चराचरात ‘राम’

विवेक मराठी    14-Mar-2022   
Total Views |
रामकथा ही अशी गोष्ट आहे की, प्रत्येकाला ती आपलीशी वाटते. रामायणाचे गारूड अजूनही भारतीय जनमानसात आणि विश्वजीवनात कायम आहे. हाच धागा घेऊन विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे ‘धर्मपालनासाठी रामायण’ आणि ‘रामकथामाला’ अशी दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आपण या लेखात त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.

jay shree ram
स्वामी विवेकानंदांना अखिल मानवजातीचा उत्कर्ष अपेक्षित होता. ‘मनुष्यनिर्माण’ आणि ‘राष्ट्रपुनरुत्थान’ हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद केंद्र कटिबद्ध आहे. राष्ट्राचे पुनरुत्थान करायचे असेल, तर राष्ट्रहिताचा, समष्टीचा विचार करणारे लोक तयार झाले पाहिजेत. केवळ भाषणे आणि व्याख्याने देऊन हे कार्य साध्य होणार नाही, तर त्यासाठी मनुष्यनिर्माणाच्या विविध आयामांची जोड द्यावी लागेल. मनुष्याला विचारप्रवण करण्याच्या कामाला गती दिली पाहिजे, यासाठी विवेकानंद केंद्राच्या वतीने प्रकाशन विभाग सुरू करण्यात आला.
 
 
मनुष्ययोनीत जन्मलेल्या प्रत्येकाला काही कर्तव्य असतात. ती कर्तव्ये पार पाडताना काही नीतिनियमांचे पालन करावे लागते, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. ही गोष्ट लिहायला जरी सोपी असली, तरी त्याचे आचरण हे महाकठीण कार्य आहे. महाकठीण असले तरी ते अशक्य आहे असेही नाही. कारण भारत देशाला प्राचीन परंपरा आहे. या परंपरेचा वारसा आपल्याला आहे. आपल्यापुढे श्रीरामांसारखे आदर्श आहेत. रामायणात आपण पाहिले आहे की, संपूर्ण समष्टीचा विचार केलेला दिसतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार सनातन धर्माचे मूळ आहे. म्हणजे या पृथ्वीतलावर असलेला प्रत्येक जीव हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. रामायणात याचे दर्शन पदोपदी होताना दिसते. रामायणाचे गारूड अजूनही भारतीय जनमानसात आणि विश्वजीवनात कायम आहे. हाच धागा घेऊन विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे ‘धर्मपालनासाठी रामायण’ आणि ‘रामकथामाला’ अशी दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आपण या लेखात त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.
 
 
‘धर्मपालनासाठी रामायण’

 
राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मा. लक्ष्मीबाई केळकर म्हणजेच वंदनीय मावशी या प्रतिवर्षी रामायणावर आधारलेली प्रवचनमाला गुंफत असत. अनेक मान्यवरांनी या प्रवचनमालेत आपली पुष्पे गुंफली आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांनी नागपुरात अशीच प्रवचनमाला गुंफली होती. त्यांच्या या प्रवचनमालेचे पुस्तकरूप प्रकाशित व्हावे अशी अनेकांची मागणी होती. त्यातूनच साकार झालेले पुस्तक म्हणजे ‘धर्मपालनासाठी रामायण’ (निवेदिता भिडे यांची रामायणावरील प्रवचने). प्रतिभा कुलकर्णी यांनी याचे संकलन केले आहे.
 
 
हे पुस्तक व्याख्यानांवर आधारित असल्याने, ते शब्दबद्ध करताना व्याख्यात्या निवेदितादीदी यांची निवेदनशैली तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना आपण व्याख्यानालाच बसलो आहोत, असा भास होतो. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संपूर्ण रामायणाचे दर्शन होते. निवेदितादीदींच्या सात प्रवचनांचे हे पुस्तकरूप आहे. शेकडो वर्षांपासून भारतवर्षात प्रवचने सांगण्याची परंपरा आहे. परंतु या पुस्तकातून केवळ रामकथा सांगणे हा उद्देश नव्हता, तर रामकथेतून कालोेचित असणारी कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, याला नीतिमूल्यांचे कोंदण घालून समृद्ध वारसा देणार्‍या व्यवस्था निर्माणाचे व मनुष्यनिर्माणाचे कार्य करण्यास वाचक प्रेरित व्हावेत, हा शुद्ध हेतू प्रकर्षाने जाणवतो.
 
