकारण्यासाठी पाठविलेला देवदूत! अनेक नवोदित कलाकार, भजनी बुवा यांना मार्गदर्शक असणारा दीपस्तंभ! दशावतार कलेत वेगळीच उंची गाठणारा हा थोर कलाकार. राजा कसा असावा, त्याने कसे बोलावे, रंगमंचावर कसे वावरावे याचे मूर्तिमंत उदाहरण! आपल्या बावनकशी अभिनयाच्या व भाषाचातुर्याच्या जोरावर मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अजिंक्यतारा! पण केवळ काविळीचे निमित्त झाले आणि हा तारा निखळला. रसिकांना पोरका करून गेला.

dashaawtar
 
श्रीकृष्णाचा वर्ण निळा, भगवान शिवशंकराचाही वर्ण निळा. पण या दशावतारात दोन्ही भूमिका जेव्हा एकच कलाकार सादर करतो, तेव्हा श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्या त्या निळ्या वर्णातील सूक्ष्मभेद आपल्या रंगभूषेतून साकारण्याची कला, तो अभ्यास, ती हातोटी ज्या कलाकाराजवळ होती, तो कलाकार म्हणजे लोकराजा सुधीर कलिंगण! बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याला अभिनयाच्या बाबतीत मि. परफेक्शनिस्ट म्हटले जाते, पण सुधीर कलिंगण निश्चितच दशावतारातील मि. परफेक्शनिस्ट होते. दुर्दैवाने आयुष्याच्या रंगमंचावरून सुधीर कलिंगण यांना अकाली एक्झिट घ्यावी लागली असेल, पण आपल्या अचाट आणि अफाट अभिनयसामर्थ्याने रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कधीही पुसले जाणार नाही.
 
 
वय वर्षे अवघे ५१. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना, दशावताराला चांगले दिवस आलेले असताना काविळीच्या आजाराचे निमित्त झाले आणि त्यातच उपचार सुरू असताना सुधीर कलिंगण यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे हे अकाली जाणे नक्कीच वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने दशावतार खर्‍या अर्थाने पोरका झाला, एवढे या कलाकाराने दशावताराला देऊ केले आहे.
 
 
बाबी कलिंगण या दशावतारी वटवृक्षाखाली नुसतेच वाढणे नाही, तर बहरणे आणि त्या वटवृक्षाएवढीच आपली अभिनय उंची गाठणे हे कोणा येरागबाळ्याचे काम नाही. दशावतारातील भीष्माचार्य बाबी कलिंगण हे सुधीर यांचे वडील. त्यामुळे साहजिकच दशावताराचे बाळकडू घेऊनच सुधीर यांनी अगदी बालवयातच दशावतारी रंगभूमीवर पाऊल ठेवले. इयत्ता तिसरी-चौथीतील बालवयाचा सुधीर, पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाच्या एका नाटकात 'वनराज' म्हणून रंगभूमीवर प्रवेशकर्ता झाला. पार्सेकर कंपनीचे मालक प्रभाकर पार्सेकर यांनी त्याची रंगभूषा आणि वेशभूषा केली होती. नंतर बाबी कलिंगण यांनी स्वतःची 'कलेश्वर दशावतारी नाटक कंपनी' स्थापन केली. त्या वेळी 'लव-कुश' नाटक खूप गाजले होते. त्यात सुधीर आणि त्याचा भाऊ बाळा हे लव-कुश साकारत. बापबेट्यांची जुगलबंदी पाहायला त्या वेळी रसिक तोबा गर्दी करायचे.
कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कलिंगण कुटुंबीयांचे गाव. नंतर सुधीर कलिंगण यांनी दशावतार कलेलाच आपले जीवन अर्पण केले. त्यांचे वाचन अफाट होते. भूमिकेचा बारीकसारीक अभ्यास, त्या भूमिकेला साजेशी रंगभूषा आणि वेशभूषा आणि तेवढीच लाजवाब संवादफेक या सर्वांच्या बळावर ते आपल्या पहिल्या एंट्रीलाच रसिकमनावर गारूड करत. संस्कृतचा त्यांचा खासा अभ्यास होता. पौराणिक, काल्पनिक, ऐतिहासिक असो किंवा संतसाहित्यावर आधारित कथानक असो, या सर्वांचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांना नारदीय चिंतनाची माहिती होती. विष्णुपुराण, पांडवप्रताप पुराण, गणेशपुराण, शिवपुराण, ब्रह्मपुराण, संतवाङ्मय यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. म्हणूनच आपल्या संवादानेच ते 'सभा' गाजवून टाकायचे.