 
‘धर्मपालनासाठी रामायण’ हे पुस्तकाचे शीर्षकच या व्याख्यानमालेचे आयोजन आणि त्याचे नंतर पुस्तक यांची समाजाला का आवश्यकता आहे, हे अधोरेखित करते. या पुस्तकात निवेदितादीदींची एकूण सात प्रवचने घेतली आहेत. (सात प्रवचने - काव्य नव्हे हा अमृतसंचय, ऋषि निर्मितम् राष्ट्रम्, रामो विग्रहवान्, सीतायाश्चरितं महत्, धन्यो गृहस्थाश्रम:, परस्परं भावयन्त:, धर्मपालनार्थं संगठनम्’.) या प्रवचनात रामायण जसे घडले ते क्रमाने न सांगता आजच्या विषयाशी साधर्म्य असे विषय घेऊन त्याची मांडणी केलेली दिसते. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यात रामायणात असलेल्या व्यक्तींनी जीवन जगताना धर्माचे समाजधारणेेसाठी अत्यावश्यक मूल्याचे पालन कसे केले, हे दिशादर्शक आहे. ऋषितुल्य माणसे समाजविघातक शक्तींवर उपाय कसा शोधतात, दुष्पप्रवृत्तींचा नि:पात करण्यासाठी सर्जनशील व्यक्ती आपल्या शक्ती कशा वापरतात, सात्त्विक आणि धर्माचरण करणारी एखादी व्यक्ती आसुरी शक्तीवर विजय कसा मिळवते, समाजातील सर्व घटकांना कसे संघटित करते हा विचार आजच्या घडीला कसा करू शकतो, हा रामायणातील संदर्भ घेऊन दृष्टिनिर्माणाचे कार्य या प्रवचनातून झाले आहे.

‘एकोऽहं बहुस्याम्’ म्हणजे एकाच तत्त्वाचे अनेक रूपांत प्रकटीकरण. या समष्टीप्रती आत्मीयतेने व्यवहार करणे म्हणजे धर्म आहे. जी कतर्र्व्यपूर्ती आहे ती आनंदाने करणे हा धर्म आहे. धर्माचे पालन करताना समर्पण व त्याग करणे म्हणजेच धर्म आहे. हे धार्मिक आचरण कसे होते, कसे होऊ शकते, कसे असायला पाहिजे हे समजण्यासाठी रामायण आहे. रामायणातील प्रत्येक पात्र पाहिले, तर जीवन जगताना त्याचा आध्यात्मिक विकास, स्वचेतनेचा विकास सहजतेने प्रकट होताना दिसतो. सर्वंकष, सर्वांगीण विचार करून समस्या कशी सोडवायची, ती रामायणातील अनेक घटनांतून कशी सोडवली गेली, याचे व्याख्यानात दर्शन घडते. तसेच निवेदितादीदींच्या सात व्याख्यानांतून या प्रकटीकरणाचे सादरीकरण झालेले या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
 
प्रत्येक समाजाच्या जीवनपद्धतीप्रमाणे रामायणाचे सादरीकरण झालेले आहे. त्यामुळे कोणते रामायण खरे आणि कोणते खोटे असा संभ्रम निर्माण करण्यास दुष्ट शक्ती तयारच असतात. अशा वेळी वाल्मिकी रामायण प्रमाण मानावे, असा त्यांनी प्रवचनातून लोकांना संदेशच दिला आहे. शिवाय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा एक लक्षात ठेवावे - प्रत्येक जनमानसात आपापल्या पद्धतीप्रमाणे रामायण जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आशय एकच आहे, फक्त त्याची मांडणी काल-परिस्थितीनुसार बदलली आहे, एवढेच. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘अॅळनिमेटेड रामायण’, ‘बालहनुमान’ यासारख्या व्यक्तिरेखा कार्टून रूपात छोट्या दोस्तांना भुरळच घालत आहेत. एकंदर काय, तर रामायणाचे आकर्षण आजच्या युगातही तसूभरही कमी झालेले नाही. फक्त अभिव्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या रूपांत प्रदर्शित होत असतात.


jay shree ram
‘ऋषिनिर्मित राष्ट्रम्’ या प्रवचनमालेतील दुसर्‍या पुष्पात भारतमातेच्या विशेषतेचे दर्शन घडवतात. आपले राष्ट्र हे ‘देवनिर्मित देशम्, ऋषिनिर्मितं राष्ट्रम्’ असे आहे. म्हणजे ईश्वरदत्त सीमा आपल्या राष्ट्राला लाभल्या आहेत. तसेच आपल्या कौटुंबिक व्यवस्था, समाजव्यवस्था, जीवनाची उद्दिष्टे, अंतिम लक्ष्य हे सर्व ज्या ऋषींनी आपल्या तपाने जाणून घेऊन ते आपल्या जीवनात कसे आणायचे हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक साधना व तपश्चर्या केल्या, त्याचे फळ म्हणजे आपले राष्ट्र ऋषी-संस्कृती असलेली तपोभूमी झाली. हे राष्ट्र ओजस्वी, तेजस्वी झाले. परंतु मनुष्याच्या भोगवादी स्वभावामुळे राष्ट्र लयाला गेले. ऋषिमुनींनी आपल्या तपाने राष्ट्राचे संवर्धन केले. तसेच ऋषींनी दाखवलेल्या सत्पथावर चालणे गरजेचे आहे. एकात्म जीवनदर्शनाचा मार्ग अवलंबून त्याप्रमाणे आचरण करावे, याचाच अर्थ प्रत्येकाने राष्ट्रसंवर्धनासाठी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषितुल्य आचरण करायला हवे, याचे रामायणातील कथा सांगून निवेदितादीदी मार्गदर्शन करीत आहेत.

 
वसिष्ठांनी राम चिंतेत असताना त्यांना जीवनाचे लक्ष्य पटवून दिले, व्यक्तीच्या जीवनातील पाच आयाम सांगितले, त्याची उकल करून व्याख्यानात मनुष्यजीवनावर प्रकाश टाकला आहे. ‘धन्यो गृहस्थाश्रम:’ या प्रवचनातील प्रकरणात कुटुंबव्यवस्था कशी असली पाहिजे. रामायणातील या संदर्भातील काही घटना-प्रसंग सांगून भारतीय संस्कृतीत असलेले कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व पटवून देतात. चुकलेल्या प्रत्येकाला मार्गावर आणायचा एकमेव मार्ग म्हणजे त्याग. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, “त्याग आणि सेवा हेच या राष्ट्राचे आदर्श आहेत.” आणि तो आदर्श आपल्याला रामायणाने दिला.

धर्मपालनाकरिता महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब. चार व्यक्ती एकत्र राहिल्या म्हणजे कुटुंब तयार होत नसते, तर परस्परांमध्ये आत्मीय भाव, बंधुभाव असला तरच कुटुंब मजबूत होते. रामायणातील चार बंधूंच्या कथा जरी ऐकल्या, तरी बंधुभाव म्हणजे नेमके काय आणि तो कशा प्रकारे प्रकट करायचा हे आपल्याला उमगते. या प्रवचनात याच गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘धर्मपालनार्थ संगठनम्’ या प्रवचनातील प्रकरणात भारत हे धर्माधारित राष्ट्र आहे हे सांगताना त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर ‘धर्मभूमी म्हणजे काय, तर एकात्म भावाने सनातन तत्त्वावर आधारित एकमेकांशी जोडलेल्या व्यवस्थांनी पूर्ण विश्वाकडेच आत्मैक्य बुद्धीने पाहणारी जीवनपद्धती होय.’ या प्रकरणात धार्मिकता पुन:स्थापनेची गरज, अवतारांत विकासक्रम आणि संघटनात्मक कार्य, रावणवध करण्यासाठी वानरसेना घेऊन श्रीरामाने संघटनकौशल्याचे जे दर्शन केले, शिवाय शबरी, अंगद, सुग्रीव, कार्यसाधक हनुमंत इत्यादी अगदी छोट्या छोट्या पात्रांनी जी मदत केली, त्याबद्दल श्रीराम कसे कृतज्ञ राहिले ही शिकवण आपल्याला आयुष्याच्या प्रवासात फलदायक ठरणारी आहे. हे विशद करताना रामायणावर विकृत साहित्यनिर्मिती केली गेली, त्यावरही त्यांनी दृष्टी टाकली आहे.