dashaawtar
 
राजा असावा तर सुधीर कलिंगण यांच्यासारखाच! मग तो राजा हरिश्चंद्र असो की महारथी कर्ण, अर्जुन असो की राजा कीर्तिमान की राजा सत्त्वशील, सुधीर कलिंगण यांनी ती प्रत्येक भूमिका जिवंत केली. राजपात्राची भूमिका करतानाच भगवान शंकर, श्रीकृष्ण, हनुमान या भूमिकादेखील त्यांनी तितक्याच समर्थपणे साकारल्या. महारथी कर्ण साकारताना ते कधी रसिकांना महाभारतकाळात घेऊन जायचे, कळायचेदेखील नाही. म्हणूनच रसिकांनी त्यांना 'लोकराजा' ही पदवी दिली. त्यांनी साकारलेली 'शिर्डी माझे पंढरपूर' नाटकातील साईबाबांची भूमिका कोण विसरू शकेल? ही भूमिका तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. ही भूमिका सुधीर कलिंगण यांच्याच नशिबात होती असेच म्हणावे लागेल, कारण या नाटकाच्या चित्रीकरणाच्या वेळी ही भूमिका करणारा कलाकार आला नाही, त्यामुळे आयत्या वेळी त्यांनी ही भूमिका केली आणि ती भूमिका त्यांचीच झाली.
 राजपात्राची भूमिका करतानाच भगवान शंकर, श्रीकृष्ण, हनुमान या भूमिकादेखील त्यांनी तितक्याच समर्थपणे साकारल्या. महारथी कर्ण साकारताना ते कधी रसिकांना महाभारतकाळात घेऊन जायचे, कळायचेदेखील नाही. म्हणूनच रसिकांनी त्यांना 'लोकराजा' ही पदवी दिली.

बाबी कलिंगण यांच्या दशावतार कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची 'सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर नाट्य मंडळ' ही कंपनी काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काही अव्वल दशावतार नाट्यमंडळे आहेत, त्यात या नाट्यमंडळाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. सुधीर कलिंगण हा दशावतारातील ब्रँड होता. अक्षरशः त्यांच्या नावावर दशावतारी नाटकाला रसिकांची तोबा गर्दी होत असे. गोवा, मुंबई, दिल्ली या सर्वच ठिकाणी सुधीर कलिंगण नावाने गारूड केले होते. एका दिवसात दोन-दोन प्रयोग असा व्यग्र कार्यक्रम त्यांच्याकडे असायचा. बर्‍याचदा त्यांच्याकडे नाटकाच्या तारखाच शिल्लक नसायच्या. ट्रिक सीनयुक्त दशावतारी नाटके सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता.


dashaawtar
 
दशावतार या पारंपरिक लोककलेला खर्‍या अर्थाने वलय प्राप्त करून दिले ते लोकराजा सुधीर कलिंगण यांनी. ठाणे महापौर, ठाणे जीवनगौरव, सिंधुरत्न, कोकण कलारत्न अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेला हा एक अवलिया कलाकार! एसटी महामंडळात चालक म्हणूनदेखील सुधीर यांनी काही काळ सेवा केली. रात्री नाटक रंगवायचे आणि सकाळी चालकाची ड्युटी इमानेइतबारे करायची, ही तारेवरची कसरत फक्त हा लोकराजाच करू जाणे. एवढेच नाही, तर ही ड्युटी करताना 'विना अपघात सेवा' चे बिरुद त्यांनी सेवा संपेपर्यंत मिरविले. खरेच हे येरागबाळ्याचे काम नोहे. पुढे दशावतार आणि नोकरी हा बॅलन्स जमविताना खूपच कसरत करावी लागली, तेव्हा त्यांनी एसटीच्या सेवेला रामराम केला आणि दशावतारी नाटकावर लक्ष केंद्रित केले.
नवीन कलाकार घडविण्यातही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. अनेक तरुण कलाकार त्यांनी घडविले, त्यांना मार्गदर्शन केले. रंगमंचावर कसे उभे राहायचे, प्रसंगानुरूप संवादफेक कशी करायची, निरर्थक बोलण्यापेक्षा समर्पक कसे बोलायचे अशी सारी तयारी ते नवोदित कलाकारांकडून करून घ्यायचे. सुधीर कलिंगण म्हणजे दशावतारी लोककलेचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. लोककलेचा त्यांचा अभ्यास फार दांडगा होता. दशावतारी कलाकारांना संघटित करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. दशावतार चालक-मालक संघाचे सहसचिव, तसेच महाराष्ट्र शासनाच्या लोककला मानधन शिफारस समितीचे सदस्य म्हणूनदेखील ते कार्यरत होते.
 
लोकराजा सुधीर कलिंगण म्हणजे उपजत देखणेपण आणि आवाजातील माधुर्य घेऊन या भूतलावर अवतरलेला स्वर्गलोकीचा गंधर्वच. जणू स्वर्गलोकीच्या सर्व देवेदेवतांनी आपली विविध रूपे साकारण्यासाठी पाठविलेला देवदूत! अनेक नवोदित कलाकार, भजनी बुवा यांना मार्गदर्शक असणारा दीपस्तंभ! दशावतार कलेत वेगळीच उंची गाठणारा हा थोर कलाकार. राजा कसा असावा, त्याने कसे बोलावे, रंगमंचावर कसे वावरावे याचे मूर्तिमंत उदाहरण! आपल्या बावनकशी अभिनयाच्या व भाषाचातुर्याच्या जोरावर मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अजिंक्यतारा! पण केवळ काविळीचे निमित्त झाले आणि हा तारा निखळला. रसिकांना पोरका करून गेला. सुधीर कलिंगण हे लोकराजा होते आणि लोकराजाच राहतील! कारण सुधीर कलिंगण कालपर्यंत लोकराजा होते, आता इंद्रलोकीचे राजे बनले आहेत; आणि हे राजेपण अढळ आहे!
 
Powered By Sangraha 9.0