भारतवर्षात रामाला विष्णूचा अवतार मानले आहे. म्हणजे राम हे अवतारपुरुष आहेत. परंतु अयोध्येतील राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या घरी राम मनुष्ययोनीत जन्मले. मनुष्यजीवनात जन्माला आलेल्या सर्व भोगांतून नीतिमूल्यांचे आचरण करून मनुष्यजीवनाचा आदर्श निर्माण करून ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम’ यांचे दर्शन घडते. आजच्या काळातही धर्मपालनासाठी रामायणाचे कथानक, अध्ययन मार्गदर्शक ठरते. या पुस्तकात रामजन्म, योगवासिष्ठ, विश्वामित्रांचे योगदान, अहिल्योद्धार, मिथिला आगमन, एकात्म जीवन दर्शनावर आधारित जीवनपद्धती, रामाचे सद्गुण, सीतास्वयंवर, वाल्मिकींची विशेष शैली, वनगमन, राम-भरत भेट, सीतात्याग, सीता अग्निपरीक्षा, सीताहरण, अशोकवन, दुसरा (सीता) वनवास, सीता धरणीमातेच्या उदरी जाणे, अवतार समाप्ती अशा रामायणातील अनेक कथा कालोचित भाष्य करून, अगदी रोजच्या व्यवहारातील संदर्भ देत, एकेका गोष्टीची उकल करत - उदा., आपण निवेदितादीदींच्या प्रवचनाला बसलो आहोत आणि त्या आपल्याशी संवाद साधत आहेत असाच पुस्तक वाचताना भास होतो. आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रवचनाला जाणे किती शक्य आहे कल्पना नाही. पण ‘धर्मपालनासाठी रामायण’ हे निवेदितादीदींच्या रामायणावरील सात प्रवचनांचे पुस्तक वाचून रामायण सार्वकालिक, सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकास साधणारे महान काव्य आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

‘रामकथामाला’
 
 
“मानवतेला प्रेरणा देणारं हे राममंदिर संस्कृतीचं प्रतीक ठरेल. आसेतुहिमालय भारत आज राममय झाला आहे” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर भूमिपूजनाच्या वेळी काढलेले त्यांच्या भाषणातील गौरवोद्गार. भाषणातील हे वाक्य केंद्रस्थानी घेऊन देशविदेशातील संस्कृतींचे दर्शन घडवणारे ‘रामकथामाला’ हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक विवेकानंद केंद्राने नुकतेच प्रकाशित केले आहे. रामायणाचे जगभरचे आकर्षण याविषयी अभ्यास असलेल्या दीपाली पाटवदकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
 
रामकथा देश, भाषा, धर्म, पंथ अशी कोणतीच बंधने मानत नाही. ती केवळ भारताची नाही, हिंदूंची नाही, तर संपूर्ण मानवजातीची कथा आहे. अनेक देशीविदेशी भाषांतून, अनेक उपासना पंथांतून, अनेक महाकाव्यांतून रामायणाची अभिव्यक्ती झाली. अभिजात गायनातून, रंगीत चित्र-शिल्पातून, नृत्य-नाट्यातून, लोकगीतातून, छाया-प्रकाशाच्या खेळातून, कठपुतळ्यांच्या माध्यमातून सादर होणारी बहुभाषिक, बहुराष्ट्रीय रामकथा, फडके-माडगूळकरांच्या गीतरामायणातून सादर झालेले रामायण यातूनच साकार झाली ही रामकथामाला. गायत्री मंत्राच्या 24 अक्षरांसाठी, वाल्मिकींच्या 24 सहस्र श्लोकांसाठी, श्रीविष्णूंच्या 24 विभवांसाठी, 24 प्रकरणांत सादर झालेली रामकथा म्हणजेच रामकथामाला होय.

महाकाव्य, खंडकाव्य, चित्रकाव्य, श्लेषकाव्य, शृंगारकाव्य, नाटक, चम्पू, कथा, कादंबरी, स्तोत्र अशा विविध साहित्यप्रकारांतून रामायण लिहिले गेले आहे आणि या पुस्तकातून आपल्याला त्याची ओझरती माहिती होते. रामकथेचा विचार सर्वात प्राचीन अशा वैदिक साहित्यापासून झालेला आहे. ऋग्वेदात रामकथा संक्षिप्तपणे आलेली आहे. वाल्मिकी रामायणातील प्रत्येक हजाराव्या श्लोकाचे आद्याक्षर घेतले असता गायत्री मंत्र तयार होतो. वाल्मिकी रामायण हा रामकथामालेतील मुकुटमणी ठरला आहे. रामकथा प्रमाण मानावी, तर वाल्मिकींचे रामायण इतके त्याचे महत्त्व आहे. लेखिकेने वाल्मिकी रामायणात प्रत्येक कांडात येणार्‍या कथाभागांची बिंदुरूपाने ओळख करून दिली आहे.
 
 
व्यासांचे रामोख्यान यामध्ये महाभारतात तीन ठिकाणी रामाची कथा आली आहे. वनपर्वात रामाची कथा ‘रामोपाख्यान’ या नावाने आली आहे. पुराणातील रामकथा या प्रकरणात स्कंद पुराणातील अयोध्या माहात्म्य, अयोध्या तीर्थक्षेत्राची महती आली आहे. रामजन्मभूमीच्या निकालासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरली. भास नावाचा एक मोठा नाटककार होऊन गेला. भासाची दोन नाटके रामायणावर आधारित आहेत. भासाने आपल्या कल्पनाशक्तीने रामकथेतील प्रसंग रंगवले आहेत. हे नाटक शब्दरूपात रेखाटून लेखिकेने नाटकाचे सादरीकरण केलेले आहे.
 
संस्कृत काव्याला पडलेले एक रम्य स्वप्न म्हणजे कालिदास! असे असले, तरीही त्याची ओळख ही रघुकार म्हणूनच केली जाते. इ.स. 420मध्ये प्रवरसेन गादीवर आला. तो रामभक्त होता. त्याने रामकथा लिहिली. त्याचा थोडका इतिहास या प्रकरणात मांडला आहे. रामचरितमानस म्हटले की तुलसीदास यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या रामचरितापासून रामकथा सांगणे आणि रामलीला यांचे सादरीकरण होऊ लागले. कठीण काळात उत्तर भारतात तुलसीदास यांच्या रामचरितमानसने धर्माची पुन:स्थापना करून समाजाला नवी उभारी दिली.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. समाजाची निकोप वाढ व्हावी, म्हणून समाजाला सन्मार्गाने जाण्यासाठी संताचे कार्य अफाट आहे. संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहून स्वराज्याचे स्वप्न बघायला भाग पाडले. तसेच सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी समाजाला पुन्हा नव्याने श्रीरामांची ओळख करून दिली.
 
गाण्यातून रामायण सादर करणे ही अभिनव संकल्पना गदिमांच्या गीतरामायणातून साकार झाली. याची अनेक भाषांत भाषांतरेही झाली. गीतरामायणाद्वारे लव-कुशांकडून रामायण ऐकतो आहे अशी भावना होऊन अनेकांचे कान तृप्त झाले आहेत. दक्षिणेतील रामायण या प्रकरणात दक्षिण भारतात प्रचलित असणारी रामायणे संक्षिप्त परंतु मुद्देसूद मांडली आहेत. भारतीय नीतिमूल्यांची कथा म्हणजे रामायण. म्हणून प्रत्येक साहित्यात, प्रत्येक पंथात आपापल्या पंथाच्या शिकवणीला अनुसरून रामकथेत बदल केलेले दिसतात. ज्या पंथात रामकथा आहे, त्या पंथाच्या चश्म्यातून रामकथा पाहावी, असे लेखिका सुचवते.
 
रामकथा ही अशी गोष्ट आहे की, प्रत्येकाला ती आपलीशी वाटते. म्हणूनच पर्शिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, मंगोलिया, लाओस, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, थायलंड, नेपाळ या देशांत रामायण हे आपल्या संस्कृतीचे चिन्ह म्हणून अभिमानाने मिरवतात. थायलंड येथे रामाकेन हे त्यांचे राष्ट्रीय महाकाव्य आहे, नेपाळमध्ये ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. अशी कितीतरी उदाहरणे आणि दाखले देऊन राम हा विदेशातील देशांच्या चराचरामध्ये कसा विराजमान आहे, याचे दर्शन या पुस्तकातून घडते.

चित्रातील रामकथा या प्रकरणात विविध प्रांतांतील चित्रशैली आणि त्याच्या प्रकारांची माहिती चित्रांसहित अतिशय देखण्या पद्धतीने मांडली आहे. रामचित्रकथाही कुठल्याही बंधनात न अडकता सीमा ओलांडून विविध देशांतून रेखाटलेल्या श्रीरामांचे चित्रदर्शन आणि त्याची थोडक्यात माहिती या प्रकरणात दिली आहे. शिल्पातील रामकथा या प्रकरणात भारतीय जीवन सर्वांगांनी रामकथेने मोहरून गेले आहे. भारतभर रामायणातील कथेवर केलेली शिल्पे पाहायला मिळतात. तसेच आग्नेय आशियामधील अनेक मंदिरांवर रामकथेतील देखावे कोरले आहेत. कंबोडिया अंकोरवट या मंदिराच्या भिंतीवरही रामायणातील प्रसंग कोरले आहेत. ज्या संस्कृतीने रामायण जपले, त्या संस्कृती टिकल्या आहेत.

 
नृत्यनाट्यातील रामकथा, लोककलेतील रामकथा, या रामायण किती अंतर्बाह्य जनमानसावर रुजले आहे, याचेच दर्शन घडवतात. कला ही उपजत असावी लागते आणि रामायण हेदेखील असेच अंतर्मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. ‘आधुनिक रामकथा’ या प्रकरणात रामायणाचे आजच्या काळात संदर्भ बदलून आशय एकच ठेवून त्याचे प्रकटीकरण केलेले दिसते. म्हणूनच लॉकडाउनच्या काळात तीस-बत्तीस वर्षांनंतरही प्रदर्शित झालेले रामानंद सागर यांचे रामायण तेवढाच टीआरपी खेचणारे ठरले.
 
 
सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती याचे स्पष्टीकरण - ‘रामायण : सांस्कृतिक वारसा’ या प्रकरणात याची मांडणी अगदी मुद्देसूद केलेली आहे. रामायण आपला सांस्कृतिक वारसा आहे. आपण या वारशाचे जतन केले पाहिजे. रामकथा ऐकणेे, सांगणे, लिहिणेे, गाणे, त्या कथेचा आनंद देणे-घेणे हे फक्त आपल्या सुखासाठी नाही, तर आपल्या पुढील पिढीला संक्रमित करण्यासाठी आहे.

रामकथामाला हे पुस्तक शेकडो वर्षे उलटूनही रामायणाचे आकर्षण किती कालातीत आहे, याचे महत्त्व पटवून देणारे आहे. पुस्तक हे नेहमीच्या पुस्तकांपेक्षा वेगळ्या धाटणीचे झालेले आहे. संपूर्ण पुस्तक रंगीत असून विविध प्रांतांतील, देशांतील रामायणाशी संबंधित चित्रकला, शिल्पकला यांची सुंदर मांडणी करणारे आणि देखणे झालेले आहे. भारत सरकारने रामायण सूत्र धरून तयार केलेली पोस्टाची तिकिटे आणि परदेशातील पोस्टाची तिकिटेही चित्ररूपात या पुस्तकात दाखवली आहेत.

 
आताच्या पिढीचा विदेशी अनुकरणावर जो भर आहे, हे आपली संस्कृती नेमकी काय आहे, हे न समजणे हेच आपल्या संस्कृतीचा र्‍हास होण्याचे मूळ आहे. अशा पिढीला हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि तिचे विदेशस्थित लोकांनी केलेेले अनुकरण याचे उत्तम उदाहरण आहे.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